ग्रंथसत्ता – डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

Books

ग्रंथसत्ता हा शब्द कानाला जरा विचित्र लागेल. राजसत्ता, दंडसत्ता, लोकसत्ता हे शब्द आपल्या परिचयाचे आहेत, तसा ग्रंथसत्ता हा नाही. हा शब्द परिचयाचा नसला तरी त्याची विवक्षा, त्यातील अभिप्रेत अर्थ मात्र आपल्या परिचयाचा आहे आणि तोच अर्थ आजच्या लेखात विशद करावयाचा आहे. राजसत्ता, दंडसत्ता, लोकसत्ता या शासनप्रकारांत भिन्नभिन्न प्रकारची सत्ता असते. कोठे राजा राज्य करतो, कोठे कोणी हुकुमशहा सत्ता चालवतो, तर कोठे लोकसभेचे शासन चालते. पण आपण सूक्ष्म विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की या सर्व शासनव्यवस्थांत समाजावर ग्रंथांचीच सत्ता चालू असते. कशी ते पाहा. कोणताही शासनप्रकार घेतला तरी त्यात सत्ता मनुष्याचीच असते. कोठे एक मानव असतो, कोठे मानवसंघ राज्य करतो आणि कोणताही मानव घेतला तरी तो काही श्रद्धा, काही विचार, काही तत्त्वज्ञान यांनी प्रेरित झालेला असतो. त्या धोरणानेच तो राज्य करीत असतो. रामचंद्र, हरिश्चंद्र, युधिष्ठिर हे राजे असोत, मुसोलिनी, हिटलर, स्टॅलिन हे दंडधर असोत, वॉशिंग्टन, चर्चिल, नेहरू हे लोकवादी शास्ते असोत, ते कोणत्या ना कोणत्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी असतात. त्या तत्त्वज्ञानाच्या चिंतनाने त्यांनी आपल्या मनाशी काही सिद्धांत निश्चित केलेले असतात आणि त्याअन्वयेच शासन चालवायचे असा त्यांचा कृतनिश्चय असतो. त्यामुळे या नेत्यांचे शासन म्हणजे त्यांनी स्वीकारलेल्या तत्त्वज्ञानाचे म्हणजे ते तत्त्वज्ञान प्रतिपादन करणार्‍या, समाजात ते दृढमूल करणार्‍या, ते सिद्ध करणार्‍या ग्रंथांचे शासन असते, हे सहज दिसून येईल. मागल्या काळात अनेक वेळा, अनेक देशांत राजे हे अगदी जडमूढ, अक्कलशून्य असे असत. अशा राजांना तत्त्वज्ञान कोठले असणार असा प्रश्न मनात येईल. पण हे राजे मूढ व म्हणूनच मदांध, उन्मत्त असले तरी त्या मदांधतेचे, अनियंत्रिततेचे, अरेरावीचे त्यांनी किंवा त्यांच्या सरदारांनी, सेनापतींनी वा मंत्र्यांनी एक तत्त्वज्ञान बनविलेले असते. राजा ईश्वरी अंश आहे, त्याची सत्ता ईश्वरदत्त असते, तो प्रजेला कधीही उत्तरदायी नसतो, धर्मक्षेत्रातही अंतिम सत्ता राजाचीच असते, हे व अशा प्रकारचे सिद्धांत मागल्या काळात किती रूढ होते हे सर्वविश्रुत आहे. म्हणजे मागल्या काळातही शासनावर व शास्त्यांवर अधिराज्य असे ते कोठल्या ना कोठल्या विचारप्रणालीचे म्हणजे ग्रंथाचे असे. अर्वाचीन काळाबद्दल तर बोलावयासच नको. सुसंस्कृत जगाच्या इतिहासात असा एक कालखंड वा भूखंड सापडणार नाही ज्या वेळी ग्रंथांचे राज्य समाजावर नव्हते, असा आपण यावरून सिद्धांत केला तर त्यात अतिशयोक्ती होईल असे वाटत नाही. सर्वंकष अशी ही जी ग्रंथसत्ता तिचे स्वरूप आता स्पष्ट करू.

१) आर्थिक जीवन –

आजचे आपले जीवन अर्थप्रधान झाले आहे. अर्थमूलोहि धर्म:| असे मागल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या काळात कौटिल्याने सांगितले होते. आज तर ते वचन सर्व दृष्टींनी सार्थ ठरू पाहात आहे. भांडवलशाही, समाजवाद, कम्युनिझम या समाजरचनांमध्ये अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांनाच महत्त्वाचे स्थान असते. म्हणून जीवनाला व्यापून दशांगुळे उरलेल्या या आर्थिक तत्त्वांपासूनच आपण विचाराला प्रारंभ करू.

‘वेल्थ ऑफ नेशन्स’ हा ऍडम स्मिथचा ग्रंथ १७७६ साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथाने पाश्चात्य जगावर व पाश्चात्यांच्या वर्चस्वाखाली आलेल्या पौर्वात्य जगावरही पुढील शंभर वर्षे अगदी अबाधित, निरंकुश, अनियंत्रित असे राज्य चालविले होते. याच सुमारास प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर पश्चिम युरोपात औद्योगिक क्रांती झाली. तिच्यामुळे अमाप धन देशात आले, पण त्याची वाटणी अत्यंत विषम झाल्यामुळे भांडवलदार व कामगार असे दोन वर्ग निर्माण होऊन त्यांच्या आर्थिक स्थितीतील आत्यंतिक विषमतेमुळे फार मोठ्या अनर्थपरंपरा निर्माण झाल्या. या अनर्थपरंपरा दिसत असूनही त्या त्या देशातील शासनाने अर्थव्यवहारात हस्तक्षेप का केला नाही? त्याचे कारण असे की हस्तक्षेप करू नये असेच त्यांचे तत्त्वज्ञान होते आणि हे तत्त्वज्ञान ऍडम स्मिथने सांगितले होते. अनिर्बंध अर्थव्यवहार, सर्वस्वी अनियंत्रित अर्थव्यवस्था हीच सर्वांच्या हिताला पोषक आहे, असा स्मिथचा सिद्धांत होता. त्यावर शास्त्यांची, नेत्यांची व अर्थकोविदांची पूर्ण श्रद्धा होती. या काळात कामगारांचे जीवन म्हणजे नरक होता, त्यांना अगदी यमयातना सोसाव्या लागत असत. समाजाच्या नेत्यांना, अर्थवेत्त्यांना त्यांच्याविषयी सहानुभूती नव्हती, दया नव्हती असे नाही. पण अर्थव्यवहाराचे नियम हे निसर्गनियमांप्रमाणे मानवी सामर्थ्याच्या बाहेरचे आहेत, तेथे कोणी काही उपाय करू शकणार नाही, असा ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ या ग्रंथाचा सिद्धांत होता आणि शास्त्यांच्या मनावर त्याची सत्ता असल्यामुळे ते समाजातील भयानक विषमतेचे समर्थनच करीत होते. त्यावेळचा समाज पराकाष्ठेचा व्यक्तिवादी झाला होता. मनुष्याला दारिद्र्य आले, दु:ख भोगावे लागले, विपरीत भवितव्य त्याच्या कपाळी आले, तर त्याला त्याचा तोच जबाबदार आहे, परिस्थितीशी त्याचा काही संबंध नाही, असा अत्यंत अशास्त्रीय व घातक सिद्धांत स्मिथने सांगितला होता. काही पंडितांच्या मते त्याचा तसा अर्थ लोकांनी बसविला होता. काही असले तरी बहुसंख्य अर्थवेत्ते व नेते यांच्या मनावर स्मिथच्या ग्रंथाचा प्रभाव होता आणि त्यामुळे ‘ज्याचा तो’ हा आत्यंतिक व्यक्तिवादी सिद्धांत त्यांनी स्वीकारला होता. त्यामुळे व्यक्तीला रूढ अर्थव्यवस्थेमुळे कितीही दैन्य प्राप्त झाले तरी सरकारने कायदे करून त्या व्यवस्थेत हस्तक्षेप करावयाचा नाही, तिचे नियंत्रण करावयाचे नाही, असे धोरण त्यांनी अवलंबिले होते. जवळजवळ शंभर सव्वाशे वर्षे ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ या ग्रंथाचे राज्य जगावर चालू होते. त्यामुळे मानवाचे प्रत्येक देशात फार हाल झाले. अनेक देशांत त्यामुळे अराजक माजले व क्रांत्या होण्याची वेळ आली. शेवटी यामुळे जोरदार प्रतिक्रिया सुरू होऊन हळूहळू या ग्रंथाच्या सत्तेला शह बसला.

‘वेल्थ ऑफ नेशन्स’ या ग्रंथाला पदच्युत करून त्याची सत्ता नष्ट करण्याचे कार्य ज्या ग्रंथाने केले त्याचे नाव माहीत नाही असा सुशिक्षित माणूस आजच्या जगात सापडणे जवळजवळ अशक्य आहे. बायबलच्या खालोखाल, कदाचित बायबलइतकीच जगात जनमानसावर जर एखाद्या ग्रंथाने दृढ पकड बसवली असली तर ती कार्ल मार्क्सच्या ‘दास कॅपिटल’ या ग्रंथाने. आज जगात असा एकही देश नाही की जेथे कम्युनिस्ट पंथाचे अनुयायी नाहीत आणि जेथे ‘दास कॅपिटल’चे पठण होत नाही. १८६७ साली या ग्रंथाचा जन्म झाला. १८८० पासून त्यातील तत्त्वज्ञान आगीसारखे जगात पसरत चालले आणि पुढील दशकात कार्ल मार्क्स हा जगाचा राजाधिराज झाला. रशिया व चीन या देशांत त्याच्या ग्रंथामुळे केवढ्या प्रचंड उलथापालथी झाल्या, प्रलयकंप झाले हे आपल्यापैकी अनेकांनी स्वत:च्या हयातीतच पाहिले आहे. या दोन देशांतील मिळून पंचाऐशी कोटी जनता ‘दास कॅपिटल’ या ग्रंथाच्या प्रत्यक्ष साम्राज्याखालीच आहे. पोलंड, पूर्व जर्मनी, रुमानिया, युगोस्लाव्हिया, बल्गेरिया यांसारखे पूर्व युरोपातील देशही बव्हंशी तसेच आहेत. आणि अप्रत्यक्षपणे त्याची सत्ता किती लोकांच्या मनावर चालते हे पाहण्यास दूरदेशी जाण्याचे कारण नाही. भारतात कम्युनिस्ट पक्ष जरी सत्ताधारी नाही तरी आपल्या सत्ताधार्‍यांमध्ये कम्युनिस्ट वा तत्सम अनेक लोक आहेत आणि आपल्या पंचवार्षिक योजना व आपले परराष्ट्रीय राजकारण यांवर त्यांचा अतिशय प्रभाव आहे, हे सर्वांना माहीतच आहे.

ग्रंथसत्ता म्हणजे काय, ग्रंथाचे सामर्थ्य काय असते, एक ग्रंथ जगावर केवढे साम्राज्य स्थापू शकतो, राजाधिराज, महाराज, सम्राट, चक्रवर्ती यांच्यापेक्षाही त्याची सत्ता कशी प्रभावी असते, हे पाहावयाचे असल्यास कॅपिटल या ग्रंथाचा व त्यातील तत्त्वज्ञानाच्या प्रसाराचा इतिहास आपण बारकाईने अभ्यासावा. आज कम्युनिझमला ओहोटी लागली आहे. पण विसाव्या शतकाची पहिली तीस पस्तीस वर्षे पाहिली तर असे आढळून येईल की त्या काळात धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, मातृभक्ती, पितृभक्ती, पातिव्रत्य इ. हजारो वर्षे दृढमूल झालेली जी तत्त्वे होती, त्यांना मार्क्सवादाने सुरुंग लावून ती उद्ध्वस्त करून टाकण्याची वेळ आणली होती. आणि आजही लाखो लोकांच्या मनात या तत्त्वांविषयी द्वेष घर करून राहिला आहे. मार्क्सने स्वत:च म्हटले आहे की जेव्हा एखादा विचार जनमनाची पकड घेतो तेव्हा त्याच्या ठायी प्रचंड शक्ती निर्माण होते. श्रममूल्यसिद्धांत, वर्गविग्रह, ऐतिहासिक जडवाद व विरोधविकासवाद या मार्क्सच्या सिद्धांतांना पन्नास एक वर्षे तरी असेच सामर्थ्य प्राप्त झाले होते. मार्क्सपूर्वी कामगार ढोरांसारखे कष्ट करीत होते, तरी भाकरीच्या तुकड्यालाही ते महाग होते. पण हा अन्याय, हा जुलूम व त्यामुळे होणार्‍या यमयातना ते निमूटपणे सहन करीत होते. कारण आपण निर्माण केलेल्या धनावर आपला हक्क आहे, हे त्यांच्या स्वप्नातही आले नव्हते. श्रममूल्यसिद्धांत सांगून मार्क्सने, तुमच्या श्रमातून निर्माण झालेले धन तुमचेच आहे आणि भांडवलदार, कारखानदार हेच लुटारू आहेत, असे त्यांना सांगितले. कॅपिटलमध्ये प्रतिपादिलेल्या या विचाराने लोकमनाची पकड घेताच त्यातून एवढा प्रचंड वडवानल निर्माण झाला की त्यात साम्राज्येच्या साम्राज्ये जळून खाक झाली. आणि आजही अमेरिका, जर्मनी, ब्रिटन यांसारख्या बलाढ्य देशांना कम्युनिझम ही एक कायमची दहशत होऊन बसली आहे. ही सर्व समुद्रवलयांकित पृथ्वी कॅपिटल या ग्रंथाने अशी हादरून टाकली आहे.

ग्रंथांची महती सांगताना आर्थिक क्षेत्रातील दोन ग्रंथांचा आपण विचार केला. या क्षेत्रातील इतरही अनेक ग्रंथांचा असाच निर्देश करता येईल. जर्मनीचा सध्याचा अर्थमंत्री लुडविग एरहार्ट याचा ‘प्रोग्रेस थ्रू कॉंम्पिटिशन’, अमेरिकन अर्थपंडित हायेक याचा ‘रोड टू सर्फडम’, युगोस्लावियाच्या क्रांतीचा नेता जिलास याचा ‘न्यू क्लास’ इ. अनेक ग्रंथांनी आपापल्या परीने समाजमनाला वळण लावण्याचे कार्य केलेले आहे. पण प्रारंभी वर्णिलेल्या दोन ग्रंथांवरून माझ्या मनातील अभिप्रेत अर्थ चांगला व्यक्त होत असल्यामुळे आता आणखी विस्तार करीत नाही.

वाचकांपुढे महाराष्ट्रात काहीशा उपेक्षिल्या गेलेल्या साहित्याच्या शाखेविषयीचा विचार मांडावा या हेतूने आजच्या विषयाची निवड मी केली आहे. निबंध, प्रबंध किंवा ग्रंथ या नावांनी जिचा निर्देश होतो ती ही शाखा होय. काव्य, कादंबरी, नाटक, लघुकथा याहून ही सर्वस्वी निराळी आहे. ते वाङमयप्रकार भावनांना आवाहन करतात, तर ग्रंथ हा बुद्धीला आवाहन करतो. त्यामुळे त्याची रचना अगदी भिन्न असते. इतिहास, अनुभव, प्रयोग, अवलोकन यांतून निघालेले सिद्धांत यात प्रतिपादन केलेले असतात आणि ते तर्कनिष्ठ पद्धतीने मांडलेले असतात. आधार, प्रमाण, खंडनमंडन, तुलना, अन्वय, व्यतिरेक यांना ग्रंथांत महत्त्व असते आणि या पद्धतीनेच त्याला सामर्थ्य प्राप्त झालेले असते. समाजाच्या प्रगतीला, उत्कर्षाला अत्यंत अवश्य असा हा जो ग्रंथ त्याची भारतात अत्यंत उपेक्षा झालेली आहे. ब्रिटिश येथे येण्यापूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात भारतात ग्रंथ असा निर्माण झालाच नाही. याविषयी सविस्तर विवेचन ‘निबंधरचना व राष्ट्ररचना’ या माझ्या लेखात मागे मी केले आहे. तेवढा सर्व विषय आज येथे मांडून होणार नाही. आज येथे महाराष्ट्रापुरताच विचार करावयाचा आहे.

मुकुंदराज, ज्ञानेश्वर यांच्या काळापासून मराठी साहित्याला प्रारंभ झाला. पण तेव्हापासून साधारण १८५० पर्यंत म्हणजे पाश्चात्य विद्येचा प्रसार होईपर्यंत वर वर्णिलेल्या प्रकारचा ग्रंथ कोणत्याच क्षेत्रात निर्माण झाला नाही. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी यांनी प्रथम या प्रकारची काहीशी रचना केली आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ग्रंथरचनेला महाराष्ट्रात खरा आरंभ केला. त्यानंतरच्या पाऊणशेऐंशी वर्षांच्या काळात टिळक, आगरकर, सावरकर, माटे, जावडेकर, वा.म.जोशी यांच्यासारखे थोर निबंधकार महाराष्ट्रात झाले. गीतारहस्य, संस्कृतिसंगम, सत्तावनचे स्वातंत्र्ययुद्ध, आधुनिक भारत यांसारखे प्रभावी ग्रंथही मराठीत झाले; पण आपल्याला नवमहाराष्ट्राची निर्मिती करावयाची आहे. येथल्या जनतेत लोकशाहीची तत्त्वे रुजवावयाची आहेत. जन्मनिष्ठ उच्चनीचता, जातिभेद, अस्पृश्यता नाहीशी करून समतेच्या तत्त्वावर समाजाची नवी घडण करावयाची आहे. शेकडो वर्षे आर्थिक दृष्टीने अप्रगत राहिलेल्या महाराष्ट्राला नवा अर्थव्यवहार शिकवावयाचा आहे. येथल्या बहुजनसमाजात विज्ञाननिष्ठा दृढमूल करून त्याचे मन कणखर करावयाचे आहे. एवंच, भारतात व महाराष्ट्रात नवा माणूस निर्माण करावयाचा आहे. त्या दृष्टीने पाहता आवश्यक ती निबंध-ग्रंथरचना महाराष्ट्रात मुळीच होत नाही. राष्ट्रीय जीवनाला अत्यंत आवश्यक असे हे पौष्टिक महाराष्ट्राला जवळजवळ मिळतच नाही. इतकेच नव्हे तर याचे महत्त्वही नीट ध्यानात आलेले नाही. म्हणून या विषयाचा सविस्तर प्रपंच करावा असा विचार केला आहे.

२) क्रांतिप्रेरणा –

आर्थिक क्षेत्रात ग्रंथसत्ता कशी प्रभावी असते याचा थोडासा विचार आपण वर केला. जगातील मोठमोठ्या क्रांत्यांचा इतिहास आपण पाहिला, तर प्रत्येक क्रांतीच्या मागे एक किंवा अनेक प्रभावी ग्रंथ होते असे आपल्या ध्यानात येईल. रूसोचा ‘सोशल कॉंट्रॅक्ट’ हा ग्रंथ फ्रेंच राज्यक्रांतीला किती प्रेरक झाला हे इतिहासतज्ज्ञांस सांगावयास नकोच. रूसो, व्हाल्टेअर, डिडेरो व मॉंटेस्क यांनाच कोणीकोणी फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानतात आणि ते फार मोठ्या अर्थाने खरे आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. असे म्हणताना कोणतेही एकांतिक विधान मला करावयाचे नाही. कोणतीही क्रांती होते, कोणतेही नवयुग निर्माण होते त्याच्यामागे अनेक प्रेरणा असतात. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रांतले घटक क्रांतीला किंवा उत्पाताला कारण होत असतात. पराकाष्ठेची विषमता, भयानक जुलूम, घृणास्पद अन्याय, आत्यंतिक दारिद्र्य यांमुळे समाजात उत्पात होतात. पण ती विषमता, तो जुलूम, तो अन्याय हे सर्व समाजाने स्वीकारलेल्या धार्मिक, सामाजिक वा राजकीय संस्थांमुळे, तत्त्वांमुळे होत असते. ती तत्त्वे उलथून टाकल्यावाचून उत्पातांना, बंडाळ्यांना क्रांतीचे प्रतिष्ठित रूप येत नाही व त्या उत्पातांतून नवा माणूस, नवा समाज निर्माण होत नाही. ग्रंथांचा संबंध येथे येतो. राजसत्ता जाऊन लोकसत्ता यावयाची तर राजसत्ता समाजाला घातक आहे व लोकसत्ता पोषक आहे, हा विचार जनतेला पटला पाहिजे आणि मान्य झाला पाहिजे. आणि कोणताही विचार मान्य व्हावयाचा म्हणजे निबंध-ग्रंथ या वाङमयाची निर्मिती होणे अवश्य असते. कोणतीही क्रांती, कोणतेही नवयुग ग्रंथावाचून होत नाही याचे कारण असे आहे.

३) फ्रेंच राज्यक्रांती –

वर उल्लेखिलेल्या फ्रेंच राज्यक्रांतीचेच उदाहरण पाहा. फ्रान्समध्ये बोरबॉन राजांची अनियंत्रित सत्ता दीर्घकाळ चालू होती. या काळात विषमता, अन्याय, जुलूम, पिळवणूक, छळ यांनी अगदी कहर केला होता. सामान्यजनांना किडा-मुंगी, जंतू यांपेक्षा जास्त महत्त्व नव्हते. मग व्यक्तित्व कोठून असणार? अशा स्थितीत रूसो, व्हाल्टेअर, मॉंटेस्क यांनी समता, बंधुता, स्वातंत्र्य यांचे तत्त्वज्ञान आपल्या ग्रंथांतून फ्रेंच जनतेत प्रसृत केले आणि त्यामुळेच क्रांतीचा वणवा भडकून त्यात राजसत्तेची आहुती पडली. ‘सामाजिक करारनामा’ हा समाजरचनेचा पाया आहे. या करारनाम्यान्वये लोक हे अधिराज असतात, त्यांनी आपली सत्ता शास्त्यांना काही अटींवर दिलेली असते. त्या अटी त्यांनी मोडल्या तर लोकांना बंड करण्याचा हक्क असतो इ. सिद्धांत रूसोने आपल्या ‘सोशल कॉंट्रॅक्ट’ या ग्रंथात सांगितले आहेत. या ग्रंथाचा प्रभाव एवढा होता की डांटन, मिराऊ इ. फ्रेंच क्रांतीचे पहिले नेते रूसोचा हा ग्रंथ नित्य खिशात ठेवीत असत आणि कसली शंका उद्भवली तर त्याचा आधार घेऊन निर्णय करीत असत. व्हाल्टेअरचे ग्रंथ असेच प्रभावी होते. तो प्रारंभी काव्य, नाटक या रूपाने लिहीत असे. पण त्याचा विषय समता, व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मसहिष्णुता हाच असे. इंग्लंडला जाऊन परत आल्यावर त्याने ‘लेटर्स ऑन इंग्लिश’ हे पुस्तक लिहिले. त्यात इंग्लिश राज्यपद्धतीचा गौरव करून त्याने अप्रत्यक्षपणे फ्रेंच राजसत्तेवर प्रखर टीका केली होती. फ्रेंच शासनाला त्यामुळे डायनामाईटसारखा हादरा बसला. त्यामुळे सरकारने त्याची होळी करून त्याला पकडण्याचा हुकूम सोडला.

व्हाल्टेअर प्रारंभी काव्यनाटकांतून आपले क्रांतीचे विचार मांडीत असे. पुढे ते आवरण त्याने फेकून दिले व लोकसत्ता, व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद या विषयांवरील पुस्तिका, पत्रके यांचा त्याने अगदी वर्षाव करण्यास प्रारंभ केला. ‘राजवाड्यातील संगीताच्या तालावर सामान्य जनता मृत्यूकडे चालली आहे,’ ‘जनतेला तुम्ही पशूसारखे वागविले तर आज ना उद्या ती तुमच्या पोटात आपली शिंगे भोसकून तुम्हाला ठार केल्यावाचून राहणार नाही,’ ही त्याची वाक्ये अनेक वर्षे लोकांच्या जिव्हाग्रावर नाचत होती. यावरून जनतेवर सत्ता लुई राजांची होती की या थोर तत्त्ववेत्त्यांची होती हे सहज उमजून येईल.

४) अमेरिकन राज्यक्रांती –

काही इतिहासकारांच्या मते रूसो-व्हाल्टेअर यांच्या ग्रंथांचा प्रभाव अमेरिकेवरही पडला होता आणि अमेरिकन क्रांतीच्या मागे हीच प्रेरणा होती. या विधानात सत्यांश आहे; पण तो फार थोडा आहे. यांच्या ग्रंथांनी अमेरिकेला प्रेरणा दिली असली तर ती अप्रत्यक्षपणे. तेथे प्रत्यक्ष क्रांतीची चेतावणी देणारा थोर ग्रंथकार म्हणजे थॉमस पेन हा होय. ‘राईट्स ऑफ मॅन’ व ‘एज ऑफ रीझन’ हे त्याचे महनीय ग्रंथ होत. इंग्लंडचा जुलूम अमेरिकन जनतेला असह्य होऊ लागला तेव्हा थॉमस पेन याने लेखणी उचलली आणि अत्यंत प्रक्षोभक अशा पुस्तिका तो भराभर समाजावर वर्षू लागला. ‘अमेरिकन स्वातंत्र्याचे ध्येय हे अखिल मानवतेचे ध्येय असून त्याला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. तोच आम्हाला इंग्लिश शृंखलांतून मुक्त करील’, असे उदात्त विचार तो मांडू लागला. त्याची शैली इतकी भेदक व भाषा इतकी जहरी होती की त्याच्या पत्रकांनी अमेरिकन बहुजनांच्या हृदयाचा ठाव घेतला आणि इंग्लंडफ्रान्समध्येही विचारवंत लोक अमेरिकन स्वातंत्र्याला अनुकूल झाले. समता, व्यक्तिस्वातंत्र्य, मानवत्त्वाची प्रतिष्ठा, लोकसत्ता या तत्त्वांचा पेन हा कट्टा पुरस्कर्ता होता. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, हॉलंड या देशांत या तत्त्वांची प्राणप्रतिष्ठा झाली तर पुढे मागे या सर्वांचे मिळून एक संघराज्य होईल, असे स्वप्न त्याला पडत असे. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने आपल्या लेखणीचे सर्व सामर्थ्य पणाला लावण्याचे ठरविले होते. पण विधिसंकेत निराळा होता.

अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवस थॉमस पेन इंग्लंडमध्ये होता. तेथून परत जाऊन निराळ्या कार्यात मन गुंतवावे असा विचार त्याच्या मनात घोळत होता. एवढ्यात फ्रान्समध्ये क्रांतीचे शिंग फुंकले गेल्याची व बॅस्टिल पडल्याची बातमी आली. त्यामुळे पेनचे सर्व भवितव्य बदलले. ही क्रांती म्हणजे स्वातंत्र्य, समता, मानवता यांच्या संग्रामातील पुढची पायरी आहे असे इंग्लंडने मानावे व फ्रेंच लोकांचा पक्ष घेऊन या तत्त्वांच्या प्राणप्रतिष्ठेच्या महान कार्यात भाग घ्यावा असे तो प्रतिपादू लागला व पुस्तके, पत्रके यांचा इंग्लिश राजसत्तेवर भडिमार करू लागला. याच काळात त्याने आपला ‘राईट्स ऑफ मॅन’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याच्या चरित्रकाराने लिहिले आहे की या ग्रंथाने युरोप व अमेरिका या दोन्ही खंडांना हादरा बसला. म्हणून विचारी लोक त्याला बुद्धिवादाचे बायबल (न्यू टेस्टामेंट) अशी पदवी देतात. इंग्लंडमधल्या पुरोगामी लोकांनी या ग्रंथाचे सहर्ष स्वागत केले. पण राजपक्षीय सत्ताधार्‍यांना हा ग्रंथ पचविणे शक्य नव्हते. त्यांनी पेनवर खटला भरला व त्याला फाशीची शिक्षा सुनावली. पण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पेन आधीच फ्रान्समध्ये निसटून गेला होता.

ग्रंथसत्तेचे सामर्थ्य काय असते ते पाहावयाचे असल्यास रुसो, व्हाल्टेअर, थॉमस पेन यांच्या ग्रंथांचे, एका बाजूने राजसत्ता व दुसर्‍या बाजूने जनता यांनी कसे स्वागत केले ते ध्यानात घ्यावे. राजसत्तेच्या प्रकोपामुळे या तिघांनाही स्वदेश सोडून हद्दपार व्हावे लागले होते आणि ते परत येऊन आपल्या सत्तेला सुरुंग लावतील या भीतीने इंग्लंड-फ्रान्समधल्या सत्ताधार्‍यांनी त्यांच्या डोक्यावर फाशीचे चक्र फिरते ठेवले होते. बलशाली सेना, जय्यत रणसामग्री, अनियंत्रित सत्ता व परंपरागत राजसिंहासन एवढे सामर्थ्य पाठीशी असताना राजसत्तेने या पुरुषांना भ्यावे असे त्यांच्याजवळ काय होते? लेखणी! बहुग्रंथप्रसवा अशी लेखणी! या लेखणीला जे पुत्र होतील ते आपला घात करतील अशी सर्व राजांना बालंबाल खात्री होती. म्हणून देवकीच्या पुत्रांचा जन्मत:च नाश करण्याचा कंसाने जसा निश्चय केला होता, तसाच या लेखणीच्या पुत्रांचाही संहार करण्याचा इंग्लंड व फ्रान्सच्या राजांनी निश्चय केला होता. उलट जनतेला रुसो, व्हाल्टेअर, पेन हे अवतारी पुरुष वाटत होते. अन्याय, जुलूम, यातना, दारिद्र्य, पिळवणूक, शोषण यांतून सोडविण्यासाठी परमेश्वराने धाडलेले हे दूतच आहेत अशी जनतेची श्रद्धा होती. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध संपल्यावर तेथील लोकांनी थॉमस पेन याला एक मोठा प्रासाद, शेकडो एकर जमीन इ. देऊन त्याचा गौरव केला यात नवल नाही. पण इंग्लंडमधून निसटून तो फ्रान्समध्ये गेला तेव्हा त्याच्या स्वागतार्थ हजारो लोक बंदरावर जमा झाले होते. फ्रेंच लोकसभेवर जनतेने आधीच त्याची निवड केली होती. आता त्याचा जयजयकार करून त्याची मिरवणूक काढण्यासाठी लोक जमले होते. जनतेचे हे प्रेम पाहून पेनच्या नेत्रांत अश्रू आले. जनतेला ही भक्ती वाटावी असे रुसो, व्हाल्टेअर, पेन यांच्याजवळ काय होते? पहिल्या प्रश्नाचे जे उत्तर तेच याही प्रश्नाचे. लेखणी! ग्रंथप्रसवा लेखणी! ग्रंथ, त्यांनी प्रतिपादिलेले समतेचे, स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान आणि त्यासाठी प्राणपणे झगडण्याची शक्ती!

ग्रंथासत्ता म्हणजे काय ते सांगून पाश्चात्य ग्रंथकारांच्या ग्रंथांच्या आधारे तिचा व्याप काय, महत्त्व केवढे, तिचे सामर्थ्य किती अलौकिक याची काहीशी कल्पना येथवर दिली. आता महाराष्ट्र व मराठी साहित्य यांचा विचार करून हे विवेचन संपवितो.

Dr. Pu Ga Sahastrabuddhe
डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

५) ललित व तात्त्विक –

मागे एकदा सांगितलेच आहे की मराठीच्या प्रारंभकाळापासून पाश्चात्य विद्येचा एकोणिसाव्या शतकात येथे प्रसार होईपर्यंतच्या सहाशे-सातशे वर्षांच्या काळात वर सांगितल्या प्रकारचा एकाही ग्रंथ महाराष्ट्रात झाला नाही. या विधानाचे थोडे स्पष्टीकरण करतो. मराठीत या काळात ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम महाराजांचे अभंग, मुक्तेश्वर, श्रीधर, मोरोपंत यांची रामायण, महाभारत यांवरील आख्याने (हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप, आर्याभारत इ.) हे अतिशय थोर साहित्य निर्माण झाले यात वाद नाही. महाराष्ट्राची, मराठ्यांची मने या साहित्यानेच घडविली आहेत. तेव्हा या साहित्याचा अनादर करावा, उपेक्षा करावी, असा मनात मुळीच हेतू नाही. पण मी प्रारंभापासून निबंध-प्रबंध-ग्रंथ हा जो वाङ्मयप्रकार सांगत आहे तो याहून अगदी निराळा आहे आणि या ग्रंथांची उणीव वरील साहित्याने कधीही भरून निघणार नाही. महाभारत, रामायण, ज्ञानेश्वरी, भागवत हे ग्रंथ मातेचे कार्य करतात, तर निबंधमाला, केसरी, सुधारक यांतील निबंध – हे ग्रंथराज (दासबोधाप्रमाणे हे ग्रंथराजच आहेत) पित्याचे कार्य करतात. राजकारण, इतिहास, अर्थव्यवहार, समाजशास्त्र हे यांचे विषय आहेत आणि त्यांतील सिद्धांत अनुभव, प्रयोग, अवलोकन, तर्क यांवर आधारलेले असतात. त्यांचे आवाहन बुद्धीला असते. असे ग्रंथ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या कोणत्याच प्रांतात त्या सहासातशे वर्षांच्या काळात झाले नाहीत आणि त्यामुळेच भारताला तेव्हा पराकाष्ठेची अवकळा प्राप्त झाली होती. अफगाण, तुर्क, मोंगल, पोर्तुगीज, डच, फेंच, इंग्रज यांची या काळात सतत आक्रमणे होत राहिली आणि त्यातले एकही आक्रमण आपण संपूर्ण परतवू शकलो नाही. भारताच्या व्यापाराची त्या काळात काय दशा होती हे सर्वश्रुतच आहे. कलोपासना, विज्ञानसंशोधन, भूसंशोधन यांची कथा तीच आहे. युरोपात याच काळात शेकडो ग्रंथ निर्माण झाले आणि राष्ट्रनिष्ठा, लोकसत्ता, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बुद्धिवाद, इहलोकनिष्ठा यांचे तर्कनिष्ठ प्रतिपादन त्यांनी केले. यामुळेच तेथील समाज जागृत झाला, संघटित झाला, बुद्धिवादी झाला आणि त्याने सर्व जगावर राज्य स्थापिले. भारतात तसे ग्रंथ झाले असते तर आपणही पराक्रमाच्या कोटी करून ते वैभव प्राप्त करून घेतले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही.

६) महाराष्ट्र – नवी सृष्टी –

पण त्यातल्या त्यात सुदैव असे की पाश्चात्य विद्येच्या प्रसारानंतर तरी ग्रंथ या शक्तीची उपासना करावी अशी सुबुद्धी आपल्याला झाली आणि त्यामुळेच येथे सर्व प्रकारची क्रांती होऊन आपण ब्रिटिश सत्तेचे निर्दालन करून स्वातंत्र्य मिळविण्यात यशस्वी झालो. अभिमानाची गोष्ट अशी की या कार्यास प्रथम महाराष्ट्रात प्रारंभ झाला. त्यावेळी येथे रानडे, तेलंग, भांडारकर, विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, राजवाडे, चिंतामणराव वैद्य, तात्यासाहेब केळकर, सावरकर यांसारखे थोर ग्रंथकार निर्माण झाले. एवढ्या सगळ्यांचा विचार येथे करणे अर्थातच शक्य नाही. म्हणून त्यांतील मूर्धाभिषिक्त जे तीन थोर पुरुष – विष्णुशास्त्री, टिळक व आगरकर – त्यांच्या कार्याचा थोडक्यात विचार करू. या त्रिमूर्तीने आपल्या लेखणीने महाराष्ट्रात नवी सृष्टीच निर्माण केली. तिचे स्वरूप विशद करून या विवेचनाचा समारोप करू. स्वातंत्र्यप्राप्ती, राष्ट्रसंघटना व लोकसत्तेची प्रस्थापना हे या पुरुषांचे ध्येय होते. त्यासाठी पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा, सामाजिक क्रांती, देशाभिमान ही जी युरोपातील युगतत्त्वे त्यांचे प्रतिपादन करून त्यांना महाराष्ट्रात मन्वंतर घडवून आणावयाचे होते. ते कार्य त्यांनी कसे केले हे आपण पाहिले म्हणजे येथून पुढे जे मन्वंतर आपल्याला घडवून आणावयाचे आहे त्यासाठी अवश्य ते ग्रंथकर्तृत्व, त्याची स्फूर्ती व सामर्थ्य आपल्या ठायी येईल, अशी मला आशा आहे.

या थोर पुरुषांनी नवी सृष्टी महाराष्ट्रात निर्माण केली असे वर म्हटले आहे. नव्या सृष्टीचा प्रारंभ म्हणजे सामाजिक वा राष्ट्रीय अहंकार-अस्मिता-हा होय. ब्रह्मदेवाची सृष्टीसुद्धा अहंकारापासूनच सुरू होते. तेव्हा मानवी जीवनात त्याच क्रमाने नव्या सृष्टीची उभारणी झाल्यास त्यात नवल काहीच नाही.

विष्णुशास्त्री यांनी महाराष्ट्रात प्रथम राष्ट्रीय अहंकार, म्हणजेच अस्मिता निर्माण केली. इंग्रजांनी आपल्याला रणात पराभूत केले होते आणि आपले साम्राज्य दीर्घकाळ चालावे या उद्देशाने भारतीयांचा ‘अहं’ नष्ट करावा असे त्यांचे प्रयत्न होते. रामायण, महाभारत, गीता हे ग्रंथ उसनवारीने आणलेले आहेत, ते भारतीयांचे नाहीत, वेद-उपनिषदे हे वाङमय फार प्राचीन नाही, गणित, ज्योतिष, वैद्यक इ. शास्त्रे प्रथम ग्रीसमध्ये निर्माण झाली व तेथून ती भारतीयांनी घेतली, असे सिद्धांत सांगून व श्रीकृष्ण, शिवाजी, महाराणा प्रतापसिंह इ. भारतीय थोर पुरुषांची निंदा करून भारतीय जनतेचा तेजोभंग करण्याचा, तिचा आत्मविश्वास नष्ट करण्याचा इंग्रजांनी- इंग्रज पंडितांनी, राज्यकर्त्यांनी, मिशनर्‍यांनी- सतत प्रयत्न चालविला होता. विष्णुशास्त्र्यांनी निबंधमालेची रचना करून हे प्रयत्न हाणून पाडले व पूर्वपरंपरेचा अभिमान जागृत करून अहंकाराचा हा दीप जास्तच प्रज्वलित केला. इतिहास, इंग्रजी भाषा, वक्तृत्व, गर्व, आमच्या देशाची स्थिती हे त्यांचे निबंध पाहिले म्हणजे मिल्, मॉरिस, मेकॉले यांनी भारतीयांच्या इतिहासाचे विडंबन करण्याचे जे प्रयत्न चालविले होते ते शास्त्रीबुवांनी विफल करून त्यांचा डाव त्यांच्यावरच कसा उलटविला याची कल्पना येईल. वर सांगितलेच आहे की या थोर पुरुषांना पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा इ. युगे भारतात निर्माण करावयाची होती. विचारस्वातंत्र्य, समता, बुद्धिवाद ही पुनरुज्जीवनाची प्रधान लक्षणे होत. विष्णुशास्त्री यांच्या प्रत्येक निबंधात या तत्त्वांचे समर्थन केलेले आढळून येईल. ‘आमच्या देशाची स्थिती’ या निबंधात इंग्रजांच्या राज्याचे फायदे काय ते सांगताना आम्हाला मिळालेले मानसिक स्वातंत्र्य हा फार मोठा फायदा होय, असे त्यांनी म्हटले आहे. ‘मुद्रणस्वातंत्र्य’ या केसरीतील लेखमालेत त्यांनी याचे विस्तृत विवेचन केले आहे. ‘देशाभिमान’ या निबंधात आपल्या देशात पूर्वकाळी राजनिष्ठा का नव्हती, याचे विवेचन करताना जातिभेद हे प्रधान कारण म्हणून सांगितले आहे. इहलोकनिष्ठा, ऐहिक उत्कर्षाची तळमळ हे पुनरुज्जीवनाचे फार मोठे लक्षण आहे. ‘गर्व’, ‘इतिहास’ या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी आपल्या निवृत्तिमार्गी जीवनावर प्रखर टीका केली आहे. कामक्रोधमदमत्सरलोभदंभ हे रिपू नसून मानवाचे मित्र आहेत, असे शास्त्रीबुवांनी पूर्ण इहनिष्ठ प्रतिपादन केले आहे. आपल्या देशात इतिहासाविषयी प्राचीन काळी पूर्ण अनास्था होती, याचे आपली निवृत्ती हे एक कारण म्हणून विष्णुशास्त्री सांगतात. विष्णुशास्त्री यांचा लेखनसंसार अवघा आठ वर्षांचा आहे. पण तेवढ्या अवधीत इहलोकनिष्ठा, बुद्धिवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, धर्मसहिष्णुता, ज्ञाननिष्ठा, स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश यांचे प्रेम इ. अनेक युगतत्त्वांचे विवरण त्यांनी केले आणि महाराष्ट्रीयांचा अहंकार जागृत करून लोकशाही विचारांची बीजे त्यांनी येथल्या जनमानसात रोवली.

टिळकांनी आपल्या विविध ग्रंथांतून याच युगतत्त्वांचा पुरस्कार करून भारतात लोकशाहीला अवश्य ती लोकशक्ती निर्माण केली, हे सर्वांना विदीतच आहे. ‘ओरायन’ व ‘आर्क्टिक होम’ हे ग्रंथ त्यांनी केवळ इतिहाससंशोधनार्थ लिहिले, असे मला वाटत माही. भारतीय संस्कृतीचे प्राचीनत्व व श्रेष्ठत्व जगापुढे सिद्ध करून भारतीय अस्मितेचा परिपोष त्यांना करावयाचा होता आणि त्या ग्रंथांनी हे कार्य साधले यात शंका नाही. तेलंग, भांडारकर, चिंतामणराव देशमुख यांच्या ग्रंथांमुळे जगन्मान्य संशोधक भारतातही निपजू शकतात हे सिद्ध झाले व भारतीयांची मान उंच व ताठ झाली. टिळकांच्या ग्रंथांमुळे या सर्वांच्या प्रयत्नांवर कलशस्थापना झाली. लोकशाहीला अवश्य जे प्रबळ कणखर व्यक्तिमत्व, त्यासाठी व्यक्तीच्या मनात प्रथम स्वाभिमानाचा पोष होणे अवश्य असते. टिळकांच्या वरील ग्रंथांनी ते कार्य साधले.

‘गीतारहस्य’ या ग्रंथाने, अनेक शतके या देशातील लोकांच्या मनावर निवृत्तीचे जे झापड आले होते, ते दूर झाले. शंकराचार्यांच्या गीता, बह्मसूत्रे व उपनिषदे यांवरील भाष्यांनी भारतीय मनावर जवळजवळ हजार वर्षे अधिराज्य चालविले होते. रामानुज, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, निम्बार्क हे संस्कृत आचार्य व अखिल भारतातील संतमंडळ यांनी संसार असार आहे, हे सांगून भारतातील इहलोकनिष्ठाच नष्ट केली होती. भारतीय कर्तृत्वाला अनेक शतके मरगळ आली होती ती त्यामुळेच होय. पाश्चात्य विद्या येथे प्रसृत होऊ लागली तसतशी आपली निवृत्तीवरची श्रद्धा ढळत चाललीच होती. टिळकांनी ज्या गीतेच्या साह्याने निवृत्ती पोसत होती, त्या गीतेचाच आधार तिच्या खालून काढून घेऊन समर्थांच्या जयिष्णु प्रवृत्तिवादी महाराष्ट्रधर्माचे पुनरुज्जीवन केले.

पण टिळकांचे खरे कार्य म्हणजे भारतात लोकशक्ती निर्माण करणे हे होय. त्यांनी निर्माण केलेली नवी सृष्टी ती हीच होय. चाळीस वर्षे त्यांचा ‘केसरी’ हा ग्रंथराज ह्या अलौकिक अभिनव सृष्टीची रचना करीत होता. त्याच काळात काव्हूर, बिस्मार्क, सन् यत् सेन, प्रिन्स इटो इ. राष्ट्रपुरुषांनी इटली, जर्मनी, चीन, जपान या देशांत राष्ट्रसंघटना केली. पण त्यांनी राजसत्ता, सरंजामी सरदार-सत्ता, लष्करी सामर्थ्य, भांडवली शक्ती यांचा उपयोग या कार्यासाठी केला. टिळकांनी भारतात लोकशक्तीचा अवलंब करावयाचा असे प्रारंभापासूनच निश्चित केले होते. या सर्व थोर पुरुषांनी ज्या साधनांनी राष्ट्रसंघटना केली त्यांची तुलना आपल्या दृष्टीने उद्बोधक होईल. राजसत्तेचे बळ कोणाच्या पाठीशी होते, कोणी लष्करी सामर्थ्य वापरले, कोणी भांडवली शक्तीचा अवलंब केला. टिळकांचे साधन कोणते? फक्त लेखणी! ग्रंथप्रसवा लेखणी! त्या पुरुषांची राष्ट्रे ३-४ कोटी संख्येची, त्यांचे क्षेत्रफळ २-३ लाख चौरस मैल. टिळकांचे कार्यक्षेत्र ३० कोटींचा समाज व १८ लक्ष चौरस मैलांचा देश! पण इतिहास अशी ग्वाही देतो की ‘केसरी’ या ग्रंथराजाने निर्माण केलेली लोकशक्ती हीच फार प्रभावी ठरली.

आगरकरांचा ग्रंथराज म्हणजे ‘सुधारक’ हा होय. राष्ट्रीय अहंकार जागृत होऊन लोक संघटित होऊ लागले म्हणजे त्या संघटित, सामाजिक शक्ती दंडसत्तेकडे झुकण्याचा संभाव असतो. ‘समाजासाठी व्यक्ती’ हे तत्त्वज्ञान प्रबळ होऊन व्यक्तीच्या व्यक्तित्वाची गळचेपी होते. जर्मनी, इटली येथील हिटलर-मुसोलिनींच्या दंडसत्ता व चीन-रशियातील दंडसत्ता यांची उदाहरणे आपल्यापुढे आहेतच. आगरकरांच्या काळी अशा सत्ता नव्हत्या. तरी जर्मनी, जपान येथे अनियंत्रित अशा राजसत्ता होत्या. भारतात असा व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी दिला जाऊ नये ही आगरकरांची चिंता होती आणि त्यासाठी सुधारकाच्या पहिल्या अंकापासून त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार करण्यास प्रारंभ केला. आपला समाज चतुर्विध शृंखलांनी जखडलेला होता. ‘वेदप्रामाण्य’ ही पहिली शृंखला. शेकडो वर्षे या देशात बुद्धिप्रामाण्याला, मानवी बुद्धीला स्वतंत्र विचार करण्यास अवसरच नव्हता. येथे भौतिक जीवनाचे, ऐहिक व्यवहारांचे तत्त्वज्ञान सांगणारे ग्रंथ निर्माण झाले नाहीत याचे हे प्रधान कारण आहे. ‘कर्मसिद्धांत’ ही दुसरी शृंखला. पूर्वजन्माच्या कर्मांनी प्रत्येक माणूस बद्ध आहे, त्याची बुद्धीसुद्धा कर्मानुसारिणी आहे, तिला सद्विचार सुचणे हे सुद्धा पूर्वकर्मावर अवलंबून आहे, असे हे तत्त्व आहे. ‘जाति’ ही तिसरी शृंखला होय. अमक्या जातीत जन्मलेल्याने अमकाच व्यवसाय केला पाहिजे, असाच आचार केला पाहिजे, असा अत्यंत क्रूर दंडक या देशात हजारो वर्षे जारी होता. त्यामुळे येथे लक्षावधी लोकांच्या कर्तृत्वाची हत्त्या झाली. चौथी शृंखला म्हणजे ‘काला’ची होय. आपण कलियुग-कल्पना शतकानुशतके उराशी धरून बसलो होतो. कलियुगात असेच घडणार, अध:पात होणारच, धर्म लयाला जाणारच, अविन्धांचे राज्य होणारच, आपल्या हाती काही नाही, असे तत्त्वज्ञान येथल्या समाजात दृढमूल झाले होते. आगरकरांना सर्वत्र असे पारतंत्र्य, गुलामगिरी, बौद्धिक दास्य हे दिसत होते. भारतीयांची बुद्धी या शृंखलांनी अगदी जखडून गेल्यामुळे येथील समाज अत्यंत दीन अवस्थेला गेलेला त्यांना दिसत होता. सुधारकाच्या पहिल्या लेखापासून त्यांनी या शृंखलांवर घणाचे घाव घालण्यास प्रारंभ केला आणि ‘आमचे ग्रहण अजून सुटले नाही’, मूळ पाया चांगला पाहिजे’, ‘आमचे काय होणार?’ असे निबंध लिहून त्या तोडून टाकण्याचा आमरण प्रयत्न चालविला. ‘हातातून लेखणी गळून पडेपर्यंत सुधारक आपले व्रत सोडणार नाही’, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती व ती शब्दश: पाळली. आगरकरांना अकाली मृत्यू आल्यामुळे भारताच्या बुद्धीला जखडणार्‍या शृंखला प्रत्यक्षात तुटून पडलेल्या पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही. पण त्या पुढच्या काळात तुटून गेल्या आणि आज आपल्या मनावर त्यांच्या ‘सुधारक’ या ग्रंथराजाचीच सत्ता आहे, हे आपल्याला सहजच मान्य होईल. स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे, पुरुषांना देण्यात येते तेच दिले पाहिजे आणि तेही एकत्र दिले पाहिजे, हा त्यांचा आग्रह आपण आज अक्षरशः अमलात आणला आहे. जुन्या स्मृती रद्द करून ‘आमच्या स्मृती आम्ही रचणार’ हे त्यांचे स्वप्न आज आपण खरे केले आहे. बालविवाहाचा त्यांना भयंकर संताप असे. त्यापेक्षा सती बरी, असे त्यांनी एका लेखात वैतागून लिहिले आहे. आज बालविवाह कायद्यानेच म्हणजे नव्या स्मृतींनीच रद्द केला आहे. जातिभेद, कलियुग, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकसत्ता, धर्मातील कर्मकांड या सर्व विषयांनी आज आपण आगरकरांचे अनुयायी झलो आहोत. त्यांच्या ग्रंथांची सत्ता ती हीच होय. महाराष्ट्राचा गेल्या पाऊणशे वर्षांचा इतिहास पाहिला तर निबंधमाला, केसरी व सुधारक या तीन ग्रंथराजांचीच सत्ता येथे प्रस्थापित झाली आहे व अजूनही लोकमत ती सत्ता आनंदाने मान्य करीत आहे असे आपणास आढळून येईल.

ग्रंथ ही महाशक्ती आहे, हा विचार वाचकांना पटवून द्यावा यासाठी एवढा प्रपंच केला. त्यांना तो पटला असेल तर या महाशक्तीची उपासना करण्यास त्यांनी तत्काळ प्रारंभ केला पाहिजे. अजून आपल्यापुढे कामाचे पर्वतच्या पर्वत पडले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य, समता, इहलोकनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा ही तत्त्वे गेली शंभर वर्षे आपल्या कानांवर पडत असली तरी भारतातील बहुसंख्य जनतेच्या चित्तांत अजून ती रुजलेली नाहीत. जातीयता, प्रांतीयता ही विषे अजून समाजमनात किती प्रबळ आहेत याचा प्रत्यय आपल्याला वरचेवर येत असतो. कायद्याने अस्पृश्यता नष्ट केली तरी प्रत्यक्षात ती किती प्रभावी आहे हेही वरचेवर दिसून येत आहे. बालविवाहाची तीच स्थिती आहे. खेड्यापाड्यांतून हजारो बालविवाह अजूनही दरसाल होतच असतात. खेड्यापाड्यांत लोकशाही आल्यामुळे तेथे गुंडांचे राज्य होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण अन्यायाचा प्राणपणे प्रतिकार करण्याचे व्यक्तित्वाचे सामर्थ्य अजून आपल्या समाजात अवतीर्ण झालेले नाही आणि ते झाले नाही तोपर्यंत आपली लोकसत्ता यशस्वी होणे अशक्य आहे. म्हणून युरोपात जी धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक क्रांती झाली, जी युगपरिवर्तने गेल्या पाचशे वर्षांत झाली, ती पुढील पन्नास वर्षांत येथल्या बहुजनसमाजात घडवून आणणे हे अतिदुर्घट कार्य आपल्यापुढे आहे आणि ग्रंथ या महाशक्तीच्या उपासनेवाचून ते साधणे कदापि शक्य नाही.

या क्षेत्रातील महाराष्ट्रामधील एक दुर्दैवी उणीव वाचकांच्या नजरेस आणू इच्छितो. रानडे, विष्णुशास्त्री यांच्यापासून पुढील चाळीस- पन्नास वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्रात युगपरिवर्तन घडवतील असे अनेक ग्रंथकार झाले. रानडे, तेलंग, भांडारकर, विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, केळकर, राजवाडे, वैद्य, केतकर, सावरकर, माटे, जावडेकर ही नाममालिका वर सांगितलीच आहे. प्रश्न असा आहे की आज त्यांच्या तोडीचा ग्रंथकार कोण आहे? वास्तविक त्यांच्या अलौकिक प्रेरणेने महाराष्ट्रात ग्रंथकर्तृत्वशक्तीचा विकास होऊन त्या वेळच्या मानाने दसपट ग्रंथकार या भूमीत निर्माण व्हावयास पाहिजे होते. तसे तर झाले नाहीच, उलट ती महान परंपरा लोप पावते की काय अशी दारुण शंका मनाला आज त्रस्त करीत आहे. म्हणून वाचकांना विनंती अशी की वेळीच सावध होऊन या महाशक्तीची उपासना त्यांनी आरंभावी आणि तिला प्रसन्न करून घेऊन भारताच्या लोकसत्तेपुढे येऊन पडलेल्या बिकट समस्या सोडविण्यास साह्य करावे.

पूर्वप्रसिद्धी – माझे चिंतन – कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच वेबसाईट