गो. नी. दांडेकर – एक कॅलीडोस्कोप – भाग १

Gopal Nilkanth Dandekar

लेखक – विनय हर्डीकर

1 जून 2018 हा आप्पांचा विसावा स्मृतिदिन. 1 जून 98 ला आप्पा गेले, आणि त्यानंतर काही दिवसांनी वीणाने (वीणा देव) ‘स्मरणे गोनीदांची’ असं पुस्तक प्रकाशित करायचा निर्णय केला. आप्पांच्या शेवटच्या आजारपणामध्ये मी अतिशय मनापासून आणि नियमितपणे आप्पांची विचारपूस करायला जात असे. आप्पा कोमातच असल्यामुळे विचारपूस कुटुंबियांकडे करावी लागत होती. त्यावेळी तिथे बसल्याबसल्या मी आप्पांशी मनातल्या मनात बोलत असे. आप्पा मला आवडत होते. मी आप्पांना किती आवडलो हे मला माहिती नाही, पण त्यांच्या सहवासात काही अतिशय उत्कट क्षण मी अनुभवले होते. एकदा मी आणि रवी (अभ्यंकर) सकाळी तळेगावला आप्पांच्या घरी गेलो होतो. त्यादिवशी त्यांचं गाडगे महाराजांचं चरित्र लिहून पूर्ण झालं होतं. त्या चरित्राचं सगळं हस्तलिखित मी तिथे बसून वाचलं. ते वाचनात मला जाणवलं की, एखादा अपवाद वगळता 300 पानांमध्ये आप्पांनी एकदाही खाडाखोड केलेली नव्हती. फिकट हिरवा कागद, त्यावर गडद हिरवी शाई आणि आप्पांचं रेखीव अक्षर, हे मी तिथे बसून वाचलं. त्यादिवशी संध्याकाळी आम्ही ते हस्तलिखित पुण्याच्या मॅजेस्टिकमध्ये घेऊन जाणार होतो. आम्ही हस्तलिखित घेऊन निघालो. कोपऱ्यापर्यंत गेल्यावर गाडी पंक्चर झाली. गाडी पंक्चरला टाकून आम्ही परत आलो. तेव्हा नीराताई म्हणाल्या, “आता ते हस्तलिखित नेऊ नका. एकदा ते परत आलंय ना, उद्या मी दुसऱ्या कोणाबरोबर तरी पाठवते.” दुसऱ्याच दिवशी मी आप्पांना एक पत्र टाकलं. त्या पत्रात मी असं लिहिलं होतं की, तुम्हाला वाचकांच्या कौतुकांच्या काय नवल आहे? ते तुम्ही नेहमीच अनुभवता आहात. त्याला आप्पांचं कार्डावर उत्तर आलं होतं. पुन्हा हिरव्या शाईत. वरती ‘श्री शं वंदे’, ‘आरे’ (ही आप्पांची खास स्टाईल. ‘अरे’ नाही ‘आरे), ‘माणूस कितीही पिकला तरी त्यास कुणी बरे म्हंटले तर त्याला उदंड वाटते. – इति आप्पा’ हे पत्र माझ्या अजूनही लक्षात आहे.

पुढे मी ‘जनांचा प्रवाहो चालिला’ हे पुस्तक लिहिलं, त्यातला एक भाग ‘माणूस’च्या 1977 च्या दिवाळी अंकात आला होता. त्यात मी ‘आणीबाणी’मध्ये काहीही न केल्याबद्दल सगळ्याच मराठी साहित्यिकांची हजेरी घेतलेली होती. आप्पांना राग येईल असा त्यांचा एक उल्लेख त्याच्यात होता. (उल्लेख खोटा नव्हता). त्यानंतर एका कार्यक्रमात आप्पा भेटले. तिथे ओळख करून देताना मी म्हणालो, ‘आप्पा, मी विनय.’ त्यावर मला म्हणाले, ‘आपल्याला कोण ओळखत नाही? तो महान लेख आपणच लिहिलाय ना?’ माझ्या छातीत थोडं धडधडलं; वाटलं, हा एक नवीन खजिना आपल्याला सापडला होता तो निसटून जातो का काय. पण पुढे ‘जनांचा प्रवाहो…’ पूर्ण पुस्तक आल्यानंतर आप्पांचं मला (अंंतरदेशीय) इनलँड’ भरून पत्र आलेलं आहे. त्या पुस्तकावर आलेल्या काही सुंदर पत्रांपैकी ते एक पत्र आहे. ते पुन्हा आप्पांच्या स्टाईलमध्येच. ‘डोहातल्या पाण्याच्या तळाशी असलेली वाळू दिसावी असे पारदर्शक दुसरे लेखन आणीबाणी संबंधी मी वाचलेले नाही. आणीबाणीवर अनेक पुस्तके आली, गाजली, काही मुद्दाम गाजवली गेली.’ या प्रकारचा अभिप्राय त्यांनी माझ्या पुस्तकावर दिलेला.

आप्पांची आणि माझी फार जवळीक नव्हती, पण आप्पा मला खूप आवडत असत. त्यावेळी वीणाने माझ्याकडून ‘स्मरणे गोनीदांची’साठी लेख मागितला होता. पण आप्पांचा समग्र विचार करताना इतके प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले होते की, तो लेख मी लिहिला नाही. (आता असं वाटतं की, आप्पांच्या शेवटच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची जी शुश्रुषा केली, त्याच्या कृतज्ञतेपोटीतरी मी लेख लिहायला हवा होता.) या घटनेला आता जवळजवळ वीस वर्ष होत आली.

आमच्या कॉलेजच्या दिवसांत वीणाने एका लेखात आप्पांचा उल्लेख ‘आप्पा – धुक्याने वेढलेला डोंगर’ असा केला होता. पुढे तिनेच आप्पांच्यावर ‘आशक मस्त फकीर’ हे एक अत्यंत वाचनीय आणि इतक्या जवळच्या व्यक्तीने जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्हली लिहिलेलं असं दुसरं पुस्तकं लिहिलं. (स्वतःबद्दल कमीत कमी ऑब्जक्टिव्हली कसं लिहिता येतं यासाठी श्री.ना. पेंडसे यांचं ‘लेखक आणि माणूस’ हे पुस्तक वाचावं!) स्वतःच्या वडिलांबद्दल जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्हली लिहिण्याचं कठिण काम वीणाने करून दाखवलं. यापैकी ‘आशक’ आणि ‘मस्त’ हे शब्द मला पटतात. पण ‘फकीर’ हा शब्द खटकतो. ‘फकिरी’ वृतीमध्ये जी इतरांबद्दल जी बेपर्वाई असते, तशी आप्पांच्या स्वभावात नव्हती. ‘स्मरणे गोनीदांची’मध्ये बाबासाहेब पुरंदर्यांचा एक लेख आहे. त्यात वीणाच्या उल्लेखाची आठवण काढून बाबासाहेब म्हणतात, ‘हा डोंगर धुक्याने वेढलेला असला तरी, मला या डोंगराच्या गुप्तवाटा माहिती आहेत.’ आणि एकाअर्थी हे बरोबरच आहे. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे ‘बाबासाहेब’, भूगोल म्हणजे ‘आप्पा!’ माझा असा नम्र दावा आहे की, मलाही आप्पांच्या काही गुप्तवाटा, अवघड वाटा माहिती होत्या.

त्यांच्या लेखनप्रवासात, जीवनप्रवासात मला जे काही दिसलं ते आज मांडणार आहे. ही समीक्षा नाही, विश्लेषण नाही. जसे आप्पा एकाच किल्ल्यावर कितीदा गेले असतील. तसा काहीसा आप्पांच्या आयुष्याकडे मी असा बघतो आहे. आप्पांनी मराठीमध्ये आणलेलं दोन भागतलं ‘महाभारत’ हे त्यांचं मी लहानपणी वाचलेलं पाहिलं पुस्तक. ते आप्पांनी बोली भाषेमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. आदल्या दिवशी मी ते पुस्तक वाचायचो आणि दुसऱ्या दिवशी शाळेत मधल्या सुट्टीत मित्रांना ते सांगायचो. मला कथाकथन करता येतं, हा शोध मला आप्पांमुळे लागला. सुरवातीच्या काळात माझ्या लिखाणावरही आप्पांची छाप होती. आप्पा कितीही वारकरी संप्रदायचे भक्त असले, अंकित असले, तरी आप्पांची लेखनशैली ही महानुभावांच्या गद्यासारखी आहे. छोटी छोटी, मार्मिक वाक्यं हे महानुभावांचं वैशिष्ट्य. आप्पांचीही तशीच स्टाईल होती.

माझा पहिला लेख फर्ग्युसनच्या वार्षिकामध्ये छापून आला होता, त्याला पहिलं पारितोषिकही मिळालं होतं. तो लेख वाचून प्रा. स. शि. भावे मला म्हणाले होते, तुझी लिहिण्याची पद्धत दांडेकरांसारखी आहे, तेव्हा तू काळजी घे! आता ते ‘भावे’ असल्यामुळे अगदी ‘मनोभावे’ त्यांनी मला इशाराही दिला होता. नंतर ‘सरू सासरी जाते’ आणि ‘त्याने चोरी केली’ या कथा मी वाचल्या. ‘सरू सासरी जाते’ ही कथा फार्सिकल आहे हे मला वाचल्यावर समजलं होतं. पण ‘त्याने चोरी केली’ ही कथा मला उलगडायला वेळ लागला. त्यानंतर मी वाचलेलं ‘अजून नाही जागे गोकुळ’ हे पुस्तक मला समजलंच नव्हतं. तेव्हा मी अगदीच लहान होतो. ते पुस्तक कुब्जेच्या श्रीकृष्णावरील प्लेटॉनिक प्रेमाबद्दल आहे. प्रेम आहे पण वासना नाही वगैरे गोष्टी मला त्यावेळी काही समजल्या नव्हत्या. ‘कर्णायन’मात्र मला पूर्ण समजलं, अतिशय आवडलं ही. त्यानंतर अकरावीच्या पुस्तकात ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ मधला एक धडा होता, तो वाचल्यानंतर मात्र मी गो. नि. दांडेकरांचं सगळं लेखन वाचायला लागलो. मी ते इतकं मनापासून वाचलेलं आहे की, काही पुस्तकं अशी आहेत, ज्यातलं पाहिलं वाक्य तुम्ही सांगा, त्याच्या आधीची आणि नंतरची वाक्यं मी सांगू शकेन.

कॅलिडोस्कोप म्हणजे काय, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यातील काचांचे तुकडे थोडसे हलवले तर आपल्याला नवीन रचना दिसते. आप्पांचा कॅलिडोस्कोप म्हणजे काय, त्यातले काचांचे तुकडे कोणते, हे आता आपण पाहूया. आप्पांना 83 वर्षांचं आयुष्य लाभलं. महाराष्ट्राच्या संदर्भात विचार केला तर आप्पा परतवाड्याला जन्मले. नागपूरला वाढले. घरातून बाहेर पडल्यावर प्रथम मुंबईला होते, त्यानंतर पुण्याला आले. नंतर पुन्हा मुंबईला गेले, नाशिकला गेले, संगमनेर जवळ अकोले गावी एक-दोन वर्ष राहिले. त्यानंतर गाडगे महाराजांच्या संप्रदायात आल्यावर पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाड्यात आप्पा फिरले, विदर्भाच्याही काही भागाला त्यांचा स्पर्श झाला. पूर्व विदर्भ सोडला तर बहुतेक सगळा महाराष्ट्र आणि भारताची सांस्कृतिक वाहिनी नर्मदा, भारतातील बहुतांशी हिंदी पट्टा परिचित झाला. हिंदीचे सगळे प्रकार, पूर्व विदर्भातील गोंडी बोली सोडली तर मराठीच्या इतर सगळ्या बोली, हे सगळं आप्पांना सापडलं ते नर्मदा परिक्रमा आणि गाडगे महाराजांच्यामुळे. त्यानंतर गाडगेबाबांचा विरोध असूनही आप्पा आळंदी आणि देहूला येऊन राहिले. गाडगेबाबा आप्पांना म्हणाले होते, तुम्हाला वैराग्य अगोदरच आलेलं असताना पुन्हा आळंदीला जाऊन कसला अभ्यास करायचा आहे? आणि जो देवाने लिहिलेलं पुस्तक वाचतो (म्हणजे निसर्ग आणि माणसं) त्याला दुसरं काही वाचावं लागत नाही. या अर्थाचा संवाद ‘स्मरणगाथेत’ आलेला आहे. तरी आप्पा हट्टाने तिथे राहिले. नंतर महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक यांच्याकडे त्यांनी संस्कृत ‘म्हंटलं’, (ज्याने संस्कृतचं अध्ययन केलं असेस त्याला ‘तुम्ही काय म्हंटलं? असं विचारतात.) भारतीय, महाराष्ट्रीय परंपरेत भिजून निघालेला जर कोणी मराठी लेखक असेल तर तो गो. नि. दांडेकर हा आहे. वारकर्यांचा अभ्यास करणारे लोक आहेत, संस्कृतचा अभ्यास करणारे लोक आहेत. परंतु संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही प्रांतांत इतका खोल गेलेला माणूस मराठी साहित्यात दुर्मिळ आहे. सहज विचार करताना दुसरं नाव पांगारकरांचं डोळ्यासमोर येतं. पण पांगारकरांचा हिंदीशी काही संबंध नव्हता. त्यांचा फक्त संस्कृत आणि मराठीशी संबंध होता.

आप्पांनी 100 पुस्तकं लिहिली. प्रत्येकाचा परामर्श घेणे इथे शक्य नाही. या 100 पुस्तकांमध्ये 33 कादंबऱ्या आहेत. बाल आणि कुमार साहित्याची जवळपास 25 पुस्तकं आहेत. 12-13 नाटकं आहेत. इथे एक गमतीदार वेगळेपण आहे. आप्पांनी प्रथम नाटक लिहिलं आणि मग ते कादंबरीकडे वळले. त्यामुळे ‘स्मरणे गोनीदांची’ मध्ये नाट्यव्यवसायातल्या लोकांचे लेख साहित्यातल्या लोकांच्या आधी आहेत. विजयाबाईंनी (मेहता) लिहिलेला प्रसंग मला इथे आठवतो, की ‘शितू’ नाटकाच्या तालमी सुरु असताना एखादा उत्कट प्रसंग आला तर आप्पांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागायचं. म्हणजे ‘टोकाची भावनाशीलता’ हे आप्पांचं वैशिष्ट्य होतं. धार्मिक, सांस्कृतिक प्रकारची सुद्धा 8-10 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. चरित्र-आत्मचरित्र मिळून तीन-चार पुस्तकं आहेत. शिवाय प्रवासवर्णन या फॉर्ममधली 8-9 पुस्तकं आहेत. मला असं वाटतं की त्यांची किल्ल्यांसंबंधीची 3-4 पुस्तकं या यादीत वेगळी दाखवली पाहिजेत. याचं कारण ते प्रवासवर्णन नाही. आप्पा जेव्हा एखाद्या किल्ल्याबद्दल लिहित असतात, तेव्हा ते तो किल्ला जगत असतात. मराठीमध्ये हल्ली प्रवासवर्णनं लिहिण्याची एक प्रथा पडलेली आहे. कोणत्याही देशाचं ‘ट्रॅव्हल गाईड’ वाचलं तर मी सुद्धा ही मीना प्रभूंसारखी ढीगभर पुस्तकं लिहू शकेन. मुद्दा असा की, आप्पांची किल्ल्यांवरची पुस्तकं वेगळी काढली पाहिजेत. आप्पांच्या आधीही अशी पुस्तकं आलेली होती. त्यामध्ये महादेवशास्त्री जोशी यांची ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ आणि ‘तीर्थरूप महाराष्ट्र’ ही दोन पुस्तकं येतात. यापैकी ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ या पुस्तकात आलेल्या अनेक किल्ल्यांवर शास्त्रीबुवा आणि आप्पा बरोबर गेले होते. त्यामध्ये एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग आलेला आहे. तोरणा किल्ल्यावर शास्त्रीबुवा घसरत चालले होते. त्यांना एका गुराख्याने वाचवलं. त्यानंतर आप्पांनी खिशात जे काही होतं ते त्या गुराख्याला दिलं आणि म्हणाले, “बाबा रे! तू कोणाला वाचवलं आहेस, याची तुला कल्पना नाही.”

Go. Ni. Dandekar

आप्पा नाटकाकडून कादंबरीकडे वळले. यामुळे आप्पांचीही सुटका झाली, नाटकाची सुटका झाली आणि मुख्य म्हणजे आम्हा वाचकांची सुटका झाली. आप्पांच्या लिखाणात नाट्य आहे. पण लिखाणात नाट्य असणं आणि तीन अंकांच्या-दोन अंकांच्या हिशोबात नाट्य बसवता येणं ही दोन वेगळी स्किल्स आहेत. ती एकाच माणसाकडे असतील असं नाही. (माझे सिनियर कथाकार मित्र विद्याधर पुंडलीक यांनी नाटकांचा एक प्रयोग करून पहिला होता.) आप्पांची नाटकं अयशस्वी झालीत असं नाही, विशेषतः ‘जगन्नाथाचा रथ’ मध्ये जो समूहनाट्याचा प्रयोग आहे तो तेव्हा तरी नवीनच होता. पण आप्पांच्या एकूण ऐसपैस स्वभावाला मोजून मापून लिहिणं मानवलं नसतं. त्यामुळे नाटकाकडून आप्पा कादंबरीकडे वळले आणि 33 कादंबऱ्या लिहिण्याइतकी मोठी कामगिरी त्यांनी केली. आप्पांच्या एकूण जीवनपद्धतीकडे पाहिलं तर राहणी आणि भाषाशैली साधी असली तरी ते त्यामध्ये वेगळेपणा दिसायचा. पोशाख सुद्धा साधाच, पण चारचौघांत आपण वेगळे दिसू याची काळजी घेतलेला. मला आठवतंय आप्पांना मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा मी प्रथम त्यांच्या पायांकडे पाहिलं होतं. इतकं चाललेल्या माणसाचे पाय कसे असतील, ही माझी उत्सुकता. पाय तसे लहानच होते. त्यांचा तो झब्बा, व्यवस्थित विंचरलेली दाढी. (ही या दोन मित्रांची सवय आहे. बाबासाहेबांच्या जाकिटाच्या खिशात सुद्धा एक लहान कंगावा असतो. आता बाबासाहेबांना शहाण्णवावं वर्ष सुरु आहे. तरी घरातून बाहेर पडताना एकदा केसांवरून आणि एकदा दाढीवरून कंगावा फिरवल्याशिवाय बाहेर पडत नाहीत.) त्यामुळे नीटनेटकं, व्यवस्थित पण आकर्षक असं त्यांचं स्वरूप होतं. आप्पांच्या आयुष्याला एक शिस्त होती. आप्पा ‘कलंदर’ तर होतेच, पण उसने पैसे घेऊन बुडवणे, फुकटची दारू पिणे आणि ज्याने आपल्याला सन्मानाने घरात बोलावलं आहे त्याच्या घरात काही लफडं करता येतं का ते बघणे अशा मराठीतील साहित्यिकांच्या ‘कलंदर’पणाच्या व्याख्येत बसणारे नव्हते. आप्पा सांगायचे सुद्धा, ‘अरे मला कोण मित्र असणार साहित्यिकांत? मी कोणाच्या खाण्यात नसतो, मी कोणाच्या पिण्यात नसतो.’ याच्यामध्ये सगळं येतं. शिवाय आप्पांनी दिनक्रमच असा बसवलेला होता की, हे वाह्यात साहित्यिक त्यांच्या आसपास फिरकणं शक्यच नव्हतं. साधेपणामधलं देखणेपण हे जसं आप्पांच्या शैलीचं वैशिष्ट्य आहे तसंच ते त्यांच्या व्यक्तीमत्वाचंही वैशिष्ट्य होतं.

अजून एक लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे, आप्पा संघात गेले आणि वेळेत संघापासून दूर झाले. कारण इतकं पठडीबद्ध आयुष्य आप्पांना आवडलं नसतं. संघात व्यवस्थित स्थिर झालेले असताना त्यांना हे केव्हातरी लक्षात आलं की अत्यंत चौकटबद्ध असं हे जीवन आहे आणि इथे आपल्याला फार काळ टिकता येणार नाही. संघाबद्दलची निष्ठा, प्रेम मनात ठेऊन आप्पा दोन वेळा तुरुंगात गेले होते. एकदा हैद्राबाद मुक्तीच्या लढ्याच्या वेळी आणि दुसर्यांदा 48 साली संघबंदीच्या वेळी. संघाशी असलेल्या नात्याचा एक धागा आप्पांनी कायम ठेवला. पण अनेकांनी आप्पांची तुलना साने गुरुजींशी केली आहे त्याला मात्र आप्पांनी कधीही दुजोरा दिलेला नाही. साने गुरुजीं विषयी आप्पा अनादराने बोलेले नाहीत किंवा लिहिलंही नाही. मात्र साने गुरुजींचा संघाबद्दल सकारण किंवा अकारण असणारा जळजळीत पूर्वग्रह आप्पांना कधीही आवडला नसणार. त्यामुळे आप्पांची जेव्हा जेव्हा साने गुरुजींशी तुलना झाली तेव्हा आप्पांनी कायम आपला वेगळेपणा दाखवलेला आहे.

आप्पांच्या अनुभवांच्या संपन्नतेचे दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा ते 13 व्या वर्षी घरातून बाहेर पडल्यापासून पुढची 16-17 वर्ष तरी घराबाहेर होते तोपर्यंतचा. आता या आकड्यांचा चोेख हिशोब लावता येत नाही. आप्पा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले निमित्ताने झालेल्या मॅजेस्टिक गप्पांमध्ये श्री. ज. जोशींनी त्यांना विचारलं, ‘आप्पा तुम्ही लिहिता मी अमुक इतके दिवस इथे राहिलो, अमुक इतके दिवस तिथे राहिलो. तर आम्ही या सगळ्याची बेरीज मांडली तेव्हा ती 105 वर्ष झाली, आणि आत्ता तर तुम्ही 60 वर्षाचे आहात?’ आप्पांनी हा प्रश्न मनाला लावून घेतला. या प्रश्नाला त्यांनी दिलेल्या उत्तरातून असं वाटतं की आप्पा रुसले आहेत. हे पुन्हा या मित्रांचं कॉमन आहे. बाबासाहेब आणि आप्पा हे दोघही रुसून बसतात. फटकन् बोलून, रागावून मोकळे होत नाहीत. आपल्याला अंदाजाने कळतं की हे रुसलेले आहेत. आप्पा या प्रश्नावर रुसले आणि म्हणाले, जोशीबुवा, तुम्ही दुसऱ्या कोणाचातरी किस्सा माझ्या नावावर खपवताय! एकाच वेळी माणूस अनेक पातळ्यांवर वावरत करत असला की असे प्रसंग येतात. काही दिवसांपूर्वी ‘ललित’मध्ये एक चांगला लेख आला होता म्हणून मी लेखकाला फोन केला. फोनवर तो म्हणाला, तुमच्यासारख्याने कौतुक केलं, पाठीवर थाप मारली म्हणजे बरं वाटतं. आता आली का पंचाईत! मी त्याला विचारलं, तुम्ही असं का म्हणताय? त्यावर तो म्हणाला, अहो तुम्ही इतकं काम केलेलं आहे (त्याला मी साधारण 80 वर्षांचा वाटत होतो. हा लेखक 67 वर्षांचा आणि मी 66 वर्षांचा होतो) त्यावर मी म्हणालो, मी बऱ्याच गोष्टी एकाच वेळेला करत असतो. तुम्ही असं एका सरळ रेषेत जाणारं लिनियर आयुष्य धरू नका! आप्पांचं साहित्य तसं सरळ रेषेत जाणारं आहे, पण आयुष्य झिगझॅग आहे! आणि पहिल्या 16-17 वर्षातले अनुभव आप्पांनी घ्यायचे म्हणून घेतलेले नाहीत. ते अनुभव त्यांच्या अक्षरशः अंगावर कोसळले आहेत. हा एक मोठा फरक ‘दांडेकर’ या लेखकाची चर्चा करताना कोणी विचारात घेतलेला नाही. म्हणजे एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा, असं ठरवून माणसं बाहेर पडतात, ती प्रक्रिया वेगळी. आणि इतक्या अजाणत्या वयापासून धडाधड कोसळणारे अनुभव आप्पांनी अनुभवले, त्यातून आप्पा टिकले आणि हे सगळं त्यांना नंतर आठवलं, या सगळ्याचंच आश्चर्य वाटत राहतं. शिवाय ते अनुभव लिहिताना कुठेही अतिशयोक्ती नाही. ‘दांडेकर’या लेखकावर अतिशयोक्तीचा आरोप अनेक लेखकांनी केलेला आहे. मात्र ‘स्मरणगाथेत’ अतिशयोक्ती अजिबात नाही. याचं कारण ते अनुभवच असे आहेत की त्यांचं अजून भडक वर्णन करण्याची गरजच नाही. आप्पांच्या अनुभवांचा हा एक टप्पा आहे, ज्यातून त्यांच्या सगळ्या साहित्याचा तपशील गोळा झालेला आहे.

दुसरा टप्पा हा गिरीभ्रमणाचा आहे. या टप्प्यांत आप्पांनी एक विस्तारित कुटुंब तयार केलं. ज्यामध्ये आप्पा तीन पिढ्याबरोबर फिरले. आप्पांच्या समवयस्कांची एक, त्यानंतर आप्पांच्या आणि आमच्या वयात तीस वर्षाचं अंतर आहे म्हणजे, आमच्या आधीची एक पिढी आणि आमची पिढी! आमच्या पिढीला बाबासाहेबांचं शिवचरित्र होतंच, पण जर त्या वेळी आप्पांचं लेखन आम्हाला वाचायला मिळालं नसतं तर आम्हाला गिरीभ्रमणाचा नाद लागला नसता. इतिहास आणि भूगोल यांचा जो समन्वय इतिहासाच्या अभ्यासकाला लागतो, तो या दोन लेखकांमुळे आम्हाला मिळाला. यामुळे आमच्या पिढीने तरी या दोघांचं ऋणी राहिलं पाहिजे. दुसऱ्या कोणत्या भाषेमध्ये असं घडलेलं दिसतं नाही, म्हणून मी असं म्हणतो आहे. शिवाय हे दोघे एकमेकांचे जवळचे मित्र.

आप्पांच्या लेखनातले 3 उतारे मी सांगणार आहे. ‘आप्पा हे महाराष्ट्राचे भूगोल’ असं मी का म्हणतो ते या पहिल्या उताऱ्यातून कळेल. “हा देश खेड्यांचा असे आपण ऐकतो. ते अतिशय खरे आहे. कुणा डोंगराच्या कड्यावर उभे राहावे, तर पायतळी इथे, तिथे, पलीकडे विखुरलेली दहा-वीस तरी खेडी दृष्टीस पडतात. खेडी, वाड्या, वस्त्या, पाडे, झाप, आवसे, झोपडी, धनगरांचे गोठे, इवली इवली खपरे किंवा झापांची, गवताने शाकारलेली घरे, झोपड्या, भटक्यांची पाले, मेजक्या (ही दांडेकर स्टाईल बघा, ‘मोजक्या’ नाही म्हणायचं, ‘मेजक्या’ म्हणायचं!) बळीवंतांचे वाडेहुडे जसे तळेगाव दाभाडे, तळेगाव ढमढेरे, मेणवली, सासवड, फलटण, भोर, औंध, मलकापूर इत्यादी ही सर्व माझ्या दृष्टीस पडली. शे-शंभर तरी गढ्या मी पहिल्या. लंगोटी आणि गळ्यात एक घोंगडीचा त्रिकोणी तुकडा इतका वेश, पण कीर्तन्या बुवा असल्याने थोडका जनांचा आदराचा विषय. त्यामुळे गढ्या पाहताना कुणी मना केले नाही. बुलंध धिप्पाड बुरुज, हत्ती अंबारी सकट आत शिरू शकेल एवढाले दरवाजे. हे सगळे जीर्ण झालेले पण प्राचीन वैभवाच्या खुणा पटवणारे. आतल्या दुपाखी, चौपाखी, चौक-चौकी इमारतीस प्रचंड सागवानी तुळया. कुठे त्या तुळयांवरती शोभिवंती हस्तीदंती नकसकाम, कुठे सुबक कडीपाट, कुठे कडीपाट सुबक चौकोनी तुकड्यांनी दडवलेला, कुठे चौकात दगडी कारंजी. वाड्या, गढ्या नांदत्या होत्या तेव्हा शेजारी बांधलेल्या चिरेबंदी विहिरीवर मोटा चालायच्या. ते पाणी वरील कोठीत साठवायचे, नळाने कारंज्यापर्यंत पुरवायचे, कळ फिरवली की कारंजे सुरु. सर्व इमारतीस सुरुदार नकसकाम केलेले खांब, ऐटदार कमानी, छतास टांगलेल्या हंड्या. आता त्यासर्वावर धुळीची पुटे चढलेली. फार अय्याशी नव्हे पण या सगळ्या मराठमोळ्या खानदानी वैभवाच्या खुणा पटवणाऱ्या” आता हे पांढरीचं वर्णन होतं, आता काळीचं वर्णन बघा, “पांढरी तो वळखीची झालीच. पण हिंडता फिरता काळीशीही वळखी झाली. कुठे नद्यांच्या थडीच्या मळ्या, गायराने, माळ, ‘आंबराया, देवराया, लोण्याचा थर असावा अशी काळी कसदार जमीन. किती आठवडी बाजार मी पाहिले. त्यात मांडलेली पाले, हलवायांची, शिंप्यांची, कापूर विक्रेत्यांची, घोंगडी विकणाऱ्या धनगरांची, तांबटांची, धान्य दुकानदारांची. किती तर्हांचा माळवा – पालेभाज्या, कांदे, लसूण, बटाटे. हलवायांच्या पालांमधून रेवड्या, जिलबी, बुंदीचे लाडू, बर्फी, गुडीशेव, चिवडाशेव. शिंप्याच्या पालांमध्ये धोतरे, लुगडी, गुलाल्या, खळीचे सदरे, बाराबंद्या, पागोटी, उपरणी, खण, चंच्या. या मी पाहिलेल्या बाजारामधून मिरच्या, कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा मिळत असे.” डिटेल्स बघा! ही फोटोग्राफिक मेमरी आहे. असा तपशील मराठीमध्ये आप्पांच्या आधी फक्त रामदासांच्या लेखनात सापडतो. आप्पांनीच कुठंतरी म्हटलंय की, रामदास एकदा भाज्यांची यादी करायला बसले आणि 250 भाज्या नोंदवल्या. (हा संत म्हणावा की आचारी?) ‘नरदेह नश्वर आहे’ हे रामदासांनी कसं सिद्ध केलंय? तर जसं आपल्या घरात निरनिराळ्या प्रकारचे किडे असतात तसंच मानवी देहामध्ये निरनिराळ्या प्रकारचे रोग असतात. ‘उंदीर म्हणती माझे घर, फुंगळ म्हणती माझे घर…’ महाराष्ट्रात सापडणाऱ्या किड्यांची यादी बघायची असेल तर ती दासबोधात बघा. रामदासांचं निरीक्षण असं अफाट होतं आणि सगळं नोंदवल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नसे. म्हणून दासबोध हा एका अर्थानं encyclopaedia सारखा ग्रंथ झाला. ही शैली कुठून आली? ही बाणभट्टाची शैली. याहूनही मोठ्या याद्या त्याच्या ‘कादंबरी’ ग्रंथात मिळतात. सुदैवानं दुर्गाबाई भागवतांनी त्या कादंबरीचं वाचनीय मराठीत भाषांतर केलं आहे त्यामुळं जरूर एकदा वाचून पहावं. कादंबरी encyclopaedic असायची पद्धत होती. व्यक्तिनिष्ठ कादंबरी, आत्मशोध घेणारी कादंबरी या अलीकडच्या काळातल्या कादंबऱ्या. आपल्याला दिसणारं, जाणवणारं सगळं नोंदवून ठेवायचं ही शिस्त बाणभट्टापासूनची आहे. त्याने ते महाभारतापासून आणलं. महाभारताचा पहिला श्लोकच आहे की, इथे जे नोंदवलंय ते सगळीकडे दिसेल आणि जे नोंदवलेलं नाही ते कुठेही सापडणार नाही.

आता या सगळ्या ‘कच्च्या माला’चं प्रोसेसिंग कसं व्हायचं, तेही आप्पांनी सांगून ठेवलेलं आहे. “आपण माझे वाचक आहात. माझी जात मी तुम्हाला सांगून ठेवतो. एकदा मुंबईहून परतत होतो. तेव्हा माझ्याबरोबर मराठीतले एक थोर लेखक होते. नाव सांगत नाही. ते म्हणाले तुम्ही हे असं आखून का लिहीत नाही? प्रकरणं पाडावी, अमुक पृष्ठावर अमुक कृती, अमुक वाक्य असं सगळं ठरवून का लिहीत नाही? मी त्यांना म्हणालो की साहेब, (हा आप्पांचा चावटपणा! भाषणातही त्यांना साहेब, बाईसाहेब करायची सवय.) दोन प्रकारच्या सावल्या मला माहित आहेत. एक राणीच्या बागेत योजनापूर्वक, दक्षतापूर्वक जोपासलेले वृक्ष. त्यांचीही छाया असतेच आणि दुसरी रानातली झाडे – त्यांचीही छाया असते. तुमचं लेखन पहिल्या जातीचं आहे. तुमचं प्रत्येक लेखन ही जणू सजवलेली एक बाग आहे. त्यात फळं आहेत, सुगंधित फुलं आहेत. माझं तसं नसतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. रानात चालणारा माणूस जेव्हा थकूनभागून उन्हानं घामेजून जाईल, त्यावेळी विसाव्याला कुण्या बागेकडे धावणार नाही. तो कुण्या उंबराखाली, सागाच्या वृक्षाखाली विसावेल. तर अर्थ असा (त्याला हे समजलं नाही हे, आप्पांनी गृहित धरलंय) की एका क्षणी मी झपाटला जातोय एखाद्या वस्तूनं आणि मग इतर नानाविध विषय जरी माझ्यासमोर आले तरी त्यांच्यामुळं माझं चित्त विचलित होत नाही. एखाद्या दिवशी मी एक प्रकरण पूर्ण करतो आणि दुसऱ्या दिवशी मी ज्या क्षणी लिहायला बसतो त्या क्षणी आता काय लिहावं असा एका क्षणाचाही विचार मला करावा लागत नाही आणि या भारलेल्या अवस्थेत मला यत्किंचितही उपद्रव होत नाही व्यत्यय निर्माण होत नाही.” तर तपशील कसा, कुठून आणि किती येतो हे आप्पांच्या शब्दांत आपण बघितलं. आप्पांनी सांगितल्याप्रमाणे ते भारलेले वगैरे असत ते इतकं खरं नाही. म्हणजे आप्पा 2-3 ड्राफ्ट करत नसत. मराठीत पुन्हा या दोन पद्धती आहेत. पहिला draft हाच काहींचा शेवटचा draft असतो. भालचंद्र नेमाड्यांनी सांगितलंय की कादंबरीचे तीन draft तरी होतातच, तेव्हापासून अनेक लोक 3 draft झाले की आपल्या हातून चांगली कादंबरी लिहून होईल या भ्रमात अडकले आहेत. ‘बाबा तुला कादंबरी लिहिता येत नाही, मग तू आणखी तीन draft केले तरी काय फरक पडणार आहे?’ आप्पांचे draft मनातल्या मनात होत असले पाहिजेत. दुर्गभ्रमणगाथेमध्ये मोहंन वेल्हाळ त्यांचं dictation घेत असत त्यावेळी त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत त्यातून हे लिखाणाची प्रक्रिया आपल्याला दिसते. ‘ही तो श्रींची इच्छा’ ही कादंबरी त्यांनी रायगडच्या स्तंभामध्ये बसून पूर्ण केली, त्यावेळी कुणी लेखनिकही नव्हता. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की, सकाळी आणि दुपारी चार-पाच तास लिहिणं झालं, दोन सत्रं झाली की संध्याकाळी फिरायला बाहेर पडायचं आणि उद्या काय लिहायचं हे सगळं योजून ठेवायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी लिहायला बसल्यानंतर लेखन सुरू. ही सहजता आप्पांच्या स्वभावातल्या सरळपणा आणि साधेपणामुळे होती. जास्त गुंतागुंतीमध्ये न जाता मूव्ही कॅमेऱ्यासारखं भराभरा जे डोळ्याला दिसेल ते मनात साठवत असले पाहिजेत आणि स्मरणशक्ती अतिशय चांगली असल्यामुळे त्यांना तो प्रसंग जसाच्यातसा दिसत असला पाहिजे.

आपले लोक इतके बालिश आहेत की लेखकांना काय प्रश्न विचारावेत हे त्यांना कळतच नाही. आप्पांना तीन छंद होते. भटकंती हा त्यांचा छंद नाही, तो आहे त्यांचा स्वभाव! पहिला छंद फोटोग्राफी. अतिशय सुंदर ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी आप्पांनी केलेली आहे. पुण्याच्या मॅजेस्टिकच्या इमारतीत तुम्ही जाऊन पाहू शकता. देव मंडळींनी जे म्युझियम केलंय तिथंही बघायला मिळेल. दुसऱ्या छंदाला ते चित्रपाषाण म्हणतात. साध्या भाषेत गारगोट्या. त्या गोळा करणं आणि त्यांना आकार देण्याचा प्रयत्न करणं. तिसरा छंद – एखादं फूल, छोटी गारगोटी मॅग्निफायरमधून लोकांना दाखवणं. त्यांना भेटायला गेलात तर मॅग्निफायर मधून अशी वस्तू पाहणं हे कंपलसरी होतं. चौथा छंद होता गड किल्ल्यांवर सापडलेल्या ऐतिहासिक वस्तू गोळा करणं. पण आर्किऑलॉजीचा नियम असल्यामुळं त्यांच्यावर काहीही न करता त्यांनी नुसत्याच ठेवल्या होत्या. त्यांचे हे तीन छंद हेच त्यांचं लेखन आहे हे कुणाच्या कसं लक्षात आलं नाही? चांगला फोटो काढायचा असेल तर त्या चौकटीत काय काय घ्यायचं हे पहिल्यांदा निश्चित करायला पाहिजे. त्याला एक्सपोजर किती द्यायचं हेही निश्चित करायला पाहिजे. राजगडवर घेतलेल्या एका फोटोचं ‘हे साक्षात्कार छायाचित्र’ आहे असं वर्णन रवीनं केलं आहे. आप्पा जेव्हा एखादा प्रसंग लिहितात तेव्हा फोटोग्राफर सारखं त्यांनी ठरवलेलं असतं. दुसरं – आकार देणं. कितीही उत्स्फूर्त म्हटलं तरी चांगलं लेखन ही एक रचना असते. प्रेरणा उत्स्फूर्त असेल पण प्रत्यक्षात ती रचना असते. तो अनुभव, त्यांच्यातल्या व्यक्ती, त्यांचे चेहरे, त्यांची देहयष्टी, त्यांचं वावरणं या सगळ्याला आकार देत असत. तिसरं मॅग्निफायर – आप्पांच्या बोलण्यात, लिहिण्यात जी अतिशयोक्ती असायची तो मॅग्निफायर होता. लोकांनी विचारलं या छंदांचा तुम्हाला त्रास होत नाही का. मी असतो तर त्या विचारणाऱ्याला चार फटके मारले असते. “मला यातल्या कशाचाही त्रास होत नाही” हे दांडेकरांनी दिलेलं उत्तर. स्वतःची खुबी दांडेकरांनासुद्धा लक्षात आली नाही.

आप्पांनी लेखनातला तपशील, लिहिण्याची पद्धत, वेगळ्या धाटणीची मराठी भाषा आणि चौकट ठरवून घेतली. लेखनात एकोणिसाव्या शतकाच्या पुढे आप्पा आलेले नाहीत. संतांचा काळ, शिवाजीचा काळ. शिवकाळात आप्पांनी ‘शिवकालावर’ भर देण्याचं ठरवलं, शिवाजीचा जन्म, तिथी यात ते पडले नाहीत. आप्पांना एक मानसिकता निर्माण करायची होती. संत वाङ्मयाच्या बाबतीतही तेच आहे. आप्पांनी त्यांच्या लेखनात शहर पूर्णपणे वर्ज्य केलं आहे. शहरांचा उल्लेख फक्त त्यांच्या ललित लेखनात कधीकधी येतो. ‘रानभुली’ ही कादंबरी सोडली तर आप्पा एकोणिसाव्या शतकापाशी थांबले आहेत. 13 ते 16 ही शतके संतांची, सतरावं शतक शिवाजीचं, अठरावं शतक (पेशवाईचं) त्यांनी पूर्ण बाजूला ठेवलं आहे. शेवटी एकोणिसावं शतक (ते स्वतःला स्वराजिष्टच्या घरी जन्मलो असं म्हणत असत). हे त्यांनी काळजीपूर्वक केलं आहे. आमचे शरद जोशी म्हणायचे की, ‘मगरीने पाणी सोडू नये आणि हत्तीनं पाण्यात जाऊ नये.’ थॉमस हार्डीचं एक वाक्य आहे, It is better to know everything about something than something about everything. आप्पांच्यात आपल्याला हे दोन्ही दिसतं. गाडगे महाराजांचा संप्रदाय काय होता हे जर आप्पांनी ‘श्री गाडगे महाराज’ हे पुस्तक लिहिलं नसतं तर महाराष्ट्राला कधी तो कळला नसता. नर्मदा परिक्रमेमधले हौशे, नौशे, गवसे आणि लुच्चे हे सगळेच व्यक्तिप्रकार आप्पांनी नोंदवलं नसते तर आम्हाला कळळेच नसते. माझं स्वतःचं ट्रेकिंग आता थांबलेलं आहे, पण दुर्गभ्रमणगाथेतलं कुठलही पान उघडलं तर मला सगळं आठवतं. आप्पांनी 250 किल्ले पाहिले. त्यातले प्रमुख 75 किल्ले मीही पाहिले आहेत. आप्पांच्या अनुभवांचे हे दोन टप्पे त्यांच्या लेखनात आपल्याला दिसतात. याद्वारे त्यांनी त्या त्या पिढीशी आपलं नातं जोडलं आहे.

बाणभट्टाचा किती लोकांशी संबंध आला होता? कवी, विद्वान (इथे दोन्ही वेगवेगळे!), गीतरचनाकार, प्राकृतरचनाकार, विष उतरवणारे, पांदण वाहणारे, वैद्य, प्रवचनकार, कलाकार, सोनार, खल्लेणूविष, चित्रकार, मातीकाम करणारे, मृदंगवादक, संदेशवाहक, गवई, संगीत्याध्यापक, मालिश करणारे, नर्तक-नर्तकी, भिक्षुणी, कथाकथन करणारे,मांत्रिक, धातुज्ञ, संन्याशी. एकूण पंचवीस एक व्यक्तिप्रकार. बाणभट्टाच्या काळात होते पण त्याने नोंदवले नाहीत अशांची मी यादी केली – मल्ल, खेळाडू, सैनिक, सैन्याधिकारी, घोडे-हत्तीतज्ज्ञ, शेतकरी, स्वयंपाकी, व्यापारी आणि बांधकाम करणारे. जवळपास 39 ची यादी झाली. आप्पांच्या काळात नवे व्यक्तिप्रकार तयार झाले ते – पत्रकार, समीक्षक, संपादक, गॉसिपवाले, ड्रायव्हरकंडक्टर, इव्हेंट मॅनेजर्स, प्रायोजक, संस्थाचालक, कन्सल्टन्ट, ढोंगी आध्यात्मिक गुरु, लोकप्रतिनिधी इ. इ. कुणाला अनुभवसमृद्ध म्हणायचं असेल तर साधारण 50 व्यक्तिप्रकारांची यादी आपल्याला करावी लागते. यातल्या 25-30 व्यक्तिप्रकारांशी आप्पांचा संबंध आलेला होता, असं म्हणता येतं.

कॅलिडोस्कोपचा दुसरा भाग – आप्पांचा स्वभाव. त्यांच्या स्वभावाबद्दल अत्यंत टोकाच्या प्रतिक्रिया आहेत. फार थोड्या परिचयावर त्यांच्या स्वभावाबद्दल कुणी मत बनवलं तर ते सर्वसामान्यपणे चुकत असे, असं मला बाबासाहेबांनी सांगितलं. आप्पा हा खूप मोठा प्रदेश आहे, यात प्रेमानं आणि मनापासून फिरावं लागतं, असं त्यांना सुचवायचं होतं. आप्पा नाटकी होते. आप्पा हिशोबी होते. व्यवहारी होते. त्याच्या-उलट आप्पा अतिशय उत्कट होते. अतिशय प्रेमळ होते. स्वभावाने उमदे होते. अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया. काही लिखाणात तर काही गॉसिपिंगमध्ये आल्या आहेत. नाटकीपणाचा आरोप आप्पा आणि बाबासाहेब या दोन्ही मित्रांवर आहे. माझ्या मते ही समवयस्कांची प्रतिक्रिया असते. आपल्याला बालपणी एक मनुष्य मित्र म्हणून माहित असतो, आणि त्यावेळी त्याच्यात कोणत्या क्षमता आहेत आणि यशाचं कोणतं शिखर तो गाठणार आहे हे आपल्याला माहित नसतं. काहीवेळा त्यालाही माहित नसतं. अशावेळी तो आपल्यासारखाच असतो. पण एकदा असा मित्र यशस्वी झाला, पुढे गेला की त्याला वेगळं वागावंच लागतं. त्या वेगळ्या वागण्याला लोक नाटकी म्हणतात.लिहिण्याच्या शैलीसरखी आप्पांची बोलण्याचीही मराठीची वेगळी शैली होती. ‘त्यामुळं आता हा आमच्यातला राहिला नाही’ अशी समवयस्कांची तक्रार असते. अरे पण आता तो तुमच्यातला राहिलाच नाही, त्यात त्याचा काही दोषही नाही. उद्या तुमच्यातलं कुणी पुढे गेलं तरी तुमचे मित्रही असंच म्हणतील.

आप्पांकडं पदवी नाही, संपत्ती नाही, फार मोठी कुलपरंपरा नाही, कोणत्या संघटनेचं फारमोठं पाठबळ नाही, कुणी दाता त्यांच्यामागे उभा राहिलेला नाही. तरीसुद्धा नाटक नाही तर कादंबरी हा आपला फॉर्म आहे हे जेव्हा त्यांना कळलं आणि ज्या झपाट्याने ते पुढं गेले ते हेवा वाटण्या-सारखं आहे. बाबासाहेबांचंही तेच. संघशाखेवर, सहलीला गेल्यावर, ‘सांग रे बाबा शिवाजीचं काहीतरी!’ असं ज्याला सांगत तो जेव्हा शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे झाला आणि महाराष्ट्र पातळीवरचा वक्ता झाला. ‘तीन वर्षांच्या पुढची तारीख तुम्हाला मिळेल’ हे बाबासाहेबांच्या ऑफिसमध्ये लिहिलेलं असायचं. लोकांना हे नाटक वाटायचं. अशा माणसांच्या नंतरच्या पिढीला याचं काही वाटत नाही. कारण त्या पिढीला तो माणूस तसाच (सेलिब्रेटी म्हणून) माहित झालेला असतो. त्यामुळे आमच्या पिढीला आप्पा फार नाटकी आहेत असं काही वाटलं नाही.

आप्पा प्रेमळ की हिशोबी? ते ज्या सांपत्तिक परिस्थितीतून आले त्यात उधळपट्टी शक्यच नव्हती. खर्चावर नियंत्रण ठेवत, आलेल्या गरजूंना आप्पा मदत करत. कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे, जीवनमूल्य आहे. यासाठी त्या माणसाला थोडं हिशोबी व्हावंच लागतं. बेहिशोबी आणि अव्यवहारीपणाचं उदाहरण म्हणजे आप्पांचं सगळं आयुष्यच आहे. ज्या उत्कटतेनं आप्पांनी स्वतःला झोकून दिलं होतं त्यात कुठला हिशोब होता? आणि नीरा ताईंशी लग्न ठरवतानाही त्यांनी सांगितलं की, अमुक दिवशी महिन्याला एवढा पगार घरात येईल याचा भरवसा नाही. पण त्या दोघांनीही ते स्वीकारलं, निभावलं. नुसतं निभावलं नाही तर जुन्या काळाबद्दल आप्पांनी कधी व्याकुळतेनं माझ्याशी, आसपासच्या लोकांशी बोलल्याचं मला माहित नाही.

आप्पा बेरकी मात्र होते. श्रद्धाळू, पण भाबडे नव्हेत. वारकरी संप्रदाय, गाडगे महाराजांचा संप्रदाय – जिथंजिथं त्यांना विसंगती दिसली तिथंतिथं त्यांनी ती मार्मिकपणे दाखवलेली आहे. आप्पांना आपल्या strengths पक्क्या माहित आहेत. समीक्षकांचा कात्रज कसा करावा हेही त्यांना माहीत आहे. आपल्यासारखा ओघवती भाषा असलेला, वाचनीय लेखक दुर्मिळ आहे हेही त्यांना माहित आहे. म्हणून आप्पांचं तुम्ही विश्लेषण करायला लागलात की आप्पा आपल्या अशिक्षितपणाकडे बोट करतात. ही स्टाईल मराठीमध्ये खांडेकरांनी आणली. खांडेकर फक्त इंटर होते, फडके – माडखोलकर एमए होते. खांडेकरांच्या कादंबरीत दोष दाखवला की, ते म्हणायचे, “मी कुठं शिकलोय! मी उच्चविद्याविभूषित नाही. मी अंतःप्रेरणेने लिहितो. मला फुरस चावलं. दत्तक मुलगा असल्यानं बापानं मला शिकवलंच नाही.” अरे वा! तुम्हाला कोण शिकायला नको म्हंटलं होतं का? स्वतःच्या आयुष्यातला अभाव मिटवण्यासाठी खांडेकर लिहीत होते की काय असं वाटतं. आप्पांना कुणी म्हटलं की, आप्पा तुमचं हे पसरट झालं, तर ते म्हणायचे, माझा कुठे तुमच्याइतका साहित्याचा अभ्यास आहे. श्री. ना. पेंडशांची एक वेगळीच स्टाईल होती. ते नावालाच B.Sc झाले. ते त्यांनी स्पष्टपणे सांगूनही टाकलं होतं. त्यांची अमुक कादंबरी चांगली आहे असं म्हटलं की ते म्हणायचे ती त्यांना आवडत नाही. डी. एच. लॉरेन्सचं वाक्य आहे – Trust the novel not the novelist. प्रत्येक लेखक आपली प्रतिमा जपूनच लिहीत असतो. म्हणून त्याच्या बोलण्यावर फारसा विश्वास ठेवू नये. मला बेतून लिहिता येत नाही असं आप्पा म्हणत. पण हे बेतणं त्यांच्या मनात चालू असायचं, हे ते सांगत नसत.

आणीबाणी संपल्यानंतर बरेचसे मराठी साहित्यिक भाषणं करू लागले. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांच्या गावागावात सभा व्हायच्या. तेव्हा आप्पा जाणूनबुजून त्यांच्या आवडत्या प्रदेशात गेले. धुळ्यापासून सुरुवात करून नागपूरपर्यंत त्यांनी निवडणुकीच्या काळात भाषणे केली. धुळ्यातल्या भाषणावेळी मी तिथे हजर होतो. ‘जनांचा प्रवाहो…’ मध्ये मी त्या सभेचं, भाषणाचं वर्णन केलंय. आपल्याला मागणी कुठं आहे हे आप्पांना माहीत असायचं. हा आप्पांचा बेरकीपणा.

आप्पांच्या भाषेवर इंग्रजीचा प्रभाव नाही. तसंच संस्कृतचं ओझंही नाही. पण त्यांचा संस्कृतचा अभ्यास मात्र होता. आप्पांची भाषा ग्रांथिक नव्हती. त्यांनी बोली भाषेतच लिहिलं आहे. ते जुन्या मराठीची आठवण करून द्यायचे. ‘मुखी’ म्हणायचे, ‘तोंडी’ नाही. लहान लेखांना ते ‘लेखुटली’ म्हणायचे. बाबासाहेब ‘माँसाहेब’ म्हणायचे. आपल्याला बाबासाहेबांच्या समांतर लिहायचं पण बाबासारखं नाही, म्हणून आप्पा ‘आऊसाहेब’ लिहायचे. दुर्गभ्रमणगाथेत ते ‘आठ जुलाय’ म्हणतात. आता जुलै म्हणायला काय हरकत आहे? क्वचित शाहिरी अंगाने ते जातात. ‘चांडाळा’ इ. त्यांच्या आवडत्या शिव्या. ‘हे किती सुंदर आहे’ असं नाही, तर ‘कसं हे!’ म्हणायचे. सभ्य चावटपणा हेही आप्पांचं वैशिष्ट्य. ‘पडघवली’मध्ये असा प्रसंग आहे की, दामुअण्णाकडे पाहुणा येतो. आणि यादोनानाची कुरूप बायको पहाटेच्या वेळी चांदण्यात आंबे राखत उभी असते. पाहुण्याला पहाटेच तांब्या घेऊन बाहेर जावं लागतं. पाहुणा झाडाखालीच येतो आहे हे पाहून ती बाई बाहेर येते. तिला पाहून पाहुणा आरोळी मारतो,“दामूअण्णा, हाडळ! धावा.” त्याच्यापुढे कॉमेंट अशी आहे की, ‘मग त्याला परसाकडे जावंच लागलं नाही.’

‘दास डोंगरी राहतो’ मधला एक प्रसंग आहे की, रामदास आणि शहाजी चर्चा करत आहेत. बाहेरचा एक गुराखी दुसऱ्या माणसाला विचारतो की, ‘हे इतकं काय बोलताहेत एकमेकांत?’ त्यावर तो म्हणाला, ‘तुझं ते खटं पडलेलं, लंगडं, केस झडलेलं घोडं आहे ना, ते पाच्छावाने मागितलंय आणि त्या बदल्यात अर्ध राज्य आणि राजकन्या दोन्ही द्यायची की फक्त राजकन्या द्यायची याची चर्चा चालू आहे.’ हा खास आप्पांचा चावटपणा आहे. असाच एक खास आप्पा स्टाईलचा चावटपणा ‘वाघरू’मध्ये आहे. बाबुदा आणि शिकारी यांच्यातल सगळं बोलणं या प्रकारचंच आहे. शिकारी नियोजन करून शिकार करणारा आहे. अमुक वाजता बसायचं. अमुक वाजता जनावर येईल. अमुक वाजता गोळी झाडणार. मग ते मरून पडणार. शिकाऱ्याचा तोडून ‘मरून पडेल’ हे ऐकल्यावर बाबुदा उठतो आणि चालायला लागतो. त्यावर शिकारी विचारतो, ‘कुठे चाललात?’ तर त्यावर बाबुदा म्हणतो, ‘तो मरून पडलेला वाघ उचलून आणायला माणसं नको सांगायला?’

सगळ्यात धमाल प्रसंग म्हणजे संघाची पहिली प्रार्थना मराठीत होती. तिच्या पहिल्याच कडव्यामध्ये ‘मी’ हे अक्षर 7-8 वेळा आलेलं आहे. ‘नमो मातृभूमी, नमो हिंदू भूमी, नमो आर्यभूमी’ असं सगळं आहे आणि शेवटी ‘सदा ती नमी मी’. त्यावर छोटा आप्पा मुख्य शिक्षकाला म्हणतो हे आठ ‘मी-मी’ पाहिजेत, तीन ‘मी-मी’ बरोबर नाहीत. खरं म्हणजे हे स्वतःचं कन्फेशन आहे, पण ते ही अतिशय गोड. ‘पूर्णामाईची लेकरे’ हा खरं म्हणजे एक कम्युनिटी फार्सच आहे. हे सगळं आप्पा म्हणत असत त्याप्रमाणे सहजही येत असेल. पण आपल्या लेखनातला भरपूर तपशील आणि सतत उत्कटतेची आपण गाठत आहोत ती पातळी या पासून वाचकाला थोडा रिलिफ मिळाला पाहिजे याची त्यांची जाणीव ठेवली होती.

कोकणच्या इतर लेखकांपेक्षा आप्पांनी वेगळी वाट निवडली. खांडेकरांच्या लघुकथांमध्ये कोकणाचं जीवन आहे. लक्ष्मणराव सरदेसाई हे एक नाव घ्यायची एक पद्धत आहे. साने गुरूजींचं कोकणावरती लेखन आहे. श्री. ना. पेंडसे, मधुमंगेश कर्णिक, जयवंत दळवी, चिं. त्र्यं. खानोलकर आहेत. खानोलकर आणि दळवींना नेमाड्यांनी घरचा आहेर दिला आहे. यांच्या कादंबर्यांत पोटे आणणे आणि पोटे पाडणे एवढंच चालू असतं. साने गुरूजींचं लेखन अतिसोज्वळ आणि अतिभावुक. पेंडशांचं लेखन कोकणातल्या एका कुटुंबापुरत सीमित आहे. म्हणजे ‘तुंबाडचे खोत’ हे खोतांचं बाड झालंय असं मी म्हणतो, कारण पेंडशांना खोतांच्या आसपासचा समाज माहितीच नाही. कोकणातली एकत्र कुटुंब पद्धती हा पेंडशांचा अनुभवाचा आणि व्यासंगाचा विषय होता. तिथे पुन्हा मगरीने पाणी सोडलं की मग जी दाणादाण उडते तशी पेंडसे महानगरात आल्यावर त्यांची दाणादाण उडालेली आहे. तरी सुद्धा त्यांनी ‘कलंदर’मध्ये चांगला प्रयत्न केला. मात्र जेव्हा ते प्रत्यक्ष मुंबईवर लिहायला लागतात तिथून त्यांचा उतार चालू होतो. माझ्यामते ‘लव्हाळी’ या कादंबरीमध्ये कोकणी वृत्ती आणि मुंबईची राहणी याचा सगळ्यात चांगला समतोल श्री.ना पेंडशांना जमला. आप्पांच कोकण तसं गुंतागुंतीचं आहे. ‘शितू’मधलं लेखन अतिशय भावुक आहे. तर ‘पडघवली’मधलं अतिशय वास्तववादी आहे. ‘पडघवली’मधली वास्तववादी निवेदन करणारी ‘स्त्री’ मराठीमध्ये फार क्वचित आलेली आहे. गडांसंबंधी जेव्हा आप्पा लिहितात, त्यातलं कोकण वेगळं आहे. त्यामुळे अतिभावुक नाही, अतिधक्कादायक नाही तर कोकणच्या जीवनाचा मध्य-प्रवाह पकडून त्यांनी लिहिलेलं आहे. आणि या तपशिलांचा उपयोग त्यांची सगळीकडे केला आहे. ‘दर्याभवानी’ ही कादंबरी संपूर्णतः कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडते. शिवकाळातली एक कादंबरी संबंध कोकणातली आहे. तिच्यावरून माझं आणि आप्पांच भांडण झालं. रामदासांच्या भेटीला राजेशिर्के आले होते, जाताना राजेमोरे गेले. चुकून तसा उल्लेख तिथं राहिला आहे. याबद्दल आप्पांना विचारलं तर पाठीत धपाटा घालून ते म्हणाले, “चांडाळा, 250 पानांत तुला तेवढंच लक्षात राहिलं का?” कोणीतरी आपलं बारकाईनं वाचतोय याचं कौतुकही त्यांना असायचं. आप्पा तो चढ तीन हजार फूट नाही, दोनच हजार फुटच आहे, आप्पा ते दहा मैल नाही सातच मैल आहे असं म्हटलं की आप्पा म्हणायचे, चांडाळांनो, मी तुमच्यापेक्षा दुप्पट वयाचा असल्यानं मला दुप्पट दिसतं.

गडावरचे आप्पा एक वेगळं प्रकरण होतं. ‘एकतरी ओवी। अनुभवावी॥’ या प्रकारचं ते होतं. बाबासाहेब आणि आप्पा ऐतिहासिक ठिकाणी गेले की त्यांचं व्यक्तिमत्व बदलून जायचं. ते त्या काळात जाऊन पोचलेले असायचे. गडावर गेल्यानंतर निसर्गाकडे कसं पाहायचं हे आप्पांना माहीत होतं. रवी अभ्यंकरनं एक आठवण लिहून ठेवली आहे. एकदा आप्पा सर्वांना रायगडावर सिंहासनाजवळ घेऊन गेले. म्हणाले, “गडे हो! एक लक्षात ठेवा. पुन्हा इथं यायची लाज वाटेल असं आयुष्यात काही करू नका.”

(क्रमशः)

लेखक – विनय हर्डीकर

(शब्दांकन – अक्षर मैफल टीम)

सदर लेख ‘अक्षर मैफल’ मासिकाच्या मार्च २०१८ या अंकामध्ये प्रकाशित झाला असून आप्पांच्या स्मृतिदिनानिमित्त वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आला आहे. या लेखाचा पुढील भाग ‘अक्षर मैफल’च्या एप्रिल २०१८ या अंकामध्ये प्रकाशित झाला आहे. तरी आपल्या संग्रही असावेत असे हे दोन्ही अंक विक्रीस उपलब्ध असून, अंक खरेदी करण्यासाठीची अधिक माहिती संपर्क या पेज वर उपलब्ध आहे. (अथवा पुढील क्रमांकावर संपर्क साधावा – 9021423717)

हे सर्व आम्ही करतो आहोत कारण आमचं मराठी भाषेवर अतोनात प्रेम आहे म्हणून. पुढच्या शंभर दीडशे वर्षात मराठी सुद्धा जगाची ज्ञानभाषा होऊ शकेल. ती ताकद मराठीमध्ये आहे. मराठी भाषेत ज्ञान निर्माण झालं पाहिजे असा हेतू घेऊन आम्ही काम करतो आहोत.

असेच मराठीतील दर्जेदार लेख वाचण्यासाठी आजच ‘अक्षर मैफल’चे सदस्य व्हा.

‘अक्षर मैफल’चा मे 2018 महिन्याचा ‘कार्ल मार्क्स’ विशेषांक!

मार्क्सच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण मार्क्स समजून घेऊ. मार्क्सवाद म्हणजे काय? ‘मार्क्सवादी टीकाकार’ कोण कोण? त्यांचे आक्षेप, त्यांनी घातलेली मार्क्सवादामध्ये भर नेमकी कोणती? मार्क्सचे क्रांतीचे निरनिराळ्या देशांतले चेहेरे कोणते? उदा. चे, स्टॅलिन, मानवेंद्रनाथ रॉय, कॉम्रेड डांगे इ. शिवाय भारतातील डावी चळवळ पुढे नेणारे निष्ठावंत अभ्यासू कार्यकर्ते यांचेही लेख यात तुम्हाला वाचायला मिळतील. मार्क्सचा साहित्यावर पडलेला प्रभाव, चित्रपटावर पडलेला प्रभाव हे सुद्धा समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

‘कार्ल मार्क्स’ विशेषांक सर्वत्र प्रकाशित! अंक खरेदीच्या अधिक माहितीसाठी संपर्क पेज ला भेट द्या. (अथवा संपर्क – 9021423717)