काही ‘कळीचे प्रश्न’ – राजीव साने

काही ‘कळीचे प्रश्न’

मार्क्स, त्याच्या विचार धारांमधील बहुप्रवाह, कम्युनिस्ट परंपरा या सार्‍यात असे काही प्रश्न आहेत की ज्यांच्यावर भूमिका घेतल्या खेरीज कोणालाच पुढे जाता येणार नाही. किंबहुना या प्रश्नांना बगल देण्यातूनच अडकलेपण आलेले आहे.

1.

कारणनियतता आणि संकल्पस्वातंत्र्य या दोन गोष्टी एकमेकीशी सहनांद्य (कंपॅटिबल) आहेत की नाहीत. नसल्या तर कोणती मानायची. असल्या तर त्यांची एकमेकीतील गुंफण कशी स्पष्ट करायची. जाणीव-वास्तव, व्यक्तीजीवन-समाजजीवन, मूल्यनिष्ठा-परिस्थितीचारेटा अशी अनेक द्वंद्वे या प्रश्नात गुंतलेली आहेत. व्यक्ती ही ‘भांडवली संकल्पना’ आहे असे मानले तरी अंतिमतः व्यक्तींनीच क्रांती करताना व पुढे चालवताना उचित निर्णय घ्यायचे असतात. याचे भान मार्क्समध्ये दिसत नाही.

2.

अपरिहार्यतेचा प्रांत (रेल्म ऑफ नेसेसिटी) आणि स्वातंत्र्याचा प्रांत (रेल्म ऑफ फ्रीडम) यात फरक करून अपरिहार्यतेच्या प्रांतात पाया (‘बेस’) आणि स्वातंत्र्याच्या प्रांतात इमला (सुपरस्ट्रक्चर) असे मानलेले दिसते. म्हणजेच बेस बदलल्याशिवाय सुपरस्ट्रक्चर बदलता येत नाही. यात कळीचा प्रश्न हा आहे की ज्याप्रमाणे उत्पादन-श्रमविभागणी-विनिमय या गोष्टी भौतिक अपरिहार्यता निर्माण करतात त्याचप्रमाणे ‘युद्धे त्यांचे निकाल आणि त्यातून येणारे बलसंबंध’ ही देखील भौतिक अपरिहार्यताच आहे. असे असून राज्यसंस्थेला सुपरस्ट्रक्चरमध्ये कसे टाकले? कारण राज्यसंस्थेद्वारे वर्ग-निर्मूलन करून राज्यसंस्था स्वतः वरून जाईल हा मुद्दा येतो. जर राज्यसंस्थाच वर्ग निर्माण करत असेल तर अचानक ती ‘स्वभाव’ का बदलेल? तसेच सेक्स आणि बालसंगोपन ह्याही गोष्टी अपरिहार्यतेत मोडत नाहीत काय?

3.

सर्वहार्‍याची अधिसत्ता (किंवा कामगारवर्गाची हुकुमशाही) ही संकल्पना तार्किक व्याघात नाही काय? कारण सत्ता आली की सर्वहारात्व राहीलच कसे? कम्युनिस्ट पक्ष हा स्वतःच अंमलदार-वर्ग (ब्युरोक्रॅटिक रूलिंग क्लास) न बनण्याला आधार काय? हा प्रश्न बाकुनिनने विचारला पण मार्क्सने त्याला हाकलून दिले.

4.

सरंजामशाहीतून भांडवलशाहीकडे हे संक्रमण नीट खुलासा केलेले आहे. त्यात सरंजामशाहीच्या पोटात भांडवलशाहीचा गर्भ वाढला होता. व्यापारी, कारागीर आणि शेती-इतर उत्पादन वाढलेले होते. पर्याय उपलब्ध झाल्याने उगवत्या राज्यकर्त्या वर्गाच्या पाठीशी उभे राहून हे संक्रमण करता आले. तसे भांडवलशाहीच्या पोटात समाजसत्तावादाचे उत्पादनातले प्राथमिक प्रारूप कोणते? समाजसत्तावाद जास्त न्याय्य असेल असे वादापुरते मानले तरी अर्थव्यवस्था म्हणून तो व्यवहार्य कसा? पॅरिस कम्युनमध्ये विद्रोहाचा झटका असताना थोडेच दिवस जी बंधुता दिसली ती मानवाची कायमस्वरूपी स्वाभाविकता अचानक कशी बनणार? आपले राज्य आले आहे असे नुसते म्हटल्याने श्रमाला व उद्योजकतेला (नियोजनबद्ध उद्दिष्टांना) प्रेरणा कशी मिळणार?

5.

बाजारव्यवस्थेला जो काय आंधळेपणा असतो त्याहून वेगळा पण आंधळेपणा अंमलदारशाही नियोजनाला का नसेल? हॉरीझाँटल वाटाघाटी व्हर्टिकल झाल्याने डोळस कशा बनतात?

6.

भांडवलशाहीत स्वरूपतःच अटळ अशी र्‍हासशीलता आहे व ती तशीच राहील याची सिद्धता कशी मिळते? भांडवलसधनता वाढत जाणे आणि उत्पादकता वाढत जाणे या दोन गोष्टीत शर्यत असते. जर भांडवलसधनताच जास्त वाढत राहिली तर शोषणाची तीव्रता वाढते व कामगारांचे कंगालीकरण होते. पण जर उत्पादकता जास्त वाढली तर शोषणाची तीव्रता कमी होते असे खुद्द मार्क्सने दास कॅपिटल मध्ये केवल-वरकड आणि सापेक्ष-वरकड या प्रकरणात म्हटले आहे. पण शोषणाची तीव्रता वाढणारच नफ्याचे दर घटणारच, कंगालीकरण होणारच हे भाकीत, ‘तंत्र काय सापडेल?’ याच्या निरपेक्ष कसे केले?

7.

दुसरा अंतर्विरोध सामाजिक उत्पादन आणि खासगी अभिग्रहण (अप्रोप्रिएशन) यात मानलेला आहे. पण मालकही संघटित होऊ शकतात नियोजन करू शकतात स्पर्धेलाही आवर घालू शकतात हे कुठे ध्यानात घेतलेले दिसत नाही. लोकशाही केन्सप्रणित ग्राहक-बचाव मोहीम, कल्याणकारी राज्य या शक्यता भांडवलशाहीला पुनःपुन्हा जीवदान देत राहिल्या हे मार्क्सच्या काळात दिसले नव्हते पण दिसल्यानंतर फेरविचार केल्यास त्याला दुरुस्तीवाद (रिव्हीजनिझम) ही शिवीच दिली गेली. जर वैज्ञानिक समाजवाद म्हणवून घ्यायचे असेल तर सतत दुरुस्ती हे विज्ञानाचे तत्त्व का गुंडाळून ठेवले गेले?

8.

दोनच दोन वर्गात ध्रुवीकरण होईल आणि शेतकरी, उद्योजक किंवा व्यवस्थापक/तंत्रज्ञ हे सर्व मध्यमवर्ग नष्ट होतील असेही भाकीत होते. ते साफ चुकीचे ठरून बहुपायरी स्तरीकरण होत गेले. वर्गीयता परस्परप्रवेशी ठरल्या. खरेतर परस्परविरोधी गोष्टीचा परस्परप्रवेश म्हणजेच द्वंद्वात्मकता होय. मग द्वंद्वात्मक भौतिकवादात ती का नाकारली गेली.

9.

क्रयवस्तूकरण हेच दुरितांचे मूळ आहे असे मानले गेले पण दमन आणि शोषण (आत्मवियोग एलीयनेशनसुध्दा) अगोदर नव्हते की काय? अगोदरच्या सर्व व्यवस्थांत जसा वर्गसंघर्ष होता तसा वर्गसमन्वयही अजिबात नव्हता की काय? किंबहुना सरंजामशाही ही जशी शस्त्रबळाने वरून लादलेली असते व म्हणूनच ‘उलथवून पाडणे’ हा शब्द अर्थपूर्ण होतो. भांडवलशाही मात्र वरून लादलेली नसून सर्वांच्यात भिनलेली असते. मग तिच्या बाबतीत उलथवून पाडणे हा शब्दप्रयोग कसा करता येतो?

10.

मार्क्सचे श्रमतासांत मोजलेले विनिमय-मूल्य आणि वस्तूंच्या पैशातील किमती यात कोणताच परस्परसंबंध कोणालाही जोडता आलेला नाही. मग विनिमय-मूल्यावर आधारित सिद्धांत तपासणार कसे? न्याय्य किंमत ही निगमनाने (डीड्यूस करून) गणिताने काढताच येत नाही हे ‘स्राफा’ने निर्विवाद सिद्ध केले. तरीही आम्हाला ती कळते असे कसे काय वाटत राहिले?

11.

भांडवलशाहीत जगत असताना कामगाराची जाणीव ही भ्रांत-जाणीव (फॉल्स कॉन्शसनेस) असते पण क्रांतिकारकाना सत्य कळलेले असते म्हणून त्यांनी कामगारांना आदेशच द्यावे लागतात. हे एकदा मानले की खरा कामगारवर्ग म्हणजे आपण स्वतःच असे ते समजू लागतात. हे मायावादापेक्षा गुणात्मकरित्या काय वेगळे आहे.

12.

एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन म्हणजे बलुतेदारी ही युरोपीय सरंजामशाहीपेक्षा वेगळी होती हे खरेच आहे. परंतु याचा अर्थ भांडवलशाही आल्यानंतरसुध्दा जात म्हणजेच वर्ग असा लावला गेला. प्रत्यक्षात जातींमध्ये वर्गस्तर आणि वर्गस्तरांत जाती अश्या दोन्ही गोष्टी वितरित झालेल्या आहेत. जातिसंघर्षातून जातिनिर्मूलन ही कल्पना चुकीची तर आहेच पण मार्क्सवादाला पूर्णपणे सोडून आहे. परंतु भारतातले कम्युनिस्ट निम्नजातीवादाशी आघाडी करतात हे त्यांनीच स्वतः तपासून बघायला नको काय?

13.

पुरुषप्रधानता हा स्वतंत्र विषय आहे. तरीही समाजवादी-स्त्रीवाद, अब्राह्मणी-स्त्रीवाद असे फाटे फोडून काय मिळवले? घरगुती श्रम हे फुकटात मालकाला मिळतात असे मार्क्सवादी म्हणत राहतात. परंतु मालक वेतन देतो तेव्हा स्त्रीची उपजीविकाही देत नाही काय? फक्त उपजीविकेपुरतेच देणे हे चूक आहे पण ते पुरुषाबाबतही आहेच. कुटुंबात पुरुष दादागिरी करतात हा दोष भांडवलदारांचा कसा? जितके सूक्ष्मात (सटलटीत) शिरावे तितके हे प्रश्न वाढत जातात. परंतु निदान वरील प्रश्नाची काही न काही उत्तरे दिल्याशिवाय मार्क्सवाद्यांना गत्यंतर नाही.