फायर इन द बॅबलॉन

Fire In Babylon

[Image Source: Link]

वेस्ट इंडीजचा संघ चांगला खेळत असतो तेव्हा खूप चांगला खेळतो पण जेव्हा नाही तेव्हा ते अक्षरशः हतबल होतात. We intend to make them grovel अर्थात, आम्ही त्यांना दयेची भीक मागत लोळण घ्यायला लावू. – टोनी ग्रेग, साल – 1976.

टोनी ग्रेगची धबधब्यासारखी खळाळत वाहणारी, बर्याचदा अतिरंजित पण तरीही लोकांना तितकीच खिळवून ठेवणारी लिजंडरी असणारी कॉमेंट्री. स्वतः खेळत असताना मात्र त्याची वर उल्लेखलेली वदंता त्याला फार महागात पडली. वेस्ट इंडीजला सहजपणे हरवू असा अर्थ त्याला अपेक्षित असावा पण जीभेने दगा दिला आणि जे बोलायला नको होतं ते तो बोलून गेला.

पूर्वरंग –

1976 सालच्या वेस्ट इंडीजच्या इंग्लंड दौर्याआधीची ही गोष्ट. 75 सालचा पहिला वर्ल्ड कप जरी त्यांनी जिंकला असला तरी ते काही सार्वभौम जगज्जेते नव्हते. एक चांगला संघ इतपत त्यांची ओळख होती. 1976 च्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाच्या लिली आणि थॉमसन द्वयीकडून तुफान मार खाऊन वेस्ट इंडीजचा संघ एकदम गार पडला होता. पाठोपाठ भारताने वेस्ट इंडीजमध्ये त्रिनिदादला 400 हून अधिक धावांचा पाठलाग अगदी हसतहसत केला आणि मग मात्र वेस्टइंडीजचे खेळाडू भर थंडीतल्या सकाळी अंगावर गार पाण्याची बादली पडल्यासारखे खडबडून जागे झाले.

आपली ताकद निव्वळ वेगवान गोलंदाजीमध्ये आहे हे वेस्ट इंडीजच्या क्लाइव्ह लॉईडला उमगलं आणि पुढल्याच सामन्यामध्ये त्यांनी भारताविरुद्ध जमैकाला रक्ताचा सडा सांडला. भारताचं नशीब थोर की मालिका तिथेच संपली. भारतीय संघ कसाबसा वाचला पण वेस्टइंडीजच्या नव्या अवताराचा खरा फटका इंग्लंडला मात्र बसायचाच होता. टोनी ग्रेगला तरी काय गरज होती चिडलेल्या हुप्प्याला वाकुल्या दाखवण्याची? आपल्या सिंघम सिनेमात एक भारी वाक्य आहे – ‘कुछ भी करनेका लेकीन जयकांत शिक्रे का इगो हर्ट नहीं करने का.’ बास! टोनी ग्रेगने नेमकं हेच केलं होतं. वेस्ट इंडीजचा इगो दुखावला होता.

ग्रॉव्हेल –

आपल्याला असं वाटेल की इतकं काय वाईट बोलला टोनी ग्रेग? प्रत्यक्ष खेळ चालू व्हायच्या आधी असे वाग्बाण नेहमीच सोडले जातात. पण टोनी ग्रेगच्या वाक्याला केवळ क्रिकेटपुरता अर्थ नव्हता. त्या ‘ग्रॉव्हेल’ ह्या शब्दाला ‘रेसिझम’ अर्थात वर्णभेदाची किनार होती. सामान्यतः पूर्वीच्या काळी असणार्या काळ्या गुलामांच्या संदर्भात तो शब्द वापरला जात असे. म्हणूनच ग्रेगच्या वक्तव्याला मिळणारे प्रतिसादही तीव्र होते. गोरे विरुद्ध काळे असा सरळसरळ सामना रंगणार होता. टोनी ग्रेगचे शब्द वेस्ट इंडीजच्या लोकांना जाळत गेले होते.

दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद तीव्र असणारा तो काळ. त्यांच्या देशात तेव्हा गोर्यांचा वरचष्मा होता. साहजिकच काळ्या रंगाच्या लोकांना इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे क्रिकेट संघातही जागा नव्हती. जग मात्र वर्णभेदापासून दूर चाललं होतं. त्याची परिणिती अशी झाली की दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटपासून एकटं पाडण्यात आलं. त्यांच्यावर सर्व देशांनी बहिष्कार घातला. इंग्लंडचा कर्णधार टोनी ग्रेग योगायोगाने मूलतः दक्षिण आफ्रिकेचाच. त्यामुळे त्याच्या वाक्याचा वर्णवादी असाच अर्थ घेतला जाणार होता. आगीत तेल ओतायचंच काम त्याच्या हातून घडलं होतं. ते मुद्दाम झालं की चुकून झालं ह्याला आता काही अर्थ नव्हता. आग भडकली होतीच.

दौऱ्याला सुरुवात –

पाच कसोटी सामन्यांचा हा बहुचर्चित दौरा अखेर चालू झाला. पहिल्या दोन सामन्यात तोडीस तोड खेळ होत दोनही सामने अनिर्णित राहिले. वेस्ट इंडिजकडे जुने जाणते खेळाडू होतेच पण तरुण खेळाडूंचाही अधिक भरणा होता. अँडी रॉबर्टस् आणि मायकेल होल्डिंग ह्या सुपरफास्ट गोलंदाजांच्या जोडीला वेन डॅनिअल, व्हर्नबर्न होल्डर, बर्नार्ड ज्युलियन अशी फौज होती. सलामीला जुन्या जाणत्या रॉय फ्रेड्रिक्सच्या जोडीला गॉर्डन ग्रिनीज आणि पाठोपाठ विव्ह रिचर्ड्स हे दोघे उमदे तरुण होते. मध्ये लॅरी गोम्स, अल्विन कालीचरण मग अनुभवी कर्णधार क्लाइव्ह लॉईड, विकेटकीपर डेरेक मरे होतेच.

Fire In Babylon
[Image Source: Link]

तिसऱ्या मॅचपासून मात्र वेस्ट इंडिजचं आग्या मोहोळ पुन्हा एकदा उठलं आणि मग इंग्लंडचा उरला सुरला प्रतिकार संपुष्टात आला. फक्त 4 सामने खेळूनदेखील रिचर्ड्सने 800 हून अधिक धावा काढल्या. विव्ह रिचर्ड्स टोनी ग्रेगच्या वक्तव्याबद्दल बोलून गेला की – This was the greatest motivational speech given to us. टोनी ग्रेगचं बोलणं आमच्यासाठी सर्वात प्रेरणादायी होतं.

एकीकडे गॉर्डन ग्रिनीजसुद्धा इंग्लंडची यथेच्छ धुलाई करत होता. त्यानेही अगदी अमाप धावा काढल्या. वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांनी तुडुंब पोट भरेपर्यंत बाऊन्सर्सचा मारा केला. तिसरी आणि चौथी कसोटी जिंकून झाल्यावर समारोप म्हणून होल्डिंगने शेवटच्या ओव्हल सामन्यात वेगवान गोलंदाजीचं अक्षरशः प्रदर्शन भरवलं होतं. झकास जेवणावर एक उत्कृष्ट स्वीट डिश! निव्वळ आणि निव्वळ वेगाच्या जोरावर त्याने इंग्लंडला गारद केलं. जवळपास सगळे ‘क्लीन बोल्ड’ किंवा पायचीत. इंग्लंडला ते होल्डिंगचं वारं झेपतच नव्हतं.

ह्याच दौदरम्यान इंग्लंडचा एक खेळाडू ब्रायन क्लोज ह्याची एक गोष्ट. ह्या वयस्कर खेळाडूने मालिकेदरम्यान वेस्ट इंडीजच्या कधी त्रिकूटाकडून तर कधी चांडाळचौकडीकडून भरपूर मार खाल्ला. त्याचा एक बॉल लागून लागून सुजलेला फोटो आहे. पण खंबीर गडी होता बरं का. खूप वेळ तग धरला त्याने. वयसुद्धा बरंच होतं त्याचं तेव्हा. पण चांगला लढला. ब्रायन क्लोजचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास 27 वर्षं तो कसोटी क्रिकेट खेळला. अर्थात संघात कायमचं स्थान नसल्यामुळे फार काही सामने खेळू शकला नाही. पण ही शेवटची मालिका मात्र त्याच्या कायम लक्षात राहिली असेल.

गोड शेवट –

वेस्ट इंडीजने शेवटी मालिका 3-0 अशी जिंकली आणि इंग्लंडचा आवाज पुरता बंद झाला. पण टोनी ग्रेगलासुद्धा मानलं पाहिजे बरं का. मालिका हरताना त्याने ओव्हल मैदानावर स्वतःहून ‘ग्रॉव्हेल’ ह्या क्रियेचं प्रात्यक्षिक करत जमिनीवर लोळण घेतलं. ह्या कृत्याने त्याने स्वतःचा पराभव खुल्या दिलाने सर्वांच्यासमोर मान्य केला होता. वेस्ट इंडीजच्या प्रेक्षकांनी पूर्ण सिरीजभर इंग्लंडला त्राही भगवान करून सोडलं होतं. ग्रेगच्या शब्दाने दुखावलेला त्यांचा इगो त्याच्या कृतीने मात्र शांत झाला. उगाच म्हणत नाहीत की – actions speak louder than words. त्यांनीही टोनीला माफ केलं. एका कटू सिरीजचा शेवट गोड झाला. अजून काय पाहिजे? शेवटी हा जंटलमेन्स गेम आहे, नाही का?

Fire In Babylon News
[Image Source: Link]

पुढल्या महिन्यात परत भेटूया एखादी नवीन गोष्ट घेऊन.

Contact – oak.kedar@gmail.com

ही एकच गोष्ट तुम्ही वाचलीत.

केदार ओक यांच्या अशा अनेक गोष्टी ‘अक्षर मैफल’ मध्ये वाचायला मिळतीलच, याशिवाय त्यांच्या ‘लॉर्डस ते वानखेडे व्हाया डेझर्ट स्टॉर्म’ या पुस्तकात तुम्हाला अशा अनेक गोष्टी वाचायला मिळतील.

या पुस्तकातील गोष्टी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता!!