गेम ऑफ थ्रोन्स – एका नवलकथेची वाटचाल – लेखांक १

Game Of Thrones Poster

[Image Source: Link]

नाथमाधव हे माझ्या पिढीसाठी तसं माहित नसलेलं नाव. पण माझ्या वडिलांची पिढी आणि त्यांच्या वडिलांच्या पिढीसाठी हे नाव मात्र फार मोठं आहे. नाथमाधवांच्या कादंबऱ्यांनी किमान दोन पिढ्यांना वेडावून सोडलं होतं. माझी नाथमाधवांशी ओळख झाली त्यांच्या ‘रायक्लब’ अथवा ‘सोनेरी टोळी’ या पुस्तकाने (अर्थात वडिलांमुळे). आता कोणाला प्रश्न पडेल नाथमाधव आणि गेम ऑफ थ्रोन्सचा काय संबंध? तर तो संबंध आहे, नाथमाधवांच्या ‘वीरधवल’ या कादंबरीमुळे. वीरधवल मी इयत्ता ५वी-६वीत असताना वाचलेली कादंबरी, ज्याने मला पुरतं वेड लावलं होतं. सन १९१३ मध्ये लिहिलेल्या कादंबरीने २००२ मध्ये कोणालाही वेड लावावं हे त्या कादंबरीच्या यशाचं द्योतक आहे. वीरधवल मध्ये असं वेड लावण्यासारखं काय होतं? वीरधवल ही मी वाचलेली नवलकथा या प्रकारची पहिली कादंबरी. नंतर कॉलेज मध्ये असताना मला गो. ना. दातार आणि शशी भागवतांचा शोध लागला आणि नवलकथांचे एक नवीन दालन माझ्या समोर परत उघडले. दातारांची कालिकामूर्ती, इंद्रभवनगुहा, तर शशी भागवतांची मर्मभेद रात्री रात्री जागून वाचलेल्या कादंबऱ्या आहेत, ज्यांनी माझे भावविश्व अतिशय समृध्द केलं. नवलकथा हा तसा मराठीत काहीसा दुर्लक्षित असलेला साहित्यप्रकार आहे. नाथमाधव, गो. ना. दातार, शशी भागवत ही नावं सोडली तर मराठीत या साहित्यप्रकाराला न्याय देणारे लेखक तसे सापडत नाहीत. त्यातूनही हे सर्व लेखक जुन्या पिढीतले. शशी भागवतांच्या कादंबऱ्या ६०च्या दशकात आल्या तर गो. ना. दातारांच्या त्याही आधी म्हणजेच १९२० वगैरेच्या काळात. दातारांच्या कादंबऱ्या रेनोल्ड्स या इंग्रजी लेखकाच्या कादंबऱ्यांवर बेतलेल्या असल्या तरी त्यात एक ठेठ भारतीय बाज होता (दातारशास्त्रींनी शेरलॉक होम्सवर बेतलेली चतुर माधवराव ही मालिका पण लिहिली पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी). तीच कथा शशी भागवतांची. भागवतांचं प्रेरणास्तोत्र पण रेनोल्ड्स आणि हॅग्गार्ड असले तरी त्यांच्या कादंबऱ्या भारतीय संस्कृतीत मुरलेल्या होत्या. या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये एक समान दुवा होता तो म्हणजे अद्भुततेला हात घालणारे कथानक. ही अद्भुतता फक्त लहानांना नाही तर मोठ्यांनाही वेडावून सोडणारी असते. (शशी भागवतांच्या मर्मभेदची प्रस्तावना दुसऱ्या तिसऱ्या कोणी लिहिलेली नसून दस्तुरखुद्द पु.लंनी लिहिलेली आहे यातच सगळं आलं). ह्या अश्या माझ्या अद्भुततेच्या भुकेला सुरुवातीला मराठी साहित्याचे खाद्य दिल्यानंतर ती भूक शांत बसायचं नाव घेत नव्हती. मराठीचे खाद्य अपुरे पडू लागल्यावर माझा मोहरा आपसूक इंग्रजीकडे वळला.

हॅरी पॉटर वाचून झालं, लॉर्ड ऑफ द रिंग्सची पण पारायणं करून झाली पण ती वीरधवल सारखी वेडावणारी कलाकृती काही केल्या सापडत नव्हती. आणि अचानक एके दिवशी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ हाताशी आलं. अर्थात मी इथे मान्य केलं पाहिजे कि गेम ऑफ थ्रोन्सचा माझा संबंध टीव्ही सिरीज मुळे पहिल्यांदा आला आणि नंतर त्या पुस्तकांना हात लावला गेला. कॉलेज मध्ये असताना गेम ऑफ थ्रोन्सचा बहुदा दुसरा सीजन सुरु असताना मी गेम ऑफ थ्रोन्स बघायला सुरुवात केली आणि एका रात्रीतून पहिला सीजन संपवून टाकला. अद्भुततेचा धागा असलेली कलाकृती तुमच्या मनाचा ठाव घेते ती अशी. गेम ऑफ थ्रोन्स ही अशीच अद्भुततेच्या कथानकावर बेतलेली आहे. तुम्हाला पहिल्या सीनमध्येच त्याची चुणूक दिसते ती मग पुढे वाढतच जाते आणि शेवटच्या (आत्ता पर्यंत आलेल्या) सीजन पर्यंत संपूर्ण कथानकाचा ताबा घेऊन सोडते.

Game Of Thrones Books
[Image Source: Link]

गेम ऑफ थ्रोन्स न बघितलेला किंवा न वाचलेला माणूस सापडणं आजच्या घडीला तसा विरळाच. पण जी लोक याच्या नादी अजून लागली नाहीत त्यांच्यासाठी गेम ऑफ थ्रोन्स ही टीव्ही सिरीज George R. R. Martin या लेखकाच्या ‘A Song of Ice and Fire’ या पुस्तकांच्या मालिकेवर बेतलेली आहे. मार्टिन हा तसा बराच वयोवृध्द गृहस्थ आहे आणि A Song of Ice and Fireच्या आधीही त्याने बऱ्याच कादंबऱ्या आणि कथा लिहिलेल्या आहेत. पण तो खरा प्रसिध्दीला पोहोचला तो त्याच्या A Song of Ice and Fire या मालिकेतल्या पुस्तकांमुळे. या पुस्तकांना टीव्हीवर मालिकेच्या स्वरुपात आणायचं ठरलं तेव्हा त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या नावावरून मालिकेला नाव देण्यात आलं ते म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’. गेम ऑफ थ्रोन्स हे या मालिकेतलं पहिलं पुस्तक तसं बरंच आधी म्हणजे १९९६ मध्ये प्रकाशित झालं होतं. या पुस्तकाची खरी समीक्षा व्हायला मात्र २००० साल उजाडलं. पण तरीही बरीच वर्ष ही पुस्तकांची मालिका तुलनेने एका लहान वाचकवर्गापर्यंत सीमित सीमित होती. सन २०११ मध्ये HBO वर याचा पहिला सीजन आल्या नंतर मात्र पटापट लोकांच्या उड्या या मालिकेवर पडू लागल्या आणि आजमितीला तर गेम ऑफ थ्रोन्स ही जगातली सर्वाधिक चर्चित मालिका आहे.

गेम ऑफ थ्रोन्सचा पहिला सीजन बघत असताना अगदी पहिल्या भागातला पहिला सीन सोडला तर जवळ जवळ पूर्ण मालिकेत अद्भुतरम्य असं काही फारसं घडत नाही. मला नीट आठवतं कि पहिला सीजन बघत असताना पहिले ९ एपिसोड मला एखाद्या ऐतिहासिक मालिकेसारखेच वाटले. अर्थात कथानक उत्तम आणि धरून ठेवणारं होतं म्हणून माझी काही तक्रार नव्हती पण बघताना मी एखादी नवलकथा बघतोय याची मला पुसटशीही शंका नव्हती. पण फक्त ९व्या एपिसोड पर्यंतच बरंका! ९व्या एपिसोड मध्ये पहिल्यांदा ड्रॅगनचे दर्शन होते आणि या मालिकेच्या भव्यदिव्यतेची कल्पना यायला सुरुवात होते. ही अद्भुतरम्यता पुढच्या सिजनमध्ये अजूनच वाढत जाते आणि गोष्टीची गुंतागुंत वाढवते.

Game Of Thrones Characters
[Image Source: Link]

कल्पनारम्यतेचे कथानक घेण्यात प्रॉब्लेम हा असतो कि ते कथानक कल्पनेबाहेरचे तर असले पाहिजे पण त्याच बरोबर त्याच्याशी आपल्याला रिलेटही होता आलं पाहिजे. गेम ऑफ थ्रोन्सचे यश याच्यातच आहे. त्याच्या कथानकातला ऐतिहासिक धागा हा इतिहासातल्या बऱ्याच घटनांवर बेतलेला आहे. त्यामुळे त्या कथानकाची वास्तविकता पदोपदी जाणवते. पण त्याच बरोबर त्यात गुंफलेला अद्भुततेचा गोफ कथानकाला जगावेगळं पण करतो. आणि हे जगावेगळं करत असताना मार्टिन त्या अद्भुततेची पाळमुळं मानवी इतिहासातल्या विविध संस्कृतींच्या मिथकांमधून आणि दंतकथांमधून उसनी घेतो. त्यामुळे पाश्चात्य मिथकांची तोंडओळख असणाऱ्यांना हे कथानक, यातली पात्र, आणि मिथकं संपूर्णपणे अपरिचित नसतात. आणि म्हणूनच टीव्ही मालिका हि मिथकं उलगडून सांगण्यात वेळ घालवत नसली तरी ते लोकांपर्यंत पोचतात. मार्टिनचा मिथक आणि इतिहासाचा अभ्यास अतिशय दांडगा आहे हे A Song of Ice and Fire मालिकेतली पुस्तकं वाचताना खऱ्या अर्थाने जाणवतं. मार्टिनने उभं केलेलं हे जग संपूर्णपणे नवीन असलं तरी त्याला मानवी संस्कृतींचा भक्कम पाया आहे. उदाहरणार्थ ड्रॅगन हे भारत आणि इजिप्त सोडलं तर अधिकांश पुरातन सभ्यतांमधल्या मिथकांचा भाग आहे. White Walkers हे स्कॉटीश मिथकांपासून प्रेरित आहे. तर Children of the Forestचे मूळ नॉर्स मिथकांमध्ये आढळते. याशिवाय जादू, Faceless Men, Giants वगैरे एकूणच युरोपियन मिथकांपासून प्रेरित वाटतात. पण या सर्वांत मला सगळ्यात महत्वाचा वाटलेला मुद्दा म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स मधली सगळी अद्भुतरम्यता निसर्गातल्या मूळ तत्वांपासून आलेली आहे. यातलं पाणी आणि बर्फ अद्भुत आहे ज्याने White Walkersची निर्मिती केलेली आहे, ड्रॅगनची आग जादुई आहे, Children of the Forest ही तर जंगलाचीच मुलं आहेत. यातले प्राणी जादुई आहे, प्राण्याच्या शरीरात परकाया प्रवेश करणारे माणसं जादुई आहेत, कोणाचाही चेहरा घेऊ शकणारे Faceless Men जादुई आहेत, अग्नीची पूजा करणारी लाल चेटकीण जादुई आहे, शेकडो वर्ष शोभेची म्हणून समजल्या जाणाऱ्या अंड्यान्मधून ड्रॅगनला जन्म देणारी खलीसी जादुई आहे. आणि एवढं सगळं अद्भुतरम्य असूनही सगळंच अतिशय वास्तविक, अतिशय पटणारं आहे. याचं कारण माझ्याप्रमाणे जेवढं कथानकात आहे तेवढंच मानवाला असणाऱ्या गूढाच्या आकर्षणात, आणि हजारो वर्षांपासूनच्या मानवी इतिहासातल्या मिथक, आणि दंतकथांच्या अढळ स्थानाला आहे. मार्टिनने ही मिथकं स्वनिर्मित न करता मानवी संस्कृतीच्या दंतकथा आणि पुराणकथांमध्ये शोधल्यामुळे या संपूर्ण कथानकाला एक वेगळीच नैसर्गिकता आणि स्वीकारार्हता आलेली आहे.

गेम ऑफ थ्रोन्स हा खरंतर एका लेखाचा विषयच नाहीये. म्हणून आपण फक्त त्याच्या कथानकातल्या अद्भुतरम्यतेविषयी या लेखात बोलायचं ठरवलं तरी जागा अपुरी पडेल एवढा मोठा त्याचा आवाका आहे. ही अद्भुतता विश्लेषण करण्यासारखी नसून अनुभवण्याचीच गोष्ट आहे, त्यात पूर्णपणे बुडून जाण्याची गोष्ट आहे. गेम ऑफ थ्रोन्सच्या निमित्ताने मराठी आणि एकूणच भारतीय साहित्यात नवलकथांना नवसंजीवनी मिळावी हीच आता इच्छा आहे. वेळ अगदी अचूक आहे. भारतीय मिथक आणि दंतकथा हा साहित्यात मोठ्याप्रमाणावर दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. गेम ऑफ थ्रोन्सच्या नवीन पिढीतल्या क्रेझच्या निमित्ताने हा विषय पुन्हा ऐरणीवर यावा हीच आशा.

संपर्क – pole.indraneel@gmail.com