चिरतरुण कर्मयोगी – डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे

अनिल सहस्त्रबुद्धे

खरं तर शिक्षक, प्राध्यापक, मास्तर, प्रिन्सिपल इत्यादी शब्द ऐकले की मनात पहिली भावना यायला हवी ती आदराची. परंतु आपली एकंदरीतच व्यवस्था आणि त्या व्यवस्थेतील माणसं अशी आहेत, की शिक्षकांचा उल्लेख करताच मनात भितीची किंवा कधी कधी तिरस्काराची देखील भावना येते. माझ्या वडिलांची फिरतीची नोकरी असल्यामुळे अनेक खेडेगावांतील शाळांत शिकण्याची वेळ देखील माझ्यावर आली. त्या शाळांमध्ये ‘pickle’चा उच्चार ‘पिकले’ करतात असं सांगणारे शिक्षक देखील मिळाले किंवा काही ठिकाणी शंका व्यक्त केली म्हणून गाणं शिकवणं बंद करणारे ‘गुरु’ देखील लाभले. अकरावी-बारावीत असताना आमच्या महाविद्यालयातील एकट्या दुकट्या प्राध्यापकाला नव्हे, तर अख्ख्या महाविद्यालयालाच पैसे घेऊन पेपर घरी सोडवायला देताना रंगे हात पकडलं होतं आणि मान्यता जायची पाळी आली होती. अशा सर्व गदारोळात शिक्षकी किंवा प्राध्यापकी पेशात ‘सेन्सिबल’ लोक उरले आहेत यावरून माझा विश्वास पुरता उडाला होता.

या सर्व पार्श्वभूमीतून ‘तावून-सुलाखून’ जेव्हा मी अभियांत्रिकीला आलो, तेव्हा मी प्राध्यापकांना कान देणं पुरता विसरलो होतो. पहिल्या वर्षी तर काही प्राध्यापक इतके दिव्य होते, की त्यांच्या वर्गात आम्ही बाकड्यावर वर्तमानपत्र उघडून सुडोकू खेळायचो.

त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक होते डॉ. अनिल सहस्रबुद्धे. त्यांना भेटायचा कधी योग येईल असं चुकून देखील वाटलं नव्हतं. मी ज्या शाळांमध्ये अथवा विद्यालयांमध्ये शिकलो, तिथे तुम्ही काही घोर अपराध केला किंवा काही खूप मोठी कामगिरी केली तरच मुख्याध्यापकांना भेटायची संधी मिळत असे. तेही अवघे काही क्षण. अभियांत्रिकी महाविद्यालयातील इतक्या सर्व शाखा आणि त्या शाखांमधील इतके सारे प्राध्यापक आणि विद्यार्थी बघता सहस्रबुद्धे सरांना भेटणं अशक्यच.

परंतु, काही महिन्यांतच हे जाणवू लागलं की सहस्रबुद्धे सर आणि त्यांची काम करायची पद्धत ही आजवर पाहिलेल्या प्राध्यापकांपेक्षा फार वेगळी आहे. सर्वात मोठा वेगळेपणा म्हणजे, वयाने फार मोठे असून देखील सहस्रबुद्धे सर मनानी आणि विचारांनी फारच तरुण होते. महाविद्यालयीन मुलं-मुली, त्यांचे विचार, त्यांच्या आतली बंडाची भावना या सर्वांची त्यांना पुरेपूर जाण होती आणि केवळ काही क्षणांतच ते विद्यार्थ्यांशी मित्रत्वाच्या नात्यानं ‘कनेक्ट’ व्हायचे. अभियांत्रिकीच्या चार वर्षांत अनेक वेळा सहस्रबुद्धे सरांना भेटायचा आणि त्यांची विचारधारा जवळून पाहण्याचा योग्य आला आणि त्यातून खूप काही शिकायला मिळालं.

अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षी, वक्तृत्व मंडळाच्या एका कार्यक्रमाचं निमंत्रण सरांना द्यायचं होतं. मी आणि वाद-विवाद मंडळाचे अजून दोन सदस्य, असे आम्ही तिघं त्यांच्या ऑफिस समोर पोहोचलो. सकाळचे पावणे दहा वाजले होते आणि सरांना ऑफिसमध्ये यायला अवकाश होता. आमच्या आधी तीन-चार प्राध्यापक आणि इतर प्रशासकीय कर्मचारी त्यांना भेटायला थांबले होते. सर येईपर्यंत वाट बघणार्‍या लोकांची संख्या दहाच्या वर गेली. बाकी सर्व जण आमच्यापेक्षा वयानं मोठे तर होतेच, त्याच बरोबर त्यांची कामं देखील अधिक महत्त्वाची असणार. “सकाळचे दोन तास वाया जाणार”, मी मनातच म्हटलं.

काही मिनिटांतच सर आले आणि जमलेली सर्व गर्दी त्यांनी पहिली. आम्हाला पाहून ते त्यांच्यासोबतच ते आम्हाला आत घेऊन गेले. मुलांना भेटण्यास सर सदैव प्राधान्य देतात आणि मुलांना ताटकळत ठेवलेलं त्यांना आवडत नाही हे आम्हाला नंतर सिनियर्स कडून कळलं. त्यानंतर चार वर्षांत अनेक वेळा त्यांना वेळी-यावेळी भेटण्याची वेळ आली परंतु कितीही गर्दी असो, सर आम्हाला लगेच आत बोलवायचे आणि मोकळे करायचे.

सरांची अजून एक खासियत म्हणजे, कुठलीही समस्या अथवा मुद्दा लांबू न देता ते तिथल्या तिथं सोडवायचे. अनेक वेळा असा अनुभव आला की आमच्या एखाद्या प्राध्यापकांचं एखादं धोरण चुकीचं असायचं आणि सर्व विद्यार्थ्यांनी नम्रपणे त्यांना ते बदलविण्याची विनंती केली, तर ते ती धुडकावून लावायचे. सर्वप्रथम जेव्हा असं झालं, तेव्हा आम्ही सहस्रबुद्धे सरांकडे गेलो. ते कोणाची बाजू घेतील याबाबत आम्ही साशंक तर होतोच आणि आपल्यालाच ओरडतील का म्हणून थोडं घाबरलो देखील होतो. सरांनी शांतपणे आम्हा सर्वांचे मुद्दे ऐकले. त्यांना काही शंका होत्या त्या देखील त्यांनी आम्हाला विचारल्या आणि तडक संबंधित प्राध्यापकांना फोन करून केबिनमध्ये यायची विनंती केली. त्यांनी अत्यंत स्पष्ट पण आदरयुक्त भाषेत त्या प्राध्यापकांना त्यांचं धोरण चुकीचं असल्याचं सांगितलं आणि ते बदलण्याची विनंती देखील केली. अनेक वेळा असा अनुभव देखील आला की सरांनी आमचा मुद्दा का चुकीचा आहे हे आम्हाला शांतपणे पटवून दिलं. परंतु, या सर्व गोष्टी करतांना त्यांनी कधीच कोणा एका विद्यार्थ्यांची किंवा शिक्षकाची मनात ‘प्रतिमा’ तयार केली नाही. सर्वांना त्रास देण्यासाठी कुप्रसिद्ध असलेले विद्यार्थी देखील जर कधी त्यांच्याकडे गेले, तर त्यांचे म्हणणे ते तेवढ्याच मोकळेपणाने आणि सामंजस्याने ऐकून घ्यायचे.

अभियांत्रिकी महाविद्यालयात निरनिराळे ‘क्लब’ होते अन् आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचा एक क्लब, वाद-विवादाचा एक क्लब, इतिहासाशी संबंधित कार्यक्रम करणारा एक क्लब, इत्यादी. मी दुसर्‍या वर्षांत असताना असे अंदाजे 20 क्लब कार्यरत होते. प्रत्येक क्लबचा त्या क्लबच्या सभासदांमधून निवडून आलेला एक सचिव असायचा. प्रत्येक क्लबला वर्षाचं एक ‘बजेट’ देखील असायचं ते वापरून तो क्लब वर्षभरात निरनिराळे उपक्रम राबवायचा. तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांच्या अभ्यासासाठी एकही क्लब नाही, ही बाब माझ्या मनात काही काळ सलत होती. आम्ही एक 10 मुलांचा ग्रुप बनवून सरांकडे मागणी घेऊन गेलो – अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी एक स्वतंत्र क्लब हवा. सर आमची मागणी एक तर पूर्णपणे धुडकावून लावतील किंवा उचलून धरतील अशी आमची अपेक्षा होती. सरांनी माध्यम मार्ग काढला.

“आपल्या महाविद्यालयात असे अनेक क्लब आहेत जे सुरू तर फार उत्साहात झाले परंतु काही महिन्यांतच त्यांची वाताहत झाली. तुम्ही उपक्रम करणं सुरु करा. पुढच्या वर्षी आपण बघुयात.”

सरांच्या या उत्तरानं काही जण निराश झाले परंतु मी पुरता हरखून गेलो. त्या वर्षात आम्ही मुलांनी मिळून तीन ते चार कार्यक्रम केले. या सर्व कार्यक्रमांना सहस्रबुद्धे सर स्वतः उपस्थित होते आणि आमची काम करण्याची प्रामाणिक इच्छा पाहून त्यांनी पुढच्याच वर्षी आम्हाला क्लब सुरु करायची परवानगी दिली.

आधी सांगितल्याप्रमाणं, महाविद्यालयात किमान वीस क्लब कार्यरत होते. या सर्वच क्लबचे साधारणपणे वर्षाला पाच ते सहा कार्यक्रम व्हायचे. सहस्रबुद्धे सरांनी आपल्या कार्यक्रमाला यावे ही सर्वांचीच इच्छा असायची. शिवाय, हे सर्व कार्यक्रम ‘एक्स्ट्रा करिक्युलर’ होते. सरांच्या मागे याव्यतिरिक्त संपूर्ण महाविद्यालयाचा व्याप आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची देखील जबाबदारी. या सर्व व्यापातून वेळ काढून ते सर्वच क्लब्सच्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, त्यांची उपस्थिती ही केवळ ‘फॉर्मल’ नसे. ते स्वतः एक विद्यार्थी बनून त्यात सहभागी व्हायचे, प्रश्न विचारायचे. प्रत्येक माणसाची एक विशिष्ट प्रकारची उपस्थिती असते. काहींची उपस्थिती वातावरण गंभीर करते; तर काहींची संपूर्ण वातावरणातील ऊर्जा शोषून घेते. सहस्रबुद्धे सरांची उपस्थिती ही कायमच प्रफुल्लतेने भरलेली आणि इतरांना उत्साहित करणारी असायची.

सहस्रबुद्धे सर यायच्या आधी अभियांत्रिकी महाद्यालायाचे नाव आणि दबदबा खूप होता परंतु महाविद्यालयावर एक संथपणाची छाप होती. सहस्रबुद्धे सर स्वतः आपल्या कामात तर गतिमान होतेच परंतु गंमत म्हणजे, त्यांनी संथपणाची सवय आणि आणि काही बाबतीत त्या संथपणाची चटक लागलेल्या शेकडो प्राध्यापकांना, बिगर शैक्षणिक कर्मचार्‍यांना देखील स्वतःच्या गतीत ओढून गतिमान केलं. कोणतीही सवय स्वतः आचरणात आणणं वेगळं आणि त्या सवयीचं ‘कल्चर’ निर्माण करणं वेगळं. सहस्रबुद्धे सरांनी संपूर्ण महाविद्यालयात कामं पटापट पण उत्कृष्टपणे करण्याचं कल्चर निर्माण केलं.

सरांचा लोकशाही तत्त्वांवरील विश्वास आणि निष्ठा देखील असामान्य. महाविद्यालयात दर वर्षी प्रत्येक क्लबचा सचिव निवडण्यासाठी निवडणूका व्हायच्या. दुर्दैवानं, निवडणुकांमध्ये इतरत्र जे प्रकार घडतात, ते सर्व या निवडणुकांमध्ये देखील होत असंत. या दरम्यान मी सरांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की आपण निवडणूक बंद करून मुलाखत घेऊन सचिवांची निवड करू. सरांनी माझ्या या मागणीला अगदी स्पष्टपणे नकार दिला. “निवडणूक प्रक्रिया चांगली करण्यासाठी काय करता येईल ते तुम्ही सांगा. ती सर्व खबरदारी आम्ही घेऊ” असं ते त्यावेळी म्हणाले. सरांच्या या उत्तरानं त्यावेळी मी नाराज झालो होतो परंतु ते किती बरोबर होतं हे आता जाणवतं आहे.

सहस्रबुद्धे सरांनी महाविद्यालयात फार मूलभूत बदल घडवून आणले. स्थानिक कंपन्या, जुने विद्यार्थी या सर्वांना एकत्र आणून अत्युच्च दर्जाच्या लॅब्स महाविद्यालयात आणण्यास ते कारणीभूत होते. चार वर्षांत अनेक इमारती, वर्कशॉप्स आणि लॅब्सचा होणारा कायापालट आम्ही स्वतः पाहिला आहे.

एका वर्षी, शिक्षक-विद्यार्थी संवादात “तुमचे प्राध्यापक कुठे चुकत असतील किंवा कमी पडत असतील तर न घाबरता तुम्ही मला सांगा, आम्ही प्राध्यापक देखील आमच्यात सुधारणा आणण्यासाठी प्रयत्नरत आहोत” असं सर बोलले. नुसते बोललेच नाही, तर त्यानुसार वागले देखील.

आम्ही विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आमच्या अडचणी सरांना मेलवर पाठवल्या आणि सरांनी त्यावर केवळ काही तासांत उत्तरं दिली. प्राध्यापकांची थेट तक्रार करायला काही वेळा विद्यार्थी घाबरायचे. अशी मुलं मग फेक ईमेल खातं उघडून सरांना ईमेल लिहायचे. अशा विद्यार्थ्यांना सर पूर्ण अभय द्यायचे आणि न घाबरता स्वतःच्या नावानं ईमेल पाठवायला सांगायचे.

अनेकवेळा शासकीय संस्थांमध्ये पदाधिकारी यंत्रणेला आणि तिच्या ढिसाळपणाला दोष देतात. त्याच यंत्रणेला जोडीस घेऊन काय किमया करता येते हे पाहायचं असल्यास सहस्रबुद्धे सरांचं कार्य बघावं. सध्या सर AICTE या देशातील तांत्रिक शिक्षणाशी संबंधित सर्वोच्च संस्थेचे संचालक आहेत. ना थकता, तरुणांनाही दडपण यावं अशा वेगानं नवनवीन आणि कल्पक योजनांवर काम करीत आहेत. भारतातील तांत्रिक शिक्षणासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांना यश येवो, हीच इच्छा!