मानवी स्वभावाचं तंत्रज्ञानावर पडलेलं प्रतिबिंब – ब्लॅक मिरर

मानवी स्वभावाचं तंत्रज्ञानावर पडलेलं प्रतिबिंब - ब्लॅक मिरर

ब्रिटनच्या राजकन्येचं अपहरण होतं. अपहरण करणारा अज्ञात इसम खंडणीची रक्कम न मागता एक फारच विचित्र अट सर्वांसमोर ठेवतो. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी लाईव्ह टीव्हीवर एका डुकरासोबत शारीरिक संबंध ठेवायचा. आधी पंंतप्रधान नाही म्हणून ही मागणी उडवून लावतो, पण मग हळू हळू जनमत त्याच्या इच्छेविरुद्ध जाऊ लागतं. कित्येक टीव्ही चॅनेल ह्या प्रकाराला आधी प्रसिद्धी द्यायला नकार देतात. पण मग जेव्हा दुसरं न्यूजचॅनेल यावर डिबेट करतंय हे दिसतं तेव्हा हळू हळू सगळेच या गलिच्छ खेळात उतरतात. पंतप्रधानांवर दबाव बनवला जातो. शेवटी पंतप्रधानांना राजकन्येला सोडवण्यासाठी अपहरणकर्त्याच्या मागणीला मानावं लागतं. सगळी न्यूज चॅनेल्स नीतिमत्ता खुंटीवर टांगून या सगळ्या गलिच्छ प्रकाराचं थेट प्रसारण करतात. आणि मग लक्षात येतं की अपहरणकर्त्याने हा प्रकार प्रत्यक्षात घडण्याआधीच राजकन्येला मुक्त केलेलं होतं, आणि हा प्रकार झाल्यानंतर तो आत्महत्या करतो. अपहरणकर्ता मुळात एक आर्टिस्ट असून ही संपूर्ण घटना त्याच्या दृष्टीने न्यूज चॅनेल्स, थेट प्रसारण 24*7 कल्चर या सगळ्याविरुद्ध त्याने तयार केलेलं आर्ट असतं. टीव्हीवरचा एपिसोड संपतो, स्क्रीन काळी होऊन आपल्याला त्यावर आपलं सुन्न झालेलं प्रतिबिंब दिसत, आणि मग लक्षात येतं की हे अतिशय खरं वाटत असलेलं कथानक असलं तरी फक्त कथानकच आहे. अजून तरी हे सत्यात उतरलेलं नाही.

वाचूनच अतिशय विचत्र आणि किळसवाणं वाटतं ना? हे कथानक आहे ‘ब्लॅक मिरर’ या अतिशय गाजलेल्या टीव्ही सिरीजच्या पहिल्या भागाचे. ब्लॅक मिरर ही अँथॉलॉजी सिरीज मानवी स्वभाव आणि तंत्रज्ञानाचे मानवी स्वभावाबरोबरचे संबंध या थीमवर बेतलेली आहे. 2011 मध्ये सुरू झालेली ही मालिका बाकी साधारण मालिकांपेक्षा बर्‍याच अर्थांनी वेगळी आहे. एक म्हणजे बाकी मालिकांसारखी ह्या मालिकेचे सीजन वीस पंचवीस एपिसोड्सचे नसून फक्त चार ते पाच एपिसोड्सचे असतात. दुसरं म्हणजे एका एपिसोडचा दुसर्‍या एपिसोडशी तसा अर्थाअर्थी फारसा संबंध नसतो. म्हणजे प्रत्येक एपिसोड एकाच कॉमन जगात घडत असला (याचे वेळोवेळी काही ईस्टर एग्स संपूर्ण मालिकेत पसरलेले आहेत.) तरी प्रत्येक भागाचं कथानक हे संपूर्णपणे वेगळं असतं. म्हणूनच सुरुवातीला या मालिकेचा लेखात अँथॉलॉजी सिरीज म्हणून उल्लेख केला आहे. आणि तिसरं म्हणजे ह्याचे भाग हे तुम्हाला अतिशय अस्वस्थ, सुन्न, करून सोडतात.

टीव्ही बंद असला तर त्याची स्क्रीन काळी असून त्यात तुम्ही तुमचं प्रतिबिंब साधारणपणे बघू शकता. ही बंद टीव्हीची स्क्रीन म्हणजे ब्लॅक मिरर. आपल्या स्वभावाचं आपल्या समाजाचं तंत्रज्ञानाने वेळोवेळी दाखवलेलं काळं रूप हा त्याचा दुसरा अर्थ. ब्लॅक मिररचा जवळ जवळ प्रत्येक भाग हा तंत्रज्ञानाचा मानवी समाजावर पडणारा दुष्प्रभाव या विषयावर बेतलेला आहे. त्यामुळे वरवर ही मालिका अतिशय तंत्रज्ञान विरोधी वाटते. पण ती तशी नाहीए. वरवर जरी प्रत्येक भाग हा तंत्रज्ञानावर भाष्य करणारा वाटत असला तरी मुळात या मालिकेतल्या कथानकाच्या प्रत्येका संघर्षाच्या तळाशी मानवी स्वाभातले गुण आणि अवगुण दडलेले सापडतात. उदाहरणार्थ पहिल्याच भागात ज्याप्रकारे एका न्यूज चॅनेलची संपादक दुसरं न्यूज चॅनेल ह्या सगळ्या प्रकारला प्रसिद्धी देतंय हे बघून आधी चिडते आणि मग त्या न्यूज चॅनेलची वाढलेली रेटिंग बघताच लगेच दुसर्‍या क्षणी आपल्या सहकार्‍यांना या प्रकारावर डिबेट घ्यायचे हुकूम सोडते ते बघून आपल्या आसपास गेल्या काही वर्षात पत्रकारितेत सुरू असलेली अनागोंदी नजरेसमोरून एका क्षणात सरकते.

ब्लॅक मिररचा अजून एक विशेष गुण म्हणजे ब्लॅक मिररचा सगळा काळ हा भविष्यातला असला तर अगदी नजीकच्या भविष्यातला वाटतो. उदाहरणार्थ, एका एपिसोडमध्ये संपूर्ण समाज हा एकामेकांना देण्यात येणार्‍या रेटिंग्सवर बेतलेला असतो. तुम्ही आयुष्यात जी कुठली गोष्ट करता त्यासाठी तुम्हाला रेटिंग मिळते, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही टॅक्सी मधून एका जागेवरून दुसर्‍या जागी गेलात, तर टॅक्सी मधून उतरल्यावर टॅक्सी ड्रायव्हर तुम्हाला ग्राहक म्हणून रेटिंग देतो, आणि तुम्ही त्याला ड्रायव्हर म्हणून तो कसा होता यावर त्याला रेटिंग देता, हेच एकूण एक गोष्टीबद्दल अर्थात जेवण, हॉटेल, रेस्टॉरंट, वगैरे वगैरे प्रत्येक सेवेबद्दल होतं. ह्या सगळ्या रेटिंग्सची सरासरी म्हणजे तुमची एकूण रेटिंग. आणि या एकूण रेटिंगच्या भरवश्यावर तुमचं समाजातलं स्थान ठरतं. म्हणजे तुम्हाला लोन मिळेल का नाही, तुम्हाला तुमच्या मित्रांच्या लग्न समारंभाला बोलावलं जाईल का नाही हे तुमच्या रेटिंग्जवरून ठरतं, संपूर्ण समाज तुम्हाला या फाईव्ह स्टार रेटिंग सिस्टीम वरून जज करतो. हा एपिसोड लिहिला गेला तेव्हा उबर सारख्या सेवा अगदी नुकत्याच आल्या होत्या, आणि त्यांनी सेवा पुरवणार्‍याला रेट करता येण्याची सुविधा नुकतीच सुरू केली होती. त्यामुळे हे सगळं कथानक अगदीच काही वर्षात घडू शकणारं वाटत होतं. गमंत म्हणजे, हा भाग प्रसारित झाल्याच्या काही वर्षांनी चायनाने साधारण याच प्रकारचा सोशल रेटिंगचा नियम चायनामध्ये आणला. चायनाची सिस्टीम ही ब्लॅक मिररच्या भागात दाखवलेल्या सिस्टीम एवढी मॅड किंवा सायको नसली तरी त्याची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे असे बर्‍याच लोकांना वाटते.

गेम थियरीमधली एक संकल्पना आहे, त्याला प्रिझनर्स डायलेमा म्हणतात. समजा पोलिसांनी दोन गुन्हेगार पकडले आहेत, पण त्यांना दोषी सिद्ध करायला पोलिसांकडे पुरेसा पुरावा नाहीए. मग पोलीस त्या दोन चोरांना चौकशीसाठी वेगवेगळ्या खोलीत नेतात. दोघांनाही सांगण्यात येते की तुम्ही दुसर्‍या विरुद्ध साक्ष द्या. त्यातली गोम अशी असते की त्यांना सांगण्यात येते, समजा तुम्ही दुसर्‍याविरुद्ध साक्ष दिली नाही आणि त्याने तुमच्या विरुद्ध साक्ष दिली तर तुम्हाला उदाहरणार्थ दहा वर्षांची शिक्षा होईल, आणि तो सुटून जाईल. जर तुम्ही साक्ष दिली आणि त्याने दिली नाही तर तुम्ही सुटाल आणि त्याला शिक्षा होईल, जर दोघांनीही एकामेकांविरुद्ध साक्ष दिली तर दोघांनाही अर्धी अर्धी शिक्षा होईल आणि कोणीच साक्ष दिली नाही तर दोघांनाही दोन चार महिन्याची फुटकळ शिक्षा होऊन तुम्ही बाहेर पडाल. दोघांनाही एकमेकांशी बोलू दिल्या जात नसल्यामुळे समोरचा काय करेल याची शाश्वती नसते. या परिस्थितीत बरेच गुन्हेगार विचार करतात जर आपण दुसर्‍या विरुद्ध साक्ष दिली तर जास्तीत जास्त आपल्याला 5 वर्षांची शिक्षा होईल, पण त्याच बरोबर सुटण्याचा पण चान्स असेल, पण साक्ष नाही दिली तर कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त दहा वर्षांची पण शिक्षा होऊ शकते. दोघंही साधारणपणे हाच विचार करतात, आणि अधिकांश केसेस मध्ये दोघांना पाच पाच वर्षांची शिक्षा होते. ब्लॅक मिररचा प्रत्येक एपिसोड या गेम थियरी मधल्या प्रिजनर्स डायलेमासारखा भासतो, ब्लॅक मिररमधल्या व्यक्ती अनैतिक वागतात, त्या भरात स्वतःच नुकसान करून घेतात पण त्या अनैतिक वागण्याला गेम थियरीच्या परिस्थितीची पार्श्वभूमी असते. एखाद्या परिस्थितीत ढकलल्यावर मनुष्य कसा वागेल याचं यथार्थ चित्रण ब्लॅक मिररमध्ये बघायला मिळतं. आणि बघता बघता आपल्याला जाणवतं की या परिस्थतीत आपण असतो तर बहुतेक आपण ही इतकेच अनैतिक वागलो असतो. ब्लॅक मिरर बघताना अस्वस्थ होण्यामागे ह्या गेम थियरीचा मोठा हात असतो.

ब्लॅक मिररमधलं तंत्रज्ञान हे सद्यकाळाच्या अगदी नजीकचं भासवणं हा देखील या सिरीजच्या लेखकांचा मोठा विजय आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाने मानवी मनात उत्पन्न होणारे कोलाहल ब्लॅक मिरर अगदी अचूकपणे टिपते. ते टिपत असताना पडद्यावरची दृश्य काहीशी अशक्य कोटीतली आणि काही बाबतीत लाऊड वाटत असली तरी त्यांचा मनुष्य स्वभावात होणारा प्रभाव मात्र अगदी रिलेटेबल अर्थात भिडणारा असतो.

उदाहरणार्थ, सोशल मीडिया आणि मृत्यू हा फारसा न बोलला जाणारा विषय आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलचे काय करायचे हा मुद्दा आज न उद्या लोकांसमोर येणार आहेच. जसे जसे सोशल मीडियावरचे आपले प्रतिबिंब आपल्या स्वभावाशी जास्तीत जास्त एकरूप होत जाईल तसं तसं आपल्या सोशल मीडियावरच्या अस्तित्वाला लोक जास्तीत जास्त वास्तविक मानायला लागतील. आणि मग प्रश्न येईल, शरीराच्या मृत्यू नंतर या आभासी अस्तित्वाचा पण मृत्यू होईल का काय?

ब्लॅक मिरर या प्रश्नाला फार वेगळ्या प्रकारे हाताळतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून माहिती गोळा करून त्या व्यक्ती सदृश व्हर्च्युअल आयडेंटिटी तयार करणारी कंपनी अस्तित्वात येते. ह्या व्हर्च्युअल आयडेंटिटी बरोबर तुम्ही एका सामान्य माणसासारखे बोलू वागू शकता. पण यात खरी गोम अशी असते की हे प्रतिबिंब तुमच्या सोशल मीडियाच्या वावरावर बेतलेलं असतं. म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही एखाद्या व्यक्तीला टोमणे मारले असतील पण खर्‍या आयुष्यात तुम्ही चांगले मित्र असाल, तरी ही व्हर्च्युअल आयडेंटिटी त्या व्यक्तीबरोबर खर्‍या आयुष्यात पण वाईटच वागते, कारण सोशल मीडियावरचं तुमचं वागणं. ब्लॅक मिरर हा तुमच्या मनाबरोबर अशाप्रकारचा अतिशय अस्वस्थ करणारा खेळ खेळतो. आजचा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे आज आपण सगळेच सोशल मीडियावर खर्‍या आयुष्यात वागतो त्यापेक्षा जास्त कडू, जास्त तुसडे, जास्त आक्रमक वागतोय. याचं कारण म्हणजे सोशल मीडियामध्ये आपल्याला इंटरनेटचं संरक्षण असतं. एखाद्याला वाईट बोललो तरी तो जाब विचारायला लगेच समोर येऊ शकत नाही, तो जास्तीच अंगावर आला तर त्याला शिव्या घालून ब्लॉक करता येतं. खर्‍या आयुष्यात हे करता येत नाही. एखाद्या माणसाचा तोंडावर अपमान करणं हे सोशल मीडियावर अपमान करण्यापेक्षा कैकपटींने कठीण काम असतं. ब्लॅक मिररचा हा भाग या मुद्द्याला अचूकपणे टिपतो.

आता खरी गंमत. लेखाच्या सुरुवातीला मी ब्लॅक मिररच्या पहिल्या भागाचं कथानक सांगितलं होतं. हा पहिला भाग प्रसारित झाला 2011 मध्ये. त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 2015मध्ये ब्रिटनच्या तेव्हाच्या पंतप्रधानांबद्दल एक फार धक्कादायक स्टिंग ऑपरेशन समोर आलं. पंतप्रधान शिकत असताना विद्यापीठात एक प्रकारे रॅगिंगच्या नावाखाली पंतप्रधानांना मेलेल्या डुकराच्या बरोबर काहीसा शारीरिक संबंध स्थापित करायला लावला होता. या संपूर्ण प्रकरणाला piggate या नावाने मीडियाने भरपूर प्रसिद्धी दिली. एका प्रकारे, ब्लॅक मिररने ब्रिटनच्या एका मोठ्या सकॅन्डलची भविष्यवाणी चार वर्षांपूर्वीच केली होती. आता हे बघितलं पाहिजे, की ब्लॅक मिररमधल्या बाकीच्या अशक्य वाटणार्‍या गोष्टी सुद्धा येणार्‍या काळात खर्‍या ठरतात का?