… हे असे घडले – चेर्नोबिल

... हे असे घडले - चेर्नोबिल

26 एप्रिल 1986. तत्कालीन सोव्हियत युनियनमधलं आणि आता युक्रेनमध्ये येणारं प्रिपयात हे शहर. शहरापासून काही अंतरावर असलेल्या चेर्नोबील आण्विक प्रकल्पात या दिवशी मध्यरात्री काही चाचण्या केल्या जात असताना स्फोट होतो. आण्विक स्फोट. जगात त्यापूर्वी कधीही, कुठेही झाला नाही असा स्फोट. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, तो होण्यामागे काही तांत्रिक बिघाड कारणीभूत होता की मानवी चुकांमुळे तो झाला, स्फोटामुळे नेमके काय आणि किती नुकसान होईल, अधिक नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, असे अनेक प्रश्न तेथील राज्यकर्ते आणि शास्त्रज्ञ यांच्यासमोर उभे आहेत. एका बाजूला अमेरिकेसहित जगातील इतर देशांना या स्फोटाचा सुगावा लागू न देण्यासाठी राज्यकर्त्यांची सुरू असलेली धडपड, तर दुसर्‍या बाजूला अनेक तर्कवितर्क लावून, सर्व संभाव्य घटनांचा अंदाज घेत, आलेलं संकट आटोक्यात आणण्यासाठी तेथील शास्त्रज्ञाचे सुरु असलेले प्रयत्न, यावर उभी आहे ‘चेर्नोबील’ ही एकूण पाच भागांची लघु मालिका. यावर्षीच्या मे महिन्यात अमेरिका आणि ब्रिटनमध्ये एकाच वेळी एचबीओ या चॅनेलने ती प्रदर्शित केली.

मालिका सुरू होते एका प्रतिष्ठित अणुशास्त्रज्ञाच्या आत्महत्येनं. चेर्नोबीलची दुर्घटना ज्या दिवशी घडली त्याच्या बरोबर दोन वर्षांनंतर. वेलेरी लेगासोव्ह असं त्या शास्त्रज्ञाचं नाव.

26 एप्रिल 1986 च्या मध्यरात्री ठराविक चाचणी करण्यासाठी, परिस्थिती अनुकूल नसतानाही प्रकल्प प्रमुख चाचणीचे आदेश देतो. त्यावेळी ड्युटीवर असणारे इतर कर्मचारी त्याचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सोव्हियत युनियनच्या एकूणच शासनव्यवस्थेत अंगभूत असलेली ‘स्टेट’विषयीची दहशत, वरिष्ठांनी दिलेले आदेश पाळण्यास कर्मचार्‍यांना भाग पाडते. त्यातून पुढे अणुस्फोट होतो. आण्विक प्रकल्पाचा ‘कोअर’ म्हणजे सगळ्यात केंद्रभागी असणारा भाग, जिथं आण्विक इंधन साठवून ठेवलेलं असतं, तो फुटला आहे की नाही यावरून पुढे संभ्रम-मतभेद सुरू होतात. मॉस्कोमधल्या सेंट्रल कमिटीला घडलेल्या घटनेचा सुगावा लागतो. मीटिंग बोलावली जाते. अधिकार्‍यांकडून गोर्बाचेव्ह यांच्यासमोर हे प्रकरण दाबले जाण्याचा प्रयत्न केला जात असताना अणु तंत्रज्ञानातला जाणकार म्हणून ज्याला आमंत्रण असते, तो वेलेरी लेगासोव्ह बंड करून उभा राहतो. पुढे इतर सर्व आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी लेगासोव्हकडे सोपवली जाते.

बोरिस शेरबिना नावाचे सेंट्रल कमिटीमधले उच्चपदस्थ अधिकारी आणि लेगासोव्ह चेर्नोबीलला येतात. गोर्बाचेव्ह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत लायकीपेक्षा अधिक बोलल्याने बोरिसच्या मनात लेगासोव्हविषयी राग आहे. मात्र घटनास्थळी घडणार्‍या घटना आणि त्यामागची सगळी शास्त्रीय कारणं लेगासोव्हकडून ऐकल्यानंतर दोघेही एकमेकांस अनुकूल होतात.

या मालिकेचं एक भलं मोठं यश म्हणजे – अणु तंत्रज्ञान कसं काम करतं, इथपासून ते आण्विक स्फोट नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, सगळं अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजावलेलं आहे. त्यासाठी लेखक-दिग्दर्शकाचं विशेष कौतुक करायला हवं. काही ठिकाणी आलेले गंभीर विनोद आपल्या चेहर्‍यावर तितकंच गंभीर हसू निर्माण करतात.

उलाना खोम्यूक नावाच्या स्त्रीचं पात्रही या मालिकेत केंद्रस्थानी आहे. चेर्नोबीलची दुर्घटना नेमक्या कोणत्या कारणांमुळे घडली याचा शोध ती घेत आहे. संपूर्ण सोव्हियत युनियनमध्ये असलेल्या इतर आण्विक प्रकल्पांमध्ये चेर्नोबीलसारखंच तंत्रज्ञान वापरलं असल्यामुळं भविष्यात सर्व अणुप्रकल्पांना धोका आहे, असं तिचं मत. हा शोध घेत असताना तिला कोणत्या अडचणी येतात, ती आपल्या शोधकार्यात यशस्वी होते का, हे पाहण्यासाठी मालिकाच बघायला हवी.

संपूर्ण पाच भागांत, दर काही मिनिटांनी येणारे संवाद, प्रसंग वेड लावणारे आहेत. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना प्रसंगाचं गांभीर्य माहित नसणं, प्रिपयातमधली जनता या दुर्घटनेकडं मनोरंजन म्हणून पाहत असणं, उध्वस्त झालेल्या भागात वाळू आणि बोरॉन टाकलं जाणं, स्वतःचा जीव अर्पण करून पुढील धोके टाळण्यासाठी कर्मचार्‍यांनी पुढं येणं, दुर्घटनेत मरण पावलेल्या मृतदेहांची ‘विल्हेवाट’ लावली जाणं, प्रिपयातमधल्या जनतेला अणु प्रकल्पापासून दूर नेलं जाणं, मदतीसाठी आलेल्या खाण कामगारांच्या मनात राज्यकर्त्यांबाबतची खदखद, स्फोटाचं गांभीर्य शेजारील देशांना कळू न देण्याचे ‘स्टेट’चे प्रयत्न इ.

एखाद्या सत्यकथेवर आधारित असलेल्या मालिकेत अनेकदा मनोरंजनाचा भाग म्हणून काही न घडलेलेही प्रसंग दाखवले जात असतात. किंवा घडलेल्या प्रसंगातील बारकावे दाखवत असताना लेखक-दिग्दर्शकाला त्यात आपल्या बुद्धीची भर घालावी लागते. या सगळ्यातून मालिकेत खोटेपणा येण्याची शक्यता असते. ‘चेर्नोबील’मध्येही काही प्रसंग किंवा दृश्ये तशी जाणवतात. मात्र हेही आवर्जून सांगावे लागेल की एकुणात ही मालिकाच सत्याच्या अधिक जवळ जाणारी आहे. लेखक क्रेग मॅझिन यांनी साकारलेल्या अनेक घटनांना अभ्यासाची, संशोधनाची जोड आहे. या मालिकेचे चित्रीकरणही चेर्नोबीलसारख्याच दिसणार्‍या एका बंद आण्विक प्रकल्पामध्ये पार पडले आहे. या मालिकेत मुद्दामच कोणताही अमेरिकन अभिनेता किंवा अभिनेत्री घेण्यात आलेली नाही. मालिकेत बोलल्या गेलेल्या इंग्रजी संवादांना रशियन उच्चार जोडण्याचा प्रयत्न क्रेग मॅझिन यांनी कटाक्षाने टाळला आहे. ही घटना सोव्हियत युनियनमध्ये घडत आहे हे दाखवण्याऐवजी, घटना घडत असताना तिथं उपस्थित असलेल्यांच्या मनात असलेले भाव टिपणे आपल्या जास्त महत्वाचे वाटले, असे क्रेग मॅझिन म्हणतात.

चेर्नोबील दुर्घटना घडून गेली. आजही तो प्रकल्प आणि प्रिपयात हे शहर निर्मनुष्य आहे. आण्विक रेडिएशन नियंत्रणात ठेवण्यासाठी आजही युक्रेन सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. 2006 साली गोर्बाचेव्ह यांनी म्हटलंय – 1991 मध्ये सोव्हियत युनियन फुटण्यामागे चेर्नोबीलची दुर्घटनाही कारणीभूत होती.

मालिका बघून झाल्यावर आपल्या देशात घडलेली भोपाळ वायू दुर्घटना आठवत राहते. 2011 चा त्सुनामी आणि त्यावेळीच घडलेली फुकुशिमा आण्विक दुर्घटनाही आठवते. आज आपला देश आण्विक प्रकल्पातून ऊर्जानिर्मितीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून उभा आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘चेर्नोबील’ आपल्याला सावध करते; सोबतच येणार्‍या पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांची आठवणही करून देते.

© पंकज येलपले

pankajyelapale@gmail.com

(लेखक ‘चाणक्य मंडळ परिवार स्पर्धा परिक्षा तयारी’ मासिकाचे सहायक संपादक आहेत)