Colour Leaves the Peacock feather

Colour Leaves the Peacock feather
‘द लास्ट गर्ल – माय स्टोरी ऑफ कॅप्टीव्हिटी अँड माय फाईट अगेन्स्ट द इस्लमिक स्टेट’ या ‘नादिया मुराद’ या नोबेल पुरस्कार (शांतता) विजेत्या लेखिकेच्या पुस्तकाचे परिक्षण.

ईश्वरानं पृथ्वीची निर्मिती करण्यापूर्वी आपल्या ‘ईश्वरी’ अंशाचे सात भाग करून, आपण जे विश्व निर्माण करणार आहोत त्याच्या संगोपनाची जबाबदारी असणार्‍या सात देवदूतांची निर्मिती केली. अशी ‘सात देवदूतांची गोष्ट’ मध्यपूर्वेतील सर्व धर्मांमध्ये समान धागा आहे. इथून पुढे त्या गोष्टीची रूपं बदलत जातात. मग ईश्वरानं माती आणि अन्य महाभूतांपासून एक माणूस बनवला. त्याला ‘आदम’ (किंवा अ‍ॅडम) नाव दिलं. आदम हा पृथ्वीवरचा पहिला माणूस. ‘आदम’ हा पहिला माणूस याबद्दल या तिन्ही धर्मांमध्ये मतभेत नाहीत. मग देवाला लक्षात आलं की जर ‘वंश’ वाढवायचा असेल तर केवळ आदम (पुरुष) असून चालणार नाही, त्याला एक ‘इव्ह’ पाहिजे. मग त्यानी इव्हची निर्मिती केली. मग ‘इव्ह’नी देवची आज्ञा मोडून एका पवित्र वृक्षाचं फळ तोडून खाल्लं. ‘इव्ह’ला भौतिक गोष्टींची आसक्ती निर्माण झाली, त्यामुळे ती पवित्र राहिली नाही, म्हणून देव रागावला आणि त्यानी आदम आणि इव्हला अनंतकाळासाठी ‘पृथ्वी’वर पाठवून दिलं. इथून पुढे या ‘दोघांच्या’तून पुढचा मानववंश निर्माण झाला, अशी ही गोष्ट पुढे सरकते. या गोष्टीची वेगवेगळी रूपं आहेत, त्यापैकी आपल्याला आज ‘याझिदी’ परंपरेच्या गोष्टीमध्ये रस आहे. देवानी आपल्या शरीराचे केलेला 7 भाग, म्हणजे सात देवदूत, त्यांच्यातला सर्वात पवित्र देवदूत होता, ‘तवासू मलेक’. कथा असं सांगते की ‘तवासू मलेक’ हा मोराच्या रूपातील देवदूत होता. आदम आणि इव्हच्याही आधी देवानी विश्वाची निर्मिती केली, पण त्यानी त्यात ‘रंग’ भरले नव्हते. याझिदी गोष्टीचा अर्थ असा की, देवानी निर्मिती केली पण त्यात चैतन्य ओतलं नाही. ते काम त्यानी देवदुतांवर सोपवलं. मोराच्या रूपातील देवदूत पृथ्वीवर आला आणि त्यानी आपल्या रंगबिरंगी मोरपिसातून रंग उचलले आणि हे विश्वाचं चित्र रंगवलं.

आजही याझिदी घरांमध्ये या ‘तवासू मलेक’च्या रंगबिरंगी ब्राँझच्या पुतळ्याची पूजा करतात. ज्यू, ख्रिश्चन, इस्लामी परंपरेपेक्षा विश्वाच्या निर्मितीबद्दलची ही गोष्ट वेगळी आहे. ज्यू, ख्रिश्चन, इस्लामी परंपरेत मानव वंशाची निर्मिती आदम आणि इव्ह ‘तून’ झालेली आहे, असं मानतात. पण याझिदी परंपरा वेगळं सांगते. देवानं इव्हची निर्मिती करण्यापूर्वी ‘तवासू मलेक’ या देवदुतानं देवाच्या आज्ञेनुसार ‘आदम’चं शरीर उघडून एक बरगडी काढली, आणि त्यातून मानवाची एक पिढी निर्माण केली. याझिदी असं मानतात की, मानव हा आदमचा सुपुत्र आहे, आदम आणि इव्हचा नाही. अल्लाह किंवा एकमात्र देवाशिवाय त्याच्या देवदूताची पूजा हा एकेश्वरवादी परंपरांनुसार ईश्वरद्रोहच आहे. ही गोष्ट वापरून ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे तिन्ही धर्म याझिदी लोकांना ‘काफिर’, नास्तिक ठरवतात. ते बिगर याझिदी परंपरा सांगतात की, आदम आणि इव्ह समोर नतमस्तक होण्याच्या ईश्वराची आज्ञा देवदूतांनी मानली नाही, हा अल्लाहचा अपमान आहे. म्हणून याझिदी जगण्याच्या लायकीचे नाहीत.

जीवनाबद्दल सामान्य आकांक्षा असणारे, कदाचित रोजच्या जेवणाची भ्रांत असणारे, आजूबाजूच्या राजकारणात रस नसलेले गरीब याझिदी या एका गोष्टीमुळे कायम दहशतीच्या छायेत जगत आहेत. अशाच अनेकांमधली एक ‘इतिहासाचा’ अभ्यास करायची इच्छा बाळगणारी, मोठं होऊन स्वतःचं ब्युटी पार्लर सुरु करण्याचं स्वप्न पाहणारी ‘नादिया’. घरात आई-बाबा, दहा-आकार भावंड. असं एकत्र कुटुंब. वडिलांनी नादियाच्या आईला सोडून दुसरं लग्न केलेलं. बाबांच्या दुसर्‍या घरी जाण्यानं घरात आलेलं रिकामेपण आणि अजून गरिबी, अशा रोजच्या समस्यांशी झगडा सुरूच आहे. अशामध्ये एकाएकी असा हल्ला होतो, जो यापूर्वी कधीही झाला नव्हता. याझिदी धर्मावर इतिहासकाळापासून 73 वेळा मोठे हल्ले झाले आहेत. ओट्टोमन काळात हे हल्ले परमोच्च टोकाला पोहोचले, तरीही याझिदी त्यातून वाचले, शिल्लक राहिले, त्यांनी पुन्हा जीवन सुरु केलं. पण आता झालेला हल्ला हा केवळ माणसं मारणारा नव्हता. माणसं मारून संपवणं, हे त्या हल्ल्याचं उद्दीष्टच नव्हतं.

असे हल्ले झेलण्याची वेळ आलेली, शाररीक, मानसिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय हल्ले सहन केलेली ‘नादिया’ तिच्या ‘द लास्ट गर्ल’ या पुस्तकातून अशी अपेक्षा व्यक्त करते आहे की, हे सगळं अनुभवलेली ती ‘लास्ट गर्ल’ असावी. यापुढे केवळ याझिदीच नव्हे, तर कोणाही मुलीवर या प्रकारचे आघात अनुभवण्याची वेळ येऊ नये.

या पुस्तकाचे 3 भाग आहेत. सामान्यतः ते तीन भाग असे करता येतील की, ‘इस्लामिक स्टेट’ पूर्व काळ. यामध्ये ‘नादिया’ तिच्या ‘कोचो’ या गावातल्या आठवणी सांगते, याझिदी परंपरांबद्दल बोलते, तिच्या कुटुंबाची आपल्याला ओळख करून देते. तिचं तिच्या भावंडांवरचं प्रेम, आईवरचं प्रेम. तिच्या आकांक्षा, स्वप्न. असं सगळं ती पहिल्या भागात सांगते. याझिदी धर्माची सुद्ध आपल्याला तोंडओळख या भागात होते. याझिदी समाजावर इराक-इराण युद्ध, सद्दाम हुसैनचे अल्पसंख्यांक समाजावरचे अत्याचार. सद्दाम हुसैनची राजवट अमेरीकेनी उलथवून टाकली, त्यानंतर आलेलं स्थैर्य, हे पहिल्या भागात आहे.

या पहिल्या भागात जगातल्या कोणत्याही मध्यमवर्गीय मुलाला/मुलीला ‘आपले’ वाटावेत असे प्रसंग या भागात आहेत. शाळेतून घरी आल्यावर घराची आर्थिक बाजू सांभाळण्याची जबाबदारी ही फक्त कुटुंब प्रमुखाची नाही. ती सगळ्यांची आहे, या भावनेनं आईसकट सगळी मुलं, भावंड ही कामाला जातात. कधी ते कांद्याच्या शेतात, लावणी, पेरणी, काढणी ही कामं करतील. कधी लहान मुलांना सांभाळण्याचं (बेबीसिटींग) काम असेल. वडिलांबरोबर शहराच्या ठिकाणी घरातलं समान आणायला जायचं असेल, उरलेल्या वेळेत आपला अभ्यास, आपल्या स्वप्नांबद्दल भावंडांकडे बोलणं, बहिणीबरोबर ‘ब्युटी पार्लर’सुरू करण्याबद्दल बोलणं, त्याची तयारी करणं. दूर कुठेतरी सद्दम हुसैन नावाचा आपला राज्यप्रमुख आहे, तो आपल्या समाजाला त्रास होईल असे निर्णय घेतो आहे, याची थोडीफार जाणीव सुद्धा त्या लहान वयात त्यांना असते, पण जोपर्यंत प्रत्यक्ष जीवाला धोका निर्माण होत नाही तोपर्यंत ते असे हल्ले सहन करण्याची ताकद बाळगून आहेत. 2007 मध्ये जगातला दुसरा मोठा दहशतवादी हल्ला होतो, त्यानं हादरून गेलेलं नादियाच कुटुंब. सद्दाम हुसैनला अमेरिकी सैन्यानी पडकून फासावर लटकवलं. त्यानंतर याझिदींची रक्षणाची जबाबदारी अमेरिकी सैन्यानी काही काळ घेतलेली. इराकच्या याझिदी बहुल भागात त्यामुळे आलेलं स्थैर्य याबद्दल नादिया बोलते. नियमित शाळा सुरु झाल्या, अद्ययावत इस्पितळ सुरु झाली, दहशतवादी हल्ल्यांची संख्या कमी झाली. या सगळ्यामुळे याझिदी घरांमध्ये आर्थिक स्थैर्य आलं.

दूर कुठेतरा सात नद्या, सात समुद्र, सात पर्वत यांच्यापलिकडे एक सैतान आहे. पण सैतानाच्या छायेतही जीवन आनंदानं जगता येतं, हे नादिया आपल्याला पहिल्या भागात समजावून सांगते.

‘नादिया’चा जन्म 1993 सालचा. सद्दाम हुसैननं कुवेतवर हल्ला केला. त्यातून पाहिलं गल्फ युद्ध झालं. ते झाल्यानंतर दोन वर्षांनी अत्यंत अस्वस्थ काळात नादियाचा जन्म झाला. तिच्या जन्माची गोष्ट नादिया सांगते. तिच्या आई वडिलांची ती शेवटची मुलगी. आपत्य अजिबात होऊ न देण्याचा पूर्ण प्रयत्न करून सुद्धा तो फसला आणि नादियाचा जन्म झाला. हे आईनीच मुलीला सांगावं इतका मोकळेपणा याझिदी घरात असतो, असंही नादिया सांगते. इतकच नाही तर त्याच्यावर नंतर विनोदही होतात. ती सांगते, तेव्हा आईनी माझा जन्म होऊ नये म्हणून प्रयत्न केले, पण आता आम्ही दोन्ही एकमेकींशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही. नादियाचं इतर कोणापेक्षाही जास्त आईवर प्रेम होतं. आईचंही नादिया ही ‘Unwanted child’ असूनही नादियावर खूप प्रेम होतं. नादियाची आई शिक्षण फारसं झालेलं नसलं तरी व्यवहारचातुर्य असलेली होती. नादियाच्या बाबांनी दुसरं लग्न केल्यानंतरही बाबांबद्दल नादिया कडवटपणा ठेवून बोलत नाही, उलट ती आईला समजावून सांगते की, तू सुद्धा कसं दुसरं लग्न करणं गरजेच आहे.

महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये सुद्धा शक्यतो असत नाही इतका मोकळेपणा एका मध्यपूर्वेतील घरात असावा, याचं मला हे पुस्तक वाचताना खूप आश्चर्य वाटत होतं. बाबांनी दुसरं लग्न केल्यानंतरही आयुष्य थांबून गेलं नाही, ते सुरु राहिलं. लहानमोठ्या प्रमाणात याझीदिंवर हल्लेही सुरूच राहिले.

2014 च्या इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यांनंतर नादियाचं राजकारणाचं भान निर्माण झालं आहे, असं मला वाचताना जाणवलं. 2014 पूर्वी कुर्द वंश, त्याचं इराकच्या राजकारणातलं स्थान, याझिदी धर्म, त्याचं जगाच्या इतिहासात काय स्थान आहे, या सगळ्याची अल्प जाणीव नादियाला होती, असं लक्षात येतं. नादियाच्या ‘कोचो’ गावापासून जवळ ‘इस्लामिक स्टेट’ पोहोचलं आहे, इथे या पुस्तकाचा पहिला भाग संपतो.

2014 मध्ये आपल्यावर अनन्वित अत्याचार झाले, त्यानंतर आपल्याला त्यातून सुटून जाता आलं. नादिया आणि तिच्या बरोबर इस्लामिक स्टेटच्या ताब्यात असणार्‍या साडेतीन हजार मुलींनी इस्लामिक स्टेटचा कारभार इतका जवळून पहिला, तरी नादियाचं इस्लामिक स्टेटबद्दलचं आकलन इतकं बाळबोध कसं राहिलं, याच आश्चर्य वाटतं.

नादियाचं मत असं आहे की, इस्लामिक स्टेटकडून आमच्यावर जे अत्याचार होत आहेत किंवा झाले, ते इस्लामचा आक्रमक, चुकीचा अन्वयार्थ लावल्यामुळं झाले. नादिया चं इस्लामचं आकलन अगदी भोळ्या भाबड्या हिंदूसारखंच राहिलं आहे. इतक्या जवळून अनुभव घेऊनही नादियाला इस्लाम कळला नाही, असं म्हणावं लागतं

कोचोच्या शेजारच्या गावात इस्लामिक स्टेटचे काळे झेंडे पोहोचले आहेत. तिथले याझिदी गाव सोडून निघून गेले सिंजर पर्वतावर निघून गेले आहेत, याच्या बातम्या कोचो गावात आणि नादियापर्यंत पोहोचलेल्या असतात. पण आपलं गाव, घर, कुटुंब सोडून जाण्याची कल्पना नादिया सकट तिच्या कुटुंबातला कोणीही करू शकत नाही. आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोचोमधल्या सगळ्यांना अशी अशा असते की कुर्दी सैनिक आपल्या मदतीला येतील. पूर्वी सद्दामच्या अत्याचारातून आपल्याला अमेरिकेने वाचवलं होतं, आताही कदाचित अमेरिकी विमानं येतील आणि हा हल्ला परतवून लावतील. शेजारच्या गावातले जे याझिदी घर सोडून यशस्वीपणे पर्वतावर जाऊ शकले त्यांच्या बातम्या नादियाला कळत होत्या, पण जे इस्लामिक स्टेटच्या तावडीत सापडले त्यांच्याबद्दल काहीही बातम्या ‘कोचो’मध्ये पोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे येणारं वादळ आपल्याबरोबर काय घेऊन येतं आहे, याची कोणालाही काहीही कल्पना नव्हती. एवढं कळत होतं की, हे आपले मित्र नाहीत. जर ते आपल्याजवळ आले तर आपल्याला त्रासच देणार आहेत. म्हणून एका दहशतीच्या छायेत पण कोचोमधले रोजचे व्यवहार सुरु होते. एक दिवस रात्री नादिया आपल्या भावंडांबरोबर घराच्या छतावर झोपलेली असताना रात्री गाड्यांचे आवाज येतात. कोणालाही दिसणार नाही, असं तिचा भाऊ उठून पाहतो की या गाड्या इतक्या रात्री कुठे चालल्या? त्याला तेव्हाच लक्षात येतं की या गाड्या ‘कोचो’मधल्या नाहीत. या बाहेरच्या आहेत. पण त्या गाड्या आल्या आणि काहीच झालं नाही. ती रात्र गेली. दुसर्‍या दिवशी रोजचे व्यवहार रोजच्यासारखेच सुरु राहिले. नादिया शाळेतून घरी आली. घरातली कामं उरकून भावंडांबरोबर शेजारच्या शेतावर कामाला गेली. त्या संध्याकाळच्या शांत वातावरणाला छेद देणारे ते गाड्यांचे आवाज पुन्हा एकदा ‘कोचो’मध्ये घुमले. पण कालचा अनुभव होता की, गाड्या येतात आणि काहीच होत नाही. रोजचे व्यवहार तसेच सुरु राहिले. पण दहशतीच्या छायेत. तिसर्‍या दिवशी सकाळी – तो दिवस होता 3 ऑगस्ट 2014 चा – इस्लामिक स्टेटच्या त्या गड्यांतून दहशतवादी ‘कोचो’मध्ये आले. सगळ्या घरातून त्यांनी निरोप पाठवला की सर्व लोकांनी शहराच्या मध्यवर्ती शाळेत अमुक अमुक वेळेला सगळ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे.

आमच्या समोर काय वाढून ठेवलं आहे, याची तेव्हा कोणीही कल्पना केली नव्हती, असं नादिया लिहिते. तिथे पहिला भाग संपतो.

दुसरा भाग नादियाचे इस्लामिक स्टेटच्या ताब्यातील गुलामगिरीचे दिवस याबद्दल आहे. पुस्तकातला हा भाग सर्वात हृदयद्रावक आहे. वैयक्तिक माझं सांगायचं तर, हे सगळे अत्याचार मी आधी वाचलेले होते. पण तेव्हा ते ‘इस्लामिक स्टेटनी याझीदिंवर केलेले अत्याचार’ अशा स्वरुपात वाचले होते. तेव्हाचा अभ्यास ‘मॅक्रो’ पातळीवरचा होता. नादियाचं पुस्तक वाचताना ते सगळे अनुभव पुन्हा एकदा वैयक्तिक अनुभव म्हणून वाचायचे, या जाणीवेनंच मला अस्वस्थ होत होतं. ते अनुभव भयानक आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे धक्के आपल्याला बसतात. त्या मधला सगळ्यात मोठा धक्का म्हणजे आज एकविसाव्या शतकात एखाद्या समाजाचं मनोधारेर्य खच्ची करण्याच्या हेतूनी ‘सेक्स’ हे हत्यार म्हणून वापरलं जाऊ शकतं. जे पुरुष याझिदी इस्लाम स्वीकारायला तयार होतील, ते इस्लाम स्वीकारून जिवंत राहतील. जे इस्लाम स्वीकारणार नाहीत त्यांना मृत्यू हीच शिक्षा. पण याझिदी स्त्रियांसाठी मात्र दोन वेगळे पर्याय. एक – इस्लाम स्वीकारून जिवंत राहणे किंवा इस्लाम न स्वीकारता ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून जिवंतच राहणे. नादियासारखं ज्या मुलींचं आपल्या धर्मावर, परंपरेवर प्रेम होतं त्यांना ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणजे काय असेल याचा अंदाजही नसेल. दुसरा धक्का असा बसतो की, कोणत्याही धर्माचा असला म्हणून काय झालं, शेवटी तो माणूस आहे. एखादा माणूस दुसर्‍या माणसाशी असा वागूच कसा शकतो? म्हणजे समोरच्याच्या वेदानांमध्येच, त्रासामध्येच, एखाद्याला आनंद वाटू शकतो, याचा धक्का आपल्याला अनपेक्षित असतो. तिसरा धक्का असा बसतो की, सेक्स स्लेव्हरीच्या या व्यवस्थेमध्ये नादियाला कोणतेही धसमुसळेपणा दिसत नाही. सेक्स स्लेव्हरीची व्यवस्थित यंत्रणा त्यांनी उभी केलेली आहे. त्याची प्रचंड नियोजनबद्ध अंमलबजावणी नादियाला दिसली. या धक्क्यांतून सावरणं हेच वाचकासाठी आव्हान होऊन बसतं.

याझीदिंवर काय प्रकारचे अत्याचार झाले ते वेगळ्या लेखात आपण पाहणार आहोतच. (त्या लेखात मात्र ते अत्याचार कलेक्टीव्ह असतील, पुस्तकात नादियानी वैयक्तिक तिच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल लिहिलं आहे.)

तावडीत सापडलेला गुलाम ही त्या मालकाची संपत्ती असतो. त्या संपत्तीची विल्हेवाट कशी लावायची याचा पूर्ण अधिकार त्या मालकाला असतो. नादिया त्याच्या मालकाच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करते. आणि पळून जाताना सापडते. त्यानंतर आधी मालक तिच्यावर त्याच्या 4 मित्रांसह (दहशतवाद्यांसह) सामूहिक बलात्कार करतो. पळून जाण्याची शिक्षा म्हणून. सामूहिक बलात्कारानंतर नादिया पवित्र राहिली नाही, म्हणून तो तिला कमी पैशात विकून टाकतो. अशा दोन वेळा खरेदी विक्री झाल्यानंतरचा नादियाचा तिसरा मालक मूर्ख होता, असं नादिया सांगते. नादियाला तो ताकीद देतो की, ‘मी आता नमाज अदा करायला जातो आहे, पळून जायचा प्रयत्न केलास तर पुन्हा तीच शिक्षा!’ असं म्हणून तो त्याच्या घरातले सगळे नमाज अदा करायला जातात. त्या एकटेपणाचा फायदा घेऊन नादिया निसटते.

पळून जाण्याचा प्रयत्न करणं किती कठीण होतं, याबद्दल नादिया लिहिते. गावातले जे सुन्नी मुसलमान याझीदिंचे मित्र होते, सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र खांद्याला खांदा लावून एकत्र काम केलेलं, एकत्र सण साजरे केलेले असे सुन्नी मुसलमान इस्लामिक स्टेटला मदत करत होते. नादियालाही आणि आपल्यालाही बसलेला सर्वात मोठा धक्का हा होता की, नादियाला शाळेत ‘इतिहास’ शिकवणारा तिचा शिक्षक याझिदी मुलींच्या व्यापारातला एक प्रमुख माणूस होता. नादियाचा पहिला खरेदी व्यवहार तिच्या शाळेतल्या इतिहासाच्या शिक्षकाच्या हाताखाली घडला होता. त्यामुळे पळून जायचा प्रयत्न केला तरी कोणाकडे मदत मागायची? तिची बहिण कॅथरीन हिनं 6 वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण 6 वेळा ज्यांनी मदत करतो म्हणून सांगितलं त्यांनीच तिचा विश्वासघात केला होता. पण तरीही नादिया एक दिवस मालक नमाजला गेलेला असताना हे धाडस केलं. गेलेलं 3-4 महिने व्यवस्थित जेवण न केलेली नादिया, अनेक वेळा बलात्कार सहन केलेली नादिया त्या दिवशी संध्याकाळी निसटून जाण्यात यशस्वी ठरते. रिकाम्या पोटी, दहशतीच्या छायेत 3 तास शहरापासून लांब चालत जाते. अर्धपोटी अवस्थेत चक्कर येऊनही पडते. पण भीती आणि सुटून जाण्याची इच्छा तिला त्यातही बळ देते. कोणाकडे मदत मागायची हा निर्णय म्हणजे जुगार आहे, हे माहिती असूनही ती ते धैर्य दाखवते. शहरापासून दूर एका पडक्या पण ‘जिवंत’ घरावर तिची नजर जाते. निर्णय जीवावर बेतू शकतो, हे माहिती असूनही ती तो घेते. याझिदींसारखाच अल्पसंख्य असलेल्या एका वंशाचं ते घर असतं. पण तो वंश इस्लामला जवळचा असल्यामुळे ते जिवंत असतात.

नादियाचा तो निर्णय जुगार ठरत नाही. ते कुटुंबही इस्लामिक स्टेटला घाबरून दहशतीच्या छायेतच जगत असतं. ते नादियाला मदत करण्याची तयारी दाखवतात. त्या घरातील कुटुंब प्रमुख नादियाचा नवरा बनतो. आपली बायको नादियाला कुर्दीस्थानमध्ये तिच्या माहेरी सोडायला जातो आहे, असा बनाव करून इस्लामिक स्टेटच्या बाहेर जाण्याची मोहीम आखतो. इथे नादियाच्या पुस्तकाचा तिसरा भाग संपतो.

‘नॉट विदआउट माय डॉटर’ हे आपल्याकडे खूप प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याच्या आणि नादियाच्या सुटकेच्या गोष्टीत कमालीच साम्य आहे. फक्त इथे नादियाला मदत करणारा एक माणूस असतो. ती तिच्यासाठी आपला जीव आपल्या कुटुंबाचं अस्तित्व पणाला लावतो. पण सगळ्या धोक्याच्या शक्यता टाळून तो तिला इराकच्या सिमेपार घेऊन जातो. बनावट ओळखपत्र बनवून घेतो. प्रत्येक क्षणाला पकडले जाण्याची भीती, पकडल्यावर अपेक्षित आणि अवघड प्रश्नांची सरबत्ती, त्यात शंकास्पद उत्तरं तोंडून बाहेर पडण्याची शक्यता, त्यानंतर पुन्हा एकदा इस्लामिक स्टेटच्या ताब्यात आणि ती जीवघेणी शिक्षा! या सगळ्याची उजळणी नादिया आणि नसीर (तिचा बनावट नवरा) यांना प्रत्येक तपासणी नाक्यावर होत असते.

नादियाच्या लिखाणातून तिची संवेदनशील मानसिकता लक्षात येते. धोकादायक क्षेत्राच्या बाहेर सुखरूप पोहोचल्यानंतरही पकडले जाण्याची भीती नादियाच्या मनातून जात नाही. आपल्याला ‘नादिया मुराद’ माहिती नसली तरी चालेल, याझिदी नावाचा एक धर्म जगाच्या पाठीवर आहे. इस्लामी आक्रमणामुळे तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, याचीही आपल्याला जाणीव नसो, त्यानी काहीही बिघडत नाही. पण एका मुलीची गोष्ट, जशी ‘नॉट विदआउट माय डॉटर’ किंवा ‘डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक’ किंवा ‘परवाना – शौझिया’ची गोष्ट यांच्यात आणि नादियाच्या गोष्टीत हा फरक आहे की जी माणसं आपली आहेत असा पूर्वी विश्वास वाटत होता, त्या लोकांनी केवळ विश्वासघात केला असं नव्हे, तर शत्रूला सामील झाले. आपल्या दुःखात त्यांना आनंद वाटतो, हे अचानक लक्षात यायला लागलं. नॉट विदआउट माय डॉटर’मध्ये सुटू जाणारी मुलगी त्या (अरबी) वातावरणात मुळात नवीन असते. तिला सुटून जाण्याची इच्छा होणं स्वाभाविक होतं, नादिया पूर्णतः अरबी वातावरणात वाढलेली, तो प्रदेश तिचा होता. तिथे ती शिकत होती, काम करत होती, स्वप्न बघत होती. इराकमधला कोचो हा प्रांत तिचा होता. तिच्या प्रांतावर तिच्याच प्रांतातल्या लोकांनी हल्ला केला. आणि अत्याचार केले. याझिदी लोकांना तो प्रांत झोडून जावं लागलं.

ज्या ‘तवासू मलेक’नी आपल्या पिसाऱ्यातील रंग वापरून ‘याझिदी’ चित्र रंगवलं होतं, ते रंग आता उडून गेले आहेत.