गँग्स ऑफ वासेपूर – वास्तवाचा रूपेरी प्रवास!

Gangs Of Wasseypur - Landmark Of Indian Cinema - Akshar Maifal Marathi Magazine

“हमारे जिंदगी हा एकही मक्सद है, बदला!” ‘बदला’ अथवा सूड या विषयावर बॉलीवूडने शेकडो सिनेमे दिले आहेत. अनेकदा प्रेम आणि सूड ही बॉलीवूडच्या चित्रपटांची मध्यवर्ती कल्पना असते. शक्यतो सिनेमाचं कथानक या कल्पनांभोवती फिरतं. अथवा आशयपूर्ण चित्रपटातही ‘प्रेम आणि सूड’ या भावना घुसवायचा किडा काही केल्या स्वस्थ बसू देत नाही, बहुतांशी चित्रपट दिग्दर्शकांची ही अवस्था झाली आहे. भारतीय चित्रपटांचा सुवर्णकाळ कधीच सरून गेला. एकीकडे सध्या तद्दन गल्लाभरू चित्रपट येत आहेत, अशी आपण ओरड नेहमीच ऐकतो आहोत. तर दुसरीकडे चांगल्या चित्रपटांकडे ‘खुशीने’ पाठ फिरवतो. ‘वजनदार’ नट किंवा नटी असेल तरच चित्रपट चालतील, मग कथानक सुमार असलेलं सुद्धा चालेल, अशी एकूण परिस्थिती आहे, असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही. अशी एकूण परिस्थिती असताना एक दिग्दर्शक अक्षरशः शिवधनुष्य उचलतो, सलग साडेपाच तासांचा चित्रपट बनवतो. असे प्रयोग बॉलीवूडमध्ये क्वचितच झाले असतील. तो चित्रपट म्हणजे ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि तो दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप!

हा चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल आणि प्रेक्षक म्हणून भारतीयांच्या रसिकतेवरचा काळा डाग! कारण अनेक चांगल्या चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट ‘व्यावसायिक दृष्ट्या’ कमाल करू शकला नाही. आपला आजचा विषय चित्रपट कसा असावा, कसा पहावा, का पहावा हा नाहीच. उलट हा चित्रपट कसा वेगळा आणि कलाकृती म्हणून ‘कोणत्या दर्जाचा’ आहे हे पाहणार आहोत.

चित्रपटाची सुरवात होते, एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकात लोकप्रिय झालेल्या मालिकेच्या गाण्यापासून. जागतिकीकरणानंतर टीव्ही आणि दूरदर्शन घरोघरी पोहोचला. शिवाय आणखी भरपूर वाहिन्या आल्यानंतरचा काळ, साधारणतः मध्यमवर्गाच्या उदयाचा काळ. अशाच एका घरात मालिका सुरू असताना गोळीबार सुरू होतो. टीव्ही बंद आणि चित्रपट सुरू होतो. चित्रपटाचा काळ नेमका कोणता आहे, कथा कोणत्या काळात घडते आहे हे दाखवण्याची ही एक वेगळी पद्धत आहे. वीस-पंचावीस जणांचं एक टोळकं अरुंद गल्ल्यांमधून एका मोठ्या चिरेबंदी वाड्यावर AK-47 रायफल्समधून गोळीबार सुरु करतात. हात बॉम्बने घराचा दरवाजा उडवून देतात. शेकडो फैरी झाडून घराची चाळणी झाल्यावर विजयी उन्मादात निघून जातात. परंतु घरात जिन्यावरच्या एका छोट्या खोलीत ते कुटुंब दाबा धरूब बसलेलं असतं, या हल्ल्यापासून वाचण्यासाठी. हल्लेखोर जिंकल्याच्या उन्मादात निघून जातात, पण यशस्वी झालेले नसतात. ते गुंडांचं टोळकं गाडीत बसून परत जाताना वाटेत त्यांना पोलिसांची नाकाबंदी दिसते. ज्याच्या सांगण्यावरून हे काम केलेलं आहे, त्या विधायकला टोळीचा प्रमुख फोन करतो. तो विधायक घरगुती मिटिंगमध्ये असतो, ‘काम’ झालं हे ऐकल्यावर तो फोन कट करून टाकतो. पोलिसांना त्यानेच टोळीचा सुद्धा बंदोबस्त करण्याचं काम देऊन ठेवलेलं असतं. नेत्यांच्या त्या घरगुती बैठकीत पार्श्वभूमीवर चाललेले संवाद खूप बोलके आहेत. एक तरूण नेता म्हणतो, “विधायकजी को टीव्ही पे पूछा, राष्ट्रगान क्या है, तो गाने लागे तो वंदे मातरम् … मिटिंगमधला जेष्ठ नेता त्याला थांबवून विचारतो, तो आप बतायीये अपना राष्ट्रगान कौनसा है?” कॅमेरा विधायकवर स्थिरावतो व त्या तरुण नेत्याच्या पार्श्वभूमीवर आवाज तो म्हणतो, “सारे जहाँ से अच्छा …” आजच्या परिस्थितीला चपखल बसेल असाच हा प्रसंग आहे. दुसरीकडे पोलिसांच्या नाकाबंदीवर टोळक्याचा प्रमुख गोळीबार करतो आणि चित्रपट सुरू होतो.

टिपिकल सूडपटाचं संगीत (जे बहुतांशी बाँडपटांमध्ये वापरलं जातं असं), निवेदकाचा भरदार आवाज, कृष्णधवल हलते पडदे हे सर्व कालदर्शक आहेत. निवेदकाचा आवाज आपल्याला सांगतो,

इन्सान जो है, बस दो नसल के होते है । एक होते है हरामी और एक होते है बेवफूक । और ये सारा खेल इन दोनों का ही है । अब कोई हरामी बेवकूफ़ी पर उतर आता है । और कोई बेवकुफ हरामजादगी का तालाब बन जाता है, पता ही नही चालता ।

सगळा चित्रपट या एका थिअरीवर प्रवास करतो. सुरवात होते चित्रपटाला. कथानकाच्या नॅरेशनची सुरवात जबरदस्त वास्तव भासणार्‍या वाक्याने करून पहिल्या फ्रेमपासून चित्रपट बघणार्‍याला धरून ठेवतो. त्यानंतर सुरू होतो वासेपूरचा परिचय. चित्रपटांच्या अनेक वेगळेपणा सिद्ध करणार्‍या अनेक गोष्टींपैकी हे एक – की तो प्रकाश टाकतो अशा विषयावर जो कायम मुख्य प्रवाहापासून कोसो दूर अंधारात राहिलेला आहे. निवेदकाच्या शब्दात सांगायचं तर,

हम मुसलमानो की ये महाभारत आजची नही है, जमाने से चली आ रही है । और वासेपूर में तो ये लडाई शिया सुन्नी की भी नही थी, यहां तो सभी सुन्नी थे । ये लडाई थी कुरैशी और बाकी के मुसलमानो कीं ।

अलीकडच्या काळात बोटावर मोजण्याइतके चित्रपटही मुस्लीम समजाला समोर ठेऊन झाले नसतील. तसा हा विषय सहिष्णू भारतासाठी अस्पृश्यच.

Gangs Of Wasseypur - Landmark Of Indian Cinema - Akshar Maifal Marathi Magazine
अक्षर मैफल मुखपृष्ठ, डिसेंबर २०१७

काळ आहे 1941 च्या आधीचा. गोष्ट तेव्हा सुरु होते, जेव्हा ब्रिटिशांनी धनबाद जो की तेव्हा बंगाल व आता झारखंडचा भाग आहे. त्याच्या आसपास ब्रिटिशांनी शेतजमिनींचा ताबा घेऊन तिथे कोळश्याच्या खाणी खोदल्या. हा कोळसा रेल्वे आणि सर्व महत्वाच्या मोठ्या उद्योगांसाठी वापरला जात असे. त्या काळात प्रवेश होतो या कथेच्या पहिल्या पात्राचा. सुलताना डाकू!

सुलताना डाकू, हा वासेपूरच्या लोकांसाठी एक दंतकथा आहे, जिचा उपयोग करून अजूनही लोक दहशतीखाली ठेवले जातात. त्याच्या नावाचा उपयोग करणारी पहिली व्यक्ती आहे, शरीफ कुरेशी. जो सुलताना डाकूच्या नावाने रेल्वे लुटतो. परंतु उघडपणे आपणच ’सुलताना’ आहोत हे मान्य करत नाही. त्याला आपल्या कुरेशी असण्यावर गर्व आहे. तर दुसरा आहे शाहीद खान. शाहीद अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. धाडसी आहे. सुलतानाच्या आधीच तो रेल्वे लुटायला सुरवात करतो. व लुटलेल धान्य लोकांपेक्षा चार पैसे स्वस्त विकतो. यातून निर्माण होतो ’संघर्ष’. याच संघर्षात एक दिवस शाहीदशिवाय बळी जातो तो शाहीदच्या सर्व साथीदारांचा. गरोदर पत्नीला घेऊन शाहीद आपल्या ’त्या’ साठीदाराबरोबर वासेपूर सोडून धनबादला जातो. मागे गाणं सुरु होतं, ’इक बगल मैं चांद होगा, इक बगल मैं रोटीयां’ एक संघर्ष संपून दुसरा सुरु होतो. पत्नीला दिलेल्या वाचनामुळे शाहीदचा प्रवास ’चोरी से मजदूरी’कडे सुरू होतो. ’धनबाद’ला कोळशाच्या खाणीत तो कामाला लागतो. त्या खाणीचा ठेकेदार म्हणजे ’रामाधीर सिंग’! पेहेलवानांच्या शिवाय खाणी ना इंग्रजचालवू शकले होते, ना रामाधीर सिंग. पिळवणूकीच्या ज्या गोष्टी आपण ऐकतो ती पिळवणूक पाहणं आणि आपलेच त्यातले हितसंबंध जाणून घेणं, आरश्यात स्वतःचा खरा चेहरा पाहण्यासारखं आहे. ब्रिटीशकालीन पिळवणूक या एका प्रसंगात दिसून येते व मुठभर ब्रिटीश दीडशेहून अधिक वर्ष यशस्वीपणे राज्य का करू शकले याचं पण उत्तर मिळतं. गर्भवती पत्नी बाळंतपणामध्ये जाते, तेव्हा शाहीदला निरोप देण्यासाठी आलेल्या त्याच्या साथीदाराला, तिथला ’पहलवान’ सहा तास आपल्या बळाच्या जोरावर बाहेर ठेवतो, त्याने शाहीदला निरोप पोहोचायला उशीर होतो. उशीर झाल्यानंतर शाहीदजेव्हा घरी पोहोचतो त्यावेळी शाहीदची पत्नी एका गोड मुलाला जन्म देऊन गेलेली असतो. त्यावेळी त्याच्या साथीदाराच्या (जो पूर्ण कथा सांगणारा निवेदक आहे) त्याच्या तोंडी पुढचे संवाद आहेत,

गलती उस पेहेलवान की नही थी जिसने मुझे खदान मै घुसने नही दिया, गलती मेरी थी जो मै उस पेहेलवान से हार गया।

पैसा किंवा ताकद यापैकी एक काहीतरी तुमच्या गाठीला हवं, नाहीतर तुमची किंमत किड्यामुंग्याहून अधिक नाही, हे वास्तव या मागे आहे. शाहीदची पत्नी जाते, तिच्याबरोबर शाहीदने तिला दिलेलं वचनही! शाहीद त्या पहलवानाला सर्वांच्या समोर ठार मारतो, रामाधीर हे बघत असतो. तो त्याच्या हिंमतीकडे बघून आपला पहलवान म्हणून निवडतो, महत्त्वाकांक्षी असलेला शाहीद त्याला तत्काळ राजी होतो. त्यातून सुरू होतो महाभारतातला नवीन अध्याय. याच दरम्यान दिल्लीला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकतो, नवी स्वप्न घेऊन नवी पहाट येते, पण दिवस पूर्वीचाच राहतो रात्र अधिक गहिरी होत जाते. कोळश्याच्या व्यापाराचा खरा तमाशा इथून सुरू होतो. कोळश्याच्या खाणी टाटा, बिर्ला, थापर अशा मोठ्या उद्योगपतींच्या हातात जातात, पण खाणी चालवायला रामाधीर सारख्या लोकांची गरज जशी इंग्रजांना होती, तशीच यांना असतेच. रामाधीर आता चार-पाच खाणींचा ठेकेदार होतो.

यापुढे शाहीद खान आणि रामाधीर सिंग याचं काय होतं? त्यांची मुलं सरदार खान आणि जे.पी. सिंग याचं काय होतं? हे चित्रपट पाहून कळेलच. चित्रपटाची कथा सांगणे हे आताचा हेतूच नाही. हेतू आहे तो या चित्रपटाची सौंदर्यस्थळं दाखवणं. वेगळी वाट चोखाळणार्‍या, प्रयोगशील अशा व्यक्तीच्या व त्याच्या सगळ्या टीमच्या प्रयत्नांना एक दिलखुलास दाद देणं. सर्वप्रथम चित्रपटासाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे कथा. ‘कथे’शिवाय चित्रपट बनवल्याची कित्येक उदाहरणे देता येतील. कदाचित असाच चित्रपटांची यादी मोठी होईल. परंतु शहरवजा गावांतून म्हणजे वासेपूरमधून एक मुलगा (ईशान कादरी) एक कथा घेऊन एका दिग्दर्शकाला भेटतो. ती कथा वाचल्यावर दिग्दर्शक त्याला म्हणतो, यावर एक चित्रपट होऊ शकत नाही, दोन होतील! आणि आपण ते सलग करणार आहोत. या कथेला अगदी मजबूत अशी पटकथा लाभली आणि चित्रपट उभा राहिला. चित्रपटाची पटकथा लिहिली आहे झीशान कादरी, अखिलेश, सचिन लाडिया आणि अखिलेश जैस्वाल यांनी संयुक्तपणे. पटकथा इतकी छान जमून आलीये की, कुणी फक्त निवेदन केलं तरी संपूर्ण चित्रपट डोळ्यासमोर उभा राहील. या चित्रपटाचे आणखी एक बलस्थान म्हणजे पात्रांची निवड. रंगभूमीशी जोडलेल्या कलाकारांचा अभिनयामध्ये एक जिवंतपणा येतो. कारण कुठल्याशी रिटेक शिवाय एखादा प्रसंग सलगपणे करण्यासाठी लागणारी समरसता त्यांच्या ठिकाणी असते. कलाकार त्या काळासाठी त्या भूमिकेत असतात. आणि अशा वेळी त्या वेळच्या प्रवाहानुसार, भावनांच्या आवेगानुसार संवादात एखादी अशी भर घालतात जी मूळ पटकथेहून अथवा संवादाहून अधिक चपखल बसते. या चित्रपटात असे बरेच प्रसंग आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर पंकज त्रिपाठी ज्याने चित्रपटात सुलतानची भूमिका केली आहे त्याने रामाधीर (तीग्मांश धुलिया) यांच्या घरी जातात. तेव्हाच्या प्रसंगात सुलतानला रामाधीर आधुनिक शस्त्र देतो व तू सरदारला संपवायचं कसं ते बघ, असं म्हणतो तेव्हा दिग्दर्शक कट म्हणायचं विसरून गेला आहे. पंकज त्रिपाठी त्या ठिकाणी म्हणतो, अगर वो ऑटॉमॅटीक वाला मिल जाये तो! खरा सुलतान त्या ठिकाणी असता तरी त्याने हेच मागितलं असतं – असं वाटून जाणं हेच त्या कलाकाराचं यश आहे. सरदार खानच्या भूमिकेत असलेल्या मनोज वाजपेयीने तर अभिनयाचा एक नवा माप दंड दिला आहे या सिनेमात. लहानपणी बाप कामानिमित्त जातो तो परत येतच नाही. अशा वेळी ‘नसीर’चाचा सोबत तो धनबाद हून वासेपूरला येतो. बापाचा खून झाला आहे हे कळल्यावर डोक्यावरचे केस काढून टाकतो आणि शपथ घेतो, रामाधीर सिंग का बदला या एकाच धेय्याने वाटचाल करतो. रामाधीर ‘हरामखोर’ दर्जाचा असतो, तो सरदारचा बाप शाहीदला ‘बेवकूफ’ ठरवून. पण सरदारला धेय्य स्पष्ट असल्याने तो सावध असतो. आपण एक दिवस रामाधीरला संपवून धनबादचे बाहुबली होऊ, हे त्याचं स्वप्न असतं. परंतु हा कथेचा नायक आहे, म्हणून तो करेल ती प्रत्येक गोष्ट योग्यच असेल असं नाही.

प्रत्येक व्यक्तीला एक काळी बाजू असते, तशी सरदारला देखील आहे. तसा रामाधीर देखील पूर्णपणे वाईट होता असे म्हणता येत नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये वरचढ ठरण्यासाठी आवश्यक संघर्षात तो विजयी होत आलेला असतो. त्याच्या विरुद्ध सरदारकडे गमवायला काहीच नसतं त्यामुळे तो मनमौजी तर असतोच, पण अधिक महत्वाचं म्हणजे बेफिकीर असतो. सरदार आणि त्याची पत्नी नगमा खातून (रिटा चड्डा) यांच्यातला प्रसंग आणि संवादातून मुस्लीम स्त्री आणि मुस्लीम पुरुष यांच्यातील सार्वत्रिक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक उभा करतो. दुसरे लग्न करण्याचा मुद्दा असेल, गर्भवती असताना शारीरिक संबंध ठेवण्याचा मुद्दा असेल. या विषयावर सरदार मुफ्ती/मौलवीकडून चार समजुतीच्या गोष्टी ऐकतो तेव्हा शांत होतो, हा प्रसंग असेल. मुस्लीम समाज बेडरूममधल्या गोष्टीसुद्धा मुफ्ती/मौलवीला विचारून करतात, हे सामाजिक वास्तव अभ्यासून दिग्दर्शक आपल्याला दाखवत आहे. भारतीय मुस्लीम स्त्री जी नगमा खातूनने उभी केली आहे तिचीही कहाणी तीच आहे. ज्या काळात चित्रपट घडत आहे त्या काळात एक स्त्री, त्यातही मुस्लीम स्त्री बाकी स्त्री वर्गापेक्षा कधी वेगळी आहे, हे अनेक प्रसंगावरून दिसून येईल. गर्भवती असताना शारीरक संबंध ठेवता येणार नाही, हे लक्षात आल्यावर आपला नवरा वेश्येकडे जातो हे तिने मान्य केलेलं आहे, तो तिच्याकडे जात असताना आपल्या नवर्‍याला, भरपूर जेवून जा, तिकडे जाऊन माझ्या नावाला काळिमा फासू नका असं समर्थन करणारी ती नगमा आहे! या सगळ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर खंबीरपणे कुटुंबाला आधार देत ती उभी राहते.

या कथेतील आणखी के महत्वाची बाजू म्हणजे बॉलीवूड. इथल्या समाजावर प्रत्येक, प्रत्येक व्यक्तीरेखेवर बॉलीवूडचा प्रभाव आहे. या चित्रपटात काळ जसा जसा पुढे सरकतो आहे, हे दाखवण्यासाठी चित्रपटांच्या पोस्टरचा उपयोग केलेला आहे. एके ठिकाणी रामाधीर सिंग म्हणतो, जब तक हिंदुस्तान मै सनिमा रहेगा, लोग चुतीया बनते रहेंगे। यानंतरची महत्वाची पात्र म्हणजे, फैजल खान आणि जे.पी. सिंग, दोघांचाही स्वतंत्र विचार करूया. फैजल (नवाजुद्दिन सिद्दिकी) हे व्यक्तीमत्व कसं बनत जातं, त्याचा प्रवास महत्वाचा आणि थरारक आहे. वडिलांनी दुसरं लग्न केलेलं असणं, त्यात आईचे चाचाबरोबर (नसलेले) शरीरसंबंध, यातून एकटेपणा, व्यसनं अशा अनेक गोष्टींनी ’फैजल’ घडत जातो. ’दुबळा’ दिसायला लागतो. ’अमिताभ के घर संजीव कुमार’ असं तोच स्वतःच वर्णन करतो. पण ’वहिदा रहमान जब तक घर पार है, घर तो जाना ही पडेगा’ असंही म्हणतो. आईबरोबर मात्र त्याचं नात विशेष आहे. सगळेजण त्याला गृहीत धरत असताना त्याची आई मात्र त्याच्याबद्दल सहानुभूती बाळगून असते. फैजलवर चित्रित होणारा प्रत्येक प्रसंग त्याला अधिक ’डार्क’ करत नेतो. त्याच्या आत सुरु असलेल्या द्वंद्वाला परिस्थिती डिवचत राहते. अन् सततच्या अपमानातून त्याच्या आत असलेला निखारा फुलून वणवा होतो. अन् कधी जंगल ताब्यात घ्यायला तयार होतो, हे कुणालाही कळत नाही. दुसर्‍या बाजूला जे.पी. सिंग. तो मंत्र्याचा मुलगा आहे, स्वतः निवडून आलेला विधायक आहे. परंतु तो सतत उपहासाचा विषय होत आलेला आहे. बुद्ध्यांक कमी असलेला परंतु अधिक भावनिक. बाळाच्या जोरावर सर्व ‘ठीक’ करता येईल असा विचार करणारा जे.पी. हा शर्यतीतला लंगडा घोडा आहे. त्याला सोडून जगातल्या प्रत्येकाला तो लंगडा दिसतो. पण तो वाट बघत आहे त्या दिवसाची, जेव्हा तो स्वतःला सिद्ध करून दाखवेल. चित्रपटात या दोन पात्रांत कमालीच साम्य आहे. ते ज्या जगात वावरत आहेत, तिथे कुणी कुणाचं नाहीये. तरीही ते विश्वास ठेवतात. चुकतात आणि आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा उभे राहतात. त्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सूड वारसा हक्काने मिळाले आहेत. त्यांचा गुन्हेगार तयार होण्याचा पूर्ण प्रवास या चित्रपटात दिसतो. फैजलच्या भूमिकेत असा ‘गँगस्टर’ उभा केला आहे, जो थेट आहे, खोल आहे. त्याच्या डोळ्यात आग आहे. तो कधी हळवा आहे, कधी निर्दयी आहे. रामाधीर सिंग आपल्या कृत्याचं समर्थन करताना म्हणतो, अगर हम उन्हे नही मारते, तो वो हमे मार देते. महाभारतात कुणीतरी एकच जण वाचू शकतो. युद्ध हेच जेव्हा जीवनाचं तत्वज्ञान होतं, तेव्हा जीवनाचे आणि कथेचेही आशय बदलतात. फैजल म्हणतो, एकही जान है, या तो अल्ला लेगा या महोल्ला लेगा! हे ठरल्यानंतर आधी कोण एवढाच प्रश्न उरलेला असतो. आधी सांगितल्याप्रमाणे चित्रपट हा सत्य घटनेवर आधारित आहे. तेव्हा रामाधीर सिंगवर गोळ्या झाडताना एक प्रकारचं समाधान आहे. जणू त्या गोळ्या बंदुकीतून नाहीत तर त्याच्यात आतून येत आहेत. म्हणूनच रामाधीर मरून गेल्यावरही त्याचं गोळ्या झाडणं थांबत नाही. स्वतः पूर्ण रिकामा होईपर्यंत तो गोळ्याझाडत राहतो. ‘गँगस्टर’ने नायकाच्या आईला किंवा प्रेयसीला आपल्या खुफिया अड्ड्यावर न्यावं, मग नायकाने एखादी मिशी, दाढी लावून तिथे यावं, सगळ्याचं मनोरंजन करावं, दारू पाजावी. अचानक बंदूक हिसकावून खलनायकाच्या डोक्याला’ लावून ‘तुम्हारा खेल खतम, अपने आदमियो से केह दो, हथियार डाल दे’ म्हणावं. त्यावर नायकाने थोडी डायलॉगबाजी करावी. लपवून ठेवलेलं (आत्तापर्यंत बहुतेक सर्वाना माहिती असलेलं) गुपित शेरलॉक होम्सच्या वरचढ सादर करावं, तेवढ्यात गाफील नायकाची बंदूक खालानायाकाने घ्यावी, अन पुन्हा ‘खेल खतम’! हा खेळ अजून एक दोन वेळा खेळून आलाच कंटाळा तर ‘ढिशुम ढिशुम’ करावं आणि ‘साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ पूर्ण करावी’. वास्तवात असं होत नसतं. आपल्या आजूबाजूला जे घडत असतं ते तसं दाखवणं हे खरं कसब आहे. म्हणून हा चित्रपट वेगळा ठरतो. कधीतरी पाहिलेला हत्ती, पण त्याचं चित्र बहुतेक जण काढू शकतात. पण रोज ‘दिसणार्‍या’ माणसाचा चेहरा चित्रित करणं फार अवघड असतं. ‘नाट्यपूर्ण’ काहीतरी पडद्यावर दाखवणं तुलनेनं सोप्प आहे, पण वास्तव पडद्यावर दाखवून त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडणं, हे खरं कौशल्य आहे. दोन भागात असलेला हा चित्रपट हे आव्हान नुसते पेलतच नाही तर नवा मापदंड रोवून जातो. वाईटाकडे दुर्लक्ष करून चालायची सवय मध्यमवर्गाला असतेच. चांगल्याला पुढे येऊन दाद देण्याची सवय लागावी एवढंच!

(पूर्वप्रसिद्धी – अक्षर मैफल, डिसेंबर २०१७)