सावरकरांचे विचार तपासताना

Vinayak Damodar Savarkar

[Image Source: Link]

सावरकर जयंती किंवा पुण्यतिथी आली की हल्ली सावरकरांच्या गीतांचे ठराविक कार्यक्रम असतात, अंदमानच्या सहलींच्या जाहिराती येतात. सावरकरांच्या आठवणी जाग्या ठेवण्यासाठी हे उपक्रम स्तुत्य आहेत पण सावरकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर पुरेसे आहेत का? ह्या वर विचार केला गेला पाहिजे म्हणून हा लेख.

सावरकरांचं व्यक्तिमत्व बहुपैलू आहे. ते ज्या काळात जन्मला आले, ज्या परीस्थितीचा सामना केला त्यातून ते घडले, म्हणूनच काळानुसार ते विचार कालबाह्य झाले आहेत का ते तपासणे गरजेचे आहे. सावरकरांनी कल्पना केलेलं हिंदू राष्ट्र काही स्वतंत्र भारताने स्वीकारलं नाही. एक सेक्युलर राज्य त्याच्या अंगभुत गुणदोषांसकट जन्माला आलं. इतकं की देशाचा विकासदर हा हिंदू रेट ऑफ ग्रोथ आहे अशी टिका झाली. असं असताना सावरकर जयंतीनिमित्त हिंदू राष्ट्र वगैरे संज्ञा वाचायला मिळतात तेव्हा सावरकरांचा आदर करणारा म्हणून अतिशय वाईट वाटत. जो बुद्धिवाद सावरकरांनी अभिमानाने मिरवला तोच वापरून सावरकरांच्या कालबाह्य संकल्पनांना बाजुला सारून अद्त्यतन होण्याची गरज आहे. महापुरुष नेहमी बरोबर असतोचं असं नाही. बदलत जाणारा काळ हे एकच सत्य मानून नव्या विचारांची मांडणी आवश्यक ठरते. कारण काळ पुढे गेला की संस्कृती, समाज, जीवनमूल्य सर्वात आमूलाग्र बदल होतो. मागच्या पिढीला मुक्तिदायी वाटणारे विचार पुढच्या पिढीच्या बेड्या ठरतात.

विचारधारा म्हणून जगभर आपले हातपाय पसरलेल्या मार्क्सवादाला Frankfert School ह्या मार्क्सवादाच्या उपशाखेने जबरदस्त आव्हान दिले, मार्क्सचे विचार नव्याने मांडले. महाराष्ट्रात सावरकरांचे विचार नव्याने मांडण्याचे काम शेषराव मोरे पुस्तकं लिहून, विचार मांडून करत आहेत पण त्यांचा प्रसार कितीसा असणार? सरकारी पातळीवर ह्या बाबतीत अनास्था दिसते आहे. Twitter वरून सावरकरांना मानवंदना देणारे माननीय पंतप्रधान मोदी प्राचीन भारतात जनुकीय विज्ञान प्रगत असल्याचे दावे करतात. हिंदूहृदयसम्राट सावरकर समोर ठेवून बुद्दीवादावर पडदा टाकण्याचा प्रकार सगळीकडे दिसतो. सध्या गोरक्षकांनी उच्छाद मांडला असता गायीं विषयी सावरकरांचे मत समजले असते तर त्यांना विरोधाला नक्कीच तोंड द्यावे लागले असते.

संस्कृतप्रचुर हिंदी बोलणाऱ्या हिंदुत्वादी मंडळींना उर्दूचे वावडे. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेने लेखकांनी देशविरोधी लिहू नये म्हणून फर्मान काढल्याची बातमी १९ मार्च २०१६ साली आली होती. उर्दू मधून लिहलेले दिल्लीची स्तुती करणाऱ्या ओळी पुसून टाकण्याची बातमी २९ मे २०१६ साली आली होती. विरोधाभास म्हणजे सावरकरांनी लिहलेल्या उर्दू गझला गेल्या काही वर्षांपूर्वी सापडलेल्या आहेत. उर्दूचे महान शायर निदा फ़ाज़ली ह्यांनी त्या गझलांचे कौतुक केल्याची नोंद आहे. भाषा म्हणून संस्कृतीचा भाग असलेल्या आणि भारत सरकारच्या अधिकृत भाषांपैकी एक असलेल्या उर्दूची अशी अवहेलना नक्कीच नैतिक नाही. पाकिस्तानने निर्मिती नंतर एक उर्दू भाषा सोडून बाकी सगळ्या भाषांना गुदमरून मारले, त्यांचे अस्तित्व नष्ट केले. त्यांनी जे केलं तेच आपण करत असू तर “तुम बिलकुल हम जैसे निकले” असं फहमिदा रियाज़ खरं बोलत आहेत का? असं वाटते.

तीच गत सावरकरांच्या भाषाशुद्धीची. सावरकर ज्या काळात कार्यरत होते त्या काळात देशाची भाषा ठरवण्यापासून सुरवात होती. सुभाषचंद्र बोसांसारख्या नेत्यांनी तर हिंदी हि रोमन लिपीत असण्याची इच्छा व्यक्त केली होती. सांगण्याचा उद्देश एवढाच की भारताच्या भविष्य बद्दल सगळे आपापले अंदाज बांधत होते. मराठी संपते ची जी तक्रार एकोणिसाव्या शतकापासून सुरु होती त्याच्या प्रभाव सावरकरांवर असावा आणि मराठी भाषेत नवीन शब्द आणण्यासाठी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. एकविसाव्या शतकात अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान झपाट्याने बदलताना माईक हा शब्द ध्वनिक्षेपका पेक्षा सुटसुटीत वाटणारच. भाषाशुद्धी पेक्षा भर सोपीकरणावर असला तर प्रादेशिकभाषा जास्त लवकर रुजू शकतात.

साधू, बैरागी हल्ली टेलिव्हिजनच्या माध्यमातून घरात डोकावत असतात. आधी ईश्वर मग धर्म नंतर त्यांची उत्पादने मिरवत फिरवताना आढळतात. त्यांची लॉकेट्स, जपमाळ, अंगारे लावून फिरणारे बरेच लोक आढळतात. नुकताच भारतीय तरुण पिढी पुराणमतवादी असा सर्वे ‘सेंटर फॉर डेव्हलपिंग सोयायटीस’ ह्या दिल्लीस्थित संस्थेने केला आहे. नागरिकांनी उपभोग्य वस्तू होऊन बुवाबाजीला बळी पडल्याचे हे लक्षण आहे. ह्या लेखाचा शेवट सावरकरांच्या अश्याच एक उताऱ्याने करणे योग्य ठरेल. सावरकर त्यांच्या विज्ञाननिष्ठ निबंधात म्हणतात, “ती विश्वाची आद्यशक्ति ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील, ते समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मुनष्याच्या हातात आहे. मुनष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट. अशी निती-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत पेक्षा विश्व आपले नाही; फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे – असे जे आहेत ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरी तीच पूजा!!”

लेखक – निनाद खारकर

संपर्क – k.ninad11@gmail.com