पहिले महायुद्ध – विषय प्रवेश (लेखांक १)

First World War

लेखक - आदित्य कोरडे

११ नोव्हेंबर १९१८ रोजी सकाळी ११ वाजायला एक मिनिट बाकी असताना हेन्री निकोलस जॉन गुंथर हा अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगनच्या माऱ्याला बळी पडला. आश्चर्य असे की तो जन्माने जर्मन-अमेरिकन होता. तो मेल्यानंतर १ मिनिटात सर्व युरोपभर युद्ध विराम लागू झाला. युरोपभराच्या चर्चमधून घंटानाद करून हे वर्तमान लोकाना सांगितले गेले. लंडनचे प्रसिद्ध बिग बेन हे घड्याळ १९१६ पासून बंद होते. त्याने सकाळी ११.०० वाजता परत एकदा टोल दिले. गेली ४ वर्षे ३ महिने अविरत धडाडत असलेल्या तोफा-बंदुका शांत झाल्या. सर्व युरोपभर शांतता पसरली. अनेकाना ती भेसूर वाटली कारण, ती भेसुरच होती. सव्वाचार वर्षे सतत चाललेल्या या नरमेधातून जे वाचले ते स्वत:ला सुदैवी समजत होते की नाही, हे नक्की सांगता येणार नाही. पण त्यानी बरेच काही गमावले होते. शरीराचे अवयव, मानसिक संतुलन, सौंदर्य, चेहरा आणि आयुष्यावरचा, एकूणच सौंदर्यावरचा विश्वास, जगण्याची अभिलाषा आणि इतरही बरेच काही. “पुन्हा कधीही असे होऊ द्यायचे नाही…” असे सगळेच जेते म्हणाले. पण फक्त २० वर्षात परत अशाच एका भयानक आवर्तात सगळे ओढले गेले. का झाले असेल असे? काय कारण असेल? याचा इतिहास रंजक आहे हे तर खरेच. तसाही युद्धाचा इतिहास रंजकच असतो. पण मग दूरवरच्या युरोप नावाच्या खंडात शंभर एक वर्षांपूर्वी घडलेल्या एका युद्धाबद्दल आपण भारतीयांनी का जाणून घ्यावे? काय गरज आहे?

आपण अनेकदा ‘युद्धाने कुठलेच प्रश्न सुटत नाहीत, हिंसाचाराने मूल्यांचा ऱ्हास होतो, संस्कृती नाश पावते’ अशा प्रकारची विधाने ऐकतो आणि त्यात तथ्यांश आहेच. त्याबरोबर मानव जेव्हापासून आपली संस्कृती/सभ्यता म्हणून जे काही स्थापत आला आहे तेव्हापासून युद्ध आणि हिंसा त्याबरोबरच आहेतच. इतिहासातला असा एकाही कालखंड नसेल ज्यात मानव समूह आपसात लढले नाहीत. तेव्हा युद्ध आणि हिंसाचार, आक्रमणे ही दुर्लक्ष करण्याजोगी गोष्ट नक्कीच नाहीत. सर्व युद्धांचा नाश करणारे अंतिम युद्ध म्हणून ज्याचा उल्लेख झाला ते पहिले महायुद्ध सर्व युद्धांचा नाश तर करू शकले नाहीच पण पाव शतकापेक्षा कमी काळात दुसऱ्या एका अशाच महाभयानक संगराची सुरुवात व्हायला मात्र कारणीभूत झाले. फ्रान्स इंग्लंड सारखी जी साम्राज्ये या झंझावातातूनतून वाचली त्यांनाही या युद्धाने इतका जबर तडाखा दिला की त्यांच्या साम्राज्याचा पाया भुसभुशीत झाला. भारत, पाकिस्तान सारखे अनेक देश या युद्धामुळे पुढे स्वतंत्र झाले. देव आणि धर्मासाठी, धन्याच्या खाल्ल्या मिठासाठी लढणाऱ्या लोकांना पुन्हा नव्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी राष्ट्र, राष्ट्रवाद, देशभक्ती अशा नव्या संकल्पना सापडल्या. सध्याचा काळ भारत देशासमोर मोठा धामधुमीचा आणि संक्रमणाचा आहे. धर्म, जात, प्रांत, भाषा ह्या पुरातन गोष्टींबरोबरच हुकुमशाही, देशभक्ती, देशप्रेम, देशद्रोह, संविधान, संविधानावरची निष्ठा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अशा निरनिराळ्या अवजड शब्दांच्या आणि संकल्पनाच्या गदारोळात भारतीय समाज मन गोंधळून गेलेले आहे. राष्ट्रवाद ही शक्ती आहे हे खरेच पण ही शक्ती शुभ कधी असते? आणि अशुभ कधी असते? शूर कर्तबगार विद्याभ्यासी, सभ्य सुसंस्कृत समाजाला अंध व्यक्तिपूजक बनवण्याचे सामर्थ्य ह्या संकल्पनात कोठून येते? सत्ताधाऱ्यांच्या व्यक्तिगत अमर्याद महत्वाकांक्षा आणि अहंकार राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय गौरवाचे रूप धारण करून उत्पात कशा घडवतात? समाजवाद, साम्यवाद, लोकशाही अशा संकल्पनांना राजकारणात, सत्ताकारणात खरोखर काही पावित्र्य असते का? त्यावरची निष्ठा म्हणजे नक्की कशावर निष्ठा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सापडायला या इतिहासाने मदत होईल अशी मला अशा वाटते. हे काम मला कितपत जमेल हे सांगता येणे मुश्कील आहे पण किमान प्रयत्न करणे माझ्या हाती आहेच.

यंदा म्हणजे २०१८ साली, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ही लेखमाला. त्या महान घटनेचा हा संक्षिप्त इतिहास.

तर मग करायची सुरुवात!

पहिले महायुद्ध - (प्रकरण १) – संघर्षाचा आरंभ

पहिले महायुध्द (१९१४-१९१८)
सोमच्या युद्धभूमीवर मृत्युच्या दाढेत जात असलेले सैनिक (अर्थात हा पहिल्या महायुद्धाचा खूप प्रसिद्ध फोटो असला तरी हा खोटा आहे. तो नंतर फ्रान्समध्ये काढलेला आहे. सैनिक खरे असले तरी ते पहिलं महायुद्ध लढायला चाललेले नाहीत.)

विसावे शतक हे अनेक अर्थाने अभूतपूर्व होते. मानवी संस्कृतीच्या इतिहासात इतक्या मोठ्या घडामोडी, इतकी प्रचंड उलथापालथ या आधीच्या कुठल्याही शतकात क्वचितच झाली असेल. विज्ञान-तंत्रज्ञानाची, कृषी, वैद्यकीय आणि इंजिनियरिंग पासून ते अवकाश संशोधन अशा सर्वच क्षेत्रातली झंझावाती प्रगती आणि त्यानेच निर्माण केलेले असंख्य अक्राळ विक्राळ प्रश्न हे तर या शतकाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. विज्ञानाप्रमाणेच समाजकारणातही नवनव्या संकल्पना, नवे प्रयोग झाले. औद्योगिकरणामुळे नवी समाजव्यवस्था येऊन फक्त मजूर वर्गाचा उदय आणि त्यांच्या समस्या याच गोष्टी विसाव्या शतकात महत्वाच्या ठरल्या नाहीत तर एकूणच औद्योगिकरणाने शेती, व्यापाराबरोबर सत्ता, सत्तासंघर्ष इथपासून ते युद्ध, युद्धतंत्रापर्यंत सगळीकडे आमूलाग्र परिवर्तन घडून आले. अनेक राजघराणी संपली, सरंजामशाहीचा अस्त, साम्यवादाचा उदय, विजय आणि त्याचे पतन, अनेक हुकुमशाह्यांचा उदय आणि अस्त हे देखिल पाहायला मिळाले. (बाय द वे हुकुमशाही जरी राजेशाहीचेच एक ‘भेस बदला हुआ रूप’ असले तरी विसाव्या शतकातल्या बहुतेक हुकुमशहांना समाजवादाचे कातडे पांघरावे लागले ही विशेष उल्लेखनीय बाब. तसेही हुकुमशहा हे विसाव्या शतकातच उदय पावले त्याधी राजे, सरदार, सामंत वर्ग आणि धर्मगुरू त्यांची गादी चालवत.) विसाव्या शतकातच ही परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनली की इथे अब्राहम लिंकनच्या १९ व्या शतकातल्या भाषणातील एक भाग उदधृत करायचा मोह आवरत नाही

“The dogmas of the quiet past are inadequate to the stormy present. The occasion is piled high with difficulty, and we must rise — with the occasion. As our case is new, so we must think anew, and act anew. We must disenthrall ourselves, and then we shall save our country.”

– Abrahm Lincoln, Washington, D.C. December 1, 1862

Speech at Annual Congress meet

भावार्थ –

गत-इतिहासातून मिळणारे धडे ‘झंझावाती-वर्तमानातले’ प्रश्न सोडवायला पुरेसे ठरत नाहीत. परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनलेली असते की आपल्याला बऱ्याचदा नवा विचार, नवी उत्तरं, नवी समीकरणं शोधावी लागतात. आणि म्हणून गतानुगतिकता सोडून देऊन नव्या- मुक्त विचारांना, संकल्पनांना संधी द्यावीच लागते. त्याशिवाय पर्याय नसतो. जे समाज, देश हे करू शकत नाहीत, त्यांचं नष्टचर्य लवकरच सुरु होतं.

या विसाव्या शतकाने पूर्वार्धातच दोन महायुद्ध पहिली. खरे पाहता पहील्या महायुद्धाचेच दुसरे महायुद्ध हे extension होते. कल्पनातीत अशी हानी, संहार त्या पिढीने पहिला, अनुभवला, इतकेच नव्हे त्यात स्वत: भाग घेऊन तो केला. कोणत्याही प्रकारचे उच्च तत्व राखण्यासाठी किंवा दमनाविरुद्ध म्हणून हे युद्ध सुरु झाले नाही. (अर्थात तसा दावा या युद्धातल्या जेत्यांनी केलाच, तसा तो दुसऱ्या महायुद्धानंतरही केला गेला होता.) तरीदेखील या युद्धात एकूण २४ लहान-मोठ्या देशांनी सक्रीय सहभाग घेतला, एक अंटार्क्तीका हे खंड सोडलं तर प्रत्येक खंडातले कुठले न कुठले राष्ट्र या युद्धात सामील झाले. युद्ध संपेपर्यंत चार प्रचंड मोठी साम्राज्य लयाला गेली. युरोपचा आणि जगाचा नकाशा पार बदलून गेला. सुरुवातीला चार-साडे चार महिन्यातच ही सगळी धामधूम आटोपून सैनिक परत १९१४ चा नाताळ साजरा करायला आपापल्या घरी जातील असे सगळ्यानांच वाटले होते. प्रत्यक्षात साडेचार वर्ष हे युद्ध चालले आणि यात दोन्ही बाजूचे मिळून साधारण १ कोटी ६५ लाख लोक कामी आले, तर २ कोटी १२ लाखापेक्षा जास्त लोक जखमी झाले. १९१४ चा काळ पहिला तर ही आकडेवारी भयानक आहे. या युद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास २% लोक या युद्धात कामी आले. १९ व्या शतकापर्यंत तग धरून असलेली समाज व्यवस्था या युद्धाने हादरून गेली. हे युद्ध जमिनीवर, जमीनीखालून, समुद्रावर, समुद्राखालून, आकाशातही लढले गेले. प्रचंड प्रमाणावर विषारी वायूचा वापर करून हवा हे देखील जणु एक युद्ध क्षेत्रच बनले होते. मशीनगन सारख्या शस्त्राचा वापर आधीही माहीती होता पण, चाल करून येणाऱ्या सैनिकाच्या शिस्तबद्ध रांगा तितक्याच शिस्तबद्ध रीतीने मशीनगनच्या सहाय्याने कापून काढण्याचे तंत्र मात्र इतक्या प्रभावीपणे या आधी वापरले गेले नव्हते. साधारणपणे युद्ध किंवा लढाई झाल्यावर जेत्यांच्या आक्रमणाला आणि क्रौर्याला बळी पडणारी नगरे प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रच बनून गेली आणि सर्वसामान्य जनता आता युद्धात अगदी सुरुवातीपासून भरडली जाऊ लागली.

पण त्याच बरोबर आतापर्यंत गुलामीत असलेले अनेक देश, मानव समूह, समाज स्वतंत्र होऊ लागले. स्वयंशासन, स्वयंनिर्णय, समाजवाद, लोकशाही, साम्यवाद अशा अनेक विचारधारा आतापर्यंत मागास, गुलाम राहिलेल्या समाजात रुंजी घालू लागल्या. विज्ञान-तंत्राज्ञान, उद्योग, उड्डाण, दळणवळण, रेल्वे, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात प्रचंड वेगाने प्रगती झाली. वैद्यकीय क्षेत्र हे या साडेचार वर्षात आधी कधीच झाले नव्हते इतक्या झपाट्याने विकसित झाले. सेवा-शुश्रुषा, सर्जरी, प्लास्टिकसर्जरी , कृत्रिम अवयव, प्रथमोपचार, वेदनाशामक औषधे, प्रत्यारोपण, मानसोपचार अशा वैद्यकीय क्षेत्रातल्या असंख्य शाखांचा विकास झाला. युद्धाआधीही लोकाना विमान, मोटारी माहिती होत्या. रेल्वे गाड्यातर अगदी नित्यपरिचयाच्या झाल्या होत्या पण या युद्धाने त्यांच्या वापराला आणि विकासाला प्रचंड गती दिली. आफ्रिका आशियातल्या अनेक देशाना, मानव समूहाना स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक बदल ही घडू लागले. स्त्रियांच्या अधिकारासाठीचे, स्वातंत्र्यासाठीचे, समानतेसाठीचे लढे त्यांचे राजकीय हक्क, नागरी हक्क मिळवण्यासाठीचे संघर्ष आणि त्यात मिळालेले यश (मर्यादित का होईना) हे देखील अंशत: या युद्धाचेच फलित.

वसाहतवाद आणि त्या वसाहतीतून मिळणाऱ्या उर्जेवर इंग्लंड फ्रान्ससारखे युरोपियन देश आपले उच्चतर मानवी संकृतीचे मळे फुलवत होते. तर इटली, जर्मनी सारखे खेळात उशीरा सामील झालेले भिडू आपल्याला या आधीच जुन्या भिडूंंनी बळकावलेल्या वसाहतीतला हिस्सा कसा लाटता येईल या विवंचनेत होते. खरेतर त्यामुळेच या युद्धाचा वणवा पेटला होता. या युद्धाने प्रचलित साम्राज्यवादाला आणि वसाहतवादाला धक्का बसला. अर्थात साम्राज्यवाद किंवा वसाहत वाद पूर्ण नष्ट झाले नाहीत, पण त्यांचे बाह्यस्वरूप इतिहासात प्रथमच बदलले गेले. अमेरिकेसारखा भांडवलवादावर बलवान झालेला मोठा भिडू आता मैदानात आला. त्याने जागतिक सत्तेचे केंद्रच युरोपातून हलवले. तोपर्यंत युरोपातील सत्तेचा समतोल हा युरोपातीलच राष्ट्रात फिरत्या करंडकाप्रमाणे फिरवला जात असे आणि जो यात वरचढ ठरत असे तोच सगळ्या जगाच्या सत्ता समतोलावर प्रभाव टाकत असे. या युद्धाला महायुद्ध, जागतिक महायुद्ध, सर्व युद्धांचा अंत करणारे युद्ध अशा विशेषणांनी गौरवले गेले. अर्थात तसे काही जरी झाले नसले तरी आधुनिक युद्धाची संहारक क्षमता लक्षात येऊन जगातल्या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन आपसातले तंटे सामोपचाराने मिटवावे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संस्थेची उभारणी करण्याची गरज ओळखून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले. त्यालाही मर्यादितप्रमाणात का होईना पण यश मिळाले.

(क्रमशः)

या लेखाचा पुढचा भाग खालील लिंकवर वाचा –

पहिले महायुद्ध – विषय प्रवेश (लेखांक 2) – दिवे मालवू लागले …