सडकेपासून संसदेपर्यंत निनादणारा आवाज – दुष्यंत कुमार

दुष्यंत कुमार

#दिवाळी_अंक_२०१८

सत्तरचं दशक होतं. देशात सामाजिक आणि राजकीय प्रलयाचा काळ बेचैनीचं वारं घेऊन घोंगावत वाहत होता. त्यावेळी एक युवक एकांतात आपल्या लेखणीत परीवर्तनाचा रंग भरत होता. विचार कूस बदलत होते. 1974 सालात जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन प्रतिक्रांतीच्या तयारीत होतं. गरज होती चांगल्या लोकाभिमुख राजकीय व्यवस्थेची… यातच काही शब्द ‘इंकलाब’ बनून समोर आले….

संपूर्ण क्रांती

मत कहो कोहरा घना है

यह किसी की व्यक्तिगत आलोचना है…

त्यावेळी जनतेच्या घुसमटीचा आवाज होऊन जे नारे सामान्य माणसांच्या ओठी बुलंद झाले होते, ते शब्द इंकलाबी कवी दुष्यंत कुमार याच्या लेखणीतून बाहेर पडत होते. गझलेला चालणं, बोलणं आणि क्रांती बनविणारा दुष्यंत कुमार! वाचा हरविलेल्या मुक्या देशाला आवाज देणारा दुष्यंत! मुडद्यांचे हात हलवत चालण्याची भाषा करणारा, आभाळाच्या छातीत दगड मारण्याचं धाडस करणारा दुष्यंत! हे सारं तो कवी म्हणून लिहीतच नव्हता तर लेखणीला हत्यार बनवून लढत होता. दुष्यंतच्या आधीच्या गझला प्रेयसीच्या केसांत हरविलेल्या संध्याकाळचं वर्णन करीत होत्या, तिची अधीरता आणि विरह सांगत होत्या. दुष्यंतनं त्याचं हत्यार केलं.

जय प्रकाश नारायणांचं आंदोलन जोर धरत होतं, त्यावेळी जेपींच्या छत्रछायेत काही नवीन रोपटी अंकुरत होती. त्या युवकांच्या ओठी विस्तव होऊन जे मतले बाहेर पडत होते ते दुष्यंतच्या लेखणीतून निघालेले आगीचे लोट होते. सभा कोणतीही असो, व्यासपीठ कोणताही असो, हरेक भाषणात दुष्यंतचे शब्द असे थैमान घालत जणू दुष्यंतच या आंदोलनाचा आवाज बनला आहे.

खरतर तो कवी कवी नाही, तो लेखक लेखक नाही, तो शायर शायर नाही जो आपला देश, समाज आणि त्यात राहणार्‍या लोकांचं दुःख समजू शकत नाही. त्यांचे दुःख, राग, आक्रोश आणि होणार्‍या शोषणाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आपल्या लेखणीचं हत्यार करत नाही. असं म्हणतात ‘जे न देखे रवि ते देखे कवी.’ एक कवीच मूक संवेदनांना आवाज देऊ शकतो. प्रसिद्ध हिंदी कवी दिनकरही हेच म्हणतात, ‘इन दोनोंमेंसे तुम्हे क्या चाहिये? कलम या तलवार!’ खरा साहित्यिक तोच जो त्याच्या काळाची नाडी पकडू शकेल. हिंदी साहित्यिक निर्मल वर्मा याबाबतीत म्हणतात, ‘ज्याप्रमाणं काटेरी झुडूपांत अडकलेलं एखादं कबुतर बाहेर काढताना हाताला जखमा होतात तसंच सत्याला शब्दरूप देऊन कागदावर चितारतांना माणसाला पूर्णतः जखमी व्हावं लागत.’

अगदी असंच दुष्यंतच्या गझला इंदिरा गांधीच्या जुलमी व्यवस्थेवर कडक प्रहार करत. त्या काळात इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली होती. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणार्‍या प्रत्येक कृतीवर मग ते चित्रपट असो वा साहित्य असो वा पत्रकारिता यावर बंदी आणली जात होती, निर्बंध लादले जात होते. कोणालाही संशयाच्या नजरेनं बघितलं जात होतं. सामान्य जनता घुसमटत होती, कुंठली जात होती. जुलमी सरकारविरोधातील तिचा चित्कार बंदी आणि हुकूमशाहीच्या बोजाखाली गळ्यातच दाबला जात होता. त्या चित्काराचा फुत्कार दुष्यंतनं केला. त्यानं लिहीलेल्या गझलांनी सडकेपासून संसदेपर्यंत विरोधाचा आवाज बुलंद केला. जनतेचा हरवलेला आत्मविश्वास जागा केला आणि समाजात चेतनेची आग पुन्हा पेटवली. याआधीही अनेक राष्ट्रीय चेतना जागविणारी काव्यं लिहिली गेली होती. कवी दिनकर यांनी देशप्रेमानं ओतप्रोत कविता लिहिली. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात रामप्रसाद बिस्मिल यांच्यासारख्या कवींनी ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है’ सारख्या अजरामर गझला लिहील्या. परंतु दुष्यंतनं देशातल्या व्यवस्थेसमोर जनसामान्यांची हतबलता आणि लाचारीला जो काटेरी स्वर दिला, त्या स्वरानं जनतेच्या मनाला साद घातली.

दुष्यंत कुमार त्यागी विकल हे त्यांचं पुर्ण नाव. त्यातून विकल शब्द कालांतरानं लूप्त झाला. परंतू त्यातली विकलता ‘साये में धूप’ मध्ये ‘धूप’ होऊन दिसू लागली. 1974 मध्ये ही विकलता अधिक विक्राळ झाली. ती लेखणीतून व्यक्त होतांना म्हणते,

कहाँ तो तय था चिरागाँ हरेक घर के लिए

कहाँ चिराग मयस्सर नहीं शहर के लिए.

या शेर दुष्यंतनं तत्कालीन सरकारच्या बोलण्या आणि वागण्यातील विसंगतीवर कडवं व्यंग केलं आहे. कदाचित कवितेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या मुखात सणसणीत चपराक लावणं यालाच म्हणतात. इथल्या व्यवस्थेच्या मुखात अशा चपराक दुष्यंतनं अनेकदा मारल्या आहेत. ते म्हणतात ना, जमिनीवर भूकंप होण्यासाठी केवळ नैसर्गिक संकटाची गरज नसते, एखाद्या साहित्यिकाचं ‘जखमी मन’ हे काम अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतं. विकास, समानता आणि प्रगतीची खोटी आश्वासानं आणि मत पेटीच्या स्वार्थी राजकारणावर क्षोभ प्रकट करताना दुष्यंत जनतेला सावध करताना म्हणतो,

ये रोशनी है हकीकत में एक छ्ल लोगो

जैसे जल में झलकता हुआ महल लोगो।

अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झाल्यावर दुष्यंत काही दिवस आकाशवाणी भोपाळ येथे सहाय्यक निर्माता म्हणून काम करत होता. त्या काळात अलाहाबादेत कमलेश्वर, मार्कण्डेय आणि दुष्यंत यांची मैत्री लोकप्रिय होती. कथाकार कमलेश्वर नंतर दुष्यंतचे व्याही सुद्धा झाले. वास्तविक जीवनात दुष्यंत मनमौजी मनुष्य होत. प्रारंभी त्यानं ‘परदेशी’ या टोपणनावानं लेख लिहीले. त्याच्यातला कवी-शायर जेव्हा चिंतनाची बैठक घेत असे तेव्हा त्याला वाटायचं,

तमाम रात तेरे मैकदे में मय पी है

तमाम उम्र नशे में निकल न जाय कहीं।

स्वातंत्र्यानंतर आपली आंतरिक मुल्यं इतकी खालावली की आम्हाला आमच्या देशबंधवांना फसविण्यात काहीही वाटत नाही. ‘वसुधैव कुटुंबकम्’ भावनेचा तर प्रश्नच येत नाही. आज प्रत्येक गोष्टीत माणूस स्वार्थ शोधतो आहे. जिथे स्वार्थ असेल तिथेच मित्रता दिसते. अन्यथा माणूस कोणाला ओळखही देत नाही. आजच्या या मनोदशेला व्यक्त करताना गझलकार दुष्यंत म्हणतो-

दुकानदार तो मेले में लुट गये यारो

तमाशबीन दुकानें लगाके बैठ गये।

भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या माध्यमातून सरकारी कार्यालयांतल्या लालफितीचा आणि अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराचा परमोच्च बिंदू गाठल्यावर दुष्यंत उद्विग्न होतो. मेहनतीनं जगणार्‍यांचा पक्षधर असलेला दुष्यंत दांभिक आणि सामान्यांची लुटमार करून जगणार्‍यांचा अत्यंतिक द्वेष करत असे. म्हणूनच तो म्हणतो,

यहाँ तक आते-आते सूख जाती हैं कई नदियाँ

मुझे मालूम है पानी कहाँ ठहरा हुआ होगा।

स्वातंत्र्य मिळण्याअगोदर देशात रामराज्य असावं, देशाला पुन्हा ‘सोने की चिडिया’ बनवणं, हे जनतेचं स्वप्न होतं. परंतु धार्मिक दंगे, जातीयवाद, सामाजिक वर्गीकरण, आरक्षण आदींचा आधार घेत स्वार्थी नेते भडकाऊ भाषणं-प्रचाराद्वारे भोळ्याभाबड्या जनतेला चुकीच्या मार्गावर नेत आहेत, हे दुष्यंतला कधीच रुचलं नाही. या स्वप्नभंगाच्या भकास वातावरणात दुष्यंत लिहितो,

कहीं पर धूप की चादर बिछा के बैठ गए

कहीं पर शाम सिरहाने लगा के बैठ गए

खड़े हुए थे अलावों की आंच लेने को,

सब अपनी अपनी हथेली जला के बैठ गए

आपल्याच देशात असून परकेपणाची भावना वाढू लागल्यावर भावूक झालेल्या शायराच्या हृदयातून बोल निघतात –

यहाँ दरख्तों के साये में धूप लगती है

चलो यहाँ से चलें और उम्र भर के लिए…

सत्ताधारी आपल्या ताकदीचा वापर करून आपल्या कामांना वाढून चढून दाखवत होते. सरकारचे नोकर, सरकार आणि त्याच्या योजनांचे ढोल बडवत होते. हा ढोल कधीच फुटला होता आणि त्याचा भेसूर आवाज जनतेच्या कानात बळजबरीनं शिसं वितळवून टाकावं तसा टाकला जात होता. तेव्हा सरकार, त्याच्या नोकरांना, गुलामांना दुष्यंत खूबीनं म्हणतो,

दोस्त अपने मुल्क की किस्मत पर रंजीदा न हो

उनके हाथों में है पिंजरा उन के पिंजरे में सुआ

जनतेला दिवास्वप्न दाखवलं जात होतं, 20 सूत्री कार्यक्रमांचा ज्याप्रकारे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर धडाकेबाज प्रचार केला जात होता त्यावर दुष्यंत विडंबनात्मक पद्धतीनं म्हणतो,

जिस तरह चाहो बजाओ तुम हमें

हम नहीं हैं आदमी हम झुनझुने हैं।

जे लोक स्वताःला जबाबदार, मेहरबान, सभ्रांत असल्याचं भासवतात परंतु देशाच्या स्थितीशी आणि अडचणींशी सबंध ठेवत नाही अशा लोकांबद्दल दुष्यंतला विशेष चीड होती. म्हणूनच अशा लोकांबद्दल तो म्हणतो,

लहू लुहान नजारों के ज़िक्र आया तो,

शरीफ लोग उठे दूर जा के बैठ गए।

सत्तेचा माज आणि सामान्यांची हताश शांतता पाहून दुष्यंतला आश्चर्य वाटते. तो म्हणतो, भगत, राजगुरु, सुखदेवसारख्या वीरांनी जन्म घेतलेली भूमी हीच आहे का? याच देशात वीरांगना राणी लक्ष्मीबाई आणि लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला? तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा हा नारा देणार्‍या सुभाषबाबू आणि या आव्हानाला साद देत आपल्या एकुलत्या मुलांना हसत हसत मातृभूमीच्या रक्षणासाठी, बलिदानासाठी पाठविणार्‍या मातांचा हाच तो देश आहे का? नाही, हा तो देश नाही. इथले लोकंही वीर वाटत नाहीत. झालं तरी काय आहे यांना? षंढ होऊन का बसलेत हे देशभक्त? मनात द्वंद्व घालणारे प्रश्न आणि जनतेचं मौन दुष्यंतला विचलीत करत असताना तो ठणकावून विचारतो,

यहाँ तो स़िर्फ गूंगे और बहरे लोग बसते हैं

खुदा जाने यहाँ पर किस तरह जलसा हुआ होगा

गरीब जनतेचं शोषण करून, त्यांची लचकांड तोडून इथले काही उन्मत्त सत्ताधारी श्वान जिथे आपली स्वार्थपारायणता पूर्ण करत होते, तिथेच शोषित, वंचित समाज एका एका घासाला महाग होता. सामान्य माणसाचं हे दारूण दुःख, ही करूण व्यथा दुष्यंतशिवाय कोण व्यक्त करू शकत होतं? म्हणून पुढच्या ओळीत शोषक आणि शोषित या दोहोंना नमूद करत दुष्यंत प्रकटतो,

अब नयी तहजीब के पेशे-नज़र हम

आदमी को भूनकर खाने लगे हैं।

आणि

हम ही खा लेते सुबह को भूख लगती है बहुत

तुमने बासी रोटियाँ नाहक उठाकर फेंक दीं।

याच सार्‍या व्यथांनी दुष्यंतच्या गझलेत क्रांतीचा स्वर भरला. आपल्या मनातून निघालेला आवाज जनतेच्या मनात धगधगणार्‍या तप्त लाव्हासारख्या वेदनेला ज्वालामुखीच्या उद्रेकात परावर्तीत करू शकतो, उन्मत्तपणे वाढलेल्या सत्ता पर्वतांना धुळीस मिळवू शकतो, असा दुष्यंतला पूर्ण विश्वास होता. त्याच्या याच विश्वासाला शब्दरूप देत तो म्हणतो,

वे मुतमइन हैं कि पत्थर पिघल नहीं सकता

मैं बेकरार हूँ आवाज में असर के लिए।

दुष्यंतला आपल्या कवितेला जनतेचा आवाज करून क्रांती घडवायची होती. यासाठी लोकांत दायित्वाची भावना निर्माण व्हावी असं त्याला नेहमीच वाटत असे. परंतु खूप प्रयत्न करूनही तत्कालीन समाजात त्याला ती दिसली नाही. मग व्यथित होत दुष्यंत म्हणतो,

अब तो इस तालाब का पानी बदल दो

ये कँवल के फूल कुम्हलाने लगे हैं।

आणि म्हणून या देशात, या समाजात ही दायित्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यानं ज्या ओळी लिहील्या त्या ओळींनी इतिहास रचला. या ओळींनी दुष्यंतला अमर करून टाकलं. त्यांनी दुष्यंतला हिंदी गझलेचा ‘मीर’ बनवलं. आजही सडकेपासून संसदेपर्यंत या ओळी सामान्य जनतेचा आवाज बनून त्रिकालात निनादत आहेत,

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,

इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं

मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए।

देशभक्ती, देशप्रेम दुष्यंतच्या मनात ओतप्रोत भरलेलं होतं. आपल्या देशाची तुलना गुलमोहराच्या झाडाशी करताना तो आपली देशभक्ती व्यक्त करतो,

जियें तो अपने बगीचे में गुलमोहर के तले,

मरें तो गैर की गलियों में गुलमोहर के लिए।

दुष्यंतच्या मनात नेहमीच आक्रोशाच्या लाव्हाचे धुमारे फुटत नसत. तरूण दुष्यंतच्या मनाला प्रणयाचा रंगही माहीत होता. त्याचं मनही कोणासाठी तरी धडधडायचं. हे उत्कट प्रेम व्यक्त करतांना तो म्हणतो,

एक जंगल है तेरी आँखों में, जहाँ मैं राह भूल जाता हूँ ।

तू किसी रेल सी गुजरती ही,

मैं किसी पुल सा थरथराता हूँ ।

मै तुझे भूलने की कोशिश में और

कितने करीब आता हूँ ।

कौन ये फासला निभायेगा,

मै फरिश्ता हूँ सच बताता हूँ ।

तू किसी रेल सी गुजरती है ॥

दुष्यंत केवळ व्यवस्थेविरुद्ध बंडाचा झेंडा बुलंद करीत उभा राहिला नाही तर त्यानं तांत्रिकदृष्ट्या हिंदी गझलेला मान्यता न देता तिला हीन उल्लेखण्याचं धारिष्ट्य करणार्‍यानां सडेतोड उत्तर देण्याचं कार्यही केलं.

गझल हा अतिशय नियमबद्ध प्रकार आहे. गझलेत नेहमीच मतला, काफिया, रदीफ़, बह्र (छंद) व रुक्न यांच्या बाबतीत अनेक शायरांत बरेच वाद होत असतात. दुष्यंतनं आपल्या गझलेत ‘शहर’ ऐवजी ‘शह्र’ लिहायला पाहिजे असं बोलून दुष्यंतला तत्कालीन पालखीच्या भोयांनी टोकल्यावर त्यांना उत्तर देताना दुष्यंत म्हणतो, ‘तुम्ही आमच्या ‘ब्राम्हण’ शब्दाला ‘बिरहमन’, ‘ऋतु’ला ‘रुत’ म्हणू शकता तर मग आम्ही ‘शह्र’ला ‘शहर’ का म्हणू शकत नाही?’ दुष्यंतच्या सर्वाधिक लोकप्रिय ‘साए में धूप’च्या ‘मैं स्वीकार करता हूँ।’ मध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना तो लिहितो, ‘या शब्दांचा प्रयोग मी अनभिज्ञपणे केला नसून जाणीवपूर्वक केला आहे. ‘शहर’ च्या जागी ‘नगर’ लिहून दोषमुक्त होणं, ही मोठी गोष्ट नाही. परंतु मी उर्दू शब्दांचा त्याच प्रकारे वापर केलाय. ज्या प्रकारे ते हिंदीत मिसळून गेले आहेत.’ याचा अर्थ दुष्यंतनं बोली भाषेलाच योग्य मानदंड मानले.

त्याचा गझल संग्रह ‘साये में धूप’ने हिंदी गझलकारीत अशी रेष ओढली की गझलेच्या नियबद्धतेबाबचं सारं साहित्य दुष्यंत-पूर्व आणि दुष्यंत नंतर अशा दोन कालखंडात विभागलं गेलं. त्याच्या हरेक गझलेतले सचेत वेगळेपण हेच याचं कारण होते.

दुष्यंतसारखी त्याची गझलही मनमौजीच! गझलेत काहीही झालं तरी रदीफ बदलत नसतो. आता दुष्यंतची ही गझल,

भूख है तो सब्र कर रोटी नहीं तो क्या हुआ,

आजकल दिल्ली में है जेरे बहस ये मुद्दा

गिड़गिडाने का यहाँ कोई असर होता नहीं

पेट भर कर गालियाँ दो आह भर कर बद-दुआ

इस अंगीठी तक गली से कुछ हवा आने तो दो

जब तलक खिलते नहीं हैं कोयले देंगे धुआँ

या गझलेत अनेकदा रदीफ बदलला आहे. परंतु बर्‍याचदा गझलेत असं होत नाही.

निदा फ़ाजली दुष्यंतबद्दल म्हणतात, दुष्यंतची नजर त्याच्या युगातल्या नव्या पिढीच्या राग आणि नाराजीनं सजलेली आहे. हा राग, ही नाराजी समाजातील मध्यमवर्गीयांच्या खोटेपणाच्या जागी मागासलेल्या शोषित समाजाविरुद्ध होणार्‍या अन्याय आणि राजकीय कुकर्मांविरोधातल्या नव्या आवाजाचं प्रतिक आहे.

तर हिंदीतले प्रसिद्ध कवी आणि लेखक यशपाल म्हणतात, दुष्यंतची कविता आयुष्याचा लेखाजोखा आहे. आयुष्याच्या चढउतरांत त्याची कविता अनायासे आठवतेच! त्याच्या कवितेत व्यक्त होणारं विडंबन सामान्य माणसाला आपला आवाज वाटू लागतं. वेळेला समजण्याची आणि प्रसंगी वेळेशी लढण्याची ताकत देणार्‍या या कविता आपल्या समाजातल्या हरेक संघर्षात सर्वाधिक उद्धारक आहेत.

दुष्यंतच्या गझलेसारखाच त्याच्या जन्मतारखेचा एक मजेदार किस्सा आहे. खरंतर दुष्यंतचा जन्म 27 सप्टेंबर 1933 चा. काही कारणास्तव सरकार दरबारी ही तारीख 1 सप्टेंबर 1933 नोंदवली गेली. दुष्यंत त्याच्या मित्रांच्या महफिलीत हा किस्सा खूपच मजेशीरपणे बोलून दाखवत असे. तो म्हणायचा, महिन्याच्या 27 तारखेपर्यंत खिसा रिकामा होऊन जातो. म्हणून वाढदिवसाचा आनंद साजरा करायचा असेल तर तो महिन्याच्या सुरुवातीला होणार्‍या पगारावरच साजरा व्हायला हवा.

दुष्यंत भले ही गोष्ट हसण्यात बोलायचा परंतू त्याच्या गझलांत आणि कवितांत भारतीय समाजाच्या अभाव-वेदना आणि दुर्बल घटकांच्या नाईलाजाचं विदारक दृश्य असं भरलेलं आहे जणू दुष्यंतनं त्याच्या काळातल्या घटना स्वतःच जगल्या आहेत. या कारणामुळे दुष्यंतच्या सामान्य हिंदीतल्या कलमबद्ध गझला त्याकाळातील परिवर्तनशील असणार्‍या प्रत्येक व्यक्ती आणि समूहांचं ब्रीद बनल्या. याच रचनांत त्याच्या आजूबाजूला घडणार्‍या घटनांचे संदर्भ बदलण्याची ताकद होती.

दुष्यंतनं बेचाळीस वर्षांच्या अत्यल्प आयुष्यात ‘साए में धूप’, ‘एक कंठ विषपायी’, ‘सूर्य का स्वागत’, ‘आवाज़ों के घेरे’, ‘जलते हुए वन का बसंत’, ‘छोटे-छोटे सवाल’ आणि इतर अनेक गद्य-पद्य पुस्तकांचं लेखन केलं. दुष्यंतनं साहित्य विश्वात प्रवेश केला त्यावेळी भोपाळचे दोन प्रगतीशील शायर ताज भोपाली आणि कैफ़ भोपाली यांचं गझलविश्वावर अधिराज्य होतं. अशा मातब्बरांत आपल्या सहजशील सामान्य बोलीभाषेतल्या शायरी आणि कवितांनी दुष्यंतनं जनतेच्या मनात भावना कशीही उतरते, हे सिद्ध केलं. एखाद्याचं मन कसं काबीज करायचं हे त्याला चांगलंच ठाऊक होतं.

आज दुष्यंत जरी आपल्यात नसला तरी त्याच्या कविता, शायरी सामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. दृकश्राव्य माध्यमांतले लोक आजही आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दुष्यंतच्या शायरीचा आधार घेतात. मागच्या दिल्लीतील निवडणुकांच्या वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष दुष्यंतच्या या ओळी-

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही

हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए.

आवेशानं वापरत मत मागत फिरत होते. दुष्यंतच्या लोकप्रियतेचं अनुमान यावरूनच लावता येतं. सडकेपासून संसदेपर्यंत मग इंदिरा गांधीचा काळ असो वा मोदींचा, निर्भीड होऊन एकच आवाज घुमत आला आहे आणि तो आवाज आहे आपल्या थोड्याशा आयुष्यातच दंतकथा बनलेल्या युवा शायर दुष्यंतचा!

दुष्यंतची शायरी आपल्या आयुष्याचं कटु सत्य आहे आणि आपण ते स्वीकारायलाच हवं. कारण हे सत्य दुष्यंतनं त्याच्या जगण्यातून जे अनुभवलं ते दुःखानं भरलेल्या छातीचा कागद करून शोषितांच्या आसवांच्या शाईनं लिहीले आहे. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक सुख-दुःखात त्याची शायरी ओठांवर हमखास येतेच. त्याची शायरी अक्षरांचा नव्हे माणसांचा समूह आहे. ज्यात त्याकाळातील या समूहांच्या हालअपेष्टांचा, शोषणाचा लेखाजोखा मांडलेला आहे. याकाळातली दुष्यंतची शायरी प्रत्येक काळातल्या व्यक्तीला आपला आवाज वाटते. दुष्यंतच्या गझला अवघड वेळेला समजण्यासाठी विवेक आणि वेळेशी लढण्याचं सामर्थ्य देतात. दुष्यंतची शायरी आपल्या समाजात प्रत्येक संघर्षात सर्वाधिक वापरली जाते. आपली राष्ट्रभाषा हिंदीनं नक्कीच आपल्याला मीर, नजीर आणि ग़ालिबसारखे शायर भले दिले नसतील परंतु दुष्यंत कुमार सारखा ‘शेर’ जन्माला घातला याचा गर्व वाटतो.

दुष्यंत शब्दांत चितारणं जितकं अवघड आहे तितकंच सोपं आहे त्याला कवितेतून समजून घेणं. त्यासाठी हृदयात अपार प्रेम आणि लेखणीत ‘इंकलाब’ पाहिजे. मी आजही या दोन्ही गोष्टी आत्मसात करण्याचा यत्न करतो आहे. दुष्यंतच्या शब्दांत दुष्यंतबद्दल सांगायचं म्हणजे,

मैं हूं मैं दुष्यंत कुमार

मेरी कार अगर देशी शराब की दुकान पर खड़ी है

तो मेरी जेब को चरित्र की कसौटी पर मत कसो

अगर हंसना जरूरी है तो

मेरी रुचि पर नहीं, मेरी मजबूरी पर हंसो

धन्यवाद और साभार की मुद्रा में

खड़े हुए लोगो ।

मैं तुम पर नहीं

अपने जूतों पर नजर डालता हुआ चल रहा हूं

यह सोचता हुआ कि हद हो गई है

कि वह मुकाम भी जहां मैं उंगली रख

सकता था होठों से छूने पड़े ॥

लेखक - साजन चंद्रकला उचाडे