‘अक्षर मैफल’ – कार्ल मार्क्स विशेषांक – A warrior, an outlaw, a rebel! (part 2)

अक्षर मैफल - कार्ल मार्क्स विशेषांक

या लेखाचा पहिला भाग या लिंकवर वाचता येईल.

http://aksharmaifal.com/200th-birth-anniversary-of-karl-marx/

मार्क्स, हेगेल आणि बरंच काही.

मार्क्स हा मुळातला तत्वज्ञानाचा विद्यार्थी. मानवी जीवनातील सत्याचा शोध ही प्रेरणा विद्यापीठात शिकत असताना त्यानेदेखील जोपासली होती. तो विद्यापीठात दाखल होईपर्यंत हेगेलचा बौद्धिक जगतावरचा प्रभाव अधिकाधिक ठळक होऊ लागला होता. हेगेलाच्या डायलेक्टीक्स (विरोधविकासवाद)चा जबरदस्त पगडा त्याकाळातल्या सगळ्याच अभ्यासकांवर होता. सुरुवातीला मार्क्सला ही विचारप्रणाली फारशी भावली नाही, त्यावेळी त्याचा कान्टच्या तत्वज्ञानाकडे अधिक ओढा होता. मात्र हळूहळू कान्ट किंवा फिश्तच्या Romantic Subjectivism सारख्या आदर्शवादी मांडणीत त्याचे मन रमेनासे झाले. याच वेळी तत्वज्ञानात गती असणार्‍या समविचारी मित्रांनी एकत्र येऊन हेगेलाच्या विचारावर चर्चा करण्यासाठी एक मंडळ तयार केलं. यासाठी मार्क्सने संपूर्ण हेगेल नीट वाचून काढला. इतिहासाच्या उत्क्रमात सातत्याने बदलत जाणार्‍या घटनांचे विवेकनिष्ठ आकलन आणि त्यामागील प्रेरणांचा हेगेलने केलेला ऊहापोह मार्क्सला आकर्षित करे. विरोधाला विरोध केल्याशिवाय विकास घडला जात नाही आणि प्रत्येक गहीतकाला विरोध केल्याशिवाय त्याचा पुढचा विकास घडत नाही, सबब निर्मिती ही एक अखंड प्रक्रिया आहे आणि सध्याचे वास्तव आणि त्यात घडणारा बदल यातल्या संघर्षांमधून नव्या वास्तवाची निर्मिती होत असते, या हेगेलच्या तर्ककठोर विवेचनामुळे मार्क्सने हेगेलीयन भूमिकेचा स्वीकार केला. त्यानेच लिहून ठेवलंय, कान्ट आणि फिस्ट निळ्या स्वर्गाकडे झेपावले दूरवरचा अमूर्त प्रदेश शोधण्यासाठी पण माझा शोध चालला आहे, प्रत्यक्ष सत्याचा जे मला सापडते रस्त्यारस्त्यामध्ये

प्रस्तुत घटनेला मार्क्सच्या वैचारिक प्रवासात मोलाचं स्थान आहे. इथवर येईपर्यंत मार्क्सचं तत्वज्ञानाविषयीचं प्रेम हे प्रामुख्याने अ‍ॅकॅडेमिक स्वरूपाचं होतं. मात्र हेगेलच्या विचारांनी मार्क्सला towards higher ends अशी दिशा मिळाली. पुढे मार्क्सने हेगेलचा देखील सैद्धांतिक पातळीवर विरोध केला, तो मांडला, मात्र तरीही आज आपण जो मार्क्स बघतो त्याची सुरुवात हेगेल पासून होते.

मानवी इतिहासाचा व्युत्क्रम आणि प्रेरणांचा एक वेगळा अर्थ हेगेलने मांडला. इतिहास म्हणजे केवळ राजे-राजवाडे, साम्राज्य, युद्धे यांची मालिका नसून इतिहासाच्या जडणघडणीत असणारी सुसूत्रता हेगेलने पहिल्यांदा मांडली आणि या सर्व घटनाक्रमांच्या मुळाशी मानवी ‘जाणीव’ (चैतन्य) हे मुख्य प्रेरक आहे अशी हेगेलची मांडणी. मानवाच्या विस्तारत जाणार्‍या जाणीवांचा व्युत्क्रम इतिहासात सापडतो आणि घडलेल्या किंवा घडू पाहणार्‍या घटना म्हणजे त्या जाणीवेचे विविध आकार असतात असा हेगेलचा इतिहास क्रमाविषायीचा सिद्धांत. थोडक्यात जाणीव ही इतिहासातील प्रेरकशक्ती (Moving Force) असते. यापैकी हेगेलची इतिहासाचा अर्थ लावणारी तर्कशुद्ध पद्धती मार्क्सला भावली मात्र इतिहासाच्या घडणीमधली प्रेरकशक्ती जाणीवेमध्ये नसून ती जड तत्वात, अर्थकारणात आहे. मानवाचा इतिहास हा त्याच्या आर्थिक आणि व्यवहारिक गरजांमधून घडतो हे मार्क्सने मांडलं. हेगेलने असं मांडलं की ‘जाणीव’ मानवी इतिहास आणि भविष्याला आकार देते मात्र मार्क्सला हे मान्य नव्हतं. ‘ए कॉट्रिब्यूशन ट्र द किटिक ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत तो म्हणतो, जीवनाच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक प्रक्रियांचे सामान्य स्वरूप हे भौतिक जीवनामधल्या उत्पादनपद्धतीने निश्चित होते. माणसाची जाणीव माणसाच्या अस्तित्वाला आकार देत नाही; परंतु उलट त्याचे सामाजिक अस्तित्व त्याच्या जाणिवेला आकार देते.

माणसाला जगण्यासाठी मूलभूत गरजा तीन – अन्न, वस्त्र आणि निवारा. आता या गरजा भागवण्यासाठी माणसाला काही वस्तूंची निर्मिती करावी लागते. सबब या निर्मिती प्रक्रियांवर ज्यांचा ताबा असतो तो गट समाजातला ताकदवान गट बनतो आणि समाजाचे नियमन तोच ठरवू पाहतो. नवीन निर्मिती करायला माणसाला निसर्गाशी संघर्ष करावा लागतो आणि माणूस आणि निसर्ग यांतील दुवा बनण्याचे काम श्रमशक्ती करत असते. तथापि समाजात घडणारं सर्व भौतिक प्रेरणांमधून घडतं त्याला जाणीव, चैतन्य असं काहीही नसतं.

आता माणसांच्या गरजेपेक्षा उत्पादनाची साधनं नेहमीच कमी असतात त्यामुळे या साधनांवर ताबा असणारा गट समाजातला सत्ताधारी वर्ग बनतो. स्वतःची सत्ता आणि स्थान टिकवून ठेवण्यासाठी तो उर्वरित जनतेच्या श्रमावर अवलंबून असतो आणि या श्रमाच्या माध्यमातूनच तो शोषणही करत असतो. परिणामत: प्रत्येक वर्गाला सामाजिक सत्ता मिळवायची असल्यास त्यांना उत्पादनाच्या साधनांवर ताबा मिळवणे आवश्यक असते आणि इतिहासाच्या संपूर्ण जडणघडणीत या सत्ता संघर्षाचा वाटा असतो. सबब संपूर्ण मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे अशी मांडणी मार्क्सने केली.

आधुनिक काळात उत्पादनाची सर्व मालकी ही मूठभर भांडवलदार वर्गाकडे आहे जो त्यातून मिळणारा नफा हा कष्टाने राबणार्‍या कामगारांच्या जिवावर लाटत असतो. उत्पादनाची साधने हाताशी धरून तो कामगार वर्गाला वेठीस धरू पहात असतो आणि यातूनच शोषण घडत असते, असमानता वाढत असते त्यामुळे मूठभरांच्या हातून उत्पादनाची साधने कष्टाकारांच्या हाती गेली पाहिजेत तरच समता स्थापन होण्याची शक्यता आहे. मात्र सत्ताधारी वर्ग आपले अधिकार आणि फायदे असे सहजासहजी सोडणार नाही. त्यामुळे समता स्थापण्यासाठी क्रांती अटळ आहे आणि हाच इतिहासाचा क्रम आहे अशी शास्त्रशुद्ध मांडणी समाजवादाच्या इतिहासात मार्क्सने पहिल्यांदा केली. या प्रेरणांमधून मार्क्सचा एका तत्वज्ञापासून एका विचारवंताकडचा प्रवास झालेला आपला दिसतो.

मी करू पहात असलेल्या या संपूर्ण मांडणीचा गाभाच मुळी हा आहे की, मार्क्स हा काही केवळ कामगारांचा किंवा सर्वहारा वर्गाचाच आयकॉन नाही. त्याच्या मांडणीमध्ये असणारे सारे थेट संदर्भ याच वर्गासाठीचे असले तरी सर्वहारावर्गाची हुकुमत यापाशी तो संपत नाही किंवा थांबत नाही. त्याच्या मांडणीची मूळ प्रेरणा ही स्वातंत्र्याची आहे आणि ते स्वतः वरचं माणसाचं नियंत्रण अधिक सबल करू पाहणार स्वातंत्र्य त्याला अभिप्रेत आहे. शोषणमुक्त समाजातील श्रममुक्त व्यक्ती हे त्याचं स्वप्न आहे. अर्थकारणाच्या रेट्यामुळे माणूस त्याच्या निसर्ग प्रवृत्तींपासून दूर होतो. भांडवल संचायाना मुळे मानवाचं एलिनेशन (परात्मभाव) वाढत जातं, माणसाच्या निवड स्वातंत्र्याची पायमल्ली होते. परात्मता ही केवळ कामगारांच्याच वाट्याला येते असं मानून चालण्याचं काही कारण नाही. कलेचे बाजरीकरण झाल्यामुळे कलाकार/कलावंत मंडळी, भांडवलादारासाठी काम करणारे शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि आपली बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आणि इतरत्र गहाण ठेवणारे बुद्धिजीवी लोक हे याच परात्मतेचे घटक आणि बळी असतात. तेव्हा अशा या व्यवस्थांच्या पलीकडे जाण्याचं स्वप्न म्हणजे मार्क्सला अभिप्रेत कम्युनिझम आहे.

समता, शोषणमुक्ती यावर आधारित जग या पूर्वीदेखील मांडलं गेलं, मात्र यापैकी कोणीही ते जग गाठायचं कसं याबद्दल ठोस असं काहीच मांडलं नाही. तो मार्ग मार्क्सने दाखवला. ज्याच्याकडे गमावण्यासारखा काहीतरी आहे असा माणूस किंवा समाज गट क्रांती घडवायला उद्युक्त होऊ शकत नाही आणि प्रस्थापित वर्ग आपले अधिकार आपणहून सोडणार नाहीत, तेव्हा नुसत्या आदर्शवादी गप्पा चर्चा यांनी काहीही बदल घडणार नाही किंवा काही फरक पडणार नाही, क्रांतीचा ठोस कार्यक्रम असल्याशिवाय जग बदलण शक्य नाही.

मार्क्सने केलेल्या धर्मचिकित्सेचं मूळ याचं विचारसूत्रात सामावलेलं आहे. विश्व जडतत्वावर उभं आहे आणि त्यावरच विश्वाचा विकास आधारलेला आहे त्यामुळे लौकिक जीवनाव्यतिरिक्त इतर कोणतेही अस्तित्व नाही. मार्क्स म्हणतो, माणूस धर्म निर्माण करतो, धर्म माणूस निर्माण करत नाही. अशी धर्म संस्थेच्या उगमाची मीमांसा मार्क्स करतो. (मात्र भविष्यात धर्माच्या आधारे मानवी मन घडत जाते यावर तो भाष्य करत नाही.) सत्ताधारी वर्गाने शोषित समाजाला त्याचे दु:ख विसरण्यासाठी उपलब्ध करून दिलेले साधन म्हणजे धर्म आहे. Religious suffering is the sigh of oppressed culture, heart of the heartless world and sould of soulless situation. मानवी जीवनावर धर्माने पसरवलेली गुंगी दूर केल्याशिवाय सत्य आणि समानतेवर उभी व्यवस्था निर्माण होणार नाही यामुळेच मार्क्स म्हणतो, धर्माची समीक्षा सर्वसमीक्षेचा प्रारंभ होय.

इथे मार्क्सच आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य जाणवतं, ते म्हणजे त्याला वास्तववाद आणि आदर्शवाद यांचा सुंदर समतोल जमलेला दिसतो आणि कदाचित हेच इतक्या वर्षांनी देखील मार्क्स कालसुसंगत राहण्याचं महत्वाचं कारण असावं. केवळ भविष्याचा वेध घेऊन कोणतीही चळवळ किंवा क्रांती घडू शकत नाही. जगाचे त्या-त्या वेळेचे प्रश्न पुढे करूनच तिला वेग धरावा लागतो. एकदा का ते मोमेंटम मिळालं की आता आपल्याला कुठवर जायचं आहे याचे निदर्शक हे त्या क्रांतीचे ‘आदर्श’ असतात. उदाहरणार्थ आज फ्रेंच क्रांतीचं मुख्य महत्व हे तिने प्रसूत केलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांसाठी आहे. असं असलं तरी ती क्रांती व त्या काळातल्या घटनांची प्रेरणा, या मूल्यांसाठी केलेली क्रांती अशी नव्हती. एका राजव्यवस्थेच्या निरुपयोगीतेला कंटाळलेल्या लोकांचा तो उठाव होता आणि मग या जनप्रवाहाला आपण नक्की कुठे जायचंय याचा निर्देश रुसो, वोल्तेयार आणि अशा अनेक फ्रेंच तत्त्ववेत्त्यांनी केला. मात्र लोकांना उठण्यासाठीचं शास्त्रीय कारण किंवा कार्यक्रम काही या मंडळीनी दिला नाही, त्यांनी आदर्श दिले. मार्क्स मात्र एकाचवेळी आदर्शही देतो आणि क्रांतीचा कार्यक्रमही. ही किमया त्याच्या पश्चात बहुदा एकट्या गांधीनाच सापडल्याचं आपल्याला दिसतं.

या लेखाचा पुढचा भाग खालच्या लिंकवर वाचता येईल –

http://aksharmaifal.com/200th-birth-anniversary-of-karl-marx-part-3/