संपादकीय – दिवाळी अंक २०१९

Cover

मित्रहो,

सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळी सुखा-समाधानाची, आरोग्यपूर्ण जावो. आणि नेहमीची आपुलकीची शुभेच्छा म्हणजे, सर्वांना अधिकाधिक वाचनाची आवड लागो, सवय लागो. सर्वांना दर्जेदार आणि मोलाचं वाचायला मिळो. आणि महत्त्वाची शुभेच्छा म्हणजे कोणाला मंदीची झळ न लागो.

ही अक्षर मैफलची तिसरी दिवाळी. अक्षर मैफलने 3 वर्षं पूर्ण केली, याचं आम्हालाही आश्चर्य वाटतं. ट्रेकिंग करणार्‍या लोकांना हा अनुभव नेहमी येत असेल, की कोणताही डोंगर चढायचा असला की सर्वप्रथम डोक्यात येतं, की हा समोर असलेला डोंगर इतका मोठा आहे, आपल्याला कसा सर होणार? पण प्रत्यक्ष चढाई सुरू केल्यावर आणि शेवटी अथक कष्ट करून माथ्यावर पोहोचल्यावर लक्षात येतं की, वाटला होता तेवढा हा प्रवास अवघड नव्हता. किंवा त्या प्रवासात केलेले कष्ट मोलाचे होते, कारण माथ्यावरून दिसणारा सूर्योदय, माथ्यावरून दिसणारा सूर्यास्त. माथ्यावरून वाहणारं वारं हे सगळं अनुभवल्यावर केलेले कष्ट किती सार्थ होते, हे लक्षात येतं. अक्षर मैफलचा प्रवास सुरू केला तेव्हाची भावना हीच होती. हा मासिकाचा डोंगर आपल्याला सर होईल का? वाटेतली आव्हानं आपल्याला पेलतील का? वगैरे. पण आज तीन वर्षं पूर्ण झाली, प्रवासातले कष्ट आता मोलाचे ठरत आहेत. ते किती गरजेचे होते हे मागे वळून पाहताना लक्षात येतं आहे. चढाई करताना अंगावर येणारा डोंगर सर करून वर गेल्यावर अनुभवलं जाणारं समाधान आज आम्ही अनुभवतो आहोत.

ते समाधान अनेक गोष्टींचं आहे. मासिकाच्या निमित्ताने अनेक लोकांशी ओळखी झाल्या. अनेक मान्यवर लोकांच्या जवळ जाता आलं. अनेक मान्यवर लोकांनी कौतुकाचे शब्द उच्चारले. मराठीतले एक जेष्ठ लेखक अक्षर मैफलचं काम पाहून, ‘तुझ्यामध्ये मी पुढचा श्री.ग. माजगावकर बघतो’, असं ही म्हणाले. नवीन असंख्य माणसं भेटली. त्यांच्याशी केवळ ‘अक्षर मैफलचे सभासद’ इतकाच संबंध न राहता, त्याच्या पुढचा मैत्रीचा संबंध निर्माण झाला. तो इतर कोणत्याही संबंधांपेक्षा मोलाचा आहे, असं मी मानतो. एक समाधान तीन वर्षातील अक्षर मैफलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांबद्दल आहे. स्वतःवर माणूस प्रेम करू लागला की, चुकांच्या शक्यता वाढतात, याची मला जाणीव आहे, तरी तो धोका पत्करून सांगतो, की मी व्यक्तीशः अक्षर मैफलमधल्या लेखांच्या विषयांवर, त्यांच्या वैविध्यावर समाधानी आहे. तीन वर्षांत असा एकही लेख नाही, की जो नाईलाज म्हणून मासिकात प्रसिद्ध केला गेला आहे. ही किमया लेखकांचीसुद्धा आहे. अनेकविध विषयांवर लिहिणारे अनेक लेखक आम्हाला मिळाले. त्यामुळे लेखकांची किंवा लेखांची वानवा कधीही भासली नाही. आम्हाला हवा तो विषय, लिहिणारे अनेक लेखक भेटले. त्यांनी अक्षर मैफलसाठी लिखाण केलं. ते आम्ही हातात असलेल्या माध्यमातून प्रसिद्ध करू शकलो, हे समाधान थोडं नाही. नुकताच एका मित्राने त्याच्या वर्षं-दीड वर्षाच्या मुलीचा अक्षर मैफलचा अंक हातात घेतलेला फोटो पाठवला होता. तिला अक्षर मैफलच्या जाहिरातीतली ट्वीटरची चिमणी खूप आवडते, चिमणी पाहून ती खुश होते वगैरे. हा फोटो तर अतीव समाधान देणारा आहे. त्या आनंदाची तुलना इतर कशाशी शक्य नाही.

तीन वर्षांतल्या अनेक अनेक अंकांप्रमाणे हाही अंक सर्वस्वी वेगळ्या विषयाला समर्पित आहे. ते वाचताना तुमच्या लक्षात येईलच. पूर्ण पुस्तक लिहायचं आणि पुस्तकात काय लिहिलं आहे ते दीर्घ प्रस्तावनेत समजावून सांगायचं, असं खांडेकर स्टाईल मी काहीही लिहिणार नाही. पुरेसा विचार, पुरेसे कष्ट आम्ही मासिकात कोणते लेख घ्यायचे ते कसे मांडायचे यामागे केला आहे, एवढंच वाचकांना लक्षात आणून द्यावं आणि आशीर्वाद मागण्याची आणि शुभेच्छा देण्याची एक संधी घ्यावी, म्हणून हे दोन शब्द. कळावे, लोभ असावा ही विनंती!

आपला,

मुकुल रणभोर