बेहोशीचा मार्क्सवादी ‘चेहेरा’ – चे गव्हारा

चे गव्हारा

लेखक - मुकुल रणभोर

तो आणि त्याचा एक मित्र, दोघंही मेडिकल क्षेत्रातले. मित्र आता प्रॅक्टिस करत होता. याच्या मात्र डिग्री परीक्षेच्या ३ टर्म पूर्ण झाल्या होत्या. शेवटची एक टर्म राहिलेली होती. आणि त्याचा आणि त्याचा बाबांचा सकाळचा संवाद त्याला आठवत असला पाहिजे, बाबा म्हणत होते, ”तो कुठंही जाणार नाही, अजून त्याची शेवटची टर्म भरलेली नाही.” त्यावर “ती थांबू शकते!” हे त्यानं दिलेलं उत्तर,सुद्धा त्याला आठवत असलं पाहिजे. नेहमीसारखं संध्याकाळी दोन मित्र चहा प्यायला किंवा ‘मेट’ (हे खास अर्जेंटिनियन पेय) प्यायला त्याच्या नेहमीच्या ठिकाणी भेटले असतील. दोघांच्याही डोक्यात हे नियोजन अनेक दिवस सुरु होतं. पण तो एक दिवस, समोर टेबलावर दक्षिण अमेरिकेचा नकाशा पसरलेला आहे. हातात बियरचे निम्मे भरलेले ग्लास. आणि अल्बर्टो शेजारच्या टेबलवर पेंगत बसलेल्या वृद्धाकडे बोट दाखवून त्याला म्हणतो, “तुला तुझं आयुष्य ‘तसं’ पाहिजे का? जी लॅटिन अमेरिका आपण फक्त पुस्तकातून वाचली ती आता प्रत्यक्ष पाहून येऊया. माझा तिसावा वाढदिवस मला तसा साजरा करायचा आहे.” नियोजन आहे ८००० मैलाच्या बाईक ट्रीपचं. अल्बर्टोच्या ‘नॉर्टन ५५ cc ला पोडेरोसा’वरून! दोघांच्यात समानता काय तर ‘स्वप्न पाहू शकणारी रम्यता’, एवढ्या भांडवलावर दक्षिण अमेरिकेचा प्रवास, हे उद्दिष्ट. तो सुद्धा चार महिन्यात, कारण परत येऊन मेडिकलची राहिलेली टर्म पूर्ण करायची आहे. अर्जेंटिनाची राजधानी ‘बेउनोस’ येथून ४ जानेवारीला निघायचं, असं पक्कं ठरवून त्याप्रमाणे पुढे जग बदलणारा क्रांतिकारक स्वतःचं जग बदलण्यासाठी निघाला.

एर्नेस्टो चे गव्हेरा! मार्क्सची क्रांती पुढे नेणारे, त्यात वैचारिक, तात्त्विक भर घालणारे अनेक विचारवंत नेते या जगानं पाहिले. सर्व देशांत आपापली भौगोलिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन तिथल्या विचारवंतांनी मार्क्सवादामध्ये देशाला अनुकूल असे बदलही केले. स्वतःला मार्क्सवादी म्हणवणाऱ्या अनेक विचारवंतानी मार्क्सला असलेल्या काळाच्या, स्थळाच्या, परिस्थितीच्या मर्यादा लक्षात घेऊन त्याच्यावर भाष्यं लिहिली. आमच्या या देशात असा एक मानवेंद्रनाथ रॉय होऊन गेला, त्याने १७ हून अधिक देशांत कम्युनिस्ट क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. चीनी कम्युनिस्ट पक्षाला माओच्या राष्ट्रव्यापी उदयाच्या आधी मार्गदर्शन करण्यासाठी लेनिननं रॉय यांना चीनमध्ये पाठवलं होतं. मार्क्स आणि त्याचे हे वेगवेगळे चेहेरे यांनी जगाचं विसावं शतक अक्षरशः आपल्या मार्गांनी वळवलं आहे.

या शतकात जे जे काही मूलभूत घडलं त्यामध्ये मार्क्स या ना त्या नात्याने गुंतलेला आहे. माझा असा अनुभव आहे की, साधारण वयाच्या विशीमध्ये बंडखोरी कोणाच्याही अंगात संचारत असते, त्याला सामाजिक अर्थ देणारा एक विचार त्याला मार्क्सच्या रूपाने सापडतोच. बहुतेक प्रत्येक माणसाला मार्क्सचं एका विशिष्ट वयात आकर्षण वाटतं. अशा वयात सामाजिक प्रश्नांची थोडी तरी झळ त्याला बसलेली असेल तर तो क्रांतीच्या प्रेरणेनं भरून जातो. असा हा मार्क्सच्या क्रांतीचा एक रम्य चेहरा म्हणजे ‘एर्नेस्टो चे गव्हेरा.’ टिपिकल उच्च मध्यमवर्गात त्याचा जन्म झाला. घरात असलेल्या अनेक भावंडांमध्ये याचा नंबर मधे कुठेतरी. लहानपणी अस्थमाचा आजार लागलेला आणि त्याच्यावर उत्तर म्हणून आपणच डॉक्टर होण्याचा निर्णय घेऊन, त्याप्रमाणं शिक्षण घेणारा एक टिपिकल युवक. त्याला एक गर्लफ्रेंड आहे, मित्राबरोबर केव्हातरी ड्रिंक्स घेणारा, कुटुंबात रमलेला असा हा तरुण डॉक्टर. फिरण्याची हौस असलेला. त्याच्या या जगप्रसिद्ध बाईक ट्रीपच्या आधी ‘आपल्याला हे जमतं का?’ हे बघण्यासाठी साडेचार हजार किलोमीटरची एक ट्रीप करून आलेला. पण मुख्यतः टिपिकल मध्यमवर्गीय मुलगा. डोक्यात कुठलेही क्रांतीची विचार न घेता अनुभव घेण्यासाठी बाहेर पडतो, जी अमेरिका आपण फक्त पुस्तकांतून पहिली आहे, ती प्रत्यक्ष पाहण्यासाठी. अजून डोक्यात मार्क्स, लेनिन शिरलेला नाही. पण घरात ‘डावं’ वातावरण. त्यामुळे डाव्या विचारांशी काहीशी जवळीक.

मी या लेखाच्या निमित्तानं म्हणून ‘चे’चं आयुष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याची एक-दोन चरित्रं वाचली. अर्थात माझा असा दावा नाही की मी अधिकारवाणीनं ‘चे’वर बोलू शकेन. तरी सुद्धा, मला जाणवली ती गोष्ट अशी की अनेकांनी त्याच्या गनिमी युद्धावर, क्यूबातील क्रांतीमधल्या त्याच्या सहभागावर, त्यानंतर तो काँगोमध्ये तिथल्या क्रांतीला मार्गदर्शन करायला गेला त्यावर, शेवटी बोलाव्हियामध्ये केलेले गनिमी प्रयत्न आणि शेवटी CIA च्या आदेशावरून संपवलेला चे याबद्दल खूप लिहिलं आहे, पण ज्या एका प्रवासामुळं तो या सगळ्याला प्रवृत्त झाला, त्या त्याच्या ‘मोटारसायकल डायरीज’वर तितकं लिहिलेलं नाही. मराठीमध्ये सुद्धा अरुण साधू यांनी ‘फिडेल चे आणि क्रांती’ लिहिलं, पण त्यातही त्यानं दक्षिण अमेरिकेचा दौरा केला आणि त्याचे ‘क्रांतीशिवाय पर्याय नाही’, हे पक्कं मत बनलं, इतक्या थोडक्यात ते प्रकरण त्यांनी संपवलं आहे. त्यामुळे आज मला ‘चे’च्या गनिमी तंत्रांमध्ये रस नाही, ‘बोलिव्हीयन डायरीज’मध्ये रस नाही. क्यूबामध्ये क्रांती यशस्वी झाल्यावर कॅस्ट्रोने त्याला अनेक मंत्रीपदं दिली, तिथं त्यानं काय काम केलं यातही रस नाही. क्यूबाचा मंत्री म्हणून त्याने केलेला जगाचा दौरासुद्धा आज आपण थोडा बाजूला ठेऊ. आज थोडं ‘चे’ गव्हेरा तयार कशामुळे होतो हे पाहू.

‘चे’ चं आयुष्य आपण भारतीय जास्त नीट समजून घेऊ शकतो असं मला वाटतं, याच कारण, तारुण्यातल्या ऊर्जा फारसा विचार न करता खर्च करणाऱ्या क्रांतीकारकांची संख्या आपल्याकडे कमी नाही. सावरकरांच्या गटात असे अनेक क्रांतीकारक होते, भगतसिंग हे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या त्यागाला कुठेही कमी न लेखता पण मला हे म्हणायचं आहे की, ब्रिटीश अधिकारी मारून, संपवून हा देश स्वतंत्र होणार नव्हता. त्यासाठी वेगळ्या कामाची गरज होती. पण देशातील तरुणांना प्रेरणास्थान वाटावं अशा गोष्टी भगतसिंगमुळे तयार होत असतात. माझ्या दृष्टीनं ‘चे’चं स्थान ते आहे. त्याने मार्क्सवादामध्ये फार मोठी तात्त्विक भर घातली, वैचारिकतेत भर घातली असं तर नाही. पण अर्जेंटिनापासून, इराण, इजिप्त, श्रीलंका, भारतापर्यंत सर्व देशांत प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धला लढा लढणाऱ्या तरुणाला प्रेरणा देणारा ‘चे’ असतो, तिथे एरिक हॉब्समन किंवा रोझा लक्झेंबुर्ग यांचा उपयोग नसतो.

म्हणून चे गव्हेरावर लिहायचा विचार डोक्यात आला तेव्हा आधी हे शीर्षक सुचलं. भारतामध्ये गांधीजी किंवा सावरकर ही अशी व्यक्तीमत्त्व होती, ज्यांच्या एका शब्दावर लोकांनी आपली आयुष्य अर्पण केली. मार्क्सच्या शब्दात ती जादू आहे. आज आपण मार्क्सची २०० वी जयंती साजरी करतो आहोत, आजही मार्क्सच्या नावानं जीवन समर्पित करणारे शेकडो कॉम्रेड्स तयार आहेत. मला वाटतं ते काहीसं स्वाभाविक आहे. जगात कोणाचंच शोषण होऊ नये, सर्व लोकं समान असावेत हे अगदी कोणालाही पटणारे विचार आहेत. शोषण करणारा कोणता वर्ग असू नये. साधारण या विषयाला पोषक अशा वातावरणात ‘चे’ लहानाचा मोठा झालेला आहे. अशा वातावरणात अंगात थोडी बेहोशी असलेला ‘चे’ वाढत होता.

त्याच्या ‘मोटारसायकल डायरीज’ या नोट्स वाचताना सुद्धा लक्षात येईल. सुरवातीला फारशी सामाजिक जाणीव त्याच्या नोट्समध्ये दिसत नाही. सुरवातीच्या नोट्समध्ये आईला लिहिलेली पत्रं आहेत. त्याच्या गर्लफ्रेंडला तो भेटतो त्याचं वर्णन आहे. त्या पोडेरोसा वरून अनेक वेळा ‘अवकाशसफर’ केल्याची वर्णनं आहेत. सुरवातीच्या पानात अगदी मोजके संदर्भ आहेत, त्यात अन्याय, गरिबीने त्रस्त जनता आपल्याला दिसते. याचा अर्थ आपल्याला दक्षिण अमेरिकेतील गंभीर सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करायला ही ट्रीप करायची आहे, अशी दृष्टी ठेऊन ‘चे’ आणि अल्बर्टो बाहेर पडलेले नाहीत. बाहेर पडल्यावर त्यांच्या अंगावर गंभीर सामाजिक प्रश्नांचे अनुभव कोसळलेले आहेत. अनपेक्षितपणे. इथे मला आठवण होते आमच्या गो. नी. दांडेकरांची. वयाच्या १३ व्या वर्षी घरातून पळाले आणि नानाविध प्रकारचे नानाविध अनुभव त्यांच्या अंगावर कोसळले. ते त्यांनी आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवले, वयाच्या स्थैर्याच्या काळात ते आठवून वाचकांची आयुष्ये समृद्ध केली. ‘चे’ला सुद्धा अनपेक्षितपणे अनुभवायला मिळालेली दक्षिण अमेरिका त्याने या नोट्सच्या माध्यमातून आणि मनात साठवून ठेवली. त्याला जोड मिळाली फिडेलच्या क्यूबा या रणक्षेत्राची आणि सर्वात मुख्य म्हणजे ते अनुभव वापरून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी लागणाऱ्या मार्क्स आणि लेनिनच्या तत्त्वज्ञानाची. फिडेल आणि मार्क्स-लेनिन जर त्याला भेटले नसते, तर कदाचित दक्षिण अमेरिकेमध्ये असलेला कुष्ठरोगाचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी ‘चे’नं आपलं आयुष्य खर्च केलं असतं. कॉम्रेड डांगे आपल्या लेखात आपल्याला मार्क्स-लेनिन उशिरा भेटले ही हळहळ व्यक्त करतात. बहुदा ‘चे’ बोलाव्हियामध्ये सैनिकांच्या ताब्यात असताना फिडेलचे आणि पर्यायाने मार्क्सचे आभार व्यक्त करत असेल.

मला भुरळ पडली त्या बेहोशीनं. क्रांतिकार्य करताना असे बेहोशीचे प्रसंग अनेक आहेत. असणारच आहेत. त्याच्या हा प्रवासाच सगळा बेहोशीनं केलेला आहे. त्यात असेच प्रसंग भरपूर आहेत. त्याच्या नोट्समध्ये एक वेळ ते अॅमेझॉनच्या एका काठावर येतात. तिथे कुष्ठरोग निवारण केंद्र असतं. तिथे हे दोघं डॉक्टर मदत म्हणून काही दिवस थांबतात. ‘चे’चा मूळचा स्वभाव हा मनमिळावू असला पाहिजे किंवा जगमित्र असला पाहिजे, सहसा लोकं त्याच्या सहवासात आल्यावर मित्र होतात. तिथे एका कुष्ठरोग झालेल्या मुलीला तो केवळ बोलून, तिच्याजवळ बसून ऑपरेशनसाठी तयार करतो. तिथले डॉक्टर्स अनेक दिवस प्रयत्न करत असतात, पण कोणाचेही प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत, ‘चे’ येतो, तिच्याशी बोलतो आणि ऑपरेशन होतं. ‘चे’च्या तिथल्या वास्तव्यात त्याचा वाढदिवस येतो आणि डॉक्टरांच्या या कँपमधला सर्वात लाडका मदतनीस म्हणून खूप उत्साहात तो साजरा करण्याचं ते ठरवतात. अर्थात डॉक्टरांच्या कँप मध्ये प्रचंड पसरलेल्या अॅमेझॉनच्या एका किनाऱ्यावर आणि कुष्ठरोग झालेले रोगी अॅमेझॉनच्या किनाऱ्याच्या दुसर्या कँपमध्ये. ‘चे’चा आग्रह असा की मला माझा हा वाढदिवस त्यांच्याबरोबर साजरा करायचा आहे. रात्रीचा डॉक्टरांच्या कँपमध्ये वाढदिवस साजरा करून झाल्यावर ‘चे’ कोणालाही न कळवता नदीच्या किनारी येतो, होडी आहे का शोधतो. अर्थात रात्रीची होडी त्याला मिळत नाही. लहानपणापासून अस्थमाने ग्रस्त असलेला हा’एर्नेस्टो चे गव्हेरा’ अॅमेझॉनच्या पाण्यात उतरतो. मागून अल्बर्टो त्याला शोधात येतोच, तेव्हा हा पाण्यात गेलेला आहे. अल्बर्टो ‘चे’ला शिव्या देण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही. अल्बर्टोच्या शिव्या ऐकून डॉक्टर बाहेर येतात, इकडच्या किनाऱ्यावर चाललेला गोंधळ ऐकून तिकडच्या किनाऱ्यावरचे कुष्ठरोगी बाहेर येतात. शिव्यांच्या बरोबर अल्बर्टोच्या डोक्यात भीतीनं अश्रू आलेले आहेत. ‘चे’ दमला आहे, हे त्याला कळतं आहे, समोरच्या किनाऱ्यावर ऑपरेशनसाठी तयार केलेल्या मुलीला माहिती आहे, याला अस्थमा आहे ते. ती चिंताग्रस्त झालेली आहे. पण ती बेहोशी सगळ्यावर मात करते. ‘चे’ पलीकडे पोचतो. सुखरूप! तिथे त्याचं भुंड्या हातानी पण कुष्ठरोगी डोळ्यात पाणी घेऊन स्वागत करतात. अल्बर्टो इकडे डॉक्टरांच्या कानात कुजबुजतो, मला खात्री होती, ‘चे’ हे पूर्ण करू शकेल.

त्याच्या गर्लफ्रेंडनी त्याला पंधरा अमेरिकन डॉलर कपडे आणण्यासाठी म्हणून दिलेले असतात. पण त्यांच्या या प्रवासाच्या दरम्यान त्यांचा अमेरिकन मायनिंग कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांबरोबर संपर्क येतो. त्यांची हलाखीची परिस्थिती ‘चे’ ला अस्वस्थ करते. चे आणि अल्बर्टोचे रोजचे खाण्याचे प्रश्न असताना पण ‘चे’ खिशातले पैसे त्या कामगाराच्या बायकोच्या हातावर ठेवतो. क्यूबामध्ये फिडेलच्या नेतृत्त्वाखाली क्रांतीची योजना करण्यात हा डॉक्टर आपल्याला उपयोगी ठरेल म्हणून ‘चे’ला बरोबर घेतलेलं आहे, पण तिथे सुद्धा बंदूक हातात घेण्याच्या कृतीमागे मला बेहोशी दिसते. बेहोशी हा शब्द मी विचारपूर्वक वापरण्याचं कारण असं की त्यात परिणामांच्या कल्पनेचा फारसा विचार केलेला नसतो. आपल्या इंस्टिंक्ट्सवर विश्वास असलेली ही माणसं असतात. हीच बेहोशी त्यानं फारसा विचार न करता माणसं मारली त्यात मला दिसते. क्रांती यशस्वी झाली. क्यूबामध्ये फिडेलनी त्याला मंत्रीमंडळात घेतलं. त्याचे साम्यवादी कार्यक्रम ‘चे’ पुढे नेऊ शकेल अशी खाती त्याच्याकडे दिली, पण क्रांतीची हौस अजून पूर्ण झालेली नाही. आपल्या मंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेला असताना त्याच्या डोळ्यासमोर ते त्याच्या या प्रवासाच्या दरम्यान पाहिलेले खाण कामगार येत असले पाहिजेत, पैसे आणि सुविधा नाहीत म्हणून कुष्ठरोग पसरतो आहे ते प्रदेश येत असले पाहिजेत. क्यूबामध्ये हवाना आणि मियामी सारखी अमेरिकन वासना पूर्ण करण्याची ठिकाणं पाहताना उरलेल्या लॅटिन अमेरिकेतील ती माणसं त्याच्या डोळ्यासमोर येत असली पाहिजेत ज्यांना दोन वेळेला सुद्धा जेवण मिळत नाही. त्याच्या त्या प्रवासाने त्याला याचं कारण सांगितलेलं होतं की ‘अमेरिकन भांडवलशाही’, साम्राज्यशाही जेव्हा संपेल तेव्हा हे प्रश्न सुटतील. समस्येचा विचार करताना आणि त्यावरच्या उत्तरांचा विचार करताना सुद्धा सम्यक विचारापेक्षा बेहोशीचा अंश अधिक आहे. ती बेहोशी त्याला क्यूबामधल्या मंत्रीमंडळाच्या ऑफिसमध्ये स्वस्थ बसू देत नाही.

काँगोमध्ये प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध स्थानिक शोषितवर्ग लढा उभा करतो आहे, हे तो क्यूबामध्ये बसून बघत असला पाहिजे. आपले क्यूबामधले अनुभव त्या लढ्याला द्यावेत, असा विचार करून तो क्यूबा सोडून गेला. क्यूबामधला मंत्रीपदाचा बंगला सोडून पुन्हा काँगोच्या जंगलात गेला. तिथे लढला.. हरला. पण लढला. अमेरिकेविरूद्ध सगळं अर्पण करून लढणारे एक.. दोन.. तीन व्हियेतनाम तयार करण्याचं स्वप्न त्यानं पाहिलेलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या पुस्तकातून पाहिलेल्या आणि नंतर बाईक ट्रीपवरून अनुभवलेल्या लॅटिन अमेरिकेत गेला. बोलिव्हिया! तिथल्या गनिमी युद्धात भाग घेतला. जगातल्या अँटी-एस्टॅब्लिशमेंट आंदोलनाला कायमस्वरूपी आयकॉन ठरेल असा CIA च्या हातून लढता लढता पकडला गेला आणि मेला. साम्यवादी विचार आणि इस्लामचा काहीही संबंध नसताना अयातुल्लाह खोमिनीच्या इस्लामिक रिव्होल्यूशनमध्ये ‘चे’चं प्रसिद्ध चित्र असलेले टीशर्ट घालून मुलं रस्त्यावर उतरलेली जगाने पाहिलेलं आहे. अरब स्प्रिंग, श्रीलंका, भारतातल्या चळवळी सगळीकडे ‘चे’चे टीशर्ट आपल्याला दिसतात. ही क्यूबन क्रांती जेव्हा घडत होती, चेला जेव्हा बोलाव्हियामध्ये CIA पुरस्कृत सैन्याने पकडलं तेव्हा भारतात अँटी-एस्टॅब्लिशमेंट आंदोलन उभं करू पाहणारे अरुण साधू त्या सगळ्या घटनांकडे लक्ष ठेऊन होते. हिंदुत्त्ववादी असलेले ‘माणूस’चे संपादक माजगावकर साधूंना सांगत होते, या सगळ्यावर माणूसमध्ये लिहा आणि साधू लिहित होते. ‘चे’च्या प्रामाणिकपणावर शंका अमेरिकेने सुद्धा घेतलेली माझ्या वाचनात आलली नाही. ‘चे’वर टीका करणारे लेख भरपूर आहेत, पण त्याच्या प्रामाणिकपणावर कोणीही शंका घेतलेली नाही. जगातल्या अँटी-एस्टॅब्लिशमेंट आंदोलनाला कायमस्वरूपी आयकॉन ठरला तो त्याच्या प्रामाणिक बेहोशीमुळे!