शांततेचे सूर – पं. नित्यानंद हळदीपूर

पं. नित्यानंद हळदीपूर

पंधरा वर्षांपूर्वी घडलेली घटना. मी तेव्हा नागपूरला राहायचो. दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती. माझी एक मावशी मुंबईला असायची. सुट्टीत मजा करायला मावशीकडे जायचं ही काही जणू प्रथाच होती. मी देखील परिक्षा आटोपताच मुंबई गाठली. मावशी आणि काका दोघेही कामाला जायचे; त्यामुळे दिवसभर वाट्टेल तो गोंधळ घालता यायचा.

एके दिवशी मी कॉम्प्युटरवर गेम खेळात बसलो होतो आणि खाली राहणारे आजोबा कुठल्यातरी कार्यक्रमाची पत्रिका घेऊन आले. चेंबूरमध्ये दोन दिवसांचा सांगितिक कार्यक्रम होणार होता त्याची ती पत्रिका. दहा-पंधरा दिवस कॉम्प्युटरवर गेम खेळून मी पण पुरता कंटाळलो होतो. शिवाय कार्यक्रम जिथे होणार होता ते सभागृह मावशीच्या घरापासून काही पावलांवर होते. वेळेतच मी तेथे पोहोचलो. त्यावेळी गाण्याची फारशी समाज नव्हती आणि वय देखील फार नव्हतं; त्यामुळे कोणते कलाकार उपस्थित होते, त्यांनी कोणते राग प्रस्तुत केले इत्यादी गोष्टी माझ्या अजिबातच लक्षात नाही. त्यावेळी घडलेली एक घटना मात्र नीट लक्षात आहे.

‘नित्यानंद हळदीपूर’ म्हणून एक कोणी बासरीवादक आपली प्रस्तुती सादर करीत होते. त्यांचे वाजवून होताच माझ्या बाजूला बसलेला एक वयस्कर माणूस उभा राहिला आणि काही क्षण दोन्ही हात जोडून तसाच उभा होता. तो खाली बसत असताना मी काहीशा आश्चर्यानेच त्याच्याकडे बघितले आणि ते त्याने पाहिले.

“फार मोठा माणूस आहे हा. देव माणूस. किती लांबून आलो मी यांना पाहायला,” इतकं बोलून तो माणूस तडक निघून पडला.

ही घटना घडली आणि मी ती विसरलो देखील.

दुसरी घटना सहा वर्षांपूर्वीची. माझे अभियांत्रिकीचे शिक्षण नुकतेच संपले होते. मैहर घराण्याच्या ज्येष्ठ सूरबहार वादक श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्यावरील एक पुस्तक मी आणि दाक्षायणी आम्ही दोघेही वाचत होतो. त्या पुस्तकात परत ‘नित्यानंद हळदीपूर’ हे नाव वाचण्यात आले. ते पुस्तक वाचत असतानाच आम्ही दोघांनी ठरविले की आपण अन्नपूर्णा देवींना आणि नित्यानंद हळदीपूरांना भेटूयात. वॉर्डन रोड वर आकाशगंगा इमारतीत सहाव्या मजल्यावर त्या राहतात एवढीच माहिती घेऊन आम्ही मुंबईला निघालो. त्यावेळी आमची अन्नपूर्णा देवींशी भेट नाही होऊ शकली. आम्ही लगेच नित्यानंदजींना फोन केला आणि आणि त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो.

या एका भेटीनंतर त्यांना नित्यानंदजींना अनेक वेळा भेटण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग्य आला. ‘देवमाणूस’ हे विशेषण त्यांना किती चपलखपणे बसते याची प्रचिती आली.

उंचपुर्‍या नित्यानंदजींसमोर उभं राहताच त्यांच्या आतील शांतता तुम्हाला जाणवू लागते. त्यांची स्थिर आणि स्वच्छ नजर काही लोकांना ‘अनकंफर्टेबल’ देखील करू शकते. त्यांच्या वागण्या आणि बोलण्यात कुठल्याही प्रकारची खोटी औपचारिकता नसली तरीदेखील सच्चेपणाचा ओलावा आहे. त्या काळात आम्ही अनेक कलाकारांना भेटायचो आणि त्यांच्या मुलाखती घ्यायचो. काही कलाकार बोलायचे नीट परंतु दारातूनच आम्हाला कटवून लावायचे. काही कलाकार आम्ही सर्व बोलणे संपवून बाहेर पडताना ‘थोडा अजून वेळ असता तर चहा वगैरे केला असता’ असं सांगायचे. नित्यानंदजी आम्ही येणार म्हणून न जेवता वाट बघत होते. आम्ही त्यांच्या घरी पोहोचल्यावर तास-दीड तास गुरुमांच्या अनेक आठवणी त्यांनी आम्हाला सांगितल्या. कोण्याही कलाकाराची कला ही त्याच्या आयुष्याचे प्रतिबिंब असते. त्याचप्रमाणे, त्या कलाकाराचे आयुष्य देखील त्याच्या कलेचे प्रतिबिंब असते.

नित्यानंदजींची जीवनकथा देखील फारच विस्मयकारक आहे. बालपणीच त्यांना वडील निरंजन हळदीपूर आणि ज्येष्ठ बासरी वादक पं. पन्नालाल घोष यांच्याकडून बासरीवादनाचे धडे मिळाले. पं. चिदानंद नगरकर, पं. देवेंद्र मुर्डेश्वर या दिग्गजांचे मार्गदर्शन देखील त्यांना लाभले.

कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यात कधीना कधी एक भिंत येते. ती भिंत तोडून पुढे गेल्यावरच तो कलाकार खर्‍या अर्थाने कलाकार बनतो. तुला देखील आयुष्यात कधी ही भिंत जाणवू लागली, तर अन्नपूर्णा देवींकडे जा. पन्नालाल घोष यांच्या कन्या हे नित्यानंदजींना नेहमी सांगायच्या. अनेक कलाकार या भिंतीने साकारलेल्या तोकड्या कलाविश्वात सुखा-सुखी पूर्ण आयुष्य व्यतीत करतात. नित्यानंदना जेव्हा त्यांच्या आयुष्यात ही भिंत जाणवू लागली, त्यांनी गुरुमांना साकडे घातले आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर गुरुमा त्यांना शिकविण्यास राजी झाल्या.

तुला प्रसिद्धी हवी असेल तर माझ्याकडे येऊन काही उपयोग नाही. तुला स्वतःच्या आनंदासाठी संगीत करायचे असेल तरच माझ्याकडे ये. गुरुमांनी अगदी सुरुवातीलाच त्यांना सांगितले.

जेव्हा नित्यानंदजी पहिल्यांदा गुरूमांकडे गेले, तेव्हा गुरुमा त्यांना अनवट आणि कठीण रागांची तालीम देतील असे त्यांना वाटले. गुरुमांनी नित्यानंदजींना ‘राग यमन’ वाजविण्यास सांगितला. पहिल्या भेटीतच गुरुमांनी अतिशय सध्या आणि सोप्या वाटणार्‍या ‘यमन रागात’ अशा काही जागा गाऊन दाखविल्या की यमन रंगाची खोली किती अफाट आहे याची जाणीव नित्यानंदजींना झाली. ही घटना 1986 सालातील. तेव्हापासून जी तालीम सुरु झाली ती कित्येक वर्षे सुरूच होती.

कित्येकदा गुरुकडे देण्यासारखे खूप काही असते परंतु शिष्याची घेण्याची कुवत नसते. अनेक वेळा शिष्याची कुवत असते परंतु आपल्या आधीच्याच ज्ञानान तो इतका काठोकाठ भरला असतो की नवीन ज्ञान साठवण्यासाठी लागणारी पोकळी त्याच्याकडे नसते. गुरूकडून शिकण्यासाठी आधी शिकलेले खूप काही विसरावे लागते. पाटी कोरी करावी लागते. अन्नपूर्णादेवीं सोबतच्या काही दशकांच्या सहवासात नित्यानंदजी संगीत दृष्ट्या फारच समृद्ध झाले आहेत. अन्नपूर्णादेवींनी त्यांच्या प्रत्येक शिष्याला वेगळ्या पद्धतीची तालीम दिली. नित्यानंदजींचा शांत आणि हळवा स्वभाव ओळखून त्यांनी त्यांना योग्य ती तालीम दिली. खोल नदीच्या संथ प्रवाहाप्रमाणे नित्यानंदांच्या बासरीतून बाहेर पडणारे स्वर श्रोत्यांच्या मनाला त्या संथ प्रवाहात सामील करून घेतात. आपल्या मनातील चंचलता किंवा अस्थैर्य दुसर्‍यांच्या मनात टाकणे फारच सोपे आहे. आपल्या मनातील निराशा आजूबाजूच्या लोकांना देखील अगदी सहजपणे निराश करू शकते. आपल्या मनातील शांतता दुसर्‍याच्या मनात भरणे फारच कठीण. हे महाकठीण कर्म नित्यानंद आपल्या बासरीवादनातून सहजपणे करीत असतात. त्यांचा गौड सारंग किंवा शुद्ध सारंग किंवा यमन जरूर ऐकावा; काही क्षणातच या शांततेची आणि सखोलतेची प्रचिती येईल.

त्यांच्या वादनात कोणत्याही प्रकारची कसरत जाणवणार नाही. किंवा ‘मला काही अचाट करून दाखवायचे आहे’ हा अविर्भाव जाणवणार नाही. मी किती ‘क्रिएटिव्ह’ आहे किंवा मला हा राग किती नीट कळाला आहे हे दाखविण्याचा आटापिटा चाललेला दिसणार नाही. त्यांचे वादन या सर्व कचाट्यापासून मुक्त आहे आणि म्हणूनच ते अलौकिक देखील आहे. कुठल्याही व्यत्ययापासून अबाधित असा एक ओघ आणि प्रवाह त्यांच्या वादनात कायमच जाणवतो.

“मी तुमचे चरित्र लिहू का?” असा प्रश्न मी त्यांना काही वर्षांपूर्वी विचारला होता.

“माझे चरित्र लिहिणारा लेखक वेडा असणार”, एव्हढेच उत्तर त्यांनी मला दिले.

त्या निमित्ताने अनेक वेळा आम्ही नित्यानंदजींना भेटलो आणि त्यांच्याशी संवाद साधला. अनेकवेळा त्यांची आणि आमची भेट गुरुमाच्या ‘आकाशगंगा’ सोसायटीतील निवासस्थानी झाली. प्रत्येक खेपेला नित्यानंदजींनी आमचं केलेलं आदरातिथ्य आम्हाला दिपवून टाकणारं होतं. त्यांची गुरुवरील आणि गुरूने दिलेल्या तालमीवरीलनिष्ठा केवळ अद्वितीय आहे.

अन्नपूर्णा देवींचे दुसरे पती, ऋषिकुमार पंड्या यांचे निधन झाल्यावर नित्यानंदजी गुरुमांसोबतच राहायचे व त्यांची देखभाल करायचे. केवळ रविवारी काही तास ते स्वतःच्या घरी जायचे. अन्नपूर्णा देवींना नित्यानंदजी सोबत असण्याची इतकी सवय झाली होती की ते परगावी गेले तर त्यांना अस्वस्थता जाणवायची. हे जेव्हा नित्यानंदजींना कळलं, तेव्हा त्यांनी परगावच्या कार्यक्रमांचे निमंत्रण नाकारण्यास सुरुवात केली. त्याकाळात लहान-मोठे सर्व कलाकार कार्यक्रम मिळविण्यासाठी धडपडत आहेत, नित्यानंदजींनी गुरूच्या सोयीसाठी स्वतःच्या ‘करियर’ ला दिलेली ‘बॅकसीट’ त्यांच्या गुरुनिष्ठेबद्दल खूप काही सांगून जाते.

‘आपली गैरसोय होऊ नये म्हणून नित्यानंद कार्यक्रम नाकारतो’ ही बातमी गुरुमांच्या कानावर पडताच त्यांनी नित्यानंदजींना कार्यक्रम स्वीकारण्याची तंबी दिली!

दोन वर्षांपूर्वी आम्ही नित्यानंदजींची पुण्यात एक घरगुती बैठक आयोजित केली होती. त्यांच्यासारख्या श्रेष्ठ कलाकाराची बैठक आयोजित करणे म्हणजे एक मोठी जबाबदारी असते. अनेक वेळा कलाकारांची सरबराई करणे आणि त्यांचे ‘मूड’ सांभाळणे यात आयोजकांचा अर्धा जीव जातो. नित्यानंदजी स्वतः टॅक्सी करून कार्यक्रमाला आले. कार्यक्रम आटोपल्यावर स्वतः कॅब करून मुंबईला परत गेले. संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकाराचा आपण कार्यक्रम करत आहोत याची जाणीव देखील त्यांनी आम्हाला होऊ दिली नाही.

त्यांचे अनेक कार्यक्रम आम्ही प्रत्यक्ष ऐकले आहेत. कलेप्रतीची त्यांची सचोटी आणि निष्ठा अनुकरणीय आहे. मंचावर बसले, की डोळे बंद करून त्यांचे वादन सुरु होते. अनेक वेळा माईक सुरु आहे की बंद आहे हे तपासण्याची तसदीसुद्धा ते घेत नाहीत. त्यांचा हा साधेपणा आणि मवाळपणा अनेकांना रुचत नाही. ते संगीता वर उगाच वैचारिक चर्चा आणि वाद-विवाद करत नाही. ही बाब देखील काहींना रुचत नाही. नित्यानंदजींचा या सर गोष्टींमधला अलिप्तपणाच त्यांच्या संगीतातील शांततेचे रहस्य असावे की काय, असे मला कायम वाटते.

आपल्या संगीतातून, किंबहुना आपल्या प्रत्येक श्वासातून श्रोत्यांना शांततेची आणि पूर्णतेची प्रचिती देणारे पं. नित्यानंद हळदीपूर खर्‍या अर्थाने मानवी सौहार्द आणि शांततेचे दूत आहेत असे मला नेहमीच वाटते!