मी का लिहितो? – जॉर्ज ऑरवेल

मी का लिहितो? - जॉर्ज ऑरवेल

वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून मला माहिती होतं की मोठा झाल्यावर मला लेखक बनायचंय आहे. वयाच्या सतरा ते चोवीस या टप्प्यात मी लेखक बनायची इच्छा सोडून द्यायचा प्रयत्न करत होतो, मात्र हे करत असताना मला जाणीव होती की या वयात अद्याप मी माझ्या क्षमता कमावत आहे, स्वतःच्या व्यक्तिमत्व विकसनाचा हा काळ आहे आणि पुढे जाऊन कधी ना कधीतरी मला लिहतं व्हावं लागणारच आहे.

आम्ही तिघं भावंडं. मी वयानं मधला होतो आणि दोन्ही भावंडांत पाच-पाच वर्षांचं अंतर होतं. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मी माझ्या वडिलांना फार कमी भेटलोय. या अशा काही कारणांमुळे मला एकाकी (एकटं) वाटायचं आणि यातूनच मग माझ्यात लोकांना सहसा न रुचणार्‍या प्रवृत्ती वाढायला लागल्या आणि अशा विचित्र स्वभावामुळे मी माझ्या शाळेत नेहमीच प्रचंड अलोकिप्रय होतो. एकाकी मुलांना असते तशी काल्पिनक गोष्टी रचणे किंवा काल्पिनक पात्रांशी संवाद साधणे अशा सवयी मला जडल्या, आणि मला वाटतं की माझ्या लेखक बनायच्या इच्छेचं मूळ या एकटेपणात आणि लोकांकडून मला न मिळणार्‍या किमतीमध्ये होतं. मला माहिती होतं की माझ्यापाशी शब्दाशी जवळीक साधायची, शब्द वापरायची कला आहे, न रुचणारं वास्तव स्वीकारायची ताकद आहे आणि यातूनच मी माझं खाजगी विश्व उभारलं होतं जेणेकरून खर्‍या जीवनात रोजच्या रोज तोंड द्याव्या लागणार्‍या अपयशापासून मी दूर जात होतो. हे सारं जरी असलं तरी माझ्या बालपणात मी सहेतुक असं जे लिखाण केलं ते सगळं मिळून अर्धा डझन पानं सुद्धा भरणार नाही. माझी पहिली कविता मी वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी केव्हातरी लिहिली. (माझ्या आईने कवितेचं डिक्टेशन घेतलं होतं.)

मला याबद्दल फारसं काहीही आठवत नाही, पण ती कविता वाघांविषयी आहे आणि वाघाला चेअरी सारखे दात आहेत, असं काहीतरी त्यात होतं. ही क्विता ब्लॅकच्या वाघ, वाघ या कवितेची चक्क प्रतीकृती होती.

मी अकरा वर्षांचा होतो तेव्हा पहिले महायुद्ध सुरु झाले आणि त्यावेळी मी लिहिलेली एक देशभक्तीपर कविता एका स्थानिक पत्रात छापून आली होती, अशीच दोन वर्षांनंतर मी किचनेर च्या मृत्यूनंतर लिहिलेली कविता पुन्हा स्थानिक वृत्तपत्रांमध्ये मुद्रित केलेली होती. थोडा मोठा झाल्यावर मी जार्जियन शैलीमध्ये वाईट आणि अपूर्ण निसर्ग कविता लिहील्या होत्या. नंतर मी दोन-तीनदा लघुकथा लिहिण्याचा प्रयत्नदेखील करून पाहिला पण त्याही पूणर्तः फसलेल्या होत्या. तर असे हे त्या सर्व वर्षांमध्ये मी खरोखरच कागदावर घालवलेले असे गंभीर काम होते.

मात्र या संपूर्ण काळात मी एका अथार्ने साहित्यिक क्रियाकलापांमध्ये गुंतलो होतो. सुरुवातीचं लेखन हे गरज पडेल त्यानुसार केलेलं असल्यानं मला त्यातून काही फार आनंद मिळाला नाही. शाळेत असताना नेहमीच्या कामाशिवाय मी प्रसंगानुरूप विनोदी कविता करायचो, आज मागे पाहताना मी त्या प्रचंड आवेगात केल्या असल्याचं मला जाणवतं. चौदा वर्षांचा असताना मी सुमारे एक आठवड्यात अरिस्तोफोनच्या अनुकरणाने एक संपूर्ण संगीतिकेचा अंक लिहिला, मुद्रित आणि पांडिलीप मधील दोन्ही शालेय नियतकालिकं संपादित करण्यास मदत केली. ही नियतकालिकं म्हणजे साहित्याचं अक्षरश: करुण विडंबन हातं. पण हे सर्व चालू असताना मी माझ्या मनातल्या मनातच एक साहित्यिक प्रयोग करत होतो. हा एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग होता. मी माझीच गोष्ट एका डायरीच्या स्वरूपात लिहीत होतो; मात्र ही डायरी केवळ माझ्या मनातच अस्तित्वात होती. खूप लहान असताना मी स्वतःलाच रॉबिन हूडसारखं एखादं पात्र मानून, माझ्या भोवती साहसकथा गुंफत असे. आणि यातूनच हळू हळू अशा कथांमधला नार्सिसिझम जाऊन त्यात मी करत असलेल्या गोष्टी, माझ्या आसपासच्या घटना यांची वर्णने वाढू लागली. त्याने दरवाजा उघडून खोलीत प्रवेश केला, तेव्हा सूर्याची पिवळीजर्द किरणं मलमली पडद्यांच्या आडून टेबलावर झेपावत होती. टेबलावर एक अधर्बट उघडी काडेपेटी दौतीच्या बाजूला पडली होती. उजवा हात खिशात ठेऊनच तो खिडकीकडे सरकला. खाली रस्त्यावर एक खवलेवाली मांजर वाळलेली पानं पकडायचा प्रयन्त करत होती. इत्यादी सारख्या गोष्टी माझ्या मनात सतत चालू असत. वयाच्या पंचिवशीपर्यंत माझी ही सवय चालू होती. योग्य शब्द शोधण्यासाठी मला कष्ट पडायचे हे खरं असलं तरी जणू कोणीतरी जबरदस्ती करत असल्याप्रमाणं हे सारं असच चालू असे. या माझ्या कथेवर बदलत्या वयानुसार आणि आवडीनुसार वेगवेगळ्या लेखकांचा प्रभाव पडत गेला आणि तरीही तीमध्ये अगदी पूर्वीसारखीच बारीकसारीक वर्णनं मात्र कायम येत राहिली.

मी सोळा वषार्ंचा असताना मला अचानक शब्दांमधला आनंद गवसला. त्यांचा नाद आणि एकमेकांच्या सहयोगाने होणार्‍या रचना यातील आनंद उमगला. मिल्टनच्या पॅराडाईज लॉस्ट या कवितेतील,

So hee with difficulty and labor hard

Moved on: with difficulty and labor her.

या ओळी आता वाचताना मला फार काही विशेष वाटत नाहीत, मात्र त्या वयात या ओळी वाचून माझ्या अंगावर रोमांच उठले होते. त्यातही मिल्टननेही या शब्दाचा केलेला वापर विशेष आनंद देणारा होता. आणि गोष्टींची वर्णनं कशी करायची याबाबत मला व्यविस्थत माहिती तर होतीच, त्यामुळे मला कशा प्रकारची पुस्तकं लिहायची आहेत हे (म्हणजे निदान त्या वयात लिहावीशी वाटत होती) आपल्याला कळू शकतं. मला उपमा-उत्प्रेक्षा, वर्णनांनी भरलेल्या, शब्दबंबाळ खंडप्राय शोकांतिका लिहायच्या होत्या. आणि खरं म्हणजे मी तीस वषार्ंचा असताना लिहिलेली बर्मीज डेज ही माझी पहिली कादंबरी अशाच प्रकारातलं पुस्तक आहे.

आता ही सर्व पाश्वर्भूमी देण्याचं कारण म्हणजे लेखकाचा हेतू समजून घेण्याच्या दृष्टीनं त्याची जडणघडण समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तो लेखक ज्या काळात राहतो त्या काळाचा प्रभाव त्याच्या लेखनावर पडतोच मात्र त्याने लेखनाची सुरुवात करण्यापूर्वीच तो एक माणूस म्हणून त्यानं जो भावनात्मक दृष्टिकोन तयार केला असतो असतो ती भावना त्याचा पिच्छा पूणर्तः कधीही सोडत नाही. स्वतःच्या प्रवृत्तीला शिस्त लावणं आणि कुठल्यातरी अपिरपक्व अवस्थेत किंवा प्रतीकूल मनिस्थतीत अडकून न राहणं ही लेखकाची जबाबदारी आहेच; मात्र हे करत असताना जर तो आपले मूळ प्रभाव पूणर्पणे विसरला तर तो लिहिण्याची उर्मीच गमावून बसेल.

उपजीविकेचं एक साधन याव्यितिरक्त गद्यलिखाणासाठी चार प्रमुख हेतू असतात असं मला वाटतं. प्रत्येक लेखकांमध्ये ते हेतू बदलत्या स्तराचे असतात आणि एकाच लेखकात त्यांचं एकमेकांच्या तुलनेतलं प्रमाणही तो लेखक ज्या वातावरणात राहतो त्यानुसार बदलणारं असतं. ते चार हेतू पुढीलप्रमाणे-

1. निखालस अहंता :

इतरांपेक्षा हुशार/वेगळं दिसणं, लोकांमध्ये चर्चेचा विषय होणं, अजरामर होणं, लहान असताना त्रास देणार्‍या मोठ्या लोकांवर सूड उगवणं इत्यादी इत्यादी इच्छा यात सामावलेल्या असतात. अहंता हा हेतू नाही, असं सांगणं हे शुद्ध ढोंग आहे.कारण हा एक प्रमुख हेतू आहे. मात्र हे काही एकट्या लेखकाचंच वैशिष्ट्य आहे अशातला बिलकुल भाग नाही. वैज्ञानिक, कलाकार, राजकारणातील माणसे, सैनिक, यशस्वी उद्योजक अशी मोजकी पण समाजाच्या सर्वात वरच्या स्थरातील माणसे देखील यात येतात. मात्र सगळीच माणसे काही स्वार्थी नसतात. बहुतांश जण वयाची तिशी ओलांडल्यावर वैयक्तिक महत्वाकांक्षा सोडून देऊन इतरांसाठी तरी जगतात किंवा आपलीच कंटाळवाणी रटाळ कामं लाजेस्तव तशीच करत राहतात. मात्र अगदी मोजकेच प्रतिभावंत हेतुपुरस्पर शेवटापर्यंत स्वतःचच आयुष्य जगतात, आणि लेखक हे या मोजक्या लोकांपैकी एक आहेत. लेखनाप्रती गंभीर असणारी लेखक मंडळी ही माझ्या मते पत्रकारांपेक्षा अधिक गर्विष्ठ आणि आत्मकेंद्री असतात मात्र त्यांना पैशात फारसे स्वारस्य नसते.

2. सौंदयर्प्रती आस्था :

एकाबाजूने बाह्य जगातील सौंदर्याची जाण आणि दुसरीकडे शब्द आणि त्यांच्या रचनेतील सौंदर्य हा दुसरा महत्वाचा हेतू. यामध्ये एका ध्वनीचा दुसर्‍या ध्वनीवर पडणारा प्रभाव, लिखाणातला निग्रह वा कथेतील सुसंगतता असे सौंदर्याचे अनुभव दुसर्‍याप्रत पोहोचवण्याचा समावेश होतो. आपल्याला मौल्यवान वाटणारा आणि कोणाकडूनही सुटून जाऊ नये असा अनुभव दुसर्‍यासोबत वाटून घेण्याची उर्मी यात समाविष्ट आहे. सौंदर्याचा हेतू हा बहुतांश लेखाकांमध्ये फार कमजोर असतो. आणि दुसरीकडे एखादा पॅम्फलेटर किंवा पाठ्यपुस्तकं लिहिणार्‍या लेखकाचे देखील काही खास ठेवणीतले शब्द आणि वाक्प्रचार असतात जे त्याला व्यवहारापलीकडला आनंद देत असतात. किंवा त्यांना त्या पुस्तकाची रचना त्यात वापरला जाणारा फॉन्ट, लिखाणाची मांडणी याबद्दल तरी आस्था असतेच. सांगायचा मतितार्थ म्हणजे रटाळपणे बांधलेल्या रेल्वेगाईडचा अपवाद करता बहुतेक सर्वत्र सौंदर्य विचारात घेतलं जातं.

3. ऐतिहासिक प्रेरणा :

घटनेत, डोळ्यासमोर, समाजात जे आणि जसं दिसतं तसं दाखवायची इच्छा, सत्य शोधायची प्रेरणा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी वतर्मानाचा संचय करण्याची भावना यात येते.

4. राजकीय हेतू :

इथं राजकीय हा शब्द फार व्यापक अर्थानं वापरलेला आहे. राजकीय अंगापासून मुक्त असं कोणतंही पुस्तक नाही. जगाला विशिष्ट दिशा दाखवायची प्रेरणा, आदर्श समाजाप्रती असणारी लोकांची कल्पना बदलणं अशा काही हेतूंचा आपण यात समावेश करू शकू. तथापि कलेचा राजकारणाशी काहीही संबंध नसणं हा देखील एक राजकीय हेतूच आहे

कोणत्याही लेखकाच्या जडणघडणीसाठी या चार प्रमुख हेतूंमधील अतर्गत द्वंद्व होणं गरजेचं असतं आणि या हेतूंतील चढ-उतार/बदल हे व्यक्ती आणि काळ सापेक्ष असतात. प्रौढ वयात माझ्या मध्ये पहिल्या तीन हेतूंचे प्राबल्य हे अधिक वरचढ होतं.

शांततेच्या काळात जर मी हे लेखन केलं असतं तर कदाचित मी माझ्या राजकीय निष्ठांपासून अनिभज्ञ राहून निव्वळ अलंकारिक आणि वर्णनात्मक लिखाण केलं असतं.

सुरुवातीची पाच वर्ष मी माझ्यासाठी अयोग्य असणार्‍या एका व्यवसायात काढली. मी ब्रह्मदेशात इडिंयन इंपिरियल पोलीस सर्व्हिसमध्ये कामाला होतो. पुढे नोकरी सुटल्यावर मी प्रचंड दारिद्य्र आणि अपयशी जीवन म्हणजे काय याचा अनुभव देखील घेतला. यामुळे व्यवस्थेप्रती असणारी प्रचंड चीड, ब्रह्मदेशातील वास्तव्यात अनुभवायला आलेला साम्राज्यवाद आणि कामगार वर्गाच्या अवस्थेची झालेली जाणीव हे सारं याच काळात वाढीला लागलं. मात्र राजकीय जाणीव सुदृढ होण्यासाठी हे एवढंच पुरेसं नव्हतं. पुढे झालेला हिटलरचा उदय किंवा त्याच काळातील स्पेन मधलं यादवी युद्ध इत्यादी इत्यादी… अगदी 1935 च्या अखेरीपर्यंत मी याबाबतीत खंबीर निणर्याप्रत पोहचू शकलो नव्हतो. या काळातील माझी दुविधा मांडणारी माझी एक कविता

मला आठवतेय-

A happy vicar I might have been

Two hundred years ago

To preach upon eternal doom

And watch my walnuts grow;

But born, alas, in an evil time,

I missed that pleasant haven,

For the hair has grown on my upper lip

And the clergy are all clean-shaven.

And later still the times were good,

We were so easy to please,

We rocked our troubled thoughts to sleep

On the bosoms of the trees.

All ignorant we dared to own

The joys we now dissemble;

The greenfinch on the apple bough

Could make my enemies tremble.

But girl’s bellies and apricots,

Roach in a shaded stream,

Horses, ducks in flight at dawn,

All these are a dream.

It is forbidden to dream again;

We maim our joys or hide them:

Horses are made of chromium steel

And little fat men shall ride them.

I am the worm who never turned,

The eunuch without a harem;

Between the priest and the commissar

I walk like Eugene Aram;

And the commissar is telling my fortune

While the radio plays,

But the priest has promised an -ustin Seven,

For Duggie always pays.

I dreamt I dwelt in marble halls,

And woke to find it true;

I wasn’t born for an age like this;

Was Smith? Was Jones? Were you?

मात्र 1936-37 या काळातील स्पॅनिश युद्ध आणि इतर घटनांनी माझी कोंडी सोडवली आणि मला माझं राजकीय अस्तित्व गवसलं. 1936 पश्चात माझ्या सर्व गंभीर लिखाणात लिहली गेलेली प्रत्येक ओळ न् ओळ ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सर्वंकषवादाच्या विरुद्ध आणि मला कळलेल्या लोकशाही समाजवादाच्या बाजूने लिहिलेली आहे. आपण ज्या काळात जगतोय त्याकाळात अशा विषयांवर लिहायला टाळणं हा विचार देखील मला मूखर्पणाचा वाटतो. प्रत्येकजण याविषयी एका किंवा दुसर्‍या मार्गानं का होईना पण लिहितोच. कोण कोणती बाजू घेतोय किंवा कोण ते कशा प्रकारे हाताळतोय एवढा एकच साधा असा हा प्रश्न आहे. आणि स्वतःच्या या अशा राजकीय बाजूची जशी जशी अधिक जाणीव होईल तशी तशी, स्वतःची सौंदर्यविषयक व बौद्धिक सचोटी न सोडून देखील, राजकीय वागण्याची शक्यता अधिक वाढेल.

राजकीय लेखन एक कलाप्रकार बनवण्याचा प्रयत्न मी गेल्या दहा वर्षांपासून सतत करू पहात आहे. पक्षपात आणि अन्याय हे दोन घटक माझ्या लेखनाचा प्रारंभबिंदू आहेत. जेव्हा मी लिहायला बसतो तेव्हा मी स्वतःशी असं नाही म्हणत की – “चला आज मी एक कलेचा उत्तम नमूना निर्माण करणार आहे” माझ्या लिहिण्याचा हेतू हा असत्य उघडे पडून लोकांसमोर आणणे किंवा मला महत्वाच्या वाटणार्‍या घटनेकडं लोकांचं लक्ष वळवणं आणि त्याद्वारे किमान त्या गोष्टीला वाचा फोडणं हा असतो. मात्र पुस्तक काय किंवा दीर्घ लेख काय त्यात जर सौंदर्य येत नसेल तर मी ते लेखन करू शकत नाही. माझं लिखाण बारकाईने वाचणार्‍याला जाणवेल की त्यात शुद्ध राजकीय प्रोपोगंडा असला तरीही सामन्यात: राजकारणी ज्या निरुपयोगी व अप्रासंगिक मानतात अशा बाबी देखील त्यामध्ये असतात. मी माझ्या लहान वयात जे जगलो आणि त्यानं मला जी जगण्याची दृष्टी दिली ती मी माझ्या आताच्या लिखाणातही सोडू शकत नाहीये आणि सोडू इच्छितही नाहीये. मी जिवंत असेपर्यंत मला गद्य शैलीबद्दल, या पृथ्वीबद्दल आणि निरुपयोगी वाटणार्‍या माहितीबद्दलचे ‘वाटणं’ कायम राहील. माझ्यापासून त्यांना दडपून दूर घालवण्याला काहीही उपयोग नाही. त्यामुळे माझ्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि मुख्यत्वे सार्वजनिक जबाबदार्‍या यांच्यात सहयोग घडवून आणणे हे मुख्य काम आहे.

मात्र हे सहयोगाचं काम खचितच सोपं नाहीये. यामुळे शब्दरचना व भाषा आणि त्याचप्रमाणं अलीकडच्या काळात सत्यता (जोपासण्याचे) प्रश्न उद्भवतात. याचं एक उदाहरणच देतो, “होमेज टू कातालोनिया” हे माझं स्पॅनिश गृहयुद्धासंबंधीचं पुस्तक सरळ सरळ राजकीय स्वरूपाचं आहे. यामध्ये मी संपूर्ण सत्य कोणत्याही प्रकारे साहित्यिक मूल्यांशी प्रतारणा न करता सांगायचा प्रयत्न केला आहे. यात भरपूर सार्‍या वृत्तपत्रीय बातम्यांचं असं एक मोठं प्रकरण आहे, ज्यात ट्रॉट्स्कीयन लोकांवर फ्रँको विरोधात केल्या गेलेल्या आरोपांचा बचाव केला गेलाय. आता खरंतर या प्रकरणाचा आणि दोन-तीन वर्षांनी सामान्य वाचकांसाठी काहीही उपयोग नाही आणि त्यामुळे त्याचा रसभंग होऊ शकेल. याचबाबत एका एका समीक्षकाने (ज्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे) मला चांगलेच सुनावले. ते म्हणाले, या नसत्या घबाडाचं इथे काय काम? आणि यामुळे तू एका चांगल्या पुस्तकाचं बातम्यांच्या संकलनात रूपांतर केलं आहेस. आता ते जे म्हणतायत ते खरं आहे पण मी वेगळे काही करू शकलो नसतो. माझ्या माहितीप्रमाणं स्पेनमध्ये अनेक लोकांना चुकीच्या आरोपाखाली अडकवण्यात येत आहे ही गोष्ट इंग्लंडमधल्या बहुतांश लोकांपासून लपवण्यात आली होती.आणि या लपवाछपवीच्या रागापोटीच मी हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त झालो होतो. जर मला याबद्दल राग आला नसता तर मी हे पुस्तक लिहिलेच नसते.

एका स्वरूपात किंवा दुसर्‍या स्वरूपात ही समस्या पुन्हा-पुन्हा उद्भवतच असते. यांपैकी भाषिक समस्या ही अधिक सूक्ष्म आहे आणि त्यावरची चर्चा खूप लांबलचक होईल. मी एव्हढंच म्हणेन की मागच्या काही वर्षांपासून मी लिखाणातील चित्रमयता कमी करुन जास्तीतजास्त अचूक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हे काही असलं तरी एकदा का तुम्ही कोणत्याही लेखनशैलीत पारंगत झालात की ती लेखनशैली तुम्हाला अपुरी वाटायला लागते. आधी लिहिल्याप्रमाणे ‘राजकीय लेखन आणि कला यांचा समन्वय’ साधायच्या माझ्या प्रयत्नाचं पहिलं फलित म्हणजे ‘ऍनिमल फार्म’ ही कादंबरी. गेल्या सात वर्षात मी एकही कादंबरी लिहिली नाहीये; पण लवकरच लिहीन अशी आशा आहे. पण कुठलं पुस्तक लिहायचं याबद्दल मला काही कल्पना आहे. तसही ती कादंबरी एक अपयशच असणार आहे, प्रत्येक पुस्तक अपयशीच असतं. हा निबंध वाचून असं वाटेल की, मी केवळ समाजाभिमुख प्रेरणांतूनच लिखाण करतो. पण ते खरं नाही. सगळेच लेखक गर्विष्ठ, स्वार्थी आणि आळशी असतात आणि त्यांच्या सर्व हेतूंच्या मुळाशी एक गूढ असतं. पुस्तक लिहिणं हा एखाद्या दीर्घ आजारातून उठल्यावर येणार्‍या अनुभवासारखा दुःखद आणि त्रासदायक अनुभव आहे. त्यामुळे ज्याचा पिच्छा सोडवता येत नाही असा अनाकलनीय सैतान मानगुटीवर बसल्याशिवाय कोणी हा असलं उपद्व्याप करू धजणार नाही. या सैतानाची आणि लहान मुलांच्यातील लक्ष वेधून घेण्यासाठी रडण्यामागच्या प्रेरणेची जातकुळी एकच आहे. आणि तरीही स्वतःच्या व्यक्तित्वापलीकडे जाण्याचा प्रयत्न सतत करत राहिलं तरच वाचनीय लिखाण घडू शकतं; हेही तितकाच खरं आहे.

चांगलं गद्य लिखाण हे खिडकीच्या तावदानासारखं असतं. माझ्या सर्व हेतूंमधील सर्वात प्रबळ हेतू कोणते हे मी निश्चितपणे सांगू शकत नाही. मात्र त्यातील कोणत्या हेतूंना माझ्या लिखाणात मी अधिक महत्व दिलं पाहिजे हे मी जाणतो. माझ्या सगळ्या लेखनाकडं बघितलं तर असं दिसतं की; जेव्हा जेव्हा मी राजकीय प्रेरणा बाजूला ठेवल्या तेव्हा तेव्हा माझं लिखाण शब्दबंबाळ, कृत्रिम आणि निर्जीव झालं आहे.