अरबस्तानाची ‘गंगा’

Great Mosque of Mecca

[Image Source: Link]

मध्यंतरी माझ्या वाचनात आलं की इस्लामपूर्व अरबस्तानात अँटीबायोटिक्स म्हणून उंटीणीचे मूत्र वापरत असत. नवजात अर्भकांना त्यामध्ये पहिली अंघोळ घालत असत. उत्सवाच्या प्रसंगी यजमान ते शिंपडून कामाला सुरवात करत असे. वरच्या वर्णनातून ‘उंट’ काढून टाका आणि ‘गाय’ वाचा. गरज आणि उपयोग तेच पण प्रदेश बदलाला कि प्राणी बदलला. तसचं आणखी एक अतिशय मजेदार उदाहरण आहे. खरं म्हणजे ती एक गोष्ट आहे. एक अशी गोष्ट कि ज्यामध्ये सेमेटिक परंपरेतले तीनही धर्म जोडले गेलेले आहेत. एका गोष्टीच्या माध्यमातून तीन धर्माच्या परंपरांत शिरता येतं. बघा आता कसं ते. ‘सेमेटिक परंपरा’ असा आता जिथे जिथे शब्दप्रयोग होईल तिथे तिथे ‘ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम’ असे तीन धर्म एकत्र वाचावे.

जगाचा इतिहास ज्या तीन संस्कृतींनी घडवला असे म्हणता येईल अशा तीन संस्कृती म्हणजे ‘ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम’. हे तीनही धर्म एकाच माळेतले धर्म आहेत. या विश्वाची निर्मिती कशी झाली, कोणी केली, का केली हे तत्वज्ञानाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर या सेमेटिक परंपरेकडून सारखीच दिली जातात. उदा. ‘द गॉड’ म्हणजे ईश्वरातला एकमेव ईश्वर म्हणजे, त्याने सलग सहा दिवस विश्व निर्माण केलं आणि सातव्या दिवशी आराम केला. म्हणून रविवारी सुट्टी असते, असे मानले जाते. मग असे सात दिवस विश्व निर्माण करून झाल्यावर या विश्वाच्या नियंत्रणासाठी देवदूतांची व्यवस्था केली. वेळोवेळी जेव्हा ‘अधर्माचा प्रभाव वाढतो’ तेव्हा तेव्हा ‘द गॉड’ किंवा ‘अल्लाह’ देवदूतांच्या मार्फत शुद्ध धर्म पृथ्वीवर पाठवतो. वगैरे वगैरे.. या सेमेटिक परंपरेच्या तत्वज्ञानानुसार पृथ्वीवरचा पहिला माणूस आणि सजीव सृष्टीला सत्य धर्माची शिकवण देणारा पहिला प्रेषित म्हणजे ‘अॅडम’ (हे ख्रिश्चन नाव) किंवा ‘आदम’ (हे इस्लामी नाव). वेळोवेळी आणि गरज पडेल तेव्हा ‘द गॉड’ने किंवा ‘अल्लाह’ ने पृथ्वीवर प्रेषित पाठवले. एक परंपरा प्रेषितांची संख्या 1 लाख 24 हजार मानते. पण 1 लाख 24 हजार ही प्रेषितांची संख्या नसून देवदूतांची आहे, असेही एक परंपरा मानते. पण ते जाऊदे!

काळाच्या प्रवाहामध्ये ‘अल्लाह’ने किंवा ‘द गॉड’ने पाठवलेल्या सत्य धर्माच्या संदेशात काही प्रक्षिप्त भाग दाखल झाला. ईश्वरी संदेशात मानवाचा हस्तक्षेप वाढला. उदा. आपल्याकडे बघा अनेकदा अशी चर्चा चालते कि पुरुषसूक्तातील पहिले, दुसरे व नववे, दहावे मंडल प्रक्षिप्त आहे. म्हणजे मूळ लेखकांनी, तो भाग लिहिलेला नाही. नंतरच्या काळात बदललेल्या परिस्थीतिनुसार नंतरच्या विचारवंत लेखकांनी तो भाग वाढवला. असा प्रकार मध्यपूर्वेतही घडलेला आहे. काळाच्या भाषेत बोलायचं तर सेमेटिक परंपरेतला पहिला धर्म ज्यू. ‘अल्लाह’ने किंवा ‘द गॉड’ने ‘मोझेस’ किंवा ‘मुसा’ याच्याबरोबर सत्य धर्माचा संदेश पाठवला. तो ईश्वरी ग्रंथ म्हणजे ‘तोराह’, पण ईश्वर आणि सामान्य माणूस यांच्यात मध्यस्थ आला तर धर्म बिघडतो हा अनुभव सगळीकडचा आहे. पुरोहितवाद त्याने वाढीला लागतो. ज्यूंचे धर्मप्रमुख ‘राबाय’ यांनी धर्म बिघडवला. लोकांचे हाल सुरु केले, सत्य धर्माचे वर्चस्व संपत गेले. हे पाहून ‘द गॉड’ने किंवा ‘अल्लाह’ने एका ज्यू स्त्रीच्या पोटी जिझसला जन्माला घातले. जिझसच्या आईला ‘व्हर्जिन मेरी’ म्हणतात. ईश्वराने थेट मेरीच्या पोटी आपला अंश ठेवला. त्या जिझसने पुढे जाऊन जो संदेश दिला त्याला धर्माचे रूप आले, आणि तो धर्म बनला ‘ख्रिश्चन.’ त्यांचा धर्मग्रंथ म्हणजे ‘बायबल.’ त्यांच्यासुद्धा धर्माची गोष्ट तशीच. मध्यस्थांनी धर्माचा विपर्यास केला. किंवा लोकं सत्य धर्मापासून दूर गेले. मागच्या दोन वेळेचा अनुभव लक्षात घेऊन ‘द गॉड’ने किंवा ‘अल्लाह’ने पुन्हा संदेश पाठवला. आणि यावेळी तो शुद्ध राहील याची काळजी घेतली. तो शुद्ध रहावा यासाठीची व्यवस्था निर्माण केली. यावेळी पाठवलेला प्रेषित म्हणजे ‘मुहंमद’ तो अल्लाहचा पैगाम म्हणजे संदेश घेऊन आला म्हणून ‘मुहंमद पैगंबर’ झाला. ‘ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम’ परंपरा सुसंगत आहे. शेवटी आलेला इस्लाम, त्यांचा धर्मग्रंथ ‘कुराण’ आधीचे सर्व प्रेषित मान्य करतो कारण ते अल्लाहनेच पाठवले होते आणि शेवटी सांगतो या मालिकेतला आता हा शेवटचा धर्म, धर्मग्रंथ, प्रेषित! आता अल्लाह पुढे प्रेषित पाठवणार नाही. अल्लाहने त्याचा सर्व संदेश मुहंमदाच्याद्वारे मानवाकडे पाठवला म्हणून तो सर्वश्रेष्ठ प्रेषित आहे. आता गोष्टीला सुरवात करूया.

सर्वात पहिला धर्म आणि प्रेषित म्हणजे ‘ज्यू’ आणि ‘मोझेस’ यांच्याही आधी एक प्रेषित होऊन गेला त्याचे नाव ‘अब्राहम.’ या तीन धर्मांना ‘अब्राहमिक’ रिलीजनसुद्धा म्हणतात. अब्राहम स्वतः प्रेषित होता. आता इस्लामी परंपरा मानते की आदम पासून पृथ्वीवर इस्लाम स्थापन झालेलाच आहे. पण काळाच्या प्रवाहात तो काही काळ मागे पडत गेला. या अब्राहमला अनेक मुलं होती. यापैकी पहिली दोन पुढे प्रेषित झाली. ती म्हणजे ‘आयझॅक’ आणि ‘इस्माईल’ पण ते पुढे. ‘हेगर’ म्हणजे अब्राहमची दुसरी पत्नी. तिच्या पोटी इस्माईलचा जन्म झाला आहे. काही परंपरा मानतात की ‘हेगर’ ही अब्राहमची गुलाम होती. काही परंपरा मानतात की ती इजिप्तच्या सम्राटाची गुलाम होती, अब्राहमने तिला सोडवून आणले. तिच्यापासून अब्राहमला इस्माईल झाला. पण त्याने फरक पडत नाही. ‘इस्माईल’ आणि ‘आयझॅक’ हे दोघेही काही महिन्यांचे असताना अब्राहम हेगरला सोडून काही महत्त्वाच्या कामानिमित्त पुढे निघून गेला. आणि लहान मुलांना हेगरजवळ ठेवून दिलं. रखरखीत वाळवंटाच्या प्रदेशातून दोन लहान मुलांना घेऊन हेगर प्रवास करत होती. वाळवंटाच्या प्रदेशात दोन्ही लहान मुलांना तहान लागली, स्वाभाविकच होतं ते! आणि तहानेनं व्याकूळ होऊन दोन्ही मुलं रडायला लागली. आपली मुलं रडत आहेत हे पाहून हेगर कासावीस झाली. तिला काही सुचेना. कदाचित मुलांचा मृत्यू सुद्धा होण्याचा संभव होता. पण मुलाचं रडणं ऐकून अल्लाहने आपला देवदूत ‘जीब्राईलला’ पाठवले. पंख असलेला ‘जीब्राईल’ वाळवंटात जिथे उभा राहिला आणि त्याचेे पंख जिथे जमिनीला टेकले तिथे पाण्याचा प्रवाह जमिनीतून वर आला. ते पाणी मुलं प्यायली आणि वाचली. ‘हेगर’ आणि ‘अब्राहम’ यांची श्रद्धा तपासून पाहण्यासाठी अल्लाहने हा सगळा खटाटोप केला होता. त्या परीक्षेत ‘हेगर’ आणि ‘अब्राहम’ दोघेही उत्तीर्ण झाले, असे इस्लामी परंपरा मानते. ही सर्व गोष्ट ‘ज्यू’ धर्माची स्थापना होण्याच्या आधी घडते.

आता या गोष्टीची वेगवेगळी रूपं आहेत. एक परंपरा म्हणते जिथे मुलं रडत हातपाय हलवत होती, तिथे मुलांचे पाय जमिनीला लागून खड्डा तयार झाला त्यातून पाण्याचा प्रवाह बाहेर आला. वगैरे वगैरे!! मुलांचे प्राण वाचले, श्रद्धा तपासून झाली, आता पाण्याचा प्रवाह थांबवा म्हणून हेगर प्रार्थना करू लागली. ‘प्रवाह थांबवा’ (stop flowing) याला अरबीमध्ये ‘झमझम’ म्हणतात. आता इस्लामी जगामध्ये ‘झमझम’ची विहीर किंवा ‘झमझम’चे पाणी या नावाने हि गोष्ट अजरामर आहे. मक्केतील इस्लाममधली सर्वात पवित्र मशीद ‘मस्जिद-अल-हराम’ पासून हि ‘झमझम’ची विहीर साडेचार किलोमीटर लांब आहे. ‘झमझम’च्या पाण्याची गोष्ट बायबल, तोराह आणि कुराण या तिन्हीही धर्मग्रंथात आहे. याचे कारण अब्राहम हा तीनही धर्माचा प्रेषित मानला जातो.

Holy Zamzam Well
[Image Source: Link]

पृथ्वीवरचे सर्वात पवित्र पाणी म्हणून प्रेषित पैगंबर यांनी तिचे कौतुक केले आहे. आपल्याकडे गंगेच्या पाण्याला जे महत्त्व आहे, तेच झमझमच्या पाण्याला आहे. प्रेषितांची एक इंटरेस्टींग गोष्ट आहे. संत ‘तुकाराम महाराज’ ज्याप्रमाणे सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे त्याप्रमाणे प्रेषित पैगंबर सुद्धा सदेह स्वर्गात गेले होते अशी मुसलमानांची श्रद्धा आहे. (तुकारामांच्या गोष्टीला हिंदू दंतकथा इ.म्हणतात, प्रेषितांच्या गोष्टीला मुसलमान दंतकथा म्हणतील का?) प्रेषितांच्या ‘हादीस’मध्ये याची गोष्ट आहे. मुहंमद पैगंबर यांच्या मनातील सैतानाचा अंश काढून टाकण्यासाठी देवदूत ‘जीब्राईल’ याने प्रेषितांचे हृदय बाहेर काढले आणि ‘झमझम’च्या पाण्याने धुतले, आणि स्वच्छ केले. स्वच्छ आणि पवित्र झालेलं हृदय पुन्हा पैगंबरांच्या शरीरात ठेवलं आणि त्यानंतर जाहीर केलं कि पैगंबरांचे शरीर आता शुद्ध झाले आहे. शरीर आणि मन शुद्ध झाल्यावर प्रेषित आणि जीब्राईल स्वर्गात गेले. या गोष्टीचा एक दुसरा भाग असं सांगतोे, कि शुद्ध मनाने आणि शरीराने स्वर्गात नेण्यासाठी जेव्हा जीब्राईल प्रेषितांना नेण्यासाठी आले तेव्हा प्रेषितांचे शरीर आणि मन झमझमच्या पाण्याने धुवून स्वच्छ केले होते.

Religional Unscientificness And Rationalism

आज सुद्धा हजच्या यात्रेला जाणारे मुसलमान परत येताना ‘पृथ्वीवरचे सर्वात पवित्र पाणी’ म्हणून झमझमच्या विहिरीचे पाणी घेऊन येतात. फक्त सौदी अरेबिया सरकारने हे पाणी पिण्यास आता मनाई केली आहे. पाण्यातील काही अंश विषारी किंवा मानवी शरीराला अपायकारक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (हजच्या यात्रेला गेलेल्या एका ओळखीच्या माणसाने मला ही पाण्याची छोटीशी बाटली दिली आहे.) हा जो फोटो दिला आहे, तो फोटो म्हणजे माझं या समस्येला असलेलं उत्तर आहे. मी ज्याला समस्या म्हणतो आहे ती नेमकी काय आहे ते सांगतो आता. वरची संपूर्ण गोष्ट अशास्त्रीय आहे. म्हणजे मूळ स्वरूपावर शेंदूर फासलेली आहे. ‘हेगर’ने मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले असतील त्यात एखादा भूजलाचा प्रवाह तिला सापडला असेल. गोष्टीचे मूळ स्वरूप याच प्रकारचे असू शकेल. पंख असलेले देवदूत आले, त्यांचे पंख जिथे जमिनीला टेकले तिथे पाण्याचा प्रवाह सुरु झाला, असा युक्तिवाद करणे म्हणजे मखलाशी आहे. हे शक्य नाही. यात आणि रामाने बाण मारून पाण्याचा प्रवाह सुरु केला यात काहीही फरक नाही. यामध्ये समस्या मला कोणती दिसते? तर भारतीय सुशिक्षित लोकं सहज म्हणू शकतात कि ‘असं काही होत नसतं. बाण मारून पाणी येत नसतं. त्यासाठी खोदण्याशिवाय पर्याय नाही.’ पण मुसलमान लोकं यावर विश्वास ठेवतील. पंख असलेल्या देवदूतांच्यावर ते विश्वास ठेवतील. जीब्राईल याने प्रेषितांचे शरीर अंतर्बाह्य झमझमच्या पाण्याने धुवून शुद्ध केले यावरही ते विश्वास ठेवतील. बहुसंख्य हिंदू ‘बाणातून पाणी’ या गोष्टीला हसून प्रतिसाद देतील. माझी अशी शंका आहे कि त्याच प्रसन्नपणाने झमझमच्या पाण्याच्या गोष्टीवर ‘असं कुठं असतं का राव!’ असं म्हणून मुसलमान हसतील का? मला असं वाटतं कि गोष्ट ऐकल्यावर मुसलमान भक्तिभावाने हात जोडतील आणि ‘आमेन’ म्हणतील. आधुनिकतेला असलेला विरोध यातून दिसतो. ‘आधुनिकता’ ह्याची व्याख्या कोणती हा चर्चेचा वेगळा मुद्दा आहे. पण ‘आधुनिकते’चा अर्थ साधारणपणे ‘वैज्ञानिक दृष्टी’ असा मी घेतो आहे. वैज्ञानिकतेला असलेला विरोध त्या भक्तिभावातून दिसतो. माझ्या मते समस्या तीच आहे. एकट्या मुसलमानांची ही समस्या आहे असही मला वाटत नाही. जो हिंदू माणूस ‘बाणातून पाणी’ या गोष्टीवर हसून प्रतिसाद देणार नाही, त्याचा सुद्धा आधुनिकतेला विरोध आहे असं मी समजतो. ‘वैज्ञानिक दृष्टी’ला असणारा विरोध ही समस्या आहे. त्याचं उत्तर या फोटोत आहे. फोटोमध्ये बघा काय काय आहे. समोर ते झमझमचं पाणी आहे. त्याच्या शेजारी गणपती आहे. आणि मागे ‘रधों कर्वे’ यांच्या लेखांचा संपूर्ण सेट. ‘गणपती आणि झमझमचं पाणी’ परंपरावादी मानसिकतेचं लक्षण आहे. त्याच्यावर उत्तर म्हणजे रधोंचा ‘बुद्धीप्रामाण्य’वाद! तो तुम्हाला झमझमच्या गोष्टीवर आणि गणपतीच्याही गोष्टीवर हसून प्रतिसाद देण्याची ताकद देईल. त्या हसण्याच्या ताकदीने भारतासमोरचे अनेक प्रश्न सहज सुटणार आहेत.

ता.क. –

1. वरीलपैकी कोणतीही गोष्ट वाचून त्याच्या अशास्त्रीयतेवर हसण्याच्या आधी हा विचार करा की, एका अवाढव्य प्राण्याचे (हत्ती) शीर काढून ते माणसाच्या (हत्तीच्या तुलनेत अतिशय लहान असलेल्या) शरीराला बसवले, हे शास्त्रीय आहे का? हिंदू वर्षानुवर्ष गणपतीची मनोभावे पूजा करतो, त्यामुळे झमझमच्या गोष्टीवर परंपरावादी हिंदूंनी हसू नये.

2. शेवटी मुसलमानांसहित सर्वांनी आपल्या गणपतीच्या गोष्टीवर आणि झमझमच्या पाण्याच्या गोष्टीवर हसून, हलकं फुलकं मनोरंजन करून घ्यावं हेच उद्दिष्ट असायला हवं.

3. ‘द गॉड’ असा वेगळा उल्लेख करण्याचे कारण विशेष आहे. इंग्लिश मध्ये ‘द’ हा शब्द एकमेवाद्वितीयत्व अधोरेखित करण्यासाठी वापरतात. केवळ गॉड या शब्दाचा अर्थ ईश्वर, ‘द गॉड’ म्हणजे एकमेवाद्वितीय ईश्वर. त्याप्रमाणे अरबी भाषेत ‘अल’ हा शब्द इंग्लिश ‘द’ प्रमाणे वापरतात. ‘किताब’ या शब्दाचा अर्थ साधे पुस्तक, त्याचे ‘अल किताब’ झाले कि विशेष पुस्तक म्हणजे ‘कुराण’ होतं. अल्लाह हा शब्द ‘अल+ इलाह’ असा बनलेला आहे. ‘इलाह’ म्हणजे ईश्वर, अल इलाह म्हणजे एकमेवाद्वितीय ईश्वर म्हणजे अल्लाह.

लेखक – संपादक मुकुल रणभोर

संपर्क – mukulranbhor111@gmail.com