पहिले महायुद्ध – विषय प्रवेश (लेखांक 2) – दिवे मालवू लागले …

पहिले महायुध्द (१९१४-१९१८)

लेखक - आदित्य कोरडे

या लेखाचा आधीचा भाग या लिंकवर वाचा –

पहिले महायुद्ध – विषय प्रवेश (लेखांक १)

“Lamps are going out all over europe: We shall not see them lit again in our life time.”

(सर्व युरोपात दिवे मालवू लागले आहेत आणि मला वाटत नाही की आपल्या हयातीत ते पुन्हा उजळलेले पहायला मिळणार आहेत…)

-सर एडवर्ड ग्रे – ब्रिटनचे परदेश सचिव (तत्कालीन)

परिस्थिती इतकी स्फोटक कशाने बनली?

आपल्या सर्वाना हे माहिती आहे की पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला तत्कालीन कारण होते, ऑस्ट्रियाचा युवराज (म्हणजेच क्राऊन प्रिन्स) आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक यांची हत्या. २८ जुन १९१४ रोजी बोस्नियाची राजधानी सारायेव्हो येथे झालेला या दोघांचा गोळ्या खालून खून करण्यात आला. बोस्निया हा त्यांच्या -ऑस्ट्रियाच्या- साम्राज्यात नव्यानेच सामावला गेलेला, मांडलिक बनवला गेलेला (प्र)देश. सर्वसाधारणपणे जे लोक पहिल्या महायुद्धबद्दल थोडेफार काही ऐकून, वाचून असतात त्याना ही एवढी माहिती असतेच असते. म्हणूनच सध्या हा फ्रांझ फर्डिनांडच्या खुनाच्या तपशिलाचा भाग बाजूला ठेवून आपण एकंदर युरोपातल्या परिस्थिती पासून सुरुवात करूयात.

१९ व्या शतकातल्या घडामोडी आणि जर्मन राष्ट्राची पायाभरणी :

ज्याप्रमाणे १८५७ च्या बंडाची कारणे शोधताना आपल्याला फक्त काडतुसाच्या प्रकरणाशी थांबून चालत नाही. तसेच पहिल्या महायुद्धाची कारणे शोधताना आपल्याला इतिहासात कमीतकमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते. १९ व्या शतकातल्या युरोपचा, विशेषत: जर्मनीचा एकीकरणापूर्वीचा इतिहासतर इतका गुंतागुंतीचा आहे की ब्रिटीश पंतप्रधान लॉर्ड पाल्मरस्टन असे म्हटले होते की, जगात फक्त तीन लोकांना या प्रश्नाचे खरोखर आकलन झाले आहे. एक म्हणजे प्रिन्स अल्बर्ट (इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाचा नवरा) पण तो आता हयात नाही, एक जर्मन प्रोफेसर आहे पण तो वेडा झाला आहे आणि मी, पण आता मी ते सगळे विसरलो आहे.

मुळात १९ व्या शतकाचा बराचसा काळ (साधारण ७० वर्षे) जर्मनी हा देशच नव्हता, होता तो प्रशिया आणि त्याच्या प्रभावाखाली असलेली जर्मन भाषिक फुटकळ राज्ये. इसवी सनाच्या १५ व्या शतकापासून कधी पोलंड, कधी फ्रान्स, कधी रशिया, तर कधी ऑस्ट्रियाशी संघर्ष करत करत हा प्रशिया आपले अस्तित्व टिकवून होता. याचे फ्रेडरिक नावाचे इतके राजे होऊन गेले की प्रशियामध्ये राजाला समानार्थी शब्द म्हणून फ्रेडरिक म्हणतात की काय असे आपल्याला वाटावे! असो तर या असंख्य फ्रेडेरिकांपैकी अतिशय प्रसिद्ध अशा फ्रेडरिक द ग्रेट (फ्रेडरिक दुसरा) याने पोलंड, फ्रान्स आणि ऑस्ट्रियाचा निर्णायक पराभव करून आपले प्रशियाचे छोटेसे पण शक्तिशाली साम्राज्य (खरेतर राज्य!) स्थापन केले. साल होते १७७२. इतका दीर्घ काळ, म्हणजे जवळपास २५० वर्षे युद्ध चालू राहिल्याने हा देश अत्यंत लढाऊ वृत्तीचा आणि आक्रमक, थोडक्यात युद्धखोर बनला. यात काहीही नवल नव्हते. पुढे जेव्हा फ्रान्समध्ये नेपोलीयनने सत्ता काबीज केली तेव्हा प्रशियाच्या गादीवर होता फ्रेडरिक विलियम दुसरा. हा एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात प्रशियाला स्वातंत्र्य, शांतता, स्थैर्य आणि संपन्नता सर्वकाही लाभली. पण हे स्थैर्याचे दिवस लवकरच पालटले. हा फ्रेडरिक काही उत्तम लढवय्या नव्हता आणि नेपोलीयनच्या झंझावातापुढे त्याने हार पत्करली. तसा अख्खा युरोपच नेपोलीयनच्या सामर्थ्यापुढे हतबल झालेला होता. १७९५ साली प्रशियाचा पराभव करत नेपोलियनने ऱ्हाईन नदीच्या आसपासचा जर्मन भाषिक बराचसा प्रदेश जिंकून घेतला. त्याचा मुलगा फ्रेडरिक विलियम तिसरा जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने सुरुवातीला नमते घेतले पण अखेरीस आपल्या प्रशियन स्वभावाला अनुसरून नेपोलीयनशी युद्ध छेडले. १८०६ साली त्याला हरवून नेपोलीयनने संपूर्ण प्रशियाच फ्रान्सचा मांडलिक करून घेतला. या आधी युरोपात जर्मन भाषा आणि संस्कृती असलेली प्रशिया आणि ऑस्ट्रिया ही दोन प्रबळ राज्ये सोडली तर इतर जवळपास ३०० फुटकळ राज्ये होती. नेपोलीयनने यातली बरीचशी बरखास्त करून, एकमेकांत विलीन करून त्यांची एकूण ३९ राज्ये केली. एरवी सतत आपसात भांडत असणारी ही छोटी छोटी राज्ये नेपोलियनसारख्या सामाईक आणि प्रबळ शत्रूमुळे आपसातले हेवेदावे विसरून एकत्र आली. पुढे १८१५ साली जरी नेपोलीयनचा वॉटर्लुच्या युद्धात निर्णायक पराभव झाला असला तरी या विजयाचे खरे शिल्पकार होते इंग्लंड. या युद्धाने युरोपातला फ्रान्सचा वरचष्मा नष्ट झाला. प्रशिया स्वतंत्र झाला. फ्रान्स हा आपला सामाईक शत्रू आहे हे ओळखून प्रशिया आणि ही ३९ जर्मन भाषिक राज्ये एकत्र आली. त्यांनी आपला एक जर्मन राज्य संघ बनवला. सुरुवातीला यात ऑस्ट्रिया देखिल सामील झाला होता पण व्यापार, अर्थव्यवस्था, संरक्षण अशा निरनिराळ्या महत्वाच्या धोरणांवर प्रशियाशी न जमल्याने त्यातून तो लवकरच बाहेर पडला. १८४० साली प्रशियाच्या गादीवर आला फ्रेडरिक विलियम चौथा. हा बराच उदारमतवादी होता. हे लक्षात ठेवले पाहिजे की आतापर्यंत आपण जी भांडणे लढाया, गटतट, शहप्रतीशह पाहतोय ती सगळी निरनिराळ्या राजवटीमधली होती. (Kingdoms) देश, राष्ट्रवाद वगैरे संकल्पना अजून मूळ धरायच्या होत्या किंवा आज आपल्याला त्या जशा माहिती आहेत त्या स्वरुपात उत्क्रांत व्हायच्या होत्या. खरेतर १८ व्या शतकात झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे नवपर्व युरोपात येऊ घातले होते. पण नेपोलीयनने सत्ता काबीज करून आणि स्वत:चेच साम्राज्य स्थापन करून त्याला चांगलीच खिळ बसवली.

नेपोलियन बोनापार्ट, एक रणकुशल सेनापती ते फ्रान्सचा सत्ताधीश
नेपोलियन बोनापार्ट, एक रणकुशल सेनापती ते फ्रान्सचा सत्ताधीश

अर्थात म्हणून काही राष्ट्रवाद नष्ट झाला नव्हता. प्रशियाच्या जर्मन भाषा, परंपरा, संस्कृती आणि भौगोलिक संलग्नता यावर आधारलेल्या राज्यसंघाच्या प्रयोगाच्या निमित्ताने तो पुन्हा उफाळून आला. राजेशाही उखडून फेकून द्यायचे अनेक उठाव १८४८ पासून युरोपात – विशेषत: प्रशियात होऊ लागले. हे सगळे उठाव फ्रेडरिक विलियम चौथा याने मोडून काढले, तरी त्याने उठाव करणाऱ्यांच्या बऱ्याच मागण्या, कल्पना स्वीकारून राज्यतंत्रात बरेच मूलगामी बदल केले. त्याने प्रशियन जनतेला राज्यकारभारात सामावून घेत, त्यांचे मत-मागण्या मांडण्यासाठी संसद आणि संविधानाची निर्मिती करून ते लागू केले. तसेही नेपोलीयानिक युद्धातून (१८०३-१८१५) युरोपमध्ये सामंतशाहीची पीछेहाट होऊन उदारमतवाद आणि त्याहून जास्त प्रमाणात राष्ट्रवाद वाढीला लागला होता. पण सर्वप्रथम त्याला थोडीफार मान्यता, अधिष्ठान प्राप्त झाले ते प्रशियात. (अर्थात इंग्लंडचा अपवाद) अशा परिस्थितीत प्रशियाचा प्रभाव (किंवा थोरलेपण म्हणू फार झाले तर) असलेले आणि जर्मन भाषा संस्कृती, चालीरितींवर आधारलेले एकसंध जर्मन राष्ट्र निर्माण करून त्याचा राजा किंवा अध्यक्ष आपण बनावे असा त्याने प्रयत्न केला ( सन १८४९). पण इतर जर्मन राज्यांनी त्याचे मोठे पण मान्य करायला नकार दिल्याने तो प्रस्ताव बारगळला. तशात काही वर्षांनी म्हणजे १८५७ साली पक्षाघाताचा झटका येऊन विकलांग झाल्याने फ्रेडेरिक विलियम चौथा याने गादी सोडली आणि त्याचा भाऊ विलियम किंवा विल्हेल्म पहिला हा गादीवर आला (आणि प्रशियातली राजांची फ्रेडरिक नावाची शृंखलाही तुटली). हा विल्हेल्म मोठा चाणाक्ष आणि धोरणी होता. त्याने लगेच काही गडबड केली नाही पण तो माणसे ओळखण्यात मोठा वाकबगार होता. त्याने प्रशियातील एक उमराव घराण्यातला तरुण, प्रिन्स ओटो फॉन बिस्मार्क याला प्रशियाचा पंतप्रधान म्हणून नेमला.

प्रिन्स ओटो फॉन बिस्मार्क हा अतिशय कणखर वृत्तीचा धोरणी, मुत्सद्दी पण विधीनिषेधशून्य असा संसदपटू/राजकारणी होता. सर्व लहान मोठ्या जर्मन भाषिक राज्यांचे अस्तित्व मोडून काढून एक विशाल जर्मन राष्ट्र उभे करायचे असा त्याचा पक्का निश्चय होता. आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करायची इच्छा विल्हेल्मला सुद्धा होती त्यामुळे राजा आणि प्रधानाची एक उत्तम युती तयार झाली (आणि ती सुदैवाने टिकली देखील दीर्घकाळ.)

जर्मनीचा पोलादी चान्सेलर बिस्मार्क

बिस्मार्कने प्रथम प्रशियात अंतर्गत शांतता प्रस्थापित केली. १८४८ पासुन चाललेली बंडाळी अजून पुरती शमली नव्हती आणि समाजवादी, स्वातंत्र्यवादी, राजेशाहीविरोधी असंतोषाचे निखारे अजून धुमसतच होतेच, पण बिस्मार्कने त्यांचे सरसकट दमन न करता त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करून, त्यांना चुचकारून त्या बदल्यात राजेशाही, सामंतशाहीला पराकोटीचा असलेला त्यांचा विरोध सोडायला लावला. अंतर्गत सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित केली. एकदा घराची परिस्थिती निर्धोक, शांत, स्थिरस्थावर झाल्यावर त्याने मग जर्मन एकीकरणाची अत्यंत धाडशी आणि दमछाक करणारी मोहीम हाती घेतली. खरेतर हा सगळा इतिहास अतिशय रंजक आहे पण फार विषयांतर नको म्हणून थोडक्यात संपवतो.

वर सांगितल्याप्रमाणे बिस्मार्क कणखर वृत्तीचा, धोरणी पण विधीनिषेधशून्य असा कसलेला संसदपटू, राजकारणी, मुत्सद्दी होता. आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याला युद्ध छेडणे, भांडण उकरून काढणे, हिंसा हे वर्ज्य नव्हतेच पण त्याची उद्दिष्टे आणि धोरणे स्पष्ट असत. (यालाच त्याने लोह-रुधीर धोरण – Blood & iron policy असे गोंडस नाव दिले.) आयुष्यात तो कधीही याबाबत चुकला नाही. जर्मन एकीकरणासाठी त्याने एकूण ३ युद्धे छेडली. पहिले युद्ध डेन्मार्कशी झाले. प्रशियाच्या उत्तर आणि पश्चिमेकडील श्लेसविग आणि होलस्टीन हे जर्मनबहुल प्रांत डेन्मार्कच्या अधीन होते आणि त्यांचा ताबा मिळवण्यासठी त्याने डेन्मार्काशी युद्ध केले. त्याला अर्थातच प्रशियन राज्यसंघाताल्या जर्मन राष्ट्रवादी लोकांचा मोठा पाठींबा लाभला आणि ही मोहिम फत्ते झाल्यावर त्याने उत्तर जर्मन राज्यातल्या राष्ट्रीय चळवळी आणि नेत्यांना पाठींबा देऊन उत्तरेकडील सगळी जर्मन भाषिक राज्ये प्रशियात सामील करून घेतली.

या एकाच युद्धाने प्रशियाचे पारडे जड झाले हे ओळखून ऑस्ट्रिया आता अस्वस्थ झाला. त्याने दक्षिणेकडील जर्मन राज्ये स्वत:च्या पंखाखाली घ्यायला सुरुवात केली. ऑस्ट्रियाला नुकत्याच जिंकलेल्या श्लेसविग आणि होलस्टीन या प्रांतांपैकी होलस्टीन प्रांताचा ताबा हवा होता. ही मागणी म्हणजे ‘प्रशिया आणि उत्तरेकडील जर्मन भाषिक प्रशियावादी राज्ये यात ऑस्ट्रियाचीची पाचर बसावी म्हणून खेळलेली एक चाल आहे’ अशी वदंता उठवून आणि ऑस्ट्रियाला फशी पडून बिस्मार्कने ऑस्ट्रियाशी युद्ध केले. हे करताना फ्रान्स तटस्थ राहील याची काळजी घेतलीच पण ऑस्ट्रियाच्या दक्षिणेला असलेल्या इटलीचा पाठींबा मिळवून वेळ पडल्यास तो आपल्याला मदत करेल अशी व्यवस्था करून ठेवली. त्यामुळे ऑस्ट्रियाला इटलीच्या सीमेवर संरक्षणाची तरतूद करावी लागली आणि प्रशियाच्या विरोधात सर्व ताकद पणाला न लावता आल्याने त्यांचा निर्णायक पराभव झाला. यानंतर बिस्मार्कने जर्मन राज्य संघातून ऑस्ट्रियाची बोळवण केली. त्यानंतर अर्थातच राज्यसंघात फक्त प्रशिया हाच एक प्रबळ देश उरला. अर्थात ऑस्ट्रियाचा पराभव झाल्यावरही त्यांच्या अधिपत्याखालाच्या भूमीचे लाचके न तोडता दूर अंतरावरच्या मैत्रीचे संबंध ठेवल्याने बहुसंख्येने जर्मन भाषिक ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रियन जनता जर्मनीची पक्की वैरी बनली नाहीत. अजून जी दक्षिण जर्मन राज्ये प्रशियाच्या कच्छपी लागलेली नव्हती, त्यांना प्रशियाची सार्थ भीती वाटत होतीच. पण यापेक्षा जास्त भीती त्यांना फ्रान्सची वाटत होती. ५०-६० वर्षापूर्वीच तर फ्रान्सने त्यांचे स्वातंत्र्य हिरावून त्यांना मांडलिक बनवले होते. १८१५ मध्ये नेपोलीयनचा पराभव जरी झालेला असला तरी लगेच काही फ्रान्स हे राष्ट्र कमकुवत झालेले नव्हते. उलट नेपोलीयनने मिळवलेल्या अनेक विजयांमुळे ते सामर्थ्यवान आणि त्याहूनही अधिक आत्मविश्वासाने भरलेले होते. त्यांच्या जगभर वसाहती होत्या. इंग्लंड नंतर क्रमांक दोनची वसाहतवादी सत्ता तेच होते. जर्मनबहुल आल्सेस आणि लॉरेन्स हे प्रांत नेपोलीयनने जिंकून फ्रान्सला जोडले तरी त्यावरचा ताबा अजूनही त्यांनी सोडलेला नाही, ही गोष्ट जर्मन लोक विसरले नव्हते.

(क्रमशः)