इतिहास, दूरचित्रवाणी आणि भारतीय राष्ट्रवाद – ॥ चाणक्य ॥ (भाग – २)

इतिहास, दूरचित्रवाणी आणि भारतीय राष्ट्रवाद - ॥ चाणक्य ॥

अलेक्झांडर मगधवर हल्ला करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईल, असे उत्तरादाखल राजाने त्याची खिल्ली उडविली, तेव्हा उद्विग्न चाणक्य आपले केस मोकळे सोडून व्रत घेतो: जोपर्यंत मी चणकचा मुलगा चाणक्य धनानंद सारख्या देशविरोधी राजांचा नाश करणार नाही तोपर्यंत मी माझे केसांची गाठ बांधणार नाही. हा प्रसंग एकत्रित अखंड राष्ट्र म्हणून भावी मौर्य साम्राज्याच्या उत्पत्तीचे ध्योतक असल्याचे दर्शवतो. मनात सूडाची भावना ठेवून चाणक्याने सैन्यासाठी धन जमवतो आणि चंद्रगुप्त मौर्य नावाच्या मुलाला भावी राजा बनविण्याचे वचन देऊन दत्तक घेतो. स्वातंत्र्यलढ्याच्या भव्य कथेत शहाणपणाने केलेला या व्रताचा समावेश म्हणजे स्त्रोतांनी जतन करुन ठेवलेल्या चाणक्य कथेचे महत्त्वपूर्ण पुनरुत्थानच म्हणावे लागेल.

ऐतिहासिक स्त्रोतांमध्ये सूड ही चाणक्य कथेची मध्यवर्ती संकल्पना आहे, तर दूरचित्रवाणी मालिकेने अलेक्झांडरची स्वारी आणि त्या परिणामी स्वातंत्र्यलढ्यास मध्यवर्ती स्थान दिले आहे. मूळ भारतीय स्त्रोतांपैकी कोणत्याही स्त्रोतात अलेक्झांडर व त्याच्या स्वारीचा नंदांच्या पाडावात असलेल्या भूमिकेविषयी काहीच उल्लेख सापडत नाही. खरं तर अलेक्झांडरचा भारतीय स्त्रोतांमध्ये अनुल्लेख असल्याने त्याच्या स्वारीमुळे सत्तेसाठी सुरू झालेला राजकीय संघर्ष मौर्य साम्राज्याच्या स्थापनेकडे गेला, असे मानणे योग्य ठरेल. त्याबरोबरच, अलेक्झांडरने भारताचा केवळ लहानसा प्रदेशच अगदी थोड्या काळासाठीच आपल्या अधिपत्याखाली आणला होता, हेहि विसरून चालणार नाही. त्याउलट, फारसवर अलेक्झांडरचा इतका मोठा प्रभाव होता की त्याच्या कारकिर्दीचे किस्से अगदी मध्ययुगीन लेखनातही सापडतात. उदा. फिरदौसीचा दहाव्या शतकातील इस्कंदर (अलेक्झांडर) नायक असलेले शहा-नामा.

द्विवेदींच्या चाणक्य मालिकेचा दुसरा भाग विशाखादत्तच्या ‘मुद्राराक्षस’ या संस्कृत नाटकावर बेतलेला आहे. ज्यात चंद्रगुप्ताचा सत्तेपर्यंतचा प्रवास रेखाटला आहे. या नाटकाचा काळ गुप्त किंवा उत्तर गुप्त काळ असा आहे आणि म्हणून काही शतकानुशतके पूर्वी त्यांनी वर्णन केलेल्या घटनांपासून ही कलाकृती विभक्त होते. नाटक परंपरेतील नाटक मुद्राराक्षस यात चाणक्यच्या सुडाची आणि गाठ नसलेल्या केसांच्या कथेची पुनरावृत्ती केली असून त्यात पर्वत प्रदेशाचा राजा पर्वतकाशी युती आणि युद्ध विजयानंतर त्याचा बिमोड कसा केला गेला; आणि शेवटी नंदाचा मंत्री राक्षसवर अंतिम विजय कसा मिळवला, हे दर्शविले गेले आहे. आधुनिक टेलिव्हिजन कथेच्या विपरीत, या नाटकात चंद्रगुप्तला नंदाचा मुलगा म्हणून चित्रित केले गेले आहे. नाटकानुसार चंद्रगुप्त प्रत्यक्षात यवन (ग्रीक), पर्वताक आणि विविध वन्य लोकांच्या विजयी युतीचा सदस्य आहे. चंद्रगुप्ताने अर्ध्या राज्याचे विभाजन करण्यास नकार दिल्यावर ही युती त्याच्या विरोधात जाते. बाकीचे नाटक म्हणजे युती फोडण्यासाठी चाणक्य कशाप्रकारे व्यूहरचना करतो. नाटकाचा मोठा भाग हा कल्पनाविष्कार असू शकतो. विशेषत: गुप्त काळात त्या प्रदेशाला ओळख नसलेल्या हूणांचा नाटकात उल्लेख आहे. हे नाटक जरी त्यात घडलेल्या घटनांच्या शतकानुशतके नंतर लिहिले गेले असले तरी त्यात किमान गुप्त किंवा गुप्तोत्तर काळात भारतात प्रचलित असलेल्या राजकीय विचारांचे चित्रण दिसते. त्यानंतर नंदांच्या विरोधातील संघर्ष स्पष्टपणे अंतर्गत कारणास्तव झाला होता आणि ग्रीक लोक जर त्यात पडले असतील तर ते भारतीय नायकांना सहायक घटक म्हणून अनुकूल असेल तेव्हाच उपयोगात आणले गेले असतील.

प्लुटार्कने आपल्या नोंदींत तरुण चंद्रगुप्त (जस्टिनमधील अँड्रोकुटस, सॅन्ड्रोकुट्टस) आणि अलेक्झांडर यांच्यात झालेल्या भेटीचा उल्लेख केला आहे, हे इथे सांगणे महत्त्वाचे आहे. त्याच्या नोंदीनुसार, राजा नंदाच्या वाईट स्वभावामुळे व स्वार्थी वागण्यामुळे जनतेला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटत असल्याने अलेक्झांडरने मगधवर सहज विजय मिळविला असता, असे चंद्रगुप्त अनेकदा म्हटला आहे. अलेक्झांडरच्या स्वारीच्या पूर्वेकडील सीमा दाखविण्यासाठी निर्माण केलेल्या 12 वेद्यावर आजपर्यंत प्रीसाईचे राजे (त्यापैकी चंद्रगुप्त) नदीपलीकडे जाऊन भेट चढवत असत, असेही प्लूटार्क पुढे म्हणतो. दुसरे विधान खूप ताणले जाऊ शकते परंतु एकूणच पुराव्यावरून, असा युक्तिवाद करणे शक्य होते की चंद्रगुप्त अलेक्झांडरला भेटला असावा आणि नंद राजाविरूद्ध युद्धात सामील होण्यासाठी त्याला राजी करण्याचा प्रयत्न केला असावा. यावरून भारतीय स्रोतांमध्ये उल्लेख केलेल्या नंदाबाबतचा त्याचा प्राथमिक हेतू स्पष्ट होतो. तो आधुनिक अर्थाने पूर्वगामी राष्ट्रवादी नव्हता तर सत्तेवर येण्यासाठी राजकीय परिस्थितीचा वापर करणारा नेता होता. ही त्याच्या काळातील एक सामान्य गोष्ट होती.

आपल्याला मॅगेस्थेनीसच्या नोंदींवरून चंद्रगुप्त सम्राटाने पूर्वेतील अलेक्झांडरचा उत्तराधिकारी, सेल्युकस निकेटरशी इ.स. पूर्व सुमारे 305 मध्ये लढाई केली आणि इ.स.पूर्व 303 सुमारास शांतता कराराचा करार केला, त्यात चंद्रगुप्ताने 500 हत्तींच्या मोबदल्यात गेद्रोसिया, अराकोसिया, अरिया आणि परोपमिसादाई प्रांत मिळवले, अशी माहिती मिळते. आता असा प्रश्न उभा राहतो की, अलेक्झांडरचा प्रतिकार करत चंद्रगुप्तने पंजाबवर प्रथम विजय मिळविला आणि सेलेयुकस विरुद्धचे युद्ध अंतिम होते; की तो आधी मगधचा राजा बनला आणि मग अलेक्झांडरने उत्तरेकडे आपला मोर्चा वळविल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय गोंधळाचा फायदा घेतला?

चंद्रगुप्तच्या उदयाच्या प्रश्नावर इतिहासकारांचे एकमत नाही. जस्टीन यांचे म्हणणे येथे उल्लेखनीय आहे: हा मनुष्य मूळचा होता, पण दैवी इच्छेने शाही सत्तेच्या इच्छेस प्रवृत्त झाला होता. जेव्हा त्याने राजा नंदाला अपमानित केले आणि राजाने त्याला ठार मारण्याचा आदेश दिला तेव्हा त्याने आपल्या चपळ हालचालीने त्वरेने सुरक्षितता शोधली लुटारूंच्या गटाला जमवून त्याने भारतीयांना नवीन सार्वभौमत्वासाठी उद्युक्त केले अशा प्रकारे सेल्युकस त्याच्या भावी महानतेचा पाया घालत असतानाच भारताचे सिंहासन सँड्रोकोटस चंद्रगुप्त ताब्यात होते. चंद्रगुप्त नंदांचा पाडाव करून आधी मगधचा राजा झाला आणि मग अलेक्झांडरच्या अधिकार्‍यांचा पराभव करून भारताचा राजा झाला, असा स्पष्ट निष्कर्ष यातून काढता येतो.

रोमिला थापर यांनी चंद्रगुप्त यांच्या राज्यारोहणाची तारीख इ.स. पूर्व 321 सांगताना असा युक्तिवाद करतात की, अलेक्झांडरच्या माघारीनंतर त्याने पूर्वेवरील आपले नियंत्रण एकत्रीत केले. उत्तरेकडील राज्यांच्या सततच्या विभाजनामुळे चंद्रगुप्ताला त्यांच्यावर विजय मिळवण्याची संधी मिळाली असावी. तेथून कदाचित तो दक्षिणेकडे मध्य भारतात आला असावा आणि इ.स. पूर्व 313 पर्यंत त्याने अवंतीच्या आसपासचा परिसर ताब्यात घेतला असावा. इ.स. पूर्व 305 च्या सुमारास तो सेल्यूकसविरूद्धच्या मोहिमेसाठी पुन्हा उत्तरेकडे गेला आणि युद्धाचा समारोप इ.स. पूर्व 303 च्या शांतता करारात झाला.

काही इतिहासकारांनी सांगितल्याप्रमाणे, चंद्रगुप्त भारताला एकत्रित करण्यासाठी निघाला होता, हा मुख्यत्वे पूर्वग्रहाचा परिणाम आहे. त्यावेळी संपूर्ण उपमहाद्वीपात कोणतेही राष्ट्रीय एकमत नव्हते. अशा प्रदेशाला एकत्र ठेवण्याचे एकमेव साधन प्रशासकीय आणि लष्करी सामर्थ्यावर अवलंबून होते.

टेलीव्हिजनच्या चाणक्यमध्ये चंद्रगुप्तला क्रांतिकारक राष्ट्रवादी म्हणून चित्रित केले आहे. तो परदेशी आक्रमकांविरूद्ध देशभक्तीपर गाणी गातो, कथानके सांगतो.

अपने अतीत को पढकर

अपना ईतिहास उलटकर

अपना भवितव्य समझकर

हम करें राष्ट का चिंतन…

है याद हमें युग युग की जलती अनेक घटनायें

जो मां के सेवा पथ पर आई बनकर विपदायें

हमने अभिषेक किया था जननी का अरिशोणित से

हमने शृंगार किया था माता का अरिमुंडो से

हमने ही ऊसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन

मां जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन

अब काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन

अपना तन मन धन देकर हम करें पुन: संस्थापन…

हम करें राष्ट्र आराधन… हम करें राष्ट्र आराधन…

मालिकेतील हेच हम करे राष्ट्र आराधन गीत नंतरच्या काळात RSSच्या व्यासपीठावरून गायलं जाऊ लागल.

चंद्रगुप्तचे सैनिक ग्रीक आक्रमकांशी जय माँ भारतीचा जयघोष करत युद्ध करतात आणि जेव्हा हिंसक संघर्षाबद्दल विचारले जाते तेव्हा चाणक्यचे उत्तर सोपे आहेः ग्रीक लोक आपल्या भूमीवर आक्रमण करणारे आहेत. हे आमचे राष्ट्र आहे. ही आपली भूमी आहे धोका फक्त ग्रीकांची गुलामगिरीच नाही तर सांस्कृतिक गुलामगिरीचीही आहे जी हळूहळू आपल्या समाजावर मात करेल म्हणूनच, जर हे राष्ट्र लवकरच आपल्या मूर्खपणापासून जागृत झाले नाही, हे राष्ट्र एकवटले नाही तर ते गुलामगिरीतून सोडवणे खूप अवघड होईल. प्रत्येक घरात प्रत्येक गावात, प्रत्येक गावात स्वातंत्र्यलढ्याची ज्योत प्रज्वलित करा माँ भारती आपला मार्ग उज्वल करो. उठा भारता.

ग्रीक लोकांपासून भारत मोकळे करणे ही राष्ट्राला एकत्र करण्याची फक्त पहिली पायरी ठरली आहे आणि राष्ट्रीय हिताकरिता मौर्य साम्राज्य निर्माण करण्यासाठी मगध जिंकणे गरजेचे आहे: आपण एकत्र असतो तर ते ग्रीक लोक सिंधू ओलांडू शकले असते का? हिमालय ते समुद्रापर्यंत आपली भूमी, आपले राष्ट्र आहे. जर आपण आताही एकजूट झालो नाही आणि स्वतःला एक राष्ट्र म्हणून ओळखले नाही तर आक्रमण करणारे परत येऊ शकतात आणि इतिहास बदलू शकतो आपल्याला एका छत्राखाली संघटित करण्याची गरज आहे, म्हणून हे राष्ट्र स्वावलंबी आहे, सामर्थ्यशाली आहे, तेजस्वी आहे आणि ही एक शुद्ध भूमी आहे, असे आम्ही म्हणू शकतो. या कटावर वाहून, मां भारती या कल्पनेभोवती फिरत असलेली ही मालिका संपूर्ण देशभक्तीपर गाण्यांनी भरली आहे आणि इथेच ती अडचणीत सापडते. उदाहरणार्थ मालिकेच्या भाग 17 मध्ये ब्राह्मणांचा एक गट तक्षशिलाच्या रस्त्यावर भगवा झेंडा घेऊन कूच करीत होता आणि ग्रीकांविरूद्ध सैनिक भरती करण्यासाठी स्वातंत्र्याची गाणी गात होता. चाणक्यचे ब्राह्मण सैनिक भगवे स्वरूप धारण करतात, राष्ट्रीय सन्मानाची वक्तव्य करतात, आणि ते ठडड मेळाव्यात गायल्या गेलेल्या गाण्यांसारखेच गातात:

तरुण वीर देश के मूर्त वीर देश के

जाग जाग जाग रे… मातृ भू पुकारती…

शत्रु अपने शीश पर आज चढ के बोलता

शक्ति के घमण्ड मे देश मान तोलता

पार्थ की समाधि को शम्भु के निवास को

देख आँख खोल तू अर्गला टटोलता

अस्थि दे कि रक्त तू

वज्र दे कि शक्ति तू

कीर्ति है खडी हुई आरती उतारती।

मातृ भू पुकारती….

आतापर्यंत या मालिकेची केवळ ऐतिहासिक महाकाव्य म्हणून माध्यमांमध्ये स्तुती केली गेली होती, अभ्यासू वर्गाने त्यास फारसे महत्व दिले नव्हते, परंतु राम जन्मभूमी चळवळीच्या संवेदनशील काळातील उत्तेजित गाणी आणि भगव्या हेतूंनी मालिकेला हिंदु-राष्ट्रवादाच्या उठावाच्या चौकटीत चौरसपणे उभे केले. यामुळे चर्चेचा, वादांचा भडका उडाला. धार्मिक सलोखा ताणला गेला. भारतीयत्वाच्या नव्या परिभाषांचे औचित्य सिद्ध करण्याच्या दृष्टीने भूतकाळाकडे बघण्यासाठी टेलीव्हिजन मालिकेने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. राष्ट्राची उत्पत्ती म्हणून दर्शविल्या गेलेल्या भव्य हिंदू भूतकाळावर हे आधारित होते. या वादामुळे चिडलेल्या दूरदर्शनने द्विवेदी यांना बंदीची धमकी दिल्यानंतर त्यांना काही आक्षेपार्ह गाणी – भगवे ध्वज संपादन व मर्यादित करण्यास भाग पाडले. मालिका हिंदुत्वाच्या दृष्टीकोनाला बळकटी देईल, असे दूरदर्शनच्या धोरणकर्त्यांना वाटले तर ही सर्व गाणी फक्त राष्ट्रीयतेबद्दल बोलतात असे म्हणत द्विवेदींनी स्वत:चा बचाव केला.

वरील युक्तिवादाने उपस्थित केलेला मुख्य वाद म्हणजे भारतीय ओळख काय आहे आणि ती कोण परिभाषित करेल? चाणक्यबद्दलच्या वादाचे हेच केंद्र आहे. स्वत: द्विवेदी नमूद करतात :

“त्या काळात डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी बरीच गोंधळ निर्माण केला. 1947 नंतरच भारत हे एक राष्ट्र बनले, असा त्यांचा विश्वास होता हीच ब्रिटीशांची निर्मिती आहे. राष्ट्रवाद म्हणजे काय? हा एक फार मोठा तात्विक प्रश्न आहे. माझे वैयक्तिक मत आहे की लोक त्या काळात ज्या शब्दांची व्याख्या करतात त्याच भाषेत त्या काळाची व्याख्या केली गेली नव्हती. आपल्याकडे इतिहास लिहिण्याची परंपरा नाही परंतु समाजाची निर्मिती ही मनुष्याच्या कल्पनाशक्तीचा भाग आहे. दुर्दैवाने, आमच्याकडे इतिहासकारांचा एक समूह आहे जो प्राचीन भारताशी संबंधित प्रत्येक महानतेस त्वरित नाकारतो.”

द्विवेदी यांच्यानुसार चाणक्य हे इतिहासावर आधारित होते, उजवे किंवा डावे न झुकलेले स्वातंत्र्यपूर्व इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासावर आधारित. इतकी वर्षे इतिहास म्हणून भारतीय इतिहास कसा लिहिला, तयार केला व समजला गेला हे आपल्याला कसे समजेल या संदर्भात पाहिले जाणे आवश्यक आहे. यासाठी मी रोमिला थापर यांच्या 1968 च्या ‘प्राचीन भारतीय इतिहासाचा अर्थ लावणे’ हा निबंध सुचवतो. ऐतिहासिक लेखनात अंतर्निहित वैचारिक लेखनाचा प्रश्न विचारतांना, पुरातन भारतावरील ऐतिहासिक लेखनात गेल्या दोन शतकांमध्ये विवेचनामध्ये महत्त्वपूर्ण बदल कसे घडले याचा शोध थापर यांनी घेतला आहे. 18 व्या शतकाच्या सुरूवातीस युरोपियन विद्वानांनी तयार केलेले ऐतिहासिक लेखन तत्कालीन युरोपमधील प्रबळ वैचारिक दृष्टिकोनातून आणि प्राचीन भारताच्या देशी परंपरेपेक्षा लक्षणीय भिन्न होते. या विचारसरणीने भारतीय विद्वानांनी लिहिण्यास सुरूवात केल्यानंतरही ते प्रभावी राहिले. आणि फक्त अलीकडील दशकांत त्यांना आव्हान देण्यात आले. याच चर्चेच्या केंद्रस्थानी चाणक्य ठामपणे उभे आहे. भारतीय राष्ट्रवादावरून सुरू असलेला संघर्ष आणि त्यावरून काय सूचित होते यावर त्याने जोरदार परिणाम झाला आहे.

थापर यांनी म्हटल्याप्रमाणे 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात ओरिएंटलिस्ट किंवा इंडोलॉजिस्ट म्हणून वर्णन केलेल्या विद्वानांच्या कार्याद्वारे भारतावर प्रथम गंभीर इतिहास लेखन सुरू झाले. त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे संस्कृत आणि काही युरोपियन भाषांमधील संबंध होता. ज्यामुळे भारतीय आर्य लोकांना युरोपियन लोकांचे सर्वात जवळचे बौद्धिक नातेवाईक म्हणून पाहिले जाऊ लागले आणि प्राचीन भारतीय भूतकाळ हा जवळजवळ युरोपियन संस्कृतीचा हरवलेला भाग आहे, असे भाष्य केले गेले.

19 व्या शतकाच्या उत्तरार्धानंतर भारतीय इतिहासकारांच्या पहिल्या पिढीने युरोपियन इतिहासकारांनी सुरू केलेली पद्धत पुढे चालू ठेवली. त्यास दुसर्‍या पिढीकडून आव्हान आले. हे इतिहासकार होते – एच. सी. रायचौधरी, के.पी. जयस्वाल, आर.सी. मजूमदार, आर.के. मुखर्जी, एच.सी. ओझा. हे इतिहासकार 1920 आणि 30 च्या दशकात लिहित होते आणि 1900 च्या दशकाच्या सुरूवातीच्या काळात बळकट झालेल्या राष्ट्रवादी चळवळीचा परिणाम त्यांना स्पष्टपणे जाणवत होता. त्यांचा इतिहासाचा अन्वयार्थ स्पष्टपणे राष्ट्रीय दृष्टिकोनावर आधारित होता. भव्य भूतकाळाच्या शोधामध्ये भारतीय संस्कृतीची स्थापना आध्यात्मिक आणि भौतिकवादी पश्चिमेपेक्षा आवश्यकतेने श्रेष्ठ म्हणून केली गेली.

आपल्या उद्देशासाठी मुख्य मुद्दा म्हणजे राष्ट्रवादाने अगदी प्राचीन काळापर्यंत भारतीय राजकीय ऐक्यावर जोर देण्याची इच्छा निर्माण केली. अशा प्रकारे तिसर्या शतकात मौर्य साम्राज्याचा उदय आणि जवळजवळ संपूर्ण उपखंडातील विस्तार हे अखिल भारतीय चेतनेची अभिव्यक्ती म्हणून पाहिले गेले. हे साम्राज्य भव्य भूतकाळात राष्ट्रवादाच्या विचारधारेचे औचित्य सिद्ध करण्यासाठी प्रोटोटाइप देशासारखे होते. वसाहतवादी मालकांच्या निर्मितीपेक्षा वंशपरंपरेपासून अस्तित्वात असलेल्या एका देशावर विश्वास ठेवणे सोपे होते.

या सर्व प्रकियेत 1905 साली एका अज्ञात पंडिताने म्हैसूर शासकीय ओरिएंटल लायब्ररीच्या मुख्य ग्रंथालयाकडे एक हस्तलिखित हस्तांतरित केले, अर्थशास्त्राचा शोध, प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरला. चाणक्यच्या प्रशासनावरील प्रबंधानं अपरिवर्तनीय असे रंगविलेल्या भारताच्या चित्राला आव्हान दिलं. येथील रहिवासी ध्यान आणि आभासी कल्पनांत व्यस्त होते, इतिहास अनुभवत नव्हते किंवा त्यात भाग घेत नव्हते. हा शोध उदयोन्मुख होत असलेल्या नवीन राष्ट्रवादी विचारसरणीला प्रेरणा देणारा ठरला. मजबूत केंद्रीकृत साम्राज्ये आणि राजकीय विचारांच्या स्वदेशी शाळा यांच्या अस्तित्वामुळे केवळ राष्ट्रवादी भावनाच मजबूत झाली नाही, तर काही युरोपियन विद्वानांनाही पुन्हा मूल्यमापन करण्यास भाग पाडले. उदाहरणार्थ, हर्मन जैकीबी यांनी चाणक्यचे भारतीय बिस्मार्क म्हणून कौतुक केले. म्हणूनच 1945 च्या डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेले आश्चर्य वाटण्यासारखे नाही:

“लवकरच बॅबिलोन येथे अलेक्झांडरच्या मृत्यूची बातमी इ.स.पू. 323 मध्ये आली आणि लगेचच चंद्रगुप्त आणि चाणक्य यांनी राष्ट्रवादाचा जुना आणि नवा आक्रोश वाढविला आणि परदेशी आक्रमणकर्त्याविरूद्ध लोकांना भडकावले राष्ट्रवादाच्या आवाहनामुळे चंद्रगुप्तला सहकारी मिळाले आणि त्यांनी त्याच्याबरोबर उत्तर भारत ओलांडून पाटलिपुत्र कडे कूच केले.. अलेक्झांडरच्या मृत्यूच्या दोन वर्षातच ते शहर आणि राज्य त्याच्या ताब्यात गेले आणि मौर्य साम्राज्य प्रस्थापित झाले. इतिहासात प्रथमच भारतात एक विशाल केंद्रीय राज्य निर्माण झाले.”

स्पष्टपणे, चाणक्य आणि चंद्रगुप्त यांनी प्रथम उभारलेल्या जुन्या राष्ट्रवादावरील विश्वास या काळात राष्ट्रवादी विचारांचे केंद्रीय तत्त्वज्ञान बनला होता. ग्रीकांविरूद्ध राष्ट्रवादी स्वातंत्र्यलढ्याची कल्पना या दृष्टीने महत्त्वपूर्ण होती आणि म्हणून प्रसारित चाणक्य मालिका फक्त या चौकटीचा विस्तार म्हणून पाहिली गेली पाहिजे. टेलिव्हिजन मालिकेत अलेक्झांडर आणि मॅसेडोनियन सर्वच इंग्रजी बोलत असल्याचे दाखवले गेले आहे, ही चूक नाही. ते सहजपणे हिंदी बोलू शकले असते परंतु आक्रमणकर्त्यांनी इंग्रजीचा वापर केल्याने आधुनिक स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांना विरोध झाला आणि त्यामुळे प्रेक्षकांशी नाळ जोडणे सोपे झाले. बाह्यस्थ लोकांद्वारे निर्माण केल्या गेलेल्या भारताबद्दलच्या पूर्वीच्या धारणा बदलण्यासाठी या इतिहासाची भारतीय आवृत्ती विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी चाणक्य हा भारतीय राष्ट्रवादाच्या विस्तृत कथेत संदर्भित केला जावा, असे मला वाटते. 20 व्या शतकाच्या पूर्वार्धातील राष्ट्रवाद प्रकल्प भारताला परदेशी किंवा आयात केलेली संकल्पना नव्हता तर तो शतकानुशतके भारतात अस्तित्वात होता या कल्पनेवर आधारित होता. प्रारंभिक राष्ट्रवादी प्रकल्प म्हणून चाणक्य आणि मौर्य साम्राज्याचे ऐतिहासिक पुनर्निर्माण या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी होते. म्हणूनच स्वतंत्र भारताने मौर्यांचा सिंहाचे चिन्ह आपले अधिकृत प्रतीक म्हणून स्वीकारले, हा अपघात नाही. हे मुख्यतः चंद्रगुप्ताचा नातू अशोकाने स्वीकारलेल्या अहिंसक नीतिमत्तेमुळे झाले असले तरी या प्रक्रियेमुळे मौर्य काळापासून आजतागायत राष्ट्रीय सातत्य यावर जोर देण्यात आला आहे. या कथेचे टेलिव्हिजन चित्रण या चौकटीचे अनुसरण करीत राज्याच्या विचारसरणीचा भाग होते.

हिंदू जातीयवादाबद्दल गेल्या काही काळातील वाद-विवादांत हिंदू राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद यांचे पूर्णपणे स्वतंत्र अस्तित्व असल्याचे मान्य करून ते एकमेकांच्या विरोधी आहेत ही वस्तुस्थिती अस्पष्ट करण्याकडे कल आहे. हे निश्चितपणे विकृत रूप आहे, परंतु थापर यांचा भारतीय इतिहासाची पुनर्मांडणी प्रबंध आणि राष्ट्रवादी चळवळ यांच्यात दुवा जोडून म्हणून माझ्यामते हे हिंदुत्ववादी विकृत रूप नसून अधिक धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी विकृत रूप आहे. नेहरूंसह धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद्यांनी आधीपासूनच केलेल्या भूतकाळाच्या पुनर्व्याख्यानेत हिंदुत्वाच्या सांस्कृतिक राष्ट्रवाद्यांनी फक्त आणखी एक थर जोडला. महान हिंदू भूतकाळाच्या कल्पनेवर दोन्ही बाजूंचे एकमत असले तरी हिंदू राष्ट्रवादी इस्लामचा उदयाला समस्या मानतात.

टेलीव्हिजनवर प्रसारित चाणक्य मालिका या प्रक्रियेचे उदाहरण आहे. भारताच्या कल्पनेभोवती फिरणार्‍या विविध वाद-विवादांना संबंधात्मक शाब्दिक अभिव्यक्ती देऊन; ते कसे उद्भवले, विकसित होत गेले आणि ते आता त्यात कसे बदल होत आहेत, टेलिव्हिजन मालिकेने मूर्त स्वरुप दिले. टेलिव्हिजन नेहमीच भारतीय राज्याद्वारे देशात जनमत तयार करण्याचे साधन म्हणून पाहिले गेले आहे आणि चाणक्यमधील प्राचीन राष्ट्रीय अस्मितेची चर्चाही याचाच एक भाग होता. केवळ दूरदर्शन वरच नव्हे तर गेल्या काही दशकात भारतीय दर्शकांना उपलब्ध झालेल्या हजारो खाजगी उपग्रह वाहिन्यांवरही टेलिव्हिजन प्रोग्रामिंगचे वर्चस्व कायम ठेवणारी ही नियामक चौकट आहे.

(समाप्त)