गेम ऑफ थ्रोन्स – राजकारणाचे धडे – लेखांक २

Game of Thrones

गेम ऑफ थ्रोंस किंवा GoT हे राजकीय आहे हे नव्याने सांगायची गरज नाहीये. GoT चे पहिले दोन तीन भाग बघताच हे ठळकपणे जाणवतं. तरीही GoT वर लिहायचं हे जेंव्हा डोक्यात आलं तेव्हापासून GoT मधली अद्भुतरम्यता आणि त्यातलं राजकारण या दोन विषयांवर लिहायचं हे नक्कीच केलं होतं. त्यामुळे पहिला भाग हा अद्भुतरम्यतेवर घेऊन दुसरा भाग हा राजकारणावर घेतला.

आधी म्हणल्याप्रमाणे गेम ऑफ थ्रोंस राजकीय आहे यात वादच नाही. त्यातले बरेचसे किस्से किंवा उपकथानक आजच्या घडीच्या जागतिक राजकारणाला लागू होतात हे ही सर्वमान्य आहे. अमेरिकेच्या निवडणुकींच्या वेळेस आलेले गेम ऑफ थ्रोंस मीम याचेच द्योतक होते. पण मला बोलायचे आहे ते गेम ऑफ थ्रोंस मध्ये असलेल्या राजकीय प्रवाहांबद्दल ज्याबद्दल फारसे लिहिल्या किंवा बोलल्या गेलेले नाहीये.

Game of Thrones troll
[Image Source: Link]

गेम ऑफ थ्रोंस मध्ये सुरु असलेल्या विविध राजकीय प्रवाहांची झलक त्याच्या पहिल्या सीजन किंवा अ सॉंग ऑफ आईस एंड फायरच्या पहिल्या पुस्तकातूनच मिळायला सुरुवात होते. गेम ऑफ थ्रोंस ही एका अर्थाने राजे राजवाड्यांची कथा आहे त्यामुळे त्यात आजच्या जगाची आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्था बघायला मिळत नाही. पण कथेचे अंडरकरंट किंवा अंतर्प्रवाह या आधुनिक लोकशाही मूल्यांचे महत्व पटवून देते. पण त्याकडे नंतर वळूया. आधी आपण बघूया राजे राजवाड्यांचे राजकारण. GOT ची सुरुवात होते स्टार्क आणि बाराथियन राजपरिवारांच्या राजकारणाने. नेड स्टार्क हा अतिशय शिस्तप्रिय आणि न्यायी राजा (खरंतर सेवेन किंग्डम च्या एका परगण्याचा ड्युक किंवा GoTच्या भाषेत वार्डन ऑफ नॉर्थ) आहे. पहिल्याच भागात आपल्या सेवेवरून पळून आलेल्या शिपायाला देहदंडाची शिक्षा सुनावून तो स्वतःच ती शिक्षा पूर्णत्वास नेतो कारण त्याचे म्हणणे आहे “जो न्यायदान करतो त्यानेच शिक्षा अमलात आणली पाहिजे” (The one who passes the sentence should swing the sword) नेडच्याच शब्दात सांगायचे झाल्यास तुम्ही ज्या माणसाचा जीव न्याय म्हणून घेणार आहात त्याच्या डोळ्यात बघून त्याचे शेवटचे शब्द ऐकायची हिम्मत तुमच्यात असली पाहिजे. आणि जर ती हिंमत तशी नसेल तर बहुतेक तो माणूस मरण्यास पात्र नाहीये. अर्थात त्याला मारायची गरज नाहीये. या पहिल्याच सीन मधून त्याच्या न्यायपप्रियतेची प्रचीती प्रेक्षकांना येते.

त्याउलट काहीसा रॉबर्ट बाराथियन आहे. रॉबर्ट या सेव्हेन किंग्डमचा महाराजा आहे. “रॉबर्टचा उठाव” किंवा Robert’s reballion या इतिहासातल्या घटनेनंतर रॉबर्ट बाराथियन या संपूर्ण राज्याचा राजा होतो. पण रॉबर्टला राज्य करण्यात काहीही रस नाहीये. तो जेंव्हा नेड स्टार्कला आपल्या राज्याचा महामंत्री (GoT च्या भाषेत Hand of the king) बनायचा प्रस्ताव घेऊन येतो तेव्हाच तो नेडला म्हणतो “मी तुला सन्मान द्यायला हे महामंत्री पद देत नाहीये. मला तू हे राज्य चालवायला हवं आहेस म्हणजे मी आनंदाने बसून खाऊ, पिऊ, आणि स्त्रिया भोगू शकेन.” रॉबर्टच्या मते राजा असणे याचा अर्थ एवढाच असतो. बऱ्याच वर्षांपूर्वी रॉबर्टने नेड स्टार्कच्या सहाय्याने उठाव करून आधीच्या निरंकुश आणि वेड्या राजाला सत्तेवरून हाकललं असतं. राजा स्वतःच वेडा आणि निरंकुश आल्यामुळे त्यांच्या उठावाला जनतेचं सुध्दा समर्थन असतं. पण रॉबर्ट स्वतः राजा झाल्यानंतर राज्यकारभारात फारसा फरक पडत नाही. जॉर्ज आर आर मार्टिन या उपकथानकातून एक मोठा संदेश देतो. तो म्हणजे क्रांती, उठाव हे जनतेला कितीही रम्य आणि जाचातून मुक्तीचे साधन वाटत असले तरी हे उपाय एका न्याय्य राज्याची खात्री देत नाहीत.

रॉबर्टचे राज्य न्याय नसते. रॉबर्टला राज्य करायची इच्छा ही नसते. त्याला युध्द प्रिय असतं. विजय प्रिय असतो पण विजयानंतर येणारी जवाबदारी नको असते. त्यापासून तो पळत असतो. त्याउलट नेड स्टार्क. नेड न्याय्य प्रिय राजा असतो. त्याला जनतेसाठी काम करायचं असतं. त्याला राज्यव्यवस्था सुरळीत करायची असते. पण रॉबर्ट आणि नेड मध्ये एक साम्य असतं. दोघांनाही राजकारण जमत नाही. रॉबर्टला राजकारणात रसच नसतो तर नेडला राजकारण करणे कमीपणाचे वाटते. तो राजकारणाला तुच्छ लेखतो. त्याच्यामते राज्यशकट हाकण्यात राजकारणाचं काहीही स्थान नसतं. आणि इथेच मार्टिन आपल्याला राजकारणाचा दुसरा महत्वाचा धडा देतो. राज्यकारण हे राजकारणाशिवाय शक्य नसतं. सत्ता लोकाभिमुख, जनतेच्या भल्याची आणि न्याय्य असायला नेड स्टार्क सारख्या राज्यकर्त्याची गरज असते. आणि नेड सारख्या सत्शील आणि प्रामाणिक माणूस सत्तेवर असणे बऱ्याच लोकांच्या हिताचे नसते. अश्या लोकांशी तुम्हाला त्यांच्याच भाषेत बोलावे लागते आणि ती भाषा असते राजकारणाची. उत्तम राज्यकर्त्याचे फक्त विचार न्याय्य असून भागत नाही तर त्याला कृतीची पण जोड द्यावी लागते आणि त्यासाठी तुम्हाला वेळ आल्यास घाणीत उतरून त्या घाणीशी दोन हात करणे भाग असते. GoT मध्ये हाच धडा पुढे नेड स्टार्कचा मुलगा रॉब आणि ज्या वेड्या राज्याविरुद्ध रॉबर्टने उठाव केला होता त्याची मुलगी डेनेरीस टारगेरियन ऊर्फ खलीसीच्या मार्फत मार्टिन वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचवतो.

Game of Thrones - Eddard Stark and Robert Baratheon
[Image Source: Link]

रॉबर्ट आणि नेड. दोन मित्र. westros मध्ये मोठा सत्ताबदल करणारे दोन योद्धे. दोघंही पहिल्या पुस्तकाच्या (किंवा सीजनच्या) शेवटापर्यंत या राजकारणाचे बळी पडतात. रॉबर्ट, कारण त्याला राजकारणात काडीचाही रस नसतो म्हणून आणि नेड कारण तो राजकारणाचा द्वेष करतो म्हणून. नेड स्टार्क महामंत्री म्हणून राजधानीत आल्यावर सुरुवातीला पीटर बेलीश ऊर्फ लिटीलफिंगरला एका जागी म्हणतो “मला माफ कर मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही” त्यावर बेलीशचे उत्तर गेम ऑफ थ्रोंस च्या कथानकाचे अर्क आहे. बेलीश म्हणतो “माझ्यावर विश्वास न ठेवणे हे राजधानीत आल्यानंतर घोड्यावरून उतरल्यापासून केलेले तू पहिले शहाणपणाचे काम आहे”. नंतर नेड स्टार्कच्या सगळ्या अंगरक्षकांना मारून नेडला कैदी केल्यानंतर पीटर त्याला परत तेच वाक्य ऐकवतो “मी तुला सांगितलं होतं माझ्यावर विश्वास ठेवू नकोस”. नेडचा चांगुलपणावरचा अतिविश्वास आणि राजकारण करायला दिलेला नकार त्याच्या अंताचे कारण बनतो. त्याचा वधही शेवटी अविश्वासाने राज्यधर्माचं पालन न करता होतो.

कल्पनारम्य कथानकं शक्यतो चांगुलपणाचा विजय, सत्याची असत्यावर मात, चांगल्या माणसाचे नेहमी चांगलेच होते अश्या प्रकारचे विचार वाचकाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात मग ते हॅरी पॉटर असो का लॉर्ड ऑफ द रिंग्स. पण हे वास्तवात फार कमी वेळा सत्यात उतरतं. गेम ऑफ थ्रोंस नेमकं इथेच वेगळं ठरतं. वास्तवात तुमच्या क्रियांना प्रतिक्रिया उमटतात आणि त्या प्रतिक्रिया तुम्ही मानाने चांगले व्यक्ती आहात का नाही याचा विचार करत नाहीत. गेम ऑफ थ्रोंस हेच वास्तव वाचकांच्या मनावर बिंबवतं आणि म्हणूनच जगावेगळं ठरतं.

क्रमशः

संपर्क – pole.indraneel@gmail.com