‘अक्षर मैफल’ – कार्ल मार्क्स विशेषांक – A warrior, an outlaw, a rebel! (part 1)

समता, शोषणमुक्ती यावर आधारित जग या पूर्वीदेखील मांडलं गेलं, मात्र यापैकी कोणीही ते जग गाठायचं कसं याबद्दल ठोस असं काहीच मांडलं नाही. तो मार्ग मार्क्सने दाखवला. ज्याच्याकडे गमावण्यासारखं काहीतरी आहे असा माणूस किंवा समाज गट क्रांती घडवायला उद्युक्त होऊ शकत नाही आणि प्रस्थापित वर्ग आपले अधिकार आपणहून सोडणार नाहीत, तेव्हा नुसत्या आदर्शवादी गप्पा चर्चा यांनी काहीही बदल घडणार नाही किंवा काही फरक पडणार नाही, क्रांतीचा ठोस कार्यक्रम असल्याशिवाय जग बदलणं शक्य नाही.

आज मार्क्स आपल्या समोर उभा आहे तो मुख्यत: एक विचारवंत आणि तत्वज्ञ या स्वरूपात. मात्र मार्क्स हा एक प्रचंड कृतीशील असा कार्यकर्ता देखील आहे, याचं भान अनेकदा आपल्याला नसतं आणि मार्क्सची कृतीशीलता प्राध्यापकी करत लोकांना अक्कल वाटण्याची नव्हती वा आयुष्याचं सगळं नीट मार्गी लावल्यावर जरा थोडं नाव मिळावं, ओळखी व्हाव्यात, आपण ज्या प्रवाहात आहोत तो प्रवाह यशस्वी झाला तर गेला बाजार कोणतंतरी पद मिळावं, जेणेकरून ‘थोर विचारवंतांच्या’ मांदियाळीत आपलं नाव सामील होईल, अशा स्वरुपाची देखील नव्हती. मार्क्सने आपलं आयुष्य क्रांतीसाठी वाहून घेण्याचं ठरवलं होतं, त्यामुळे 1844 ते 1860 या काळात युरोप खंडात घडणार्‍या प्रत्येक राजकीय उलाथापालथीवर अत्यंत बारकाईने नजर ठेऊन त्या उठावांना कष्टकरी वर्गाच्या क्रांतीचं स्वरूप देता येईल का, याच्या तो सातत्याने प्रयत्नात राहिला. या प्रत्येक घटनेशी त्याचा थेट संबंध होता आणि प्रशिया, बेल्जियम, अशा ठिकाणच्या उठावांत तो सामील होता. या काळात मार्क्सला जे अनुभव मिळाले त्यांच्या संचितावर त्याचं पुढील लिखाण उभं असल्याचं आपल्याला दिसतं.

मार्क्सच्या संपूर्ण जीवनात काळानुरूप बदलत जाणारा समाज आणि वास्तवाचं भान यामध्ये सातत्य आहे. आयुष्याची अखेरची 10 वर्षं सोडली तर तो आयुष्यभर काही ना काही तरी लिहित होता आणि आपल्या लिखाणाची उपयोगीतता शोधत होता. बदल आणि क्रांतीसाठी काम करायचं असं ठरल्यावर सुरुवातीला त्याने ‘र्‍हायनिश झिटूग’ या वृत्तपत्रात संपादक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि पुढे आयुष्यभर तो विविध वृत्तपत्रातून लिहित होता. मात्र केवळ वृत्तपत्रीय लिखाणाने क्रांती होऊ शकत नाही त्यासाठी अधिक भक्कम आणू सखोल कार्यक्रम लागतो याची जाणीव त्याला होती. मार्क्सच लिखाण धारदार आणि तर्कशुद्ध होतं तरी या लिखाणातून फार तर लोकांची जाणीव (awarness) वाढेल, त्यापेक्षा अधिक काही नाही. त्याच्याच शब्दात सांगायचं तर, असल्या लेखांमुळे क्रांती होते असे म्हणणे म्हणजे दुर्बिणीची दिशा बदलल्यामुळे नक्षत्रे फिरतात असे म्हणण्याजोगे आहे. असे असले तरी या काळात मार्क्सने केलेलं क्रांतीकार्य त्याच्या जीवनाची सार्थकता समजून घेण्याच्या द़ृष्टीने आवश्यक आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशात लिहिलेल्या टिपणात मार्क्सच्या जीवनाचा हा भाग मोजक्या पण प्रभावी शब्दांत मांडल्याने तो इथे उधृत करणं अधिक संयुक्तिक ठरेल.

फ्रेंच साम्यवादाचा अभ्यास करण्याकरता मार्क्स पॅरिसला गेला. फ्रेंच आणि जर्मन कामगारवर्गाच्या साम्यवादी संघटनांशी त्याचा संबंध आला. त्यात या संघटनांची विचारसरणी ओबडधोबड आहे, तिला नीट तर्कशुद्ध आकार नाही, हे मार्क्सच्या लक्षात आले; परंतु या कामगार संघटनांच्या जीवनाचा मानवी बंधुत्व हा स्थायीभाव झाला आहे; तो केवळ भाषेचा अलंकार राहिला नाही; हेही त्याला दिसले. याच काळामध्ये पहिला सुप्रसिद्ध ग्रंथ ‘इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्ट्स ऑफ 1844’ मार्क्सने लिहून काढला. याच वर्षी ‘टोअर्ड द क्रिटिक ऑफ द हेगेलियन फिलॉसॉफि ऑफ राइट’ हा निबंध प्रसिद्ध झाला. धर्म ही जनतेची अफू आहे, हा मार्क्सचा निष्कर्ष या निबंधात आला असून, कामगारांना उठावाचे आवाहनही त्यातच पहिल्यांदा आले आहे. जर्मन सरकारचे मार्क्सवर बारीक लक्ष होतेच. फ्रान्सच्या सरकारने जर्मन सरकारचा रोख लक्षात घेऊन मार्क्सला हद्दपार केले. 5 फेब्रुवारी 1845 रोजी मार्क्स ब्रूसेल्सला येऊन राहिला. त्याने जर्मन नागरिकताही टाकली.

यूरोपातील ‘द लीग ऑफ द-जस्ट’ नामक गुप्तमंडळी जून 1847 मध्ये लंडन येथे जमली आणि त्यांच्या बैठकीत राजकीय कार्यक्रम तयार करण्याचे ठरविण्यात आले. या मंडळींनी मार्क्सकडे एक प्रतिनिधी पाठवून त्याला विनंती केली, की तू आमच्या या लीगचा सभासद हो. मार्क्स एंगेल्ससह त्या लीगमध्ये सामील झाला. त्या लीगचे नाव बदलून ‘कम्युनिस्ट लीग’ असे ठेवले. मार्क्स आणि एंगेल्सना कार्यक्रम आखण्यास सांगितले. 1847 च्या डिसेंबरपासून 1848 च्या जानेवारी अखेरपर्यंत खपून कम्युनिस्ट जाहीरनामा त्यांनी तयार केला आणि तो लीगने स्वीकारला. त्यात प्रथम इतिहासाचा मुख्य सिद्धांत सांगितला. वर्गविग्रहाचा इतिहास हाच इतिहास होय; हा सिद्धांत प्रथम सांगून वर्गविहीन समाजरचना निर्माण होण्याकरता शेवटचा विग्रह कामगारवर्गाचा विग्रह होणार आणि त्या विग्रहाचा विजय होऊन शेवटी समताप्रधान साम्यवादी समाजरचना निर्माण होईल, असे भविष्य वर्तविले आहे. हा जाहीरनामा साम्यवादाच्या इतिहासामधील विचारांच्या प्रचाराचे एकमेव, अद्वितीय असे साधन ठरले.

फ्रान्स, इटली आणि ऑस्ट्रिया या देशांमध्ये 1848 च्या पूर्वार्धात क्रांतीची लाट उसळली. बेल्जियमचे सरकार मार्क्सला हद्दपार करणार हे लक्षात घेऊन या क्रांतिकारक गटाच्या एका सदस्याने मार्क्सला पॅरिस येथे बोलावून घेतले. एक जर्मन क्रातिकारकांचा गट पॅरिसमध्ये होता. जर्मनीवर आक्रमण करून जर्मनीला राजसत्तेच्या विळख्यातून सोडवण्याकरता जर्मनीवर आक्रमण करावे, असा बेत तो गट आखीत होता. हा आक्रमणाचा कार्यक्रम मार्क्सने अव्यवहार्य म्हणून असंमत केला. त्यामुळे मार्क्सबद्दल क्रांतिकारक नाखूष झाले. ऑस्ट्रिया व जर्मनीत क्रांती पसरतच होती. त्यामुळे मार्क्सला जर्मनीत परतावे असे वाटले. तेथे परतल्यावर कोलोन येथे कामगारक्रांतीचा कार्यक्रम अंमलात आणावा की लोकशाहीवादी शक्तीमध्ये तडजोड करून कामगारवर्ग आणि उदारमतवादी लोकशाही मध्यम वर्ग यांचे संयुक्त सरकार स्थापन करावे, असा प्रश्न पडला असताना मार्क्सने तडजेडवादी धोरण पुरस्कारिले. न्यू र्‍हाइनिश्चे झाइटुंग या नवीनच, 1849 जूनमध्ये स्थापन झालेल्या वृत्तपत्रात आपला दृष्टिकोन मार्क्सने मांडण्यास सुरूवात केली. जर्मनीच्या सम्राटाने बर्लिनची लोकसभा बरखास्त केली. त्याविरूद्ध मार्क्सने सशस्त्र उठाव करण्याला आवाहन केले. कोलोन या शहरात कामगारांच्या जमावापुढे भाषण केले. मार्क्सवर सरकारने राजद्रेहाचा खटला भरला. त्यात मार्क्सने आपली बाजू संविधानाशी सुसंगत आहे असे सिद्ध केले. जर्मनीचा राजाच घटनेविरुद्ध वागला हे दाखवून दिले. न्यायाधिश मंडळाने मार्क्सची बाजू मान्य करून त्याला दोषमुक्त केले; परंतु मार्क्सला घटनेच्या अनुसाराने संसदेची पुन्हा स्थापना करण्यात यश आले नाही. लोकांच्या उठावांचा उपयोग झाला नाही. 16 मे 1949 मध्ये मार्क्सला हद्दपारीची शिक्षा झाली त्याने चालविलेल्या वृत्तपत्राचा शेवटचा प्रक्षोभक अंक प्रसिद्ध झाला.

मार्क्स पॅरिसला गेला; परंतु तेथूनही त्याला हद्दपार व्हावे लागले. 1849 ऑगस्टमध्ये तो लंडनला कायम राहण्यास गेला. उदारमतवादी मध्यम वर्गाशी जुळते घेऊन लोकशाही पुरोगामी राजकारणावरील त्याचा विश्वास उडाला. लंडन येथील कम्युनिस्ट लीगमध्ये तो सामील झाला आणि डाव्या जहाल क्रांतीकारी राजकारणाचा पुरस्कार पुन्हा करू लागला. त्याला वाटले, की पुन्हा आर्थिक दुरावस्थेचा संकटकाळ जवळ येत आहे. क्रांतीची चळवळ पुन्हा वर उफाळून येणे शक्य आहे. परंतु ही आशा फार वेळ टिकली नाही. ज्यांचा आशावाद टिकला व प्रखर होत गेला अशा ऑगस्ट व्हॉन विलिचसारख्या क्रांतिकारकांना ‘लोखंडाचे सोने बनवणारे जादूगार क्रांतिकारक’ म्हणून तो हिणवू लागला. असे अधीर मनोवृत्तीचे क्रांतिकारक हे भौतिकवादी नसतात, असे त्याने सांगितले. ‘प्रत्यक्ष वास्तव घटनांच्या आधारेच क्रांती होते; केवळ क्रांतीची शुद्ध वासना क्रांतीला प्रसवू शकत नाही. आम्ही कामगारांना सांगतो की 15, 20, 50 वर्षे चालणारी अनेक यादवी युद्धे आणि राष्ट्रीय युद्धे परिस्थिती बदलून टाकतात; एवढेच नव्हे, तर तुम्हालाही बदलून टाकतात. तुम्हाला राजकीय सत्ता वापरण्यास समर्थ करतात. याच्या उलट तुम्ही सांगता की आपण राजकीय सत्ता त्वरित मिळविली पाहिजे.’

1848 हे वर्ष युरोपमधील राजकीय बंडे व त्यांच्या पराभवांचे वर्ष होय. या वर्षातील परिस्थितीचे पृथक्करण कार्ल मार्क्सने गंभीरपणे केले. निष्कर्ष काढला, की कामगारवर्गाचे वैचारिक शिक्षण पक्के व्हावयास पाहिजे. कामगार पक्षाने इतर पक्षांशी तडजोड करावी, ध्येयवादाला मर्यादा घालणे भाग पडले, मार्क्सचा 1850 ते 1864 हा काळ मानसिक यातना आणि कौटुंबिक व आर्थिक विवंचना यांमध्ये गेला. मार्च 1850 मध्ये तो, त्याची बायको, 4 लहान मुले यांना बिर्‍हाड सोडावे लागले आणि कर्जापायी होते-नव्हते तेवढे गमवावे लागले. मुलगा आणि मुली उपासमारीने व दीर्घ आजाराने वारली. फ्रान्झिस्का ह्या मुलीला पुरण्याकरता लागणारी पेटी विकत घेण्याकरता बायकोला कर्ज काढावे लागले. या कुटुंबाची सोहो येथे 6 वर्ष उपासमारीतच गेली. केवळ ब्रेड आणि बटाटे यांच्यावर गुजराण करावी लागली. सावकार कर्जवसुलीला आला म्हणजे मुले म्हणायची, की बाबा घरात नाहीत. सावकारांना चुकवण्याकरता एकदा मँचेस्टर येथे पळून जावे लागले. कार्ल मार्क्सची बायको मनाने खूप थकली. फ्रीड्रिख एंगेल्सची आर्थिक मदत पहिल्यांदा फारच थोडी येत होती. एंगेल्स मँचेस्टर येथे कारखान्यामध्ये कालांतराने भागीदार झाला तेव्हा म्हणजे 1864 मध्ये मार्क्सला तो पुरेशी आर्थिक मदत देऊ लागला. इतरही अनेक मित्रांनी आणि बायकोच्या नातेवाईकांनीही थोडीबहुत मदत केलीच; परंतु चणचण कायम राहिली. ब्रेड आणि बटाटे पुरेसे मिळतील याची तरतूद कायम झाली; एक अल्पसे उत्पन्न 1851 पासून सुरू झाले. द न्यूयॉर्क ट्रिब्यून या वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक चार्ल्स ए. डाना याने युरोपचा वार्ताहर म्हणून मार्क्सची नेमणूक केली. होरेस ग्रीली हा या वृत्तपत्राचा संपादक होता. फोरियरप्रणीत साम्यवादी विचारसरणीबद्दल त्याला सहानुभूती होती. 1851 ते 1862 पर्यतच्या कालावधीत सुमारे 500 लेख आणि संपादकीय मजकूर मार्क्सने पाठविला. त्यात एंगेल्सचाही चवथा हिस्सा होता. या लेखांचे विषय त्या काळचे सगळे राजकीय विश्व, त्यातील सामाजिक चळवळी आणि आंदोलने होती; भारत, चीन ते ब्रिटन आणि स्पेन यांचा अंतर्भाव केला होता. लंडन येथे दारीद्य्र आणि कौटुंबिक आपत्तीशी तोंड देत असतानाच कार्ल मार्क्सने आपला बौद्धिक व्यासंग अधिक निष्ठेने आणि एकाग्र चित्ताने चालविला. ब्रिटिश म्यूझियमचा त्याने चांगला उपयोग करून घेतला. मानवाचा आर्थिक आणि सामाजिक इतिहास या विषयावर त्याने आपले चित्त केंद्रित केले. इतिहासाची भौतिक उपपत्ती हा सिद्धांत त्याने ऐतिहासिक घटनांच्या आधारावर परिष्कृत केला. त्याची सारभूत मांडणी 1859 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘ए कॉट्रिब्यूशन ट्र द किटिक ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी’ या अर्थशास्त्रावरील त्याच्या पहिल्या पुस्तकात त्याने केली. इतिहासाची भौतिक उपपत्ती निश्चित कशी केली याबद्दल तो या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतो – जीवनाच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक प्रक्रियांचे सामान्य स्वरूप हे भौतिक जीवनामधल्या उत्पादनपद्धतीने निश्चित होते. माणसाची जाणीव माणसाच्या अस्तित्वाला आकार देत नाही; परंतु उलट त्याचे सामाजिक अस्तित्व त्याच्या जाणिवेला आकार देते.

हे मूलभूत सूत्र त्याच्या दुसर्‍या मूलभूत सूत्राचा आधार ठरते. तात्त्विक उपपत्ती आणि प्रत्यक्ष वर्तन याची नित्य सांगड असली पाहीजे; हे ते दुसरे मूलभूत सूत्र होय. पहिल्या मूलभूत सूत्राबद्दल मॅक्स वेबरसारख्या समाजशास्त्रज्ञांनी मतभेद व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे असे, की वैचारिक प्रेरणादेखील वास्तविक जीवनाला कलाटणी देऊन विकासाच्या वरच्या पायरीवर पोचवू शकते; इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीचे उदाहरण या संदर्भात विचारात घेतले असताना नीट उलगडा होतो. प्रॉटेस्टंट नीतिशास्त्राच्या प्रेरणेने इंग्लंडमध्ये उद्योजक हे औद्योगिक क्रांतीची रचना करण्यात यशस्वी झाले, असे मार्क्स वेबरने दाखवून दिले आहे.

1864 च्या अखेरीस मार्क्सने ‘इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन’ या संस्थेत शिरून एकलकोंडेपण संपविला. या संस्थेचा तो वैचारिक नेता बनला. 28 सप्टेंबर 1864 ला संस्थेची सार्वजनिक ठिकाणी सभा झाली; त्यात जर्मन कामगारांचा प्रतिनिधी म्हणून कार्ल मार्क्स उपस्थित राहिला. या संस्थेच्या एका उपसमितीवर त्याची नेमणूक झाली. या संस्थेला त्याच्या वृत्तपत्रीय दीर्घकालीन अनुभवाचा फार उपयोग झाला. त्याने या संस्थेपुढे एक लेखी व्याख्यान दिले. त्या व्याख्यानात सहकारी चळवळीच्या विधायक कार्याचे महत्त्व आणि संसदीय कायद्याचे महत्त्व दाखवून संथ गतीने ब्रिटीश कामगारांना राजकीय सत्ता जिंकता येईल, हे पटविण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेच्या सर्वसाधारण सभेचा सदस्य म्हणून मार्क्स याने जवळजवळ सगळ्या बैठकींना उपस्थित राहण्याचा नियम पाळला. निरनिराळे पक्षोपपक्ष, गट आणि उपगट यांच्यातील आपसातल्या मतभेदांना सामावून घेण्याची आणि सार्वत्रिक ऐक्यमत जास्तीतजास्त निर्माण करण्याची व्यवहारकुशलता मार्क्सच्या ठिकाणी या कालखंडात आढळून आली. या संघटनेची सदस्यसंख्या 1869 मध्ये आठ लाखांच्या पुढे गेली.

पॅरिस कम्यूनच्या पराभवानंतर ‘इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन’, या संघटनेमध्ये फाटाफूट होण्यास सुरुवात झाली. कार्ल मार्क्सने पॅरिस कम्यूनला उचलून धरले हे जॉर्ज ओजरसारख्या इंग्लिश मजूर नेत्याला मान्य नव्हते. इंग्लिश संसदेने 1867 साली कामगारवर्गाला मतदानाचा हक्क संमत केला. त्यामुळे कामगार संघटनांना राजकीय कृती करण्यास आवश्यक असे व्यापक स्वतंत्र्य लाभले. उदारमतवादी पक्षाला त्या वेळी इंग्लंडमध्ये महत्त्व होते. त्याच्याशी सहकार्य करून कामगारवर्गाचे प्रश्न चागल्या रीतीने निर्णित होतील, असा कामगार नेत्यांना विश्वास उत्पन्न झाला. त्यामुळे मार्क्सची भूमिका अतिरेकी म्हणून अमान्य झाली.

अराज्यवादी तत्त्वज्ञानाचा किंवा ध्येयवादाचा प्रणेता म्यिकईल अल्यिक्सांद्रव्ह्यिच बकून्यीन यांच्या प्रभावाखाली इंग्लंडच्या जनरल कौन्सिलमध्ये डावा गट वाढीस लागला. झारच्या कारागृहातून व सायबेरियाच्या हद्दपारीतून निसटलेला हा रशियन क्रांतीकारक मार्क्सच्या विरोधात उभा राहिला. दोघेही ‘पॅरिस कम्यून’चे पुरस्कर्ते होते. परंतु बकून्यीनला इटली, स्वित्झर्लंड, फ्रान्स इ. देशांतील तरूण अनुयायी मोठ्या प्रमाणात मिळाले. त्याने ‘इंटरनॅशनल अलायन्स ऑफ सोशल डेमॉक्रसी’ नावाची गुप्तमंडळी स्थापन केली. या गुप्तमंडळीला फर्स्ट इंटरनॅशनलमध्ये प्रवेश मिळू नये, म्हणून मार्क्सने अगोदरच बंदोबस्त करून ठेवला होता. मार्क्स हा जर्मन हुकूमशाहा आहे. असा बकून्यीनने त्याच्यावर आरोप ठेवला आणि मार्क्सविरुद्ध फर्स्ट इंटरनॅशनलमध्ये फळी उभी करण्याचा प्रयत्न केला. 1872 च्या हेग येथे भरलेल्या इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये मार्क्सने बकून्यीनवाद्यांचा पराभव घडवून आणला. जनरल कौन्सिलमध्ये बकून्यीनवाद्यांचा प्रभाव होताच. एंगेल्सने युक्त्या प्रयुक्त्या लढवून जनरल कौन्सिल हे लंडनहून न्यूयॉर्क येथे हलविले. बकून्यीनवाद्यांना फर्स्ट इंटरनॅशनलच्या जनरल कौन्सिलमधून हाकलून लावले. परंतु कौन्सिल न्यूयॉर्कमध्ये तग धरू शकले नाही; ते नष्ट झाले.

मार्क्सच्या क्रांती प्रति असणार्‍या विश्वासाचं आणि निष्ठेचं हे लोभसवाण दर्शन आहे. मार्क्सने क्रांती घडवून आणण्यासाठी आपलं जीवन अर्पूनही त्याच्या हयातीत क्रांती कधीच घडली नाही. क्रांतीसाठी एवढा सुसूत्र कार्यक्रम मार्क्सने दिलं मात्र त्याचा अंगीकार तो जिवंत असे पर्यंत केला गेला नाही. अशी अनेक मंडळी इतिहासाने बघितली की ज्यांनी तारुण्यात भव्य स्वप्नं पहिली. त्यांचा पाठपुरावा केला, मात्र आता स्वप्न साकार होण्याची शक्यता दिसेनाशी झाल्यावर मग त्यांनी त्याचा नाद सोडला आणि प्रस्थापित चौकटीत स्वतःला सामील करून घेतलं. मार्क्सला त्याच्या नंतरच्या आयुष्यात फारसं कोणीही ओळखत नसे, हा दाढीवाला बाबा कोण आहे याचं कोणालाही सोयर-सुतक नव्हतं. एकेकाळी हा एक क्रांतिकारी होता, एवढीच ओळख युरोपातल्या क्रांतीकारी वर्तुळात मार्क्सला उरली असतानाच्या काळात देखील, मी जे मांडतोय त्याचं मोल आज नाही कळलं तरी भविष्यात लोकांना ते गरजेचं आहे, या वृत्तीने पराभव, मानापमान असं काही जाणता मार्क्सने आपलं विहित कार्य पूर्ण केलं. म्हणूनच आजही मार्क्सची दखल आपल्याला घ्यावी लागते.

या लेखाचा पुढचा भाग या लिंकवर वाचता येईल.

http://aksharmaifal.com/200th-birth-anniversary-of-karl-marx-part-2/