आयसीसचे प्रशासन – लष्करी ते मुलकी राज्याच्या प्रवासाचा प्रयत्न

administrative structure of islamic state of iraq and syria

‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया’ याचं अस्तित्व अमेरिकी आणि युरोपी देशांनी सैनिकी बळावर आता संपवलं आहे. त्यांची राजधानी ‘मोसुल’ सुद्धा आता त्यांच्या ताब्यातून गेली. ‘राक्का’ हे महत्वाचं शहर त्यांनी आता गमावलं आहे. पण ‘आयसीस’ भविष्यातही इतर दहशतवादी संघटनांपेक्षा कायम वेगळेपण टिकवून ठेवणार आहे. याची करणं अनेक आहेत.

त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी एका विशिष्ट प्रदेशावर आपलं राज्य उभं केलं होतं. भले त्या राज्याचं अस्तित्व दोन-अडीच वर्षासाठी होतं. भले ते राज्य मुलकी/नागरी नसून लष्करी होतं, तरी एका मोठ्या प्रदेशावर हुकुमत उभी करणं, ती दोन वर्ष टिकवून ठेवणं वाटते तितकी सोप्पी गोष्ट नाही. ती त्यांनी करून दाखवली होती. जून 2014 मध्ये खिलाफतीची स्थापना केली तेव्हाच हे निश्चित होतं की आज ना उद्या ही संपणार आहे, प्रश्न होता फक्त वेळेचा. ती वेळ उजाडायला 2017 साल यावं लागलं. असो! ‘आयसीस’ या संघटनेच्या वेगळेपणविषयी आज बोलायचं आहे.

आपली मतं जास्तीत जास्त लोकांनी वाचावी, त्यावर विचार करावा, आपल्याला पाठींबा द्यावा यासाठी सगळे लोकं करतात ती धडपड आयसीसनं सुद्धा केली. म्हणजे स्वतःचं ‘नियतकालिक’ सुरु करणं. त्यातून आपलं तत्त्वज्ञान मांडणं. मागे असा प्रयोग ‘ओसामा बिन लादेन’च्या ‘अल-कायदा’ने सुद्धा केला होता. ‘अल-कायदा’च्या नियतकालिकाचं नाव ‘इस्पयार’ असं होतं. आयसीसच्या नियतकालिकाचं नाव ‘दबिक़’ असे आहे. आता संघटनाच संपली या कारणासाठी नियतकालिकही बंद पडलं आहे.

पण या नियतकालिकाचे 15 अंक उपलब्ध आहेत. वेळोवेळी प्रकाशित होत होते तेव्हा मी त्यांच्यावर नजर ठेवून होतो. आयसीसच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांचे सगळे अंक उपलब्ध होते. त्यावेळी मी ते डाउनलोड करून ठेवले होते. आता भारत सरकारनं त्यांची ‘जीहादोलॉजी.नेट’ ही वेबसाईट बंद केली आहे. आयसीसचा अभ्यास करण्यासाठीचे प्रचंड अधिकृत दस्तऐवज त्या वेबसाईटवर होते. ते आता नष्ट झाले आहेत. असो! आयसीसने आपल्या राज्यात स्वतःची वेगळी चलनव्यवस्था सुरु केली होती. सोन्याची, चांदीची आणि ब्राँझची नाणी ही चलन म्हणून वापरली जात होती. त्यांचे मूल्य निश्चित करणारी व्यवस्था त्यासाठी निर्माण केली होती. आयसीसची ‘मिडिया विंग’ अत्यंत प्रभावीपणे काम करणारी होती. जगाच्या वेगवेगळ्या भागात आयसीसच्या नावे होणाऱ्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी म्हणून एक स्वतंत्र व्यवस्था त्यांनी उभी केली होती. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने जबाबदारी स्वीकारण्याच्या प्रभावी पद्धतीवर एक स्टोरी केली होती. आयसीसची गुप्तहेर संघटना अस्तित्वात होती.

या सर्व गोष्टी इतर दहशतवादी संघटनांपेक्षा आयसीसला वेगळ्या पाडणाऱ्या आहेत. पण ताब्यात असलेल्या प्रदेशावर शासक नियंत्रण कशाच्या आधारे ठेवतो, याचा अभ्यास हा सर्वात मूलभूत आहे. त्यासाठी आयसीसने ‘structure of the Khilafat’ नावाने 15 मिनिटांचा व्हिडिओ प्रकाशित केला आहे. (आता तो व्हिडिओ इंटरनेट वरून काढून टाकण्यात आला आहे.) व्हिडिओ पाहून मी सुद्धा प्रभावित झालो होतो. तो बनवण्याच्या पद्धतीमुळे, मागे वापरण्यात आलेल्या म्युझिकमुळे हिप्नॉटाईज व्हयला होतं. बहुदा म्हणूनच काढून टाकला असावा. आयसीसची प्रशासकीय रचना या एका 15 मिनिटांच्या व्हिडिओमधुन समजु शकते, आज आपण त्याचा विचार करायचा आहे.

इतिहास लेखनाची शास्त्रीय पद्धत असं सांगते की हातात आलेल्या दस्तऐवजाचे सर्वप्रथम बहिरंग परीक्षण करायचे असते. बहिरंग परीक्षणात दस्तऐवजाच्या कंटेंटचा विचार करायचा नसतो. उदा. एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमावर लेख लिहायचा आहे तर त्याचे बहिरंग परीक्षण म्हणजे – वातावरण कसे होते, स्पीकरची व्यवस्था कशी होती इ. या पद्धतीचा तपशील त्यात येतो. त्याप्रमाणे ‘structure of the Khilafat’ याचे सर्वप्रथम बहिरंग परीक्षण करणे गरजेचे आहे.

हा व्हिडिओ 6 जुलै 2016 रोजी इस्लामिक स्टेटनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला होता. आता ती अधिकृत वेबसाईट आणि तो व्हिडीओ बहुतेक माध्यमातून काढून टाकलेले आहेत. विशेष प्रयत्न केले तर सापडू शकतात. व्हिडिओ एकूण 15 मिनिटांचा आहे. व्हिडिओच्या एकूण वेळेपैकी बहुतेक वेळ इस्लामिक स्टेटची प्रशासकीय रचना दाखवणाऱ्या ग्राफिक्स आहेत. सुरवातीचा काही वेळ आणि शेवटचा काही वेळ प्रत्यक्ष रेकॉर्ड केलेल्या क्लिप्स आहेत. या व्हिडिओची सुरवात इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीयाचा खलिफा ‘अमीर अल मोमिनून इब्राहीम अबू बक्र अल बगदादी’ याची प्रसिद्ध भाषणानं होते. भाषणातली सुद्धा सर्वात परिणामकारक अशी 4 वाक्य निवडलेली आहेत. व्हिडिओची निर्मिती उच्च दर्जाची आहे. तो बनवण्यावर भरपूर खर्च आणि कष्ट आहेत हे व्हिडिओच्या प्रत्येक फ्रेममधून लक्षात येईल. प्रत्यक्ष रेकॉर्ड केलेल्या क्लिप्सना दिलेले इफेक्ट्स तर मनाचा ताबा घेतात आणि वर म्हंटल्याप्रमाणे माणूस संमोहित होतो. एका 15 मिनिटांच्या क्लिपचा मनावर परिणाम होतो, तेव्हा ते क्लिपचं बनवणाऱ्या टीमचं यश मानलं पाहिजे. आयसीसीची प्रशासकीय रचना दाखवणारे ग्राफिक्स समजावून सांगण्यासाठी मागे एक माणूस आहे. बहुतांशी ग्राफिक्स हे ट्री-डायग्रामच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहेत.

5 जुलै 2014 रोजी खिलाफत स्थापन करून झाल्यावर शुक्रवारची नमाज झाल्यावर अबू बक्र अल बगदादी यानी प्रवचन दिलं आहे आहे. बगदादी आयसीसच्या 3 वर्षाच्या काळात 2 वेळा कॅमेरासमोर आलेला आहे. त्यापैकी त्याचं पहिले भाषण ‘खिलाफत स्थापन झाली’ हे सांगण्यासाठी होतं. त्या भाषणातील त्याच्या 3 वाक्यांनी या व्हिडीओची सुरवात आहे. अरबी भाषणाची ओरिजिनल ऑडीओ क्लिप तिथे वापरण्यात आली आहे. त्याची इंग्लिश वाक्यं त्याच्या खाली देण्यात आली आहेत. ती अशी, – ‘O Umma of Islam, We have become determined to not to repeat the tragedy & not allowed the fruits to be lost for the belivers is not bitten from the same hole twice. Indeed the, Islamic State will remain’ बगदादीच्या मूळ भाषणातील ही वाक्य आहेत. ती झाल्यावर आयसीसच्या प्रदेशातील एका शांत, निवांत संध्याकाळची क्लिप आपल्याला डोळ्यासमोर दिसते. तिथून पुढे हा व्हिडीओ नेमका कशासाठी तयार केलेला आहे याचा खुलासा आहे. समोर दिसणाऱ्या चित्रांच्या पार्श्वभूमीवरून आपल्याला तो उद्देश कळत जातो. तो उद्देश आपण त्यांच्या शब्दांतच पाहूया.

It is the structure that has became more manifest than the sun in the middle of the sky. It was created by the arms of defined men & irrigated by the bloods of Shuhadah (शहिदांच्या रक्तानी) through patience, conviction & hard resolve. Its methodology is the guiding book in the aiding sword with respect to defending religion & governing the worldly affairs. Imam was legislated in order to follow prophatehood in upholding these two matters. No era had ever been voide of a khilapha or Imam until the people of Islam become the squanderous, negletfull chaotic masses. Overtake by trebulations & envopled be hostilities, so the the religion was lost & land isrupt. Allah sends forth for the Umma at ahead of every 100 years. A man who will renew for the umma its religion, Thus the khalifah was announced & the Khalifah was given Bayah after the years of religious famine & political barrenness. So earth yielded crops & became green. The caravan proceded forth, religion returned & the sacentity were defended. This is land of the Khilaphate & this is its structure. Its subjects are governed, Justice is applyed evenly & the lord of mankind is feared.. या सगळ्याचा प्रमुख ‘अमीर अल मोमिनून इब्राहीम अबू बक्र अल बगदादी’ हा खलिफा आहे. इथून पुढे खिलाफतीची प्रशासकीय संरचना ग्राफिक्सच्या माध्यमातून सूत्रधार आपल्याला समजावून सांगतो. खलिफाच्या हाताखाली 1. शूरा कौन्सिल, 2. डेलिगेटेड कमिटीज काम करतात. खलिफाला कोणत्याही विषयावर निर्णय घ्यायचा असेल तर तो शूरा कौन्सिलचा सल्ला घेतो. इस्लामी इतिहासातील पहिल्या चार आदर्श खालीफांच्या काळात ‘शूरा कौन्सिल’ या व्यवस्थेची स्थापना झाली आहे. पहिला खलिफा अबू बक्र यांनी आपल्या शेवटच्या काळात पुढचा खलिफा नेमण्यासाठी म्हणून एका समितीची स्थापना केली होती. ती समिती पुढे खलीफाची सल्लागार समिती म्हणून काम करू लागली. आजही इस्लामिक देशांमध्ये राज्याच्या प्रमुखाच्या सल्लागार मंडळाला शूरा कौन्सिल म्हणण्याची पद्धत आहे. आयसीसचा खलिफा बगदादी याला सुद्धा सल्लागार म्हणून 9 जणांची एक समिती (शूरा कौन्सिल) मदत करते. शूरा कौन्सिल आणि डेलिगेटेड कमिटीच्या सहय्याने खलिफा पुढील कामे करायची आहेत.

१. धर्माचा प्रसार आणि प्रचार (Uphold and spread the religion)

२. ताब्यात असलेल्या प्रदेशाचे रक्षण (Defends the Homeland)

3. सीमांचे रक्षण (Fortifies the frontiers)

4. लष्कराची व्यवस्था (Prepare the armies)

5. Implementing the Hudud (इस्लामी कायद्याप्रमाणे शिक्षेची अंमलबजावणी करणे)

६. Enforce people’s adherance to Shariah rulings (शरीया कायद्याप्रती लोकांची निष्ठा ढळू न देणे)

खलिफाला मदत करणाऱ्या एकूण ३ डेलिगेटेड कमिटी आहेत. १. विलायत, २. दावावीन, ३. कमिटीज आणि ऑफिसेस.

इस्लामिक स्टेटचा वाढता विस्तार लक्षात घेता ‘विलायत’ म्हणजे प्रांतरचनेची गरज भासू लागली तेव्हा त्यावेळी ‘विलायत’ ही वेगळी स्वतंत्र कमिटी तयार करण्यात आली. प्रत्येक प्रांताचा म्हणजे विलायतचा प्रमुख म्हणजे ‘वली’ याची नेमणूक प्रत्यक्ष आणि थेट खलिफाच्या हातून होत असे. प्रांतातील रहिवासींचे प्रशासन सांभाळणे आणि गंभीर बाबी ‘वली’च्या वर असणाऱ्या डेलिगेटेड कमिटीवर निर्णयासाठी सोपवणे, ही ‘वली’ची कामं आहेत. शिवाय प्रांतातील नागरिकांना ‘न्याय’ मिळेल याची जबाबदारी ‘वली’ची आहे. (हा न्याय शरीयाप्रमाणे देणे वलीवर बंधनकारक आहे) शिवाय नागरिकांच्या प्राथमिक गरजा भागवण्याची सुद्धा जबाबदारी प्रांतप्रमुखाचीच आहे. आयसीसची ताकद जेव्हा सर्वात जास्त होती तेव्हा एकूण विलायतींची संख्या 35 होती. त्यापैकी 19 इराक आणि सिरीयामध्ये होत्या. आणि 16 इराक आणि सिरीयाच्या आसपासच्या प्रदेशात शिवाय जगाच्या वेगवेगळ्या भागात. एखादा प्रांत ‘आयसीसचा’ म्हणून गणला जाण्याची सुद्धा प्रक्रिया महत्त्वाची होती. इराक आणि सिरीया सोडून इजिप्त, लिबिया, अल्जीरिया, येमेन, सौदी अरेबिया, नायजेरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर कॉकेशियस या या देशांत सुद्धा आयसीसचे प्रांत होते. इराक आणि सिरीया या दोन देशांच्या बाहेर सुद्धा वरील देशांत आयसीसचे प्रांत होते. आयसीसचे अधिकृत प्रांत सोडून लेबेनॉन, फिलिपाईन्स, मोरोक्को, तुर्कस्तान या देशात आयसीसचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. पण तो आताचा आपला विषय नाही.

नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी या विशेष ऑफिसची स्थापन केली आहे. नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या एकूण क्षेत्रांची संख्या 14 आहेत. त्या अर्थानी आयसीसच्या शासित प्रदेशात एकूण 14 ‘दावावीन’ आहेत. ‘दावावीन’ हा शब्द ’दिवाण’ या शब्दाचं अनेकवचन आहे. दिवाण याचा अर्थ ’प्रशासकीय अधिकारी’ असा होतो. आयसीस शासित प्रदेशात असे 14 विषयांचा कार्यभाग सांभाळणारे 14 दिवाण म्हणजे प्रशासकीय अधिकारी आहेत. लोकांच्या हितांचे रक्षण आणि धर्माचा प्रसार ही त्यांची मुख्य कामं आहेत.

आता आपण एक एक करून 14 दिवाण आणि त्यांची कामं थोडक्यात पाहू.

1. Diwan of Judgement and Grivance :

मुख्यतः न्यायदान आणि तक्रारी नोंदवून घेणे हे या दिवाणाचे काम आहे. याच्या हाताखाली न्यायाधीशांची गरजेइतकी टीम मदतीला असते. शरिया कायद्यानुसार दिलेले निर्णय लोकांना समजावून सांगणे आणि वारसा, संपत्ती आणि कुटुंब आणि लग्न यासंबंधीचे निर्णय शरिया कायद्यानुसार दिले जात आहेत ना, याच्यावर हा दिवाण लक्ष ठेऊन असतो. वरील विषयांत शरिया कायद्याचे योग्य पालन करण्याची जबाबदारी या दिवाणाची आहे.

2. Diwan of Hisbah :

लोकांना चांगल्या गोष्टी करायला भाग पाडणे, वाईट गोष्टींपासून दूर लोटणे याची जबाबदारी या दिवाणाची आहे. शिवाय शरिया आणि इस्लामी कायद्यानुसार योग्य काय अयोग्य काय याची शिकवण लोकांना देत राहणे हे सुद्धा या दिवाणाचे काम आहे.

3. Diwan of Da’waha and Masajid :

धर्म प्रसारासाठी प्रचारक तयार करणे आणि ‘इमाम’ नियुक्त करणे हे या दिवाणाचे मुख्य काम आहे. प्रचाराकांचे प्रशिक्षण घेण्याचे काम या दिवाणाचे आहे. लोकांना शरिया कायद्याचे परिपूर्ण ज्ञान व्हावे यासाठी शरिया कायद्यावर सेमिनार आयोजित करणे ही सुद्धा जबाबदारी या दिवाणाची आहे. शरिया कायद्यावर सर्टिफाइड कोर्सेस सुद्धा या दिवाणातर्फे आयोजित केले जातात.

4. Diwan of Zakah :

जकात म्हणजे कर गोळा करणे हे काम या दिवाणाचे आहे, केवळ कर गोळा करणे एवढ्यावरच याचे काम संपत नाही. तर ज्यांना गरज आहे अशा लोकांमध्ये गोळा केलेला कर वाटून टाकणे याची सुद्धा जबाबदारी याचीच आहे. आखून दिलेल्या नियमांच्या आधारे गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन कराची वाटणी करण्याची जबाबदारी सुद्धा या दिवाणाची आहे.

5. Diwan of Soldiery :

आयसीसच्या सर्व युद्धाचे नियोजन करणे आणि युद्धासंबंधी सर्व गोष्टीची जबाबदारी या दिवाणाची आहे. युद्धाचे नियोजन करणे यातच सीमांचे रक्षण गृहीत धरलेलं आहे. लष्करी कारवायांसाठी लागणारी रसद पुरवठा आणि निर्मितीसुद्धा करण्याची जबाबदारी या दिवाणाची आहे. खलिफाला प्रशिक्षित सैनिकांचा पुरवठा सुद्धा हा दिवाण करणार.

6. . Diwan of Public Security :

इस्लामिक स्टेटच्या अंतर्गत सार्वजनिक सुरक्षेची जबाबदारी या दिवाणाची आहे. अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आणेल अशा कोणत्याही लक्षणापासून इस्लामिक स्टेटचं संरक्षण करणं हे काम या दिवाणावर सोपवलं आहे. अंतर्गत सुरक्षिततेला धोका पोचेल अशा बंडखोरांचा बंदोबस्त करणं (व्हिडिओमध्ये Waging war असे शब्द वापरले आहेत.) अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या बंडखोरांविरुद्ध युद्ध पुकारणं हे या दिवाणाचं काम आहे. शिवाय आयसीस विरोधी काम करणाऱ्या गुप्तहेर संघटनांच्या विरोधात सुद्धा युद्धच पुकारणं हे काम सुद्धा या दिवाणाचं आहे.

7. Diwan of Treasury :

इस्लामिक स्टेटच्या सर्व मालमत्तेचे रक्षण आणि नियोजन करण्याची जबाबदारी या दिवाणाची आहे.

8. Diwan of Media :

आयसीसची कोणत्याही प्रकारची माहिती प्रसारित करण्याची जबाबदारी या दिवाणाची आहे. (आयसीसच्या मिडीया विंगची तुलना कोणत्याही सार्वभौम देशाच्या मिडीया विंगशी केली जाऊ शकते, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण वेबसाईट, नियतकालिकं (ती वेगवेगळ्या भाषांत), वेळोवेळी प्रसिद्ध आणि प्रसारित केलेले व्हिडीओ आणि ऑडीओ मेसेज, प्रसिद्धी पत्रकं याची व्यवस्था कोणत्याही देशाच्या मिडिया विंग इतकी सक्षम आहे)

9. Diwan Of Education –

व्हिडीओमध्ये या दिवाणाचे काम या शब्दात लिहिले आहे, ‘Responsible for propelleing the wheel of knowledge’ ज्ञानदानाचे चक्र सुरु राहिले पाहिजे याची जबाबदारी या दिवाणाची आहे, असं प्रशासकीय रचनेत आहे. शिवाय शरिया कायद्यानुसार शैक्षणिक कोर्सेसवर नियंत्रण ठेवणे आणि शरियाच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे शैक्षणिक कोर्सेसची आखणी सुद्धा या दिवाणाकडून केली जाते. शिवाय शिक्षकांच्या नेमणुका सुद्धा या दिवाणाकडून केल्या जातात.

10. Diwan Of Health :

‘आरोग्य क्षेत्राचा विकास’ ही मुख्य जबाबदारी या दिवाणाकडे आहे. आरोग्यासंबंधी सर्व गरजा भागवल्या गेल्या पाहिजेत यासाठी याने काम करायचे आहे. पण आजार पसरूच नयेत यासाठी त्याने प्राधान्याने काम करायचे आहे.

11. Diwan of Agriculture :

इस्लामिक स्टेटच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रातील शेती आणि पशुपालनाची जबाबदारी या दिवाणाची आहे. एकूण अन्नधान्य उत्पन्नाचे इस्लामिक स्टेटच्या रहिवाशांसाठी न्याय्य नियोजन करणे याची जबाबदारी या दिवाणाकडे आहे.

12. Diwan of Resources :

इस्लामिक स्टेटच्या ताब्यातील प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे नियोजन करण्यासाठी इस्लामिक स्टेटच्या प्रशासकीय रचनेत स्वतंत्र ऑफिस तयार केलेलं आहे. खनिज तेल, वायू आणि मिनरल्स याची जबाबदारी या दिवाणाची आहे.

13. Diwan of Fay’ and Ghana’im :

संपत्तीचे मोजमाप आणि रक्षण ही जबाबदारी याच्याकडे आहे. ही संपत्ती मुख्यतः युद्ध आणि रसद याच्याशी संबंधित आहेत. शिवाय संपत्तीची वाटणी ‘गरज’ असेल तशी पुरवण्याची जबाबदारी सुद्धा या दिवाणाकडे आहे.

14. Diwan of Services :

इस्लामिक स्टेटच्या रहिवाशांच्या प्राथमिक गरजा उदा. पाणी, वीज, रस्ते, (दुरुस्ती आणि बांधणी) भागवणे हे काम याच्याकडे आहे. इस्लामिक स्टेटच्या रहिवासी वरील गरजांसंदर्भात या दिवाणाला भेटू शकतात.

आता खलिफाच्या हाताखालच्या विलायतबद्दल आपण बोललो, वेगवेगळ्या दिवाणांबद्दल बोललो, शूरा कौन्सिल बद्दल बोललो, डेलिगेटेड कमिटीबद्दल बोललो आता राहिले ‘कमिटीज आणि ऑफिसेस’! या समिती वेगवेगळ्या विषयावर प्रासंगिक परिस्थितीनुसार तयार केलेल्या असू शकतात. या इस्लामिक स्टेटच्या अधिकारी माणसांकडून या समितीवर काम केलं जातं. शिवाय विशेष समितीवर माणूस नेमायचा असेल तर त्याचे त्यासाठीचे विशेष प्रशिक्षण सुद्धा होते. या समित्यांवर डेलिगेटेड कमिटी लक्ष ठेवून असते.

यापैकी एक महत्त्वाची कमिटी आहे ‘हिजरा कमिटी’. इस्लामिक स्टेटमध्ये बाहेरच्या प्रदेशातून ‘हिजरत’ करून येणाऱ्या लोकांना स्वीकारण्यासाठी ही विशेष समिती तयार केली आहे. शिवाय हिजरत करून आलेल्या लोकांची व्यवस्था लावण्यासाठी वेगवेगळ्या दिवाणांना संपर्क करून आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्याची सुद्धा जबाबदारी या समितीकडे सोपवण्यात आली आहे.

या प्रमाणेच ‘गुन्हेगार आणि शहीद’ यांची व्यवस्था पाहणारी एक समिती इस्लामिक स्टेटने स्थापन केलेली होती. इस्लामिक स्टेटच्या ताब्यात असलेले ‘गुलाम’, यामध्ये वेगवेगळ्या युद्धात पकडलेल्या ‘स्त्रिया आणि मुलं’ यांचा गरजेनुसार पुरवठा करण्याची जबाबदारी या समितीकडे आहे. शिवाय इस्लामिक स्टेटचे सैनिक किंवा नागरिक दुसऱ्या देशाच्या तुरुंगात असतील तर त्यांना सोडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा काम या समितीचे आहे. इस्लामिक स्टेटतर्फे लढताना मृत्यू आलेल्या शहिदांच्या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा या समितीकडे आहे. शरियावर संशोधन करण्यासाठी एक समिती आहे. इस्लामिक स्टेट म्हणजे इराक आणि सिरीयाच्या प्रदेशाबाहेर असणाऱ्या विलायत म्हणजे प्रांतांची प्रशासकीय जबाबदारी एका अशाच विशेष समितीकडे देण्यात आली आहे. शिवाय इस्लामिक स्टेटला पाठींबा देणाऱ्या अनेक आदिवासी टोळ्या आयसीसच्या प्रदेशांच्या आसपास आहेत. त्यांच्याशी संबंध वाढवण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न आयसीसने केले आहेत. त्यासाठी सुद्धा एक विशेष समिती तयार करण्यात आली आहे.

ग्राफिक्सच्या माध्यमातून इस्लामिक स्टेटची प्रशासकीय रचना इथे सांगून पूर्ण होते. प्रशासकीय व्यवस्था म्हणून याच्याकडे पहिले तर कोणत्याही सार्वभौम देशाच्या व्यवस्थेइतकी व्यापक व्यवस्था यांनी तयार केली आहे. शासनाने नागरिकांची जबाबदारी घ्यायची असते म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रात शासनाने काम करायचे असते अशा सर्व क्षेत्रांचा आयसीसने विचार करून आराखडा उभा केला होता. शिवाय आयसीसचे वेगळेपण लक्षात घेऊन परिस्थितीजन्य अशा काही विशेष उपाययोजना सुद्धा त्यांनी केल्या आहेत.

ग्राफिक्स संपली की एक इस्लामिक स्टेटचा योद्ध एका लहान मुलाला घेऊन दूर जाताना आपल्याला दिसतो. मोठ्या माणसाने काळा पायघोळ वेश परिधान केलेला आहे आणि लहान मुलाच्या हातात पिस्तूल आहे. इथून पुढची जवळ जवळ 2 मिनिटं इस्लामिक स्टेटच्या अनेक युद्धाची लाइव्ह क्लिपिंग वापरली आहेत. इस्लामिक स्टेटनी अत्यंत क्रूर तऱ्हेने गुन्हेगारांना मारलेल्या क्लिपचे व्हिडिओ वापरलेले आहेत. अनेक गुन्हेगारांना गळे चिरून मारल्याच्या क्लिप्स येथे वापरल्या आहेत. शत्रूच्या गाड्या उडवल्याच्या आनंदात इस्लामिक स्टेटचे योद्धे नाचत आहे याच्या क्लिप्स आपल्याला पुढे दिसतात. इस्लामिक स्टेटचा एक योद्धा इराकचा झेंडा उचकटून टाकून देताना दाखवला आहे. गळे चिरून, शत्रूची विमानं, गाड्या उडवूनसुद्धा इस्लामिक स्टेटचे योद्धे आनंदाने नाचत आहेत, अशा क्लिप्सने व्हिडीओचा शेवट आहे.

लेखक : मुकुल रणभोर

(पूर्वप्रसिद्धी – अक्षर मैफल, फेब्रुवारी २०१८)