‘अक्षर मैफल’ – कार्ल मार्क्स विशेषांक – A warrior, an outlaw, a rebel! (part 3)

अक्षर मैफल - कार्ल मार्क्स विशेषांक

या लेखाचा आधीचा भाग या लिंकवर वाचता येईल –

http://aksharmaifal.com/200th-birth-anniversary-of-karl-marx-part-2/

मार्क्स आणि एंजेल्स

मार्क्स आणि फ्रेडरिक एंजेल्स यांची पहिली भेट 28 ऑगस्ट 1844 ला पॅरीसमधल्या एका कॅफेमध्ये झाली. एंजल्स मार्क्स पेक्षा दोन वर्षांनी लहान. त्याचं एकूण शिक्षण बेताचंच, मात्र त्याला तत्वज्ञान आणि अर्थकारण यांची आवड. तो उत्तम लेखकही होता. मार्क्स आणि एंजल्स आर्थिक सामाजिक व्यावहारिक भावनिक अशा सर्वच पातळ्यांवर एकमेकांपेक्षा प्रचंड भिन्न. एंजल्स अत्यंत सधन कुटुंबातला होता. त्याचे वडील मॅनचेस्टर मधल्या एका कापड गिरणीमध्ये भागीदार होते. पुढे हीच भागीदारी एंजेल्सने देखील सांभाळली. दुसरीकडे मार्क्स म्हणजे अठराविश्वे दारिद्य्रात जगणारा. मार्क्स स्वभावाने तापट आणि उसळ्या होता, तो स्वतःला धांदरट म्हणवायचा. एंजेल्स मात्र स्वभावाने संयत आणि काहीसा थंड होता. दोघांची जीवनपद्धती टोकाची वेगळी होती. एंजेल्स कमालीचा टापटीप, कपड्यांच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ, पैसे आणि व्यवहाराला चोख, त्याला उच्चभ्रू वर्तुळात वावरायला आवडायचं. कुटुंब, नाती याबाबतीत तो औरच होता. त्याची अनेक प्रेमप्रकरणे झाली मात्र त्याने कधीही लग्न वगैरे केलं नाही. तर दुसरीकडे मार्क्स अत्यंत कुटुंब-वत्सल, टोकाचा अव्यवहारी, राहणीमान अजागळ म्हणावं इतकं सैलसर, अगदी असह्य झालं तरच केस-दाढी यांची ठेवण करणारा. त्याचं अभ्यासाचं टेबलदेखील अत्यंत अव्यवस्थितच असायचं. मात्र दोघांची वैचारिक नाळ पटकन आणि घट्ट जुळली. दोघेही अत्यंत जहाल बुद्धिवादी, ईश्वर-धर्म यांसारख्यांचे विरोधक, औद्योगिकरणामुळे कामगारांचे होणारे हाल त्यांना अत्यंत वेदना देत. शोषणावर आधारलेली ही व्यवस्था उलथवून टाकली पाहिजे, त्यासाठी झटलं पाहिजे याची दोघांचीही प्रेरणा अत्यंत तीक्ष्ण होती. मार्क्सला भेटल्याक्षणापासून एंजेल्सने बहुदा ओळखलं असावं की, हा माणूस आपल्या स्वप्नांना साकार करण्याची क्षमता राखतो. हे प्रकरण काही वेगळंच आहे. मात्र मार्क्सच्या घरातली गरिबी त्याचे होणारे हाल पाहून एंजेल्स प्रचंड गलबलून गेला. या एवढ्या द्रष्ट्या आणि प्रतिभावान माणसाला अभ्यासात व्यत्यय न येता त्याची काहीतरी सोय करणं ही आपली जबाबदारी आहे असं त्याला वाटल्याने त्याने स्वतः काम करायला सुरुवात केली जेणेकरून तो मार्क्सला महिन्याच्या खर्चासाठी कहीतरी रक्कम पाठवू शकेल. भविष्यात त्याला वडिलांच्या भागीदारीतून वर्षाला 800 पौंड मिळायला लागले तेव्हा तो त्यापैकी 350 पौंड मार्क्सला खर्चाला देत असे.

मार्क्सने आयुष्यभर नियमित पैसे मिळवून देणारं कोणतंच काम केलं नाही. लिखाणातून, भाषणांतून मिळणारे पैसे फारच तुटपुंजे आणि अनियमित असायचे. जेनी कधी घरच्यांकडून तर कधी नातेवाईकांकडून घर चालवण्यासाठी काही पैसे मिळतात का ते पहायची. पण तेदेखील क्वचितच मिळायचे आणि मिळालेच तरी फार कमी पडायचे. अशा स्थितीत एंजेल्सची मैत्री हा मार्क्स साठी दिलासा असायचा. मार्क्ससारख्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून प्रसंगी स्वतःला गरज असताना देखील तो मार्क्सला मदत करत राहिला आणि उपलब्ध चारित्रांवरून असं दिसतं की मार्क्स देखील हक्काने एन्जेल्स कडून मदत मागून घ्यायचा. यात कसलीच देवाण-घेवाण नव्हती. मात्र कधीकधी या अशा मदतीचे सल मार्क्सच्या देखील मनात राहिल्याचं दिसतं. दास कॅपिटल चं छपाईकाम सुरु असताना एका पत्रात मार्क्स म्हणतो की आता एकदा या पुस्तकाची रॉयल्टी मिळायला लागल्यावर आपण एंजेल्स कडून पैसे घायायचे नाहीत. (मात्र प्रत्यक्षात मार्क्सला या पुस्तकातून त्याला वाटल्याप्रमाणे भरपूर असं अर्थार्जन काही झालं नाही.) पण इतरवेळी मार्क्सची परिस्थितीच इतकी भयानक असायची की अशा मदतीखेरीज जगणं अशक्यच होतं. जग बदलण्याच्या प्रेरणेवर आणि उरी बाळगलेल्या क्रांतीच्या ध्येयाप्रती तो इतका समरस झाला होता की अर्थार्जनासाठी इतर काही काम करणे हा आपल्या वेळेचा अपव्यय आणि ध्येयाशी प्रतारणा आहे असं मानून त्याने कधीच नोकरी धंदा केला नाही.

आणि एंजेल्सने देखील या मदतीबद्दल कधीच शेखी मिरवली नाही. त्याच्याच शब्दात सांगायचे तर, मार्क्स बरोबर केलेल्या गेल्या चाळीस वर्षांच्या सहकार्यात आणि त्यापूर्वीही या विचारप्रणालीची रूपरेषा आखण्यात माझा हातभार निश्चितपणे लागला होता. ती विचारसरणी विवरण करून सांगण्यात तर माझा सहकार विशेषच होता. परंतु या विचारप्रणाली मधली मूलभूत स्वरुपाची तत्वे मांडणे, विशेषतः अर्थशास्त्र व इतिहासाच्या संदर्भात त्यांचा विशिष्ट अन्वयार्थ लावण्याचे काम हे निश्चितच मार्क्सने केले. मी त्याला जी मदत केली, त्यापैकी काही क्षेत्रातले खास अपवाद वगळले तर मार्क्स माझ्या मदतीशिवाय हे काम सहज करू शकला असता. मार्क्सने जे साध्य केले तेथवर मला कधीही जाता आले नसते. तो फार वरच्या स्तरावर उभा होता, त्याच्याकडे फार विशाल दृष्टी होती आणि प्राप्त परिस्थितीचा सम्यक वेध तो आम्हा इतर सहकार्‍यांपेक्षा फारच झटकन घेऊ शकत असे. मार्क्सविना कम्युनिस्ट तत्वविचार आज आहे तितक्या सुस्पष्ट स्वरूपात मांडलाच गेला नसता.

त्यांची मैत्री एकमेकांना पूरक होती. दोघांचीही क्रांतीवर श्रद्धा होती आणि ती होणारच हा विश्वास देखील होता. मात्र त्यांच्या हयातीत क्रांती कधीच सफल झाली नाही. एंजेल्सची मार्क्स मधल्या वास्तववादी तत्वाज्ञावर श्रद्धा होती, प्रेम होतं. स्वतः तत्वज्ञानाचा अभ्यास केला असल्याने त्यावेळे पर्यंतच्या तत्वज्ञानातील भोळ्या आदर्शावादाच्या मर्यादा त्याच्या लक्षात यायला लागल्या होत्या. सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्याच्या मानवी स्वभावाच्या सहज वृत्तीची त्याला जाण होती, किंबहुना तो स्वतः तशाच प्रकारचं आयुष्य जगत होता. मात्र आपण असे जगताना उर्वरित बहुतांश लोकं हलखीचं जिणं जगताहेत, तेव्हा त्यांच्यापर्यंत सुखाच्या सीमा नेऊन पोचवणे आणि त्यासाठी शोषणावर आधारलेलं जग बदलणे हे त्याचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला वास्तवाचा पाया असलेलं मूर्त रूप देणारा मार्क्स त्याला प्रिय होता. हायगेट च्या दफनभूमीत मार्क्सला दफन करेतेवेळी केलेल्या भाषणात एंजेल्स म्हणतो,

Just as Darwin discovered the law of development or organic nature, so Marx discovered the law of development of human history: the simple fact, hitherto concealed by an overgrowth of ideology, that mankind must first of all eat, drink, have shelter and clothing, before it can pursue politics, science, art, religion, etc.; that therefore the production of the immediate material means, and consequently the degree of economic development attained by a given people or during a given epoch, form the foundation upon which the state institutions, the legal conceptions, art, and even the ideas on religion, of the people concerned have been evolved, and in the light of which they must, therefore, be explained, instead of vice versa, as had hitherto been the case.

या लेखाचा पुढचा भाग या लिंकवर वाचता येईल –

http://aksharmaifal.com/http-aksharmaifal-com-200th-birth-anniversary-of-karl-marx-part-4/