जपून टाक पाऊल जरा..

Arnab Goswami

[Image Source: Link]

मागल्या चार वर्षात मला आवडलेली दोन माणसे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरा अर्णब गोस्वामी! देशातील पत्रकारितेला पाखंडी पुरोगामी विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपली सर्व शक्ती व बुद्धी पणाला लावणारा पत्रकार, म्हणून अर्णब मला खूप आवडला. कारण त्याने दिल्लीत बसून देशावर दीर्घकाळ यशस्वीपणे राज्य करणार्या बौद्धिक नोकरशाही उर्फ ब्युरोक्रसीला उखडून चव्हाट्यावर आणायचे मोठे काम हाती घेतलेले आहे. त्यासाठी त्याला एका वाहिनीच्या संपादक पदाचा त्याग करावा लागला आणि अनेकांचे शिव्याशापही पत्करावे लागलेले आहेत. पण आपल्या विवेकबुद्धी व शहाणपणाला त्या ब्युरोक्रसीसमोर शरणागत होण्यास नकार देणारा झुंजार पत्रकार, म्हणून अर्णब मला आवडला. मात्र अलीकडे त्याने आपल्या प्रतिष्ठेच्या भांडवलावर आरंभ केलेल्या रिपब्लिक या नव्या वाहिनीची वाटचाल हळुहळू त्याच ब्युरोक्रसीच्या दिशेने होऊ लागल्याची शंका येऊ लागली आहे. ज्या कंपूशाहीच्या विरोधात अर्णबने संघर्ष सुरू केला, त्यांच्या बौद्धिक वा वैचारिक भूमिकेशी मतभेद असणे एक गोष्ट आहे. पण त्यांच्याच पद्धतीने, शैलीने उचापतखोरी करणे, ही वेगळी गोष्ट आहे. पुरोगामी विचारसरणी ही एक भूमिका आहे आणि ती काही लोकांनी आपली बटिक करून टाकली. त्यामुळे एका उदात्त विचारसरणीला बिकट दिवस आलेत. तिची जनमानसातील पत संपलेली आहे. ठराविक ढुढ्ढाचार्य एक भूमिका घेणार आणि बाकी पत्रकारांनी व माध्यमांनी त्याचीच री ओढावी, अशी जी शैली मागल्या दोनतीन दशकात उदयास आली, तिने पत्रकारितेची तटस्थता मारून टाकली आहे. त्याला प्रादेशिक वा भाषिक माध्यमातून आव्हान मिळत असले, तरी ते किरकोळ होते. अर्णबने इंग्रजी व राष्ट्रीय माध्यमात ते आव्हान उभे केले, म्हणून त्याला प्रतिसाद मिळाला होता. त्यालाच आता बाधा येऊ लागली काय, अशी शंका येते आहे.

‘टाईम्स नाऊ’ ही राष्ट्रीय माध्यमातील बहुधा एकमेव वाहिनी अशी होती, जिचे मुख्यालय मुंबईत होते, दिल्लीपासून दूर होते म्हणून असेल; ल्युटियन दिल्ली म्हणतात त्या मूठभर सत्ताधीशांची दिल्लीची हुकूमत अर्णब वा टाईम्स नाऊवर चालू शकली नाही. केवळ अंतरामुळे नाही तर अर्णबकडे त्यापासून मुक्त राहण्याची हिंमत व इच्छा असल्यानेच ते शक्य झाले. अन्यथा मुंबई, चेन्नई वा कोलकात्यातील माध्यमेही सतत दिल्लीची मांडलीक म्हणूनच पत्रकारिता करत राहिली आहेत. ल्युटियन दिल्ली म्हणजे तमाम भारतीय लोकसंख्येला क्षुद्र मानून त्या गुलामांवर हुकूमत गाजवण्याची प्रवृत्ती होय. जेव्हा या नव्या दिल्लीची उभारणी झाली, तेव्हाच तिथे उपर्या ब्रिटीश राज्यकर्त्यांचे वर्चस्व गृहीत धरलेले होते. नेटीवांवर हुकूमत गाजवायची व त्यांच्यात न्यूनगंड जोपासून आपल्या वर्चस्वाचा खुंटा पक्का करायचा, ही त्यातली वृत्ती हळुहळू त्या ल्युटियन दिल्लीत प्रवेश मिळालेल्या भारतीयांमध्येही रुजत, फोफावत गेली. मागल्या सात दशकात ती प्रवृत्ती समाजाच्या विविध घटकांतही चांगलीच रुजली. अशा प्रवृत्तीला ल्युटियन दिल्ली म्हटले जाते. ती तिथल्या राजकारणी, पत्रकार, लेखक, वकील, अधिकारी आणि विचारवंत प्राध्यापकांत मुरलेली दिसेल. विषय कुठलाही असो. अशा ल्युटियन लोकांनी परस्परांची वकिली केलेली दिसेल किंवा त्यांच्या बाहेरच्या कुणालाही खतम करताना हे सर्व व्यावसायिक घटक एकजुटीने उभे ठाकलेले दिसतील. अशा ल्युटियन दिल्लीला हादरा देणारा राजकारणी नरेंद्र मोदी पहिला, तर ल्युटियन माध्यमांच्या पीठाधीशांना झुगारणारा अर्णब दुसरा. म्हणूनच त्याचे कौतुक होते. पण नवी वाहिनी सुरू केल्यावर अर्णब बेताल होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. ज्यांच्या विरोधात दंड थोपटून अर्णब उभा राहिला, त्यांचीच शैली घेऊन तो दहशत निर्माण करू बघत असेल, तर त्याला जाब विचारणे भाग आहे.

Arnab Goswami
[Image Source: Link]

रिपब्लिक वाहिनी सुरू केल्यावर अर्णब व त्याच्या सहकार्यांनी अनेक जुन्या नव्या भानगडी चव्हाट्यावर आणलेल्या आहेत. आजवर दडपून ठेवलेल्या या सर्व भानगडी तथाकथित पुरोगामी राज्यकर्ते, राजकारणी वा त्यांनी मानदंड बनवलेल्या प्रतिष्ठितांच्या आहेत. त्याचे कागदोपत्री वा अन्य स्वरूपाचे पुरावे उकरून काढून पर्दाफाश करणे योग्यच आहे. त्यापैकीच एक सुनंदा पुष्करचा संशयास्पद मृत्यू होय.

ज्या प्रकारे शशी थरूर या केंद्रीय मंत्र्याच्या सुंदर पत्नीचा मृतदेह एका पंचतारांकित हॉटेलात आढळून आला, ती बाब गुंडाळून टाकण्यासारखी घटना नव्हती. त्या घटनेच्या पुढल्या मागल्या घटनाही संशय गडद करणाऱ्या आहेत. पण कुठल्याही गंभीर चौकशीविना त्यावर पडदा पाडला गेला होता. अन्य कुठल्या नवर्याची गोष्ट असती तर प्रथम त्याला अटक झाली असती. पण दिल्लीचे पोलिस निष्क्रीय राहिले. त्यांच्या त्याच नाकर्तेपणाला कुणा माध्यमाने प्रश्न विचारले नाहीत. कुणा बुद्धिमंताला त्यावर शंका घेण्याची इच्छाही झाली नाही. हा सगळा मामला म्हणूनच अधिक संशयास्पद होता. कारण सुनंदा बोलली तर शशी थरूर सोडा, ल्युटियन दिल्लीतले भलेभले चेहरे फाटत गेले असते.

सहाजिकच आज त्याचे काही भक्कम पुरावे वा लपवाछपवी हाती लागली असेल, तर तिचा गौप्यस्फोट करणे ही अर्णाबच्या वाहिनीची पत्रकारिता योग्य व धाडसी नक्कीच आहे. पण त्यातून सत्य समोर आणण्याचा आग्रह असला पाहिजे. त्यातून शशी थरूर वा काँग्रेस पक्षाची नाचक्की करण्याचा हट्ट असेल, तर ती शैली प्रामाणिक पत्रकारितेची वाट सोडून ल्युटियन दिल्लीच्या बदमाशीची वाट धरू लागत असते.

काँग्रेस मुख्यालयात शशी थरूर यांच्या पत्रकार परिषदेतून रिपब्लिकच्या वार्ताहरांना बाहेर काढल्यानंतरचे त्यांचे वर्तन व रिपब्लिक वाहिनीने आरंभ केलेली मोहिम, ल्युटियन दिल्लीचेच अनुकरण करताना दिसली. त्यात अर्णब विरघळून गेला असे वाटले.

शशी थरूरची पापे उकरून काढणे, त्यावर चर्चा घडवणे किंवा त्याच्यासह काँग्रेस पक्षाला उघडे पाडणे योग्यच आहे. पण ते करताना त्याच्याशी काडीमात्र संबंध नसलेल्या कुठल्या कार्यक्रमात वा पत्रकार परिषदेत जाऊन धुमाकुळ घालण्याचा प्रयास करणे, ही पत्रकारिता असू शकत नाही. तीचळवळ व पत्रकारिता यांची सरमिसळ होते. तेच गेल्या दोनतीन दशकात ल्युटियन दिल्लीच्या टोळीने केलेले पाप आहे. कन्हैयाकुमार या विद्यार्थी नेत्यावर बालंट आले, तेव्हा त्याच्या सुटकेनंतर त्याचे भाषण लिहून देण्यापर्यंत बरखा दत्त लुडबुडत होती. युपीए सरकार बनत असताना बरखा, प्रभू चावला किंवा वीर संघवी यांच्यासारखे मान्यवर ल्युटियन पत्रकार, सत्तापदांची सौदेबाजी करण्यात गर्क झालेले होते. लोकपाल आंदोलनाच्या काळात अनेक पत्रकार केजरीवाल टोळीला पर्याय म्हणून उभा करण्यासाठी आपली बुद्धी झिजवत होते. गुजरात दंगलीचे निमित्त करून भाजपा व प्रामुख्याने नरेंद्र मोदींना लक्ष्य बनवण्यासाठी ल्युटियन पत्रकार व बुद्धिमंत राजकारण्याच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले होते. त्यासाठी मोदी कुठेही दिसले वा भेटले; मग त्यांना बाकीचे विषय सोडून दंगलीवर प्रश्न विचारण्याचा सपाटा लावलेला होता. अनेकदा त्या प्रश्नांची उत्तरे देऊनही तेच तेच प्रश्न वारंवार विचारून हैराण करून सोडायचे, अशी ती मोडस ऑपरेन्डी आहे. त्यामुळे मोदींनी पत्रकारांना मुलाखती देणेच बंद केले. तर मोदी माध्यमांना घाबरून पळाले, अशी आवई उठवण्यातही ल्युटियन दिल्लीचाच प्रेरणा होती. सुनंदा पुष्कर प्रकरणात रिपब्लिक वाहिनी व अर्णबने काय वेगळे चालविले आहे? शशी थरूर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत, म्हणून दिसतील तिथे त्यांच्या पाठलाग करून त्याच प्रश्नांची सरबत्ती करणे, हा अतिरेक व दहशतवाद नाही काय? त्यासाठीच काँग्रेसने थरूर यांच्या पत्रकार परिषदेत व्यत्यय नको म्हणून अर्णबच्या सहकार्यांना बाहेर काढले असेल, तर त्यात वावगे काय आहे?

ती पत्रकार परिषद एका ठराविक विषयासाठी होती आणि तिथे जाऊन रिपब्लिकच्या वार्ताहरांना त्या विषयातले प्रश्न विचारायचे नव्हतेच. तिथेही कारण नसताना सुनंदा पुष्कर मृत्युविषयी प्रश्न विचारून गोंधळ घालण्याचाच त्यांचा हेतू होता. तो उघडपणे दिसत असतानाही काँग्रेस पक्षाने अशा वार्ताहरांना प्रवेश देऊन गोंधळाला आमंत्रण कशाला द्यायचे? त्या पक्षाचे कार्यालय आहे आणि त्यांना त्रासदायक ठरतील अशा पत्रकारी वेशातल्या गोंधळ्यांना तिथून बाहेर ठेवणे, हा कुठल्याही पक्ष वा संघटनेचा पूर्ण अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेने लेखन वा अविष्कार स्वातंत्र्य दिले आहे, तो कुठेही घुसखोरी करण्याचा वा गोंधळ घालण्याचा परवाना नाही. ज्या बाबतीत तुम्हाला काही म्हणायचे असेल वा सांगायचे असेल, ते कथन करण्याची ती मोकळीक आहे. त्यात शशी थरूर वा काँग्रेस पक्षाने कुठलीही बाधा रिपब्लिक वाहिनीला आणलेली नाही. पण आपल्या अधिकार वा स्वातंत्र्याची व्याप्ती परस्पर वाढवून काँग्रेस वा कुठल्याही पक्ष संघटनेच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा अधिकार रिपब्लिक वा अर्णबच्या सवंगड्यांनी सांगण्याचा अट्टाहास चालविला होता. त्याला स्वातंत्र्याधिकार नव्हे तर उचापतखोरी म्हणतात. कारण शशी थरूर काँग्रेसच्या एका नव्या शाखेचे प्रमुख म्हणून तिथे भूमिका मांडणार होते आणि ‘सुनंदा’ मृत्यूचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नव्हता. तरीही तिथे व्यत्यय आणण्याच्या हट्टाच्या पत्रकारितेशी काडीमात्र संबंध नाही आणि म्हणूनच रिपब्लिक वाहिनीची कुठलीही गळचेपी काँग्रेसने केल्याचा दावा धादांत कांगावाखोरीच म्हणावी लागेल. आजवर अशी कांगावखोरी ल्युटियन दिल्लीचे बुद्धिमंत, पत्रकार व राजकारणी सातत्याने करीत आलेले आहेत. या निमित्ताने अर्णबने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून दाखवलेले आहे. म्हणूनच तसे वागणे निषेधार्हच आहे. मग अर्णबने काय करायला हवे होते?

Arnab Goswami
[Image Source: Link]

ती पत्रकार परिषद एका ठराविक विषयासाठी होती आणि तिथे जाऊन रिपब्लिकच्या वार्ताहरांना त्या विषयातले प्रश्न विचारायचे नव्हतेच. तिथेही कारण नसताना सुनंदा पुष्कर मृत्युविषयी प्रश्न विचारून गोंधळ घालण्याचाच त्यांचा हेतू होता. तो उघडपणे दिसत असतानाही काँग्रेस पक्षाने अशा वार्ताहरांना प्रवेश देऊन गोंधळाला आमंत्रण कशाला द्यायचे? त्या पक्षाचे कार्यालय आहे आणि त्यांना त्रासदायक ठरतील अशा पत्रकारी वेशातल्या गोंधळ्यांना तिथून बाहेर ठेवणे, हा कुठल्याही पक्ष वा संघटनेचा पूर्ण अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेने लेखन वा अविष्कार स्वातंत्र्य दिले आहे, तो कुठेही घुसखोरी करण्याचा वा गोंधळ घालण्याचा परवाना नाही. ज्या बाबतीत तुम्हाला काही म्हणायचे असेल वा सांगायचे असेल, ते कथन करण्याची ती मोकळीक आहे. त्यात शशी थरूर वा काँग्रेस पक्षाने कुठलीही बाधा रिपब्लिक वाहिनीला आणलेली नाही. पण आपल्या अधिकार वा स्वातंत्र्याची व्याप्ती परस्पर वाढवून काँग्रेस वा कुठल्याही पक्ष संघटनेच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा अधिकार रिपब्लिक वा अर्णबच्या सवंगड्यांनी सांगण्याचा अट्टाहास चालविला होता. त्याला स्वातंत्र्याधिकार नव्हे तर उचापतखोरी म्हणतात. कारण शशी थरूर काँग्रेसच्या एका नव्या शाखेचे प्रमुख म्हणून तिथे भूमिका मांडणार होते आणि ‘सुनंदा’ मृत्यूचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नव्हता. तरीही तिथे व्यत्यय आणण्याच्या हट्टाच्या पत्रकारितेशी काडीमात्र संबंध नाही आणि म्हणूनच रिपब्लिक वाहिनीची कुठलीही गळचेपी काँग्रेसने केल्याचा दावा धादांत कांगावाखोरीच म्हणावी लागेल. आजवर अशी कांगावखोरी ल्युटियन दिल्लीचे बुद्धिमंत, पत्रकार व राजकारणी सातत्याने करीत आलेले आहेत. या निमित्ताने अर्णबने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून दाखवलेले आहे. म्हणूनच तसे वागणे निषेधार्हच आहे. मग अर्णबने काय करायला हवे होते?

वाजपेयी यांच्या कारकिर्दीत ‘तहलका’ नावाच्या वेब साईटने काही भानगडी छुप्या कॅमेराने टिपून प्रकाशित केल्या होत्या. तेव्हा त्याचा संपादक पत्रकार तरूण तेजपाल याला ल्युटियन दिल्ली व पत्रकार डोक्यावर घेऊन नाचले होते. त्यांचे अनुकरण देशभरच्या पत्रकार माध्यमांनी करून त्याला वारेमाप प्रसिद्धी दिलेली होती. भाजपाचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण व पर्यायाने त्या पक्षाला गोत्यात आणण्यासाठी तेजपालने एक राजकीय अजेंडा हाती घेतला होता आणि अवघी ल्युटियन दिल्ली त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती. पण त्यातले तर्कशास्त्र तेजपालचे समर्थन वा भाजपा विरोधाची पाठराखण असे नव्हते. सत्य प्रस्थापित होण्याची लढाई असे त्यातले चित्र उभे करण्यात आलेले होते. नंतरच्या काळात तशाच बातमीदारीसाठी तेजपाल याला ल्युटियन दिल्लीच्या राज्यकर्ते, बुद्धिमंत व माध्यमांनी निर्विवाद सहाय्य केले होते. पण चार वर्षापूर्वी तोच तेजपाल गोव्यात एका लैंगिक भानगडीत अडकला, तेव्हा सत्याचा शोध घेणारे ल्युटियन दिल्लीचे तमाम शहाणे तेजपालच्या सुरक्षेसाठी सरसावले होते. त्यातल्या पीडित मुलीविषयी कोणाला आस्था नव्हती. त्यांच्या पुरोगामित्वाचा बुरखा तेजपालनेच एका वक्तव्यातून फाडला होता. आपण पुरोगामी पत्रकार आहोत म्हणून गोव्यातले भाजपा सरकार आपल्याला गोत्यात घालत असल्याचा अजब बचाव तेजपालने मांडलेला होता. जे काही घडल्याची तक्रार होती, त्याचा कुठलाही इन्कार तेजपालने केला नव्हता. तरीही ल्युटियन दिल्ली त्याचा निषेध करायला राजी नव्हती. अटकेच्या भयाने भूमिगत झालेल्या तेजपालचे निर्लज्ज समर्थन ल्युटियनवासी करीत होते. तेजपालच्या बदमाशीला पत्रकारिता ठरवून त्याच्या बचावाला उतरले होते. आता सुनंदा वा अन्य भानगडी चव्हाट्यावर आणणार्या अर्णबच्या पाठीशी त्यापैकी कोणी उभा राहिलेला नाही. तेजपालप्रमाणे कोणी रिपब्लिकच्या समर्थनाला पुढे आलेला नाही.

कुठल्याही चिरकुट कारणासाठी पत्रकारितेवर हल्ला वा अन्याय म्हणून बहिष्काराचे पवित्रे घेणारे ल्युटियन दिल्लीचे पत्रकार अशावेळी रिपब्लिक वार्ताहरांच्या सोबतच काँग्रेस कार्यालयातून बाहेर पडायला हवे होते. कारण ती आजवरची कार्यशैली राहिली आहे. पण काँग्रेस मुख्यालयातून शशी थरूर पत्रकार परिषदेपूर्वी रिपब्लिकच्या एकेक वार्ताहराला शोधून बाहेर काढले जात असताना कोणी अन्य माध्यमाचे पत्रकार निषेधाला उभे राहिले नाहीत की त्यांना सहानुभूती दाखवायला बाहेर पडले नाहीत.

म्हणून यातला खरा आरोपी बदमाश ल्युटियन दिल्लीची पत्रकारिता आहे. किंबहुना आपल्या त्यावेळच्या प्रक्षेपणात रिपब्लिक वाहिनी सातत्याने तोच एक सवाल जाहिरपणे विचारत होती आणि रात्रीच्या चर्चेत अर्णबनेही त्याच विषयाला हात घातला होता. तोही रास्त होता. पण त्या घटनेसाठी काँग्रेस पक्षाला वा नेत्यांना जबाबदार धरणे साफ चुकीचे होते. त्यानंतर अर्णब वा त्याच्या सवंगड्यांना निदर्शने वा निषेधच करायचा होता, तर त्यांनी काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर ठाण मांडण्याला अर्थही नव्हता. त्यांनी याप्रकरणी ल्युटियन माध्यमे व पत्रकारितेचे मुखवटे फाडण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार संघटनांच्या दाराबाहेर येऊन प्रदर्शन मांडायला हवे होते. पत्रकारितेचा मुखवटा लावून जो दुटप्पीपणा राजरोस चालू असतो, त्याचा पर्दाफाश अशा प्रसंगी आवश्यक होता. यापूर्वी अशी किरकोळ घटना कुठे घडली तर राष्ट्रीय आपत्ती असल्याप्रमाणे प्रत्येक वाहिनी वा दिल्लीच्या वृत्तपत्रात त्यावर आवाज उठवला गेलेला आहे. मग रिपब्लिकच्या वाट्याला तशीच वागणूक आल्यावर तमाम माध्यमे त्यावर इतकी गप्प का होती? त्याचेही कारण समजून घेतले पाहिजे. ल्युटियन माध्यमे वा त्यांचे अन्य व्यवसायातील साथीदार यांचा एक दंडक आहे. त्यांच्या वर्तुळाच्या बाहेरील कुणाला त्यात स्थान नसते किंवा त्याच्यावरील अन्यायालाही वाचा फोडण्याची गरज नसते. दिवंगत रेगे सरांनी याचे विश्लेषण केलेले आहे.

‘समाजात जेव्हा एखादा वरिष्ठवर्ग अभिजनवर्ग असतो तेव्हा त्याचे सदस्य एकमेकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळताना आढळतात. त्याची उलट बाजू अशी की, या वर्तुळा बाहेरच्या व्यक्तीशी, कनिष्ठ व्यक्तीशी वागताना, ते जाणूनबुजून असभ्यरितीने वागतात. सामाजिक समतेच्या दिशेने वाटचाल करताना या कृत्रिम सभ्यतेवर आणि कृत्रिम असभ्यतेवर आघात करावेच लागतात. अधिकाधिक व्यक्तींना सभ्यतेच्या परिघात आणावे लागते आणि कृत्रिम सभ्यपणा अधिक सुटसुटीत करावा लागतो. या प्रक्रियेत एकेकाळी असभ्य मानल्या गेलेल्या वागण्याच्या रिती सभ्य म्हणून स्वीकारल्या जातात.’ (प्रा. में. पुं. रेगे.- ‘नवभारत’ जाने-फेब्रु 1997)

ल्युटियन दिल्ली म्हणजे असा वरिष्ठ अभिजन वर्ग आहे. त्याच्या तुलनेत बाकीचे भारतीय वा दिल्लीतलेही परिघाबाहेरचे लोक हे क्षुल्लक असतात. त्यांना परिघाबाहेरचे म्हणूनच असभ्य वा असंस्कृत ठरवलेले असते. सहाजिकच त्यांना कुठलेही अधिकार वा स्वातंत्र्य नसते. त्यांनी गुलाम वा पाळीव जनावराप्रमाणे जगावे हीच अभिजन वर्गाची अपेक्षा असते. मग त्यातला कोणी पंतप्रधान वा राष्ट्रपती झाला म्हणून फरक पडत नाही. त्याची लायकी क्षुद्रच असते. लागोपाठ यश मिळवूनही मोदी ल्युटियन दिल्लीत तुच्छ व सतत पराभूत होऊनही सोनिया राहुल तिथे कौतुकाचे कसे असतात, त्याचा अर्थ उलगडू शकतो. तेजपालच्या क्षुल्लक पत्रकारितेचे महात्म्य मोठे व अर्णबच्या यशाची पायमल्ली का होते, त्याचे उत्तर रेगेसरांच्या विश्लेषणात सापडू शकेल. इथेच मग मोदी आणि अर्णब यांच्यातला फरक समोर येतो. मोदी ल्युटियन दिल्लीच्या मान्यतेसाठी धडपडताना कधी दिसले नाहीत. त्यांनी अभिजन म्हणवून घेणाऱ्या या वर्गाच्या अन्यायकारक वर्तनाला काडीमात्र किंमत दिली नाही. परंतु अर्णब मात्र त्याच ल्युटियन विरोधात संघर्ष करताना त्यांनीच आपल्याला मान्यता द्यावी म्हणून धडपडतो आहे काय अशी शंका येते. तसे नसेल तर स्टुडिओमधून ल्युटियन माध्यमांवर दुगाण्या झाडणार्या अर्णबने काँग्रेस व शशी थरूर यांच्यापेक्षा ल्युटियन माध्यमे व विचारवंतांना आंदोलनाचे लक्ष्य बनवायला हवे होते. इतर प्रसंगी निषेधाचे सूर आळवणाऱ्यांच्या दारात जाऊन धरणे धरावे किंवा घोषणाबाजी करायला हवी होती. अशा लढाईत उतरणे सोपे असले तरी टिकून रहाणे खूप अवघड गोष्ट असते. पण त्यांना झुगारताना आपल्या पाठीशी सामान्य लोक जमा होत असतील तर फिकीर करण्याची गरज नसते. असे अभिजन आपल्याशी अतिरेकी असभ्यपणे वागणार, हे त्यात गृहीत असते. तरीही त्यांच्यातला एक व्हायचा मोह टाळून आपला संघर्ष कायम ठेवावा लागतो.

ज्यांना इथे ल्युटियन दिल्लीचे पीठाधीश संबोधलेले आहे, त्यांची पात्रता फक्त इतरांमध्ये न्यूनगंड निर्माण करण्याची असते. एकदा तो न्यूनगंड तुम्ही स्वीकारला व जोपासलात मग तुम्ही त्यांचे गुलाम होत असता. तुमची विवेकबुद्धी गहाण टाकून त्यांच्या भूमिकेची चाकोरी अपरिहार्य होऊन जात असते. ती चाकोरी झुगारली तरच स्वतंत्रपणे उभे रहाता येते. ही चाकोरी झुगारणारे संख्येने जितके अधिक होत जातात तितका अभिजन वर्गाचा धीर सुटत जातो आणि ते बंडखोरांना सामावून घेण्याची खेळी करून आपले वर्चस्व टिकवण्यासाठी जुनेच डाव खेळू लागतात. असा कालबाह्य दुटप्पी अभिजन वर्ग निकालात निघण्याची गरज असून त्याची नक्कल करण्यातून ते उद्दीष्ट साध्य होऊ शकत नाही. त्यांच्या शैलीने राजकीय अजेंडा घेऊन चालण्याने त्यातून बाहेर पडता येणार नाही. तुम्ही बंडाखोरी करता करता त्यांचेच पुढले वारस होऊन जाण्याची शक्यता अधिक असते.

काँग्रेस वा शशी थरूर यांच्या विरोधात ससेमिरा लावण्यातून रिपब्लिक वा अर्णब गोस्वामी ल्युटियन दिल्लीचा पीठाधीश व्हायला धडपडू लागला आहे काय अशी शंका येते. चुकीच्या प्रवृत्तीचे अनुकरण करून धुळीस मिळालेली पत्रकारितेची प्रतिष्ठा व पत पुन्हा प्रस्थापित होऊ शकणार नाही. भाजपा असो किंवा काँग्रेस त्यांच्या चुका दाखवण्याचे स्वातंत्र्य पत्रकारांना आहे. पण त्यापैकी कुणाला संपवण्याचा वा नामोहरम करण्याचे काम राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे आहे. ते आपल्या अंगावर घेऊन पत्रकारिता करणे ही सुपारीबाजी होते. काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेण्याचे व तिचा प्रसार करण्याची मुभा अर्णबला आहे. त्यासोबत ल्युटियन माध्यमे व पत्रकारांचा मुखवटा फाडण्याचा अधिकारही त्याला आहे. पण काँग्रेस वा अन्य कुणाच्या कामात वा कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा अधिकार राज्यघटना वा अन्य कुठल्याही कायद्याने पत्रकार वा अर्णबला दिलेला नाही.

संपर्क – bhaupunya@gmail.com