इतिहास, दूरचित्रवाणी आणि भारतीय राष्ट्रवाद – ॥ चाणक्य ॥ (भाग – १ )

इतिहास, दूरचित्रवाणी आणि भारतीय राष्ट्रवाद - ॥ चाणक्य ॥

1991-92मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेली 48 भागांची चाणक्य मालिका म्हणजे 1980च्या दशकापासून धार्मिक व पौराणिक कथांमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक घटनांचे किंवा पुरातन कालखंडातील इतिहासाचे नाट्यचित्रण करण्याचा भारतीय दूरदर्शनच्या पहिल्या गंभीर प्रयत्नापैकी एक. प्रसारणांवर राज्याची पूर्ण मक्तेदारी असलेल्या काळात ही मालिका प्रसारित झाली. तीत ज्याप्रमाणे ब्रिटिशांविरूद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातून आधुनिक भारतीय राष्ट्र-राज्याची उभारणी झाली त्याप्रमाणेच मॅसेडोनियाच्या अलेक्झांडरच्या हल्ल्यामुळे विस्कळीत झालेल्या तत्कालीन राजकीय अस्थिरतेतून चंद्रगुप्ताकरवी अखंड भारतावर मौर्य साम्राज्य निर्माण करण्याचे श्रेय चाणक्य यांना दिले आहे. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून भारताने आपली ‘भारतीय ओळख’ निर्माण करण्यासाठी कोणत्या शैलीचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे, हे समजून घेण्यासाठी ‘चाणक्य’ मालिका अतिशय उपयोगी साधन आहे. अखंड भारताच्या कल्पनेविषयी सतत चर्चेचे, वादाचे प्रसंग उद्भवत असतानाच्या काळात ही टेलीव्हिजन मालिका व्यापक कॅनव्हासमध्ये स्थित असणे आवश्यक होते. रामजन्मभूमी आंदोलन भारतात पेटलेले असतांना, उजव्या हिंदुत्ववादाचे समर्थन करणारे वर्णन काही भागांत केले गेले असल्याने चाणक्य मालिकेवर बहुतेक समकालीन लेखांमध्ये टीकेची झोड उठली होती. माझ्या तर्कानुसार ही टीका संपूर्णपणे वैध आहे. कारण चाणक्य हा स्वातंत्र्यसैनिक आणि त्याची पहिल्या भारतीय राष्ट्राचा निर्माता म्हणून केलेली व्याख्या 20व्या शतकाच्या उत्तरार्धात उद्भवलेल्या भारतीय राष्ट्रवादाच्या इतिहासात ठामपणे केली गेली आहे.

20 व्या शतकात उदयास आलेली भारतीय राष्ट्रवादी चळवळ ऐतिहासिक स्त्रोतांच्या राष्ट्रवादी पुनर्व्याख्येवरच आधारित होती आणि हाच ‘चाणक्य’ मालिकेचाही आधार आहे. अखंड भारताच्या मुख्य पार्श्वभूमीला मौर्यांपर्यंत नेऊन भारत मातेच्या सेवेसाठी मॅसेडोनियाविरुध्द स्वातंत्र्यलढ्याची लढाई, असे चाणक्यचे दूरचित्रवाणी चित्रण भारतीय राष्ट्रवाद केंद्रस्थानी ठेवून केलेली इतिहासाची केवळ कलात्मक मांडणीच होती. आणि म्हणूनच भारतीय दर्शकांपर्यंत भारताची राष्ट्रवादी दृष्टी मांडण्याच्या मुख्य उद्देशाने लोकप्रिय सांस्कृतिक माध्यम म्हणून ही मालिका राज्याच्या मालकीच्या दूरचित्रवाणीद्वारे प्रसारित केली गेली.

बाबरी मशिद विध्वंस होण्याची पार्श्वभूमी निर्माण होण्याच्या काळात उजव्या विचारसरणीच्या हिंदू राष्ट्रवादाच्या प्रसाराने भारताला ग्रासले होते त्यावेळी प्रसारित करण्यात आलेल्या चाणक्य मालिकेद्वारे खोटा इतिहास पसरवल्याबद्दल अनेक इतिहासकारांनी टीका केली होती. मालिकेतील काही भागात उजव्या हिंदु राष्ट्रवादाचे समर्थन केले गेले असल्याने दूरदर्शनला काही आक्षेपार्ह भाग संपादित करावे लागले होते. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेची दूरदर्शन आवृत्ती त्याच्या हिंदू स्वरूपामुळे हिंदुत्वाच्या प्रचार-प्रसाराला मदत करते आणि वास्तविक इतिहासात त्यास कोणताही आधार नाही, असाही आरोप या मालिकेवर झाला होता.

चाणक्य मुळात आख्यायिका असल्याने त्यास ऐतिहासिक भूमिका प्राप्त झाली. तत्कालीन ऐतिहासिक शास्त्रीय ग्रीक साधनांत त्याचा उल्लेख सापडत नाही. भारतीय पौराणिक कथांमध्ये तो चाणक्य म्हणून ओळखला जातो, तर अर्थशास्त्राचा लेखक म्हणून त्याच्या भूमिकेस सामान्यत: त्याच्या ‘कौटिल्य’ या गोत्र (कुळ) नावाने ओळखले जाते. त्याच्यासंबंधातील उप-खंडातील जतन केल्या गेलेल्या आख्यायिका बहुतेक वेळा गुप्त किंवा उत्तर गुप्त काळातील आहेत आणि म्हणूनच त्यापूर्वीच्या अनेक शतकानुशतके असलेला त्याचा उल्लेख मालिकेत दाखविलेल्या काळापासून विभक्त आहे. तथापि, नंद, चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य या विषयावरील लोकप्रिय कथांचे तत्कालीन प्रचलित पुरावेही आहेत. पाली, जैन आणि काश्मिरी साहित्यात या कथांच्या आवृत्त्या जपल्या गेल्या आहेत; काही पुराणात आणि संस्कृतमध्ये मुद्राराक्षस नाटक यात त्याचे संदर्भ सापडतात. वसाहतवादाने 20 व्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात निर्माण केलेल्या राजकीय आणि समाजशास्त्रीय परिस्थितीमुळे चाणक्य आणि मौर्यांचा उदय या ऐतिहासिक कथांविषयीची गुंतागुंत राष्ट्रवादी लेखनात पूर्णपणे दुर्लक्षित केली गेली, असा माझा तर्क आहे.

राष्ट्रांचा शोध लावला गेला की ते आदिम काळापासूनच आहेत की नाही, हा प्रश्न राष्ट्रवादाच्या अभ्यासाचा मुख्य विषय आहे. आधुनिक औद्योगिक युगाचा परिणाम म्हणून राष्ट्रवाद पाहिलेले सैद्धांतिक अर्नेस्ट गेलनर यांनी म्हटल्यानुसार, राष्ट्रवाद अस्तित्त्वात नसलेल्या राष्ट्रांचे निर्माण करतो. याउलट ए.डी. स्मिथ यांनी राष्ट्रांचा पूर्व-आधुनिक वंशीय उत्पत्तींकडे शोधत घेतला परंतु राष्ट्रवादला वैचारिक उभारणी म्हणून पाहिले: आधुनिक राज्यात प्रवेश केल्यामुळे बौद्धिक व्यक्ती तयार होतात; त्यांच्या सांस्कृतिक सुधारणेच्या प्रयत्नातून आदर्श भूतकाळ निर्माण होऊन तो वांशिक राष्ट्रवादी विचारसरणीच्या उदयाचा आधार बनतो. त्यानुसारच चाणक्य मालिका भारतीय राष्ट्रवादाच्या व्यापक दृष्टीकोनात स्थित असणे आवश्यक आहे.

सांस्कृतिक संदर्भ म्हणून चाणक्यवरील दूरदर्शनवरील मालिका आणि त्याभोवतीचे विविध वादविवाद ही अखंड भारताच्या कल्पनेविषयी सतत सुरू असलेल्या वादविवादाचे सूक्ष्मदर्शक आहे. जतन केलेल्या इतिहासामध्ये भारतीय टेलीव्हिजनचा पहिलाच प्रवेश असल्यामुळे, आधुनिक राष्ट्रवादामध्ये टेलिव्हिजनची भूमिका आणि त्याचा राज्याशी जटिल संबंध तपासण्यासाठी ही मालिका उपयुक्त मानबिंदू आहे. लेखाद्वारे दूरदर्शनच्या चाणक्य मालिकेचे गंभीरपणे विश्लेषण केले असून भारतीय राष्ट्रीयता वाढविण्यासाठी टेलीव्हिजनची भूमिकाच नव्हे तर या राष्ट्रवादाशी संबंधित बदलते अर्थ दर्शविण्याचे आधुनिक साधन म्हणून सांस्कृतिक अस्मिता आणि राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या संदर्भातील त्यातील संभाषणांचे परीक्षण मी केले आहे. या लेखात मी या मालिकेची संक्षिप्त पार्श्वभूमी देऊन, भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात तिला स्थित करून आणि त्या काळातील विद्वत्तापूर्ण ऐतिहासिक स्पष्टीकरणांच्या संदर्भात त्याचे समालोचन करणार आहे.

1989 ते 1990 च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या टिपू सुलतान मालिकेनंतर, चाणक्य दूरदर्शनवरील ऐतिहासिक विषयाचे दुसरे नाट्यचित्रण होते. टीपू सुलतानला राष्ट्रवादी स्वातंत्र्यसेनानी म्हणून साकारताना या मालिकेत 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हैसूरच्या राज्यकर्त्याचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी प्राणांतिक संघर्ष चित्रित केला आहे. त्यानंतर प्रसारित झालेली चाणक्य मालिका आणि अनेक ऐतिहासिक घटनांवर आधारित राष्ट्रवादावर लक्ष केंद्रित असलेल्या इतर मालिका हा काही अपघात नव्हता.

इतिहासाकडची ही वाटचाल 1980च्या दशकाच्या मध्यातील दूरदर्शनच्या धार्मिक आणि पौराणिक थीम्सवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमांची नांदी होती. 1959मध्ये देशात टेलीव्हिजनची सुरूवात शैक्षणिक उद्देशाने झाली असली तरी माध्यमांवरील मक्तेदारी कायम ठेवणार्‍या राज्यात 1970च्या दशकापर्यंत त्यास प्रोत्साहन देण्यात आले नाही. 1980च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय दूरचित्रवाणी केवळ माध्यम बनली. देशभरात ट्रान्समीटरची स्थापना झाली आणि 1982 च्या नवी दिल्ली आशियाई स्पर्धेदरम्यान रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. टेलिव्हिजनला सांस्कृतिक अभियांत्रिकीचे साधन म्हणून आणि भारतीय राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्यासाठी पाहिल्या जाणार्‍या दूरदृष्टीचा हा भाग होता.

रामायण (1987 -1990) आणि त्यानंतरचे महाभारत या रामानंद सागर या स्वतंत्र निर्मात्याच्या लोकप्रिय निर्मिती. या मालिकांच्या लोकप्रियतेने दूरदर्शन माध्यमाला अभूतपूर्व आर्थिक झळाळी दिली आणि या शैलीतील पुढील कार्यक्रमांचा मार्ग मोकळा झाला. या मालिकांची लोकप्रियता इतकी होती की, बर्‍याच घरांमध्ये रामायण पाहणे धार्मिक विधी बनला होता. टेलिव्हिजनचा सेट हार घालून, चंदन व शेंदूर लावून सजविला जायचा, शंख फुंकले जायचे. 1980 च्या दशकाच्या मध्यात राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या भोवती असलेल्या हिंदुत्व पुनरुज्जीवनाच्या स्थापनेसाठी दूरदर्शनवरील रामायण महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे महत्त्वपूर्ण साहित्य ठरले. परंतु मालिका आणि त्या काळातील राजकारण यादरम्यान कोणताही थेट संबंध स्थापित करणे अशक्य आहे. मात्र टेलीव्हिजनने निश्चितच राजकारणाची कल्पना, अधिनियमितता आणि नवीन प्रकारच्या राजकारणाची चौकट तयार करण्यासाठी नवा मार्ग प्रशस्त केला. उदाहरणार्थ, रामायणाची संपूर्ण भारतभरात अनेक रूपे आहेत आणि रोमिला थापर यांनी दावा केल्यानुसार, दूरदर्शनवरील आवृत्ती तसेच रामजन्मभूमीच्या राजकारणाने या कथेच्या वाल्मीकि किंवा तुलसीदास यांच्या भाषेच्या अनुरुप नसलेल्या आवृत्त्या पुढे आणल्या. ज्यामुळे लोकांमध्ये बदल झाला. निरपेक्ष, सर्वव्यापी, सदैव क्षमाशील रामाचे रागाच्या भरात असलेल्या, एखाद्याला शिक्षा करणार्‍या, वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांनी सशस्त्र असलेल्या रूपांतरीत रामातील प्रकटीकरण हा दूरचित्रवाणीचा परिणाम होता.

रामायण व महाभारत या दोन अभूतपूर्व व्यावसायिक यशामुळे दूरदर्शन इतिहासाकडे वळले – ‘टीपू सुलतान की तलवार’ आणि ‘चाणक्य’ या शैलीतील पहिला प्रयोग होता. व्यावसायिक जाहिरातींमधून स्वत:चे पैसे कमविताना नेटवर्क शुल्क अदा करणार्‍या खासगी निर्मात्यांनी हे कार्यक्रम तयार केले होते. चाणक्यत मुख्य भूमिका असलेले निर्माता चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या म्हणण्यानुसार त्यांची तीन मूलभूत उद्दीष्टे होती: एका मनुष्याच्या दृढ विश्वासाने इतिहास बदलता येतो हे दर्शविणे, इ.स.पूर्व 400च्या बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्राची स्थापना असे चित्रित करणे. आणि ते राष्ट्र कसे एकजूट होते आणि संपूर्ण सृष्टी त्याच्या संपूर्णतेत पुन्हा निर्माण करणे. स्पष्टपणे, इ.स. पूर्व चौथ्या शतकाच्या आसपासच्या राष्ट्राच्या वंशाचा शोध लावणारी कथा दूरदर्शनमधील अधिकार्‍याना अपील करणारी होती.

प्रति भागासाठी दहा लाख रुपये खर्चून बनवलेल्या चाणक्यने लवकरच स्वत:चे विशेष स्थान निर्माण केले. दूरदर्शनवरील महान-महाकाव्यांच्या परंपरेनुसार, रविवारी सकाळी 10 वाजता प्राइम टाइममध्ये त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. आणि अल्पावधीतच एशियन प्रोग्रामिंगचा भाग म्हणून बीबीसीने त्याची निवड केली. 9 ऑक्टोबर 1992 पासून चाणक्यची ओळख ब्रिटिश प्रेक्षकांशी बीबीसी 2 वर झाली. या मालिकेच्या अनोख्या चित्रिकरणामुळे द गार्डियन वृत्तपत्रात विशेष लेख लिहिला गेला :

“You’d have to go back to the great Arthur Freed-MGM² musicals, with their specially-dyed-for Technicolor fabrics, to approach the rags worn by the merest spear-carrierits cool, dark palaces where princes frolicked in pools among floating marigolds were delicious enough, but several episodes were set in exile in a rustic hut, every panel of which was evidently hand-woven, giving the static, two-shot images a lively density. Chanakya challenged all perceptions: visual, emotional and narrative.”

चाणक्य मालिकेची येथे चार केंद्रीय उद्दीष्टे आहेत : राजकीयदृष्ट्या विभागलेला असला तरी संपूर्ण उपखंडात भौगोलिकदृष्ट्या वेढलेला आणि समान सभ्यतेच्या जाणीवेने बांधलेल्या शाश्वत भारतावरील विवेचन; माँ भारतीची कल्पना; मॅसेडोनियाच्या आक्रमणकर्त्यांविरूद्ध स्वातंत्र्यलढ्यात संघर्ष; आणि शाश्वत राष्ट्राची राजकीय प्राप्ती म्हणून चाणक्य आणि चंद्रगुप्त यांनी मौर्य साम्राज्याची केलेली निर्मिती. या सर्व संकल्पनांचा समावेश करून तक्षशीला गुरुकुल येथे पदवीधर भाषण करतांनाचा प्रौढ चाणक्य हा मालिकेतील पहिला देखावा आहे:

“माँ भारतीच्या सुपुत्रांनो… आपण आपापल्या मातृभूमीत परत येत आहात. पण आज मी येथून कुठलाही मगध, कुठलाही मल्लव, कुठलाच लिच्छवी, कोणताही कुरु, किंवा कोणताही पांचाल म्हणून जाऊ देणार नाही. आज येथून फक्त भारतीय निघतील. भारतीय भूमीवर असंख्य भिन्न भाषा बोलणारे आणि असंख्य भिन्न धर्मांचे अनुसरण करणारे लोक आहेत. आमची मातृभूमी निश्चितच राजकीयदृष्ट्या अनेक जनपदांमध्ये विभागली गेली आहे परंतु सांस्कृतिकदृष्ट्या तीच आहे. त्याच संस्कृतीच्या प्रवाहात माँ भारतीचे पुत्र पोसले जात आहेत. तर, जनपदांच्या सीमा त्यांना कसे विभाजित करू शकतात? माझ्यासमोर बसलेल्या भरतपुत्रांनो जनपद सीमेच्या आधारे भारतीयांना विभाजित करण्याचा प्रयत्न करु नका. माणूस आणि माणूस जोडणारा सांस्कृतिक दुवा जपून ठेवा विद्यार्थी इथून निघाल्यावर त्यांनी आपल्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ऐक्याची गाणी मोठ्याने गायली पाहिजेत एकजुटीने एका आवाजात आवाजात जेणेकरून त्यांनी एक राष्ट्र निर्माण केले आहे असा गुरुकुलमधील शिक्षक विश्वास ठेवतील. मां भारती आपला मार्ग उज्वल करो.”

राष्ट्रवादाचा स्वर यापेक्षा अधिक स्पष्ट होऊ शकत नाही. मालिकेतील आधुनिक भारतीय राष्ट्रवादाची कल्पना केंद्रस्थानी असलेल्या विविधतेत एकता या तत्त्वानुसार बांधल्या गेलेल्या राष्ट्र निर्माणास वचनबद्ध असलेला चाणक्य स्पष्टपणे राष्ट्र-निर्माता आहे. 19 व्या शतकात भारतीय राष्ट्रवादाची केंद्रीय कल्पना म्हणून उदयास आलेल्या मां भारतीचा प्रमुख वापर व्यक्ति म्हणून मालिकेत करण्यात आला आहे. 1866 साली सर्वप्रथम अनामिकपणे प्रकाशित झालेल्या उनाबीम्स पुराण (एकोणिसावे पुराण) नावाच्या विडंबनात्मक साहित्यात भारत मातेच्या वंशावळीचा शोध लागला आहे. या ग्रंथात भारत मातेची ओळख आर्य स्वामींची विधवा, अधि-भारती म्हणून केली गेली. किरणचंद्र बंड्योपाध्याय यांच्या 1873 साली पहिल्यांदा प्रदर्शित झालेल्या ‘भारत माता’ या नाटकात मातृभूमीची ही प्रतिमा सापडली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची कादंबरी आनंद मठ या प्रतिमेच्या उत्क्रांतीत महत्त्वाचा निर्णायक बिंदू आहे. चट्टोपाध्याय यांचे स्तोत्र बंदे मातरम हे राष्ट्र म्हणून भारताचे मूळ वर्णन त्यांच्या बंगदर्शन या जर्नलसाठी लिहिले गेले होते आणि नंतर आनंद मठ (1882) कादंबरीत घातले गेले होते. 1896 च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात बीडन स्क्वेअर येथे रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध करून ते गायले होते.

‘प्रचलित धार्मिक संस्कृतीचा वापर करून आपले लोक आवाहन वाढविण्याच्या प्रक्रियेत’, राष्ट्रवादाचे स्वरूप असलेल्या देवीच्या रूपाकडे जाताना भारत माता ही कल्पना लवकरच राष्ट्रीय परंपरेचा प्रमुख भाग बनली. 1936 साली बनारसमध्ये भारत मातेचे मंदिर उघडले गेले. त्याचे महात्मा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्पष्टपणे, चाणक्य दूरदर्शन मालिकेतली मां भारती ही भारती मातेची चाणक्याच्या काळातली संस्कृत आवृत्ती असलेल्या आणि 19 व्या आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीस शोध लावलेल्या धर्माच्या रूपातली राष्ट्रवादाची परंपरा आहे. शाश्वत राष्ट्राचे मूर्त रूप म्हणून भारत माता ही आधुनिक बांधणी आहे, हे स्पष्ट आहे.

भारताच्या प्राचीन भौगोलिक आणि सांस्कृतिक ऐक्याबद्दल चाणक्य मालिकेतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अंभी (गंधार-आधुनिक अफगाणिस्तान आणि उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये असून तक्षशिला येथे त्याची राजधानी आहे) आणि महान कैकेयी राजा पौरव (पोरस) यांच्यातील मतभेद (प्राचीन ग्रीक दस्तऐवजांनुसार आधुनिक पंजाबचा शासक). शास्त्रीय साधनांनुसार, अंभीच्या पौरावाबरोबरच्या मतभेदांमुळेच जेव्हा अलेक्झांडर भारतात पोहचला तेव्हा अलेक्झांडरशी जुळवून घेण्यास अंभी उद्युक्त झाला आणि त्याद्वारे उपखंडाचे प्रवेशद्वार अलेक्झांडरला खुले झाले. मालिकेचा प्रारंभिक भाग दोन राज्यांमधील मतभेदांवर चित्रित आहे. अंभी राजा भारताला एक राष्ट्र मानतो स्वतःला त्याचा रक्षक म्हणून पाहणार्‍या कल्पनेवर विश्वास ठेवणारा आहे. त्यांचा मुलगा अंभीकुमार या कल्पनेवर विश्वास ठेवत नाही आणि वैभवाची स्वप्ने बघतो, पौरवाला त्रास देतो आणि अलेक्झांडरशी युती करतो. अंभीकुमार याने निर्माण केलेला सीमा वाद जेव्हा तीव्र झाल्यावर पौरवचा शांती दूत राजा अंभीला पुढील शब्दांनी अभिवादन करतो: महाराज पौरव म्हणतात की गंधार हा सीमावर्ती प्रांत आहे आणि भारताच्या सीमा प्रांतांचे रक्षण करण्याचे वजन तुमच्यासारख्या चांगल्या माणसांच्या खांद्यावर पडते याचा आम्हाला अभिमान आहे…, त्यास उत्तर देतांना, त्याला सांगा मी माझी कर्तव्ये चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो नाही, हा अंभीराजाचा प्रतिसाद स्पष्टपणे दाखवितो की तो मोठ्या देशाचा सीमारक्षक होता. जेव्हा अंभीराजाला आपल्या मुलाच्या अलेक्झांडरबरोबरच्या तहबद्दल कळते, तेव्हा तो आत्महत्या करतो, परंतु त्यापूर्वी आपल्या मुलाला चेतावणी देतो : मुर्खा, तुझे स्वत:चे डोके वाचवण्यासाठी तू भारताचे डोके त्याच्या पायावर ठेवले आहे… तक्षशिला भारताचा अविभाज्य भाग आहे. जनपदांना राजकीय स्वातंत्र्य असू शकते परंतु ते राष्ट्रीय प्रवाहापासून दूर गेले नाहीत. आम्ही, सीमेवरील भागातील संरक्षक हे नेहमीच भारताला उत्तरदायी आहोत आणि तेही राहू.

अलेक्झांडर आणि अंभी यांच्यातील ऐतिहासिक युतीमुळे ज्यांच्यात प्राचीन भारतीय राष्ट्राला पूर्वस्थितीत पाहण्याची इच्छा निर्माण झाली त्यांच्यासाठी निर्माण झालेल्या समस्यांकडे या मालिकेच्या कथानकाने सुबकपणे तोंड फिरवले आहे. येथल्या कथेत चुकीच्या शासकाने विश्वासघात केलेले अखंड चिरंजीव राष्ट्र आहे. अगदी अंभीच्या राज्यावरील पौरवांनी केलेला हल्ला त्यांच्या एका मंत्र्याद्वारे राजकीय कारणास्तव नव्हे तर राष्ट्रवादावर नीतिमान, योग्य ठरविला आहे: तक्षशिला भारताचे प्रवेशद्वार आहे. आम्ही त्याची सुरक्षा अंभीसारख्या राज्यकर्त्याकडे सोपवू शकत नाही. पौरव आणि अंभी यांच्यात होणारी लढाई राष्ट्रवादासाठी हानिकारक म्हणून स्पष्टपणे वर्णन केली आहे. जनपदांमधील या संघर्षात राष्ट्रवाद मरतो… जनपदांचे हे स्वकेंद्रित राजकारण देशाच्या विकासासाठी अडचणीचे ठरणार आहे. हा संघर्ष एके दिवशी देशाला विनाशाच्या दारात घेऊन जाईल, हे चाणक्याच्या पौरावा मंत्र्यांशी झालेल्या संवादात स्पष्ट होते.

एकात्मिक प्राचीन राष्ट्रीय चेतनेची संकल्पना अर्थातच अत्यंत समस्याप्रधान आहे. रोमिला थापर यांनी निदर्शनास आणून दिल्यानुसार, जंबुद्वीप आणि भारतवर्ष या चाणक्यमध्ये सतत उल्लेख केलेल्या संकल्पना या नेमक्या भौगोलिक संकल्पना नाहीत तर लौकिक संकल्पना आहेत. जंबुद्वीप हा मौर्य काळाच्या सुरुवातीच्या काळात वापरला जात होता परंतु त्यामध्ये उपखंडापेक्षा अधिक प्रदेशाचा समावेश आहे असे दिसते. भारतवर्ष त्याच्या नऊ विभागांपैकी एक विभाग होता परंतु त्यासंदर्भातील संदर्भ बरेच नंतर आढळतात. त्यानुसार भरतवर्षाला नऊ भागात विभागले गेले. प्रत्येक भाग समुद्राने विभक्त झाले आहेत. स्पष्टपणे भौगोलिक अचूकतेचा प्रयत्नही झालेला नव्हता. थापर म्हणतात त्याप्रमाणे, वेस्ट एशियन्सद्वारे भारतासाठी वापरल्या जाणारे शब्द – पर्शियन राजांचा हिंदुश, ग्रीकांचा इंडोई, लॅटिन लेखकांची इंडिका आणि अल-हिंद अरबांची – ही सर्व नावे सिंधूपासून घेतली गेलेली आहेत. पर्शियन लोकांसाठी याचा अर्थ फक्त उपखंडातील उत्तर-पश्चिम असा होता. अरब लोकांसाठी अल-हिंद सुरुवातीला ट्रान्स सिंधू प्रदेश होता आणि हळूहळू इतर क्षेत्रांचा त्यात समावेश झाला. जरी उपखंडासाठी ऐतिहासिक स्त्रोत समान नाव वापरत असले तरी त्यापैकी कोणीही या सर्व क्षेत्रातील भारतीयांना एकच राष्ट्र म्हणून संबोधत नाही. ‘भारतीय’ ही राष्ट्रीय अस्मितेची संज्ञा नसून मूलत: अंदाजे भौगोलिक स्थान निश्चित करणार्‍या शब्दाची व्याख्या आहे.

कौटील्य अर्थशास्त्रात स्वत: राष्ट्रवादी तर्क म्हणता येईल अशा संदर्भात कोणताही उल्लेख करत नाही. आंतरराष्ट्रीय संबंध सिद्धांतातील वास्तववादाच्या आधुनिक संकल्पनेसारखाच जगाच्या दृष्टीने होब्सियन दृष्टिकोन काय असेल याचा संदेश देते. त्याचा मंडल सिद्धांत हा राष्ट्रवादाचा सिद्धांत नाही, तर ज्या भूमीवर सत्तेसाठी अनेक राजे संघर्षात आहेत असा अस्तित्वाचा सिद्धांत आहे. अर्थशास्त्रात साम्राज्याचा उल्लेख नसला तरी त्याचे सामर्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आणि मोठे राष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्यसीमा वाढवणे आवश्यक आहे, हे स्पष्ट आहे.

चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या मालिकेत चाणक्य यांनी देशाला प्राधान्याचे ठरविले आहे. एकदा हे ठरले की, मौर्य साम्राज्य निर्माण करण्यासाठी चाणक्य आणि चंद्रगुप्त यांच्या नेतृत्वात उप-खंडातील विविध राज्ये आणि स्वराज्य संस्थांनी अलेक्झांडरला केलेला प्रतिकार हा भविष्यात होणार्‍या हल्ल्यांपासून बचाव करून देशी संस्कृतींचे रक्षण करणारा राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्राम म्हणून दर्शविणे तर्कसंगत ठरते. आणि म्हणूनच 11व्या प्रकरणात, तो पौरवच्या एका मंत्र्याला उद्देशून म्हणतो: हिमालय आणि समुद्राच्या दरम्यानची जमीन एकत्र केल्याशिवाय ग्रीक लोकांचा पराभव करणे अशक्य आहे. त्यानंतर चाणक्य नेतृत्वाच्या प्रश्नावर गनिमी चळवळ सुरू करण्यासाठी एका राज्यातून दुसर्‍या राज्यात विचारधारा पसरविण्यासाठी प्रवास करतो.

आख्यायिकेच्या केंद्रस्थानी असलेलले मगधातील नंद राजवंशाचे उच्चाटन करण्यासाठी चाणक्याने घेतलेले व्रतदेखील राष्ट्रवादाच्या हेतूपासून फारकत घेतलेले दिसते. चाणक्य, स्वातंत्र्यसैनिकच्या भूमिकेत नंद राजाकडे जातो आणि अलेक्झांडरविरूद्ध पौरवासमवेत संयुक्त मोर्चाचे आवाहन करताना म्हणतो: इजिप्त आणि पर्शियाचे साम्राज्य उपटून काढल्यानंतर अलेक्झांडर नावाचा योद्धा भारताच्या दिशेने येत आहे. त्यांनी तक्षशिलेशी आधीच शांतता करार केला आहे. लवकरच तो भारतावर आक्रमण करेल ग्रीक लोकांवर भारताचे शासन असेल भारताच्या सीमा असुरक्षित आहेत. केवळ मगधच त्यांचे संरक्षण करू शकते. म्हणून मी तुमच्याकडे प्रार्थना करण्यास आलो आहे की भारताच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी मगधने स्वीकारावी भारताचे रक्षण करण्यासाठी मी तुम्हाला सैन्य साहाय्यासाठी विनवणी करतो धनानंद… भारताची सीमा तुम्हाला बोलावत आहे

(क्रमशः) – भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा