मुखवटा घातलेल्या समाजाचा चेहरा – जोकर!

मुखवटा घातलेल्या समाजाचा चेहरा...जोकर!
व्हॉकीन फिनिक्सच्या अभिनयासाठी हा चित्रपट पहायला हवा. आत्तापर्यंत तीन वेळा ऑस्कर नामांकन मिळवणारा हा अभिनेता यावेळी ऑस्कर च्या शर्यतीत नसेल तर आश्चर्य वाटायला हवं.

(३ महिन्यांपूर्वी जेव्हा जोकर भारतात रिलीज झाला, तेव्हाच पाहून त्यावर एक उत्स्फूर्त लेख लिहिला होता. आज ऑस्कर पुरस्कार जाहीर झाले त्यामध्ये ‘जोकर’ची भूमिका करणाऱ्या जोऑक्वीन फिनिक्स याला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.)

आर्थर फ्लेक् उर्फ जोकर. कुठल्याही समाजाचा असा चेहरा जो त्या समाजाला कधी पहायचाही नसतो. त्याला ओळख दाखवणं तर खूप लांब ची गोष्ट. डी.सी. पिक्चर्स चा जोकर हा आणखी एक दमदार चित्रपट. तुम्ही डी.सी. चित्रपटांचे फॅन्स असाल तर तुम्ही हे न वाचताही चित्रपट पहायला जाल. पण ज्यांनी अजून एकदाही ‘जोकर’ पाहिला नाही त्यांनी देखील हा जोकर पहायला हरकत नाही. बॅटमॅन चा व्हिलन म्हणून चेहऱ्यावर एक ‘खुनी’हास्य रंगवलेला पांढऱ्या रंगाने चेहरा रंगवून गुन्हे करणारा जोकर माहिती नाही असा प्रेक्षक विरळाच असेल. आत्तापर्यंत बॅटमॅन च्या कथेत व्हिलन असणाऱ्या जोकरच्या ‘जोकर’ होण्याची कथा म्हणजे हा जोकर चित्रपट. फार वेळा झाला ना जोकर चा उल्लेख? हा चित्रपटही असाच जोकरमय आहे.

चित्रपट सुरू होतो गॉथम शहरात. सत्तरच्या दशकात. शहरभर बेरोजगारी, रोगराई पसरलेली आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यात तणाव आहे. शहराला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी नव्या राजकीय पर्यायांची गरज आहे. आपल्या वृद्ध आईला सांभाळणारा आर्थर गॉथम मध्येच छोटी मोठी विदूषकी काम करून आपली गुजराण करतोय. त्याला खरंतर “स्टँडअप” कॉमेडियन व्हायचं आहे. परंतु मानसिक आजाराने त्रस्त असलेला आर्थर काही मोठं करू शकत नाही याची सल त्याला आहे. त्याच्या आजूबाजूच्या लोकांसाठी तो कुणीही नाही, असलाच तर एक निरुपयोगी, वेडा आहे. जो एका बिथरलेल्या समाजासाठी “पंचिग बॅग” आहे. कुणीही उठाव आणि दुबळ्याला ठेचाव. जगात इतरत्र असतो तोच नियम गॉथम मध्येही आहे.

एवढी सगळी निराशा आजूबाजूला असताना देखील आर्थर स्वप पाहतो, जे त्याने लहानपणापासून पाहिलंय. आपण स्टँडअप कॉमेडियन व्हायचं. हेच स्वप्न आर्थरला जगवत असतं. आपली म्हातारी आई आणि हे स्वप्न यांच्यासाठी आर्थर जगतोय. त्याला जगाच काही देणं घेणं नाही. आजूबाजूच्या क्रूर जगाला त्याने कधीच बदलायचा प्रयत्न केला नाहीय. ‘प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट वेगळी असते’ हे वेडा आर्थर समजू शकतो परंतु शहाण्या जगाला ‘इतरांपेक्षा वेगळा’ कुणी असेल तर ते सहन होत नाही. इथून संघर्षाला सुरुवात होते. एकामागून एक घडणाऱ्या घटना आर्थरच्या जीवनाला वेगळीच कलाटणी देतात. ते चित्रपट गृहात पाहणेच योग्य ठरेल.

‘जोकर’या व्यक्तिरेखेसाठी बॅटमॅन च्या सगळ्याच चित्रपटात जोकर एक मुखवटा धारण करतो यातच दिग्दर्शक खूप काही सांगून जातो. कधीही सत्यापासून न पाळणारा जोकर मुखवटा का घालतो? समाजाने घातलेले असे बरेच मुखवटे त्याला फाडायचे असतात. पण तो चळवळ वगैरे करणारा नाहीय. त्याला नेता किंवा नायक व्हायचं नाहीय. त्याला त्याच्या वाट्याच प्रेम हवंय. त्याच्या हक्काचं हवंय. सामन्याला तरी याहून वेगळी काय अपेक्षा असते? म्हणूनच जोकर त्याच्या नकळत सामान्यांसाठी ‘हिरो’ होऊन जातो. प्रेक्षागृहात जोकर साठी टाळ्या वाजतात कारण तो त्या प्रत्येक व्यक्तीचा प्रतिनिधी होतो ज्यांचा कधीतरी व्यवस्था, समाज, परिस्थिती, कुटुंब या पैकी कुणी ना कुणी कधी ना कधी जोकर केलाय.

व्हॉकीन फिनिक्सच्या अभिनयासाठी हा चित्रपट पहायला हवा. आत्तापर्यंत तीन वेळा ऑस्कर नामांकन मिळवणारा हा अभिनेता यावेळी ऑस्कर च्या शर्यतीत नसेल तर आश्चर्य वाटायला हवं.