क्रिकेट वर्ल्डकप २०१९ – क्रिकेटच्या जन्मदात्यांची व्यथा (इंग्लंड)

वर्ल्डकप २०१९ मध्ये इंग्लंड

भारतात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. येत्या 23 तारखेला या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील त्यासोबतच लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सांगता होईल. तोपर्यंत ‘एक्झिट पोल’चा धुमाकूळ सुरू राहील. आणि लागलीच सुरू होईल आणखी एक उत्सव…क्रिकेट शौकिनांसाठीचा. तो म्हणजे आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक. तर आम्ही घेऊन येतोय क्रिकेटचा ‘एक्झिट पोल’!

1. यजमान इंग्लंड –

2019 चा बारावा विश्वचषक होणार आहे इंग्लंड आणि वेल्स येथे. इंग्लडकडे या विश्वचषकाचे यजमानपद कसे आले याची कहाणी रोचक आहे. 2019 च्या विश्वचषकाचे यजमानपद कुणाकडे जाणार याची आय.सी.सीच्या पुढ्यात बोली लागली होती ती 2006 मध्येच. 2006 मध्येच 2011, 2015 आणि 2019 च्या विश्वचषकाच्या आयोजनाचे हक्क वितरित केले जात होते. आधी इंग्लड व वेल्सने 2015 च्या आयोजनासाठी बोली लावली परंतु 2011 च्या आयोजनासाठी आशियायी गटाच्या पुढे निभाव न लागल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड 2015 चा विश्वचषक आपल्याला आयोजित करायचा हक्क मिळावा म्हणून अडून बसले. इंग्लंड माघार घ्यायला तयार नाही. शेवटी 2009 च्या टी-ट्वेन्टी विश्वचषकाचे यजमानपद देऊन इंग्लंड व वेल्स ला 2019 च्या विश्वचषक यजमानपदासाठी राजी करण्यात आलं..! अशाप्रकारे 2006 पासून इंग्लंड या सोहळ्याची वाट पाहत होतं. यजमानांना मिळणारा घरच्या वातावरणाचा फायदा, हे त्यामागचं कारण नसेल असं, समजायची काही गरज नाही. घरच्या वातावरणाचा यजमान संघांना नेहमीच फायदा होतो हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे यजमान संघ यावेळी पूर्ण तयारीनिशी उतरणार आहे हे नक्की. विश्वचषकाचे यजमानपद भूषावण्याची ही इंग्लंडची पाचवी वेळ असेल. यापूर्वी 1975, 1979, 1983 हे सलग आणि मध्ये 1999 ला एकदा असे चारवेळा यजमानपद भूषवुनही इंग्लंडला एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही ही, बाब खेळाचे निर्माते म्हणून प्रत्येक इंग्लिश व्यक्तीला बोचत असणार आणि यात काहीही नवल नाही. का जिंकता आला नाही यासाठी? आता त्यांची विश्वचषकतील आजपर्यंतची कामगिरी थोडक्यात बघू.

१९७५ च्या वर्ल्डकपमधील इंग्लंडची टीम

1975:

1975 च्या वर्ल्डकपमधला उपांत्य सामना. इंग्लंडने या विश्वचषकतील सर्व साखळी सामने जिंकले. परंतु उपांत्य सामन्यात त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला. विश्वचषकतील हा एक अनेकांताला उत्तम सामना मानला जातो. या सामन्यात इंग्लडचा संघ 37/7 अशा दारुण अवस्थेतून सर्वबाद 93 इतकी मजल मारू शकला. इंग्लंडची ही अवस्था केली ती गॅरी ग्लिमोरने. त्याने 14 धावात सहा बळी घेतले. पण खरी गंम्मत तर पुढे आहे, ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल असं वाटत असताना त्यांची सुरुवात ही इंग्लंड सारखीच झाली. अगदीच सारखी म्हणावी अशी. 36/6, पण पुन्हा एकदा गॅरी धावून आला, पण यावेळी फलंदाज म्हणून. त्याने नाबाद 28 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने चार गडी राखून सामना जिंकला. आणि इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडला.

1979:

अंतिम सामना, या स्पर्धेचे आयोजन देखील इंग्लडमधेच केले गेले. साखळीतील सर्व सामने जिंकल्यानंतर उपांत्य सामन्यात केवळ 9 धावांनी न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंडने अंतिम सामन्यात प्रवेश केला. तेंव्हा पर्यंतचा हा सर्वात कमी फरकाने मिळवलेला विजय होता. अंतिम सामन्यात त्यांची गाठ गतविजेत्या वेस्ट इंडिजशी होती. विंडीजने हा सामना नाट्यपूर्णरित्या जिंकला. पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा 2 बाद 183 वरून सर्वबाद 194, असा इंग्लंडचा डाव गडगडला. म्हणजे 11 धावांच्या मोबदल्यात 8 गडी बाद. विश्वचषकाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरगुंडी मानली जाते. इंग्लिश खेळाडूंच्या स्वप्नांना सुरुंग लावणारा खेळाडू होता जोएल गार्नर. त्याने 11 चेंडूत अवघ्या 3 धावा देत 5 बळी घेतले. इंग्लंडचे स्वप्न अंतिम सामन्यात आणि पुन्हा एकदा भंगले.

संदीप पाटीलची ३१ बॉलमध्ये ५१ रन्सची इनिंग

1983:

उपांत्य सामना, यावेळी तिसऱ्यांदा इंग्लडचा संघ विश्वचषकाचे आयोजन करत होता. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणारा संघ अधिकच्या अपेक्षांचे ओझे बाळगत असतो. गटसाखळीतील 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकत इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहचला. त्यांना न्यूझीलंड सोबत एक पराभव पत्करावा लागला. उपांत्य सामन्यात त्यांची लढत होती भारतीय संघाशी. विश्वचषकापूर्वी कुणाच्या गिणतीतही नसलेल्या भारतीय संघाने इंग्लडला ‘सहज’ पराभूत केले. धावगती कमी राखण्यात यश आल्याने इंग्लंडचा संघ 60 षटकात केवळ 213 धावा फलकावर लावू शकला. ८३ चा आपला हिरो कपिल देवने ११ ओव्हरमध्ये केवळ ३५ रन्स देऊन ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला साथ होती ती मोइंदार अमरनाथ आणि कीर्ती आझाद यांची. प्रत्युत्तरात भारताने 54.4 षटकात 6 गडी राखून सामना जिंकला. संदीप पाटीलने तुफान फटकेबाजी करत केवळ ३२ बॉल्समध्ये ५१ रन केल्या होत्या. आज ३२ मध्ये ५१ चं फार कौतुक वाटणार नाही, पण हे १९८३ साल आहे, टी२० क्रिकेट कोणाच्या स्वप्नातही नव्हतं, जेव्हा एका ओव्हरला ३ पेक्षा जास्त रन निघाल्या तरी ती ओव्हर ‘एक्सपेंसिव्ह’ मानली जात असे, तेव्हा संदीप पाटील ३२ मध्ये ५१ असा खेळला होता.

तर अशा पद्धतीने आपण जिंकलो, आणि पुन्हा एकदा इंग्लंड हारलं!

गेटिंगचा रिव्हर्स स्वीप, वर्ल्ड कप डायरच्या ग्लोव्हजमध्ये

1987:

अंतिम सामना, यावेळी विश्वचषक पहिल्यांदाच इंग्लंडबाहेर खेळावला जात होता. यावेळी भारत-पाकिस्तान संयुक्तपणे यजमान होते. उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध भारत असा सामना झाला. वानखेडे वर झालेल्या या सामन्यात भारत 35 धावांनी पराभूत झाला. 255 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना 204/5 वरून 219 सर्वबाद झाला. अंतिम सामन्यात इंग्लंडपुढे ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. इडन गार्डनवर झालेल्या या रोमांचक अंतिम सामन्यात इंग्लंड 7 धावांनी पराभूत झाला. माईक गेटिंग हा इंग्लंडचा कॅप्टन, सुंदर खेळत होता. गेटिंग ४५ बॉल ४१, असा खेळत होता, त्यात ३ फोर आणि एक सिक्स होती. याचा अर्थ गेटिंग सकारात्मक खेळत होता. चार नंबर आलेला गेटिंग आणि त्याच्या खेळावरून असं दिसत होतं की, त्याच्यावर प्रेशर नाही. आपण क्रिकेटचे जन्मदाते, सलग चार वर्ल्डकप आपण हरलो आहोत, याचं कोणतंही प्रेशर गेटिंगवर नाही, असं वाटतं असताना, ते प्रेशर ज्वालामुखी सारखं उसळून आलं. संपूर्ण करियरमध्ये कधीही रिस्की क्रिकेट न खेळणारा गेटिंग प्रेशर गेममध्ये फसला. बोर्डरच्या बॉलींगवर आउट ऑफ द ब्लू, रिव्हर्स स्वीप मारला. बॅटच्या वरच्या एजवर बॉल लागला आणि हवेत उडाला, जो कॅच ऑस्टेलियन विकेट कीपर डायर यानी पकडला तो फक्त गेटिंगचा कॅच नव्हता, तो वर्ल्डकप होता. पुन्हा एकदा स्वप्न भंगले.

1992:

अंतिम सामना, या विश्वचषकात इंग्लंड 8 पैकी 5 गट सामने जिंकत उपांत्य फेरीत पोहचला. शेवटच्या गट सामन्यात झिबाब्वे कडून झालेला पराभव अनपेक्षित होता. उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेसोबतचा तो ‘ऐतिहासिक’ प्रसंग घडला. दहा मिनिटांच्या पावसाच्या व्यत्ययामुळे आफ्रिकेसाठी 13 चेंडूत 22 धावांचे असलेले लक्ष एका चेंडूत 21 धावा असे बदलण्यात आले. त्यावेळी आजची वापरात असलेली डकवर्थ-लुईस पद्धत वापरात नव्हती, ती पुढे 1999 च्या विश्वचषकापासून लागू करण्यात आली. नाहीतर शेवटच्या चेंडूवर आफ्रिकेला जिंकण्यासाठी 5 धावा व सामना बरोबरीत सोडवण्यासाठी 4 धावांचे लक्ष दिले गेले असते. नियमांच्या आड लपून आफ्रिकेला पराभूत करून इंग्लंड अंतिम सामन्यात दाखल झाला. पण दुसरीकडून पाकिस्तान फायनलला आला होता. फायनलमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन इम्रान खान याची सुंदर बॅटिंग, आणि वासिम अक्रमयाची फायरी बॉलींग यांच्या जीवावर पाकिस्तानचा २४९ चा स्कोर इंग्लंडला पार करता आला नाही. पाकिस्तानी बॉलींग समोर इंग्लंड आपल्या ५० ओव्हर्सही पूर्ण खेळू शकला नाही. पाकिस्तानकडून अंतिम सामन्यात पराभूत होऊन अंतिम सामन्यात पराभूत होण्याची आपली मालिका इंग्लंडने जिवंत ठेवली.

एलन डोनाल्ड विरुद्ध इंग्लंड

1999: यावेळी चौथ्यांदा संयुक्तपणे यजमान असणारा इंग्लंड खळीसामन्यांच्या पुढे जाऊ शकला नाही. साखळी सामन्यात इंग्लंडची गाठ साऊथ आफ्रिकेशी होती. इंग्लडनी सुरवातीला बॉलींग करत साऊथ आफ्रिकेला केवळ २२७ पर्यंत रोखलं. ५० ओव्हरमध्ये २२७ ही धावसंख्या म्हणजे अशक्य टोटल माव्हाती. पण साऊथ आफ्रिकेकडे असे बोलर्स होते, त्यांनी इंग्लडची वाताहत केली. एकट्या डोनल्डनी ८ ओव्हरमध्ये केवळ १७ रन्स दिल्या आणि ४ विकेट्स घेतल्या. आणि ह्या चार विकेट्समध्ये कोणी बोलर्स नव्हते, पूर्ण वेळ बॅट्समन होते, १९९९ च्या वर्ल्डकपचं स्वप्न डोनाल्डनी उध्वस्त केलं म्हणायला हरकत नाही. हे त्यांचे विश्वचषकतील सर्वात खराब प्रदर्शन होते.

एलन डोनाल्ड विरुद्ध इंग्लंड

2003:

यावेळी विश्वचषक दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे यांनी संयुक्तपणे आयोजित केला. नासिर हुसेनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे त्यांनी हरारे येथे होणारा झिम्बाब्वे विरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला. त्यामुळे झिम्बाब्वेला विजयी घोषित करण्यात आले. पुढच्या सामन्यात नेदरलँड विरुद्ध 6 विकेट व 160 चेंडू शिल्लक ठेवून दणदणीत विजय मिळवला. नामिबिया सोबत 55 धावांनी तर पाकिस्तान विरुद्ध 112 धावांनी विजय मिळवला. पुढचा सामना भारताविरुद्ध होता, या सामन्यात आशिष नेहरा ने 23 धावांत 6 बळी घेत इंग्लडचे कंबरडे मोडले, या सामन्यात फ्लिनटॉप वगळता एकही इंग्लिश फलंदाज भारतीय गोलंदाजी समोर उभा राहू शकला नाही. साखळी फेरीतून पुढच्या फेरीत जाण्यासाठी ऑस्ट्रेलिया सोबत विजय मिळवणे आवश्यक होऊन बसले होते. कमी धावांच्या झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 गडी व 2 चेंडू राखून विजय मिळवला. इंग्लंडचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.

2007:

वेस्ट इंडिज बेटसमूहावर झालेल्या या विश्वचषकात आपल्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा संघ न्यूझीलंडकडून पराभूत झाला. दुसऱ्या सामन्यात कॅनडाला पराभूत करून आपले आव्हान जिवंत ठेवले. केनियाला 7 विकेट व 60 चेंडू शिल्लक ठेवून पराभूत करून ‘सुपर एट’मध्ये प्रवेश केला. परंतु कमजोर संघांविरुद्ध जिंकून पुढे गेलेला संघ तयारीच्या संघांसमोर टिकाव धरू शकला नाही. उपांत्यपूर्व फेरी गाठण्याआधीच इंग्लंडचा संघ बाहेर पडला.

२०११ ची भारत विरुद्ध इंग्लंड टाय झालेला सामना

2011:

भारतात झालेल्या या विश्वचषकात इंग्लंडने आपल्या पहिल्या सामन्यात नेदरलँडला 6 विकेट्सने पराभूत केले. विश्वेविजेते पदाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या भरतासोबतचा सामना बरोबरीत/टाय सोडवला. अँड्र्यू ट्रॉसच्या 158 धावांच्या खेळीने सचिन तेंडुलकरची 120 धावांची खेळी व्यर्थ ठरवली. परंतु ट्रॉसला दुसऱ्या बाजूकडून साथ लाभली नाही. तिसऱ्या सामन्यात आयर्लंडने सर्वांना आश्चर्यचकित करून इंग्लंडचा 3 विकेट शिल्लक ठेवून पराभव केला. या सामन्यातील केविन ओब्रायनची फलंदाजी दिग्गजांना लाजवणारी होती. यातून धडा घेत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला कमी धावांच्या झालेल्या सामन्यात 6 धावांनी पराभूत केले. परंतु पुन्हा लिंबू-टिम्बु समजल्या जाणाऱ्या संघाकडून- बांग्लादेशकडून 2 विकेट्सने निसटता पराभव स्वीकारावा लागला. साखळीतील आपल्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा अठरा धावांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेसोबतच्या उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंडचा 10 विकेट्सनी दणदणीत पराभव केला. इंग्लंडने दिलेल्या 230 धावांचा पाठलाग करताना उपुल थरांगा आणि तिलकरत्ने दिलशान दोघांनीही नाबाद शकत साजरे करत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले.

पुन्हा एकदा लाजिरवाणा पराभव

2015:

हा विश्वचषक इंग्लडसाठी सर्वात वाईट विश्वचषक ठरला. साखळीतील सहा समन्यांपैकी चार सामने गमावून इंग्लंड विश्वचषकातून बाहेर पडला. शेवटच्या सामन्यात बांग्लादेशकडून पराभूत होऊन बाहेर पडल्यामुळे सार्वत्रिक टिकेला तोंड द्यावं लागल. इंग्लंड क्रिकेटसाठी हा काळ थोडा नाजूकच होता. त्यानंतर संघाची नव्याने बांधणी करण्यात आली. एकदिवसीय सामान्यांसाठी वेगळा संघ आणि कसोटी सामन्यांसाठी वेगळा संघ हे धोरण आखण्यात आले. तेंव्हापासून इंग्लंडने आक्रमक क्रिकेट वर भर दिला आहे. त्यांची ही रणनीती यशस्वी होताना दिसत आहे. 15 नंतर इंग्लडचं क्रिकेट बदललं आहे. मधल्या चार वर्षात ते यशस्वी होतं, असं दिसतं आहे. त्याची परिणीती १९ च्या घरच्या मैदानांवर बघायला मिळेल.

2019:

यावेळी पुन्हा एकदा घरच्या मैदानावर विश्वचषक होत असल्याने इंग्लडला विजेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. आक्रमक सलामीचे फलंदाज, परिस्थितीनुसार फलंदाजी करू शकणारी माध्यमफळी त्याच प्रमाणे 3-4 अष्टपैलू खेळाडू यांमुळे इंग्लंडचा संघ बाकी कोणत्याही संघापेक्षा कागदावर तरी तुल्यबळ दिसतो. पाकिस्तान सोबतची एकदिवसीय मालिका पाहता इंग्लंडचा संघ कमालीच्या तयारीत दिसतोय. जास्त धावांचे सामने पाहायला मिळतील याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो.