संगीत नाटकांच्या पडद्यामागे…आठवणींचा ठेवा

Sangeet Natya - Natya Devata - Natraj

[Image Source: Link]

१९ व्या शतकाचा तो काळ म्हणजे संगीत नाटकांसाठी सुवर्णकाळ. या काळाने संगीत नाटकाला, प्रेक्षकांना पर्यायाने पुढच्या पिढ्यांना जे काही दिल ते एकंदर आत्ताच्या नाट्यसृष्टीचा भरभक्कम पाया आहे अस मला वाटत. कदाचित आमच्या पिढीने ती संगीत नाटक अनुभवली नाहीत पण त्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन करायला शब्द कमी पडू नयेत. साल असेल १८८० वगैरे तसही काळाची बंधन कलाकृतींना असतात कुठे म्हणा! रसिकांनी प्रचंड गर्दीने व्यापून टाकलेल सभागृह, नाटकासाठी चाललेली नाट्यकलावंतांची धडपड, स्टेजवर लावलेला सुगंधित धूप, पडद्याच्या पाठीमागे चालणारी कलाकारांची गडबड, धावपळ, एकीकडे नायकाने घेतलेले नायकाचे रुप आणि दुसरीकडे नायकाने घेतलेले नायिकेचे रुप दोघांच्या जुगलबंदीत बाकीच्या पात्रांची प्रवेशासाठी चाललेली पळापळ, नांदीचे पडघम चालू होताच स्थिरावलेला रसिक वर्ग आणि सरतेशेवटी या सगळ्यातून सर्वांवर आपली ओळख, देहभान विसरून रंगशारदेला प्रणाम करून अभिनयाची, गायनाची बरसात करणारे त्यात रसिकांना चिंब भिजवणारे नट. पण मला कायम या सगळ्यामागे किती तरी गोष्टी घडत असतील याचा विचार येतो. रसिकांना त्या माहितच असाव्यात असा अट्टहास नाही. पण पडद्याच्या मागे घडणाऱ्या गोष्टी सुध्दा किती लोभस असाव्यात यालाही सीमाच नाहीत. त्या गोष्टी सर्जनशील मनाला कळाव्या आणि अनेकांच्या आठवणींना उजाळा मिळावा त्यासाठी हा लेखप्रपंच.

विष्णुदास भावेंनी सर्वप्रथम मराठी नाटकाला ‘नाटक’ ही अवस्था प्राप्त करुन दिली. नाही म्हणायला गेलं तरी त्या अगोदर तंजावरच्या भोसलेराजांनी ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ हे नाटक लिहिले होते. कोकणात दशावतार, कर्नाटकात यक्षगान ह्यांचे खेळही चालायचे पण ती अवस्था नाटकाची नव्हती. हे सगळे प्रकार नाटकाचा जन्म होण्याच्या आधी केले गेलेले प्रयोग होय. विष्णुदासांनी पौराणिक कथांमधून नाटके बसवली. त्यांनी बसवलेले ‘सीतास्वयंवर’ नाटक तर लोकांनी खूप उचलून धरले. इतकेच नव्हे तर मुंबईच्या गव्हर्नरांनी या नाटकाचा प्रयोग लंडन मध्ये व्हावा अशी इच्छा भाव्यांकडे व्यक्त केली. पण तो काळ मोठा कर्मठपणाचा होता. परदेशी जाण म्हणजे प्रायश्चित्त आलं, माफी आली, लोकांचा राग आला त्यापेक्षा भाव्यांनी या गोष्टीला नकार दिला. कारण खूप सोसलं होत त्यांनी हे सगळ उभ करण्यासाठी. त्याकाळी नटाच तोंड पाहिल की लोक अशुभ मानत आणि अंघोळ करत. अर्थात या प्रकारे मराठी नाटक सातासमुद्रापार जायच राहिल खर पण मराठी नाटकात काही स्थित्यंतरं यायची होती. अजून तर सरस्वतीच्या पुत्रांच्या कलाकृती जन्माला यायच्या होत्या, प्रेक्षकांच्या अभिरुची संप्पनतेचा काळ सुरू व्हायचा होता. पौराणिक नाटकांचा काळ मागे पडला होता. इंग्रजांच्या अंमलाचा परिणाम म्हणा किंवा त्यांच्या नाटकाचा महाराष्ट्रात वाढणारा प्रभाव म्हणा यामुळे ‘बुकिश’ नाटकांचा जन्म झाला. बुकिश नाटक म्हणजे जी नाटक पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित होतात ती. या नाटकांनी वेगळीच दिशा मराठी नाटकाला दिली आणि आत्तापर्यंत देव, देव राक्षस राक्षस करणारी नाटक व्यवस्थित संहितेनुसार सादर व्हायला लागली.

मराठीतल पहिल बुकिश नाटक रंगभूमीवर आल ते म्हणजे श्री.वि.अ.कीर्तने यांच ‘थोरले माधवराव पेशवे’ (१८६१-६२). या नाटकात एकदा अतिशय मजेशीर प्रसंग घडला. त्याच झाल अस की श्रीमंत माधवरावांच्या निधनानंतर रमाबाई सती जातात असा नाटकात एक प्रवेश होता. त्या प्रवेशात रमाबाई पांढरे वस्त्र परिधान करून, कपाळी कुंकवाचा मळवट भरून, केस मोकळे सोडून सती जाण्यासाठी प्रवेश करतात. काही स्त्रिया तिची खणानारळाने ओटी भरतात. अर्थात या दोन्ही भूमिका पुरुष मंडळीच करत होती. रमाबाईची भूमिका विष्णू वाटवे करत होते. ते मुळात दिसायला सुंदर होते. त्यामुळे स्त्री भूमिकेसाठी ते अगदी योग्य होते. पण एका प्रयोगासाठी त्या नाटक कंपनीच्या मालकाने रमाबाईची ओटी भरण्यासाठी गावातल्या थोरामोठ्यांच्या काही प्रतिष्ठित बायकांना पाचारण केले. सीन सुरेख रंगला;मग काय विचारता? पुढच्या प्रयोगापासून सतीच्या दर्शनाला नि ओट्या भरायला स्त्रियांची तोबा गर्दी नाटकाला होऊ लागली. स्टेजवर गव्हा-तांदळाच्या नि खणा-नारळाच्या राशी पडू लागल्या! हाच प्रवेश दोन दोन तास चालू लागला. बिचारी रमाबाई (विष्णू) मात्र पार अवघडून आणि दमून जात असे. पुढे पुढे तर ओटी भरणे हा विषय गावातल्या लोकांसाठी प्रतिष्ठेचा झाला. रमाबाई हा पुरुष आहे ही भावनाच नाहीशी झाली. इतक सुरेख काम विष्णू करीत असे.

Old Marathi Theatre
[Image Source: Link]

पुढचा सगळा काळ संक्रमणाचा होता. आणि यात उदय झाला अण्णासाहेब किर्लोस्करांचा. कमिशनराच्या कचेरीत सुखेनैव नोकरी करणाऱ्या अण्णासाहेबांना नाटकाकडे वळावस वाटल हे मराठी नाटकासाठी भाग्याच पाऊल पडल. मग सुरू झाला सुकाळ एकाहून एक अजरामर कलाकृतींचा पहिल्यांदाच यातून बाहेर आल ते संगीत कालिदासकविविरचित ‘शाकुंतल’. हे नाटक रंगभूमीवर आणल मोरोबा वाघोलीकर, शंकरराव मुजुमदार, बाळकोबा नाटेकर या दिग्गजांनी. या नाटकाने संगीत नाटकाला एक अजब आणि म्हणाल तर महत्त्वाची गोष्ट दिली. यातील मोरोबा वाघोलीकर दुष्यंताची भूमिका करणार होते. पण ते पहिल्यांदाच नाटकात काम करत होते. त्यांचा गायक म्हणून नावलौकिक होता. पण अभिनय वगैरे ते पहिल्यांदाच करत होते. साहजिकच ते मनातून घाबरले होते. म्हणून ते त्यांचे आध्यात्मिक गुरु जंगली महाराज यांच्याकडे गेले नि म्हणाले,’महाराज तुम्ही आज नाटकाला या. तुम्ही असलात म्हणजे मला धीर येईल. माझे काम चांगले वठेल. त्यावर महाराज किंचित हसून म्हणाले,’अरे मोरु, मी कसा नाटकाला येणार? मी नाटक पहात नाही.’ यामुळे मोरोबा दादा नाराज झाले. त्यांची नाराजी महाराजांच्या लक्षात आली. लगेच ते म्हणाले, ‘अरे मोरु ये ऊदी घे. नाटकाच्या आधी हा ऊद घाल. तुझे काम सरस होईल.’ भाबडे मोरोबा एकदम खूष झाले. थिएटरवर येताना चांगला शेरभर ऊद-धूप घेऊन आले. खेळ सुरू होण्यापूर्वी महाराजांनी दिलेली प्रसादाची ऊदी त्यात मिसळून भक्तिभावाने तो सगळा ऊद-धूप घातला. मराठी रंगभूमीवर धूप दरवळला तो त्या दिवसापासून. त्या दिवशीचा शाकुंतलचा पहिला प्रयोग होता. तो दिवस होता ३१ ऑक्टोबर १८८० रविवार, आश्विन वद्य त्रयोदशी. नांदीचे सूर सुरू झाले आणि धूपाच्या सुगंधात न्हाऊन निघाले. त्यानंतर हा जणू अलिखित नियम झाला की संगीत नाटक म्हणजे धूपाचा दरवळ हवाच.

यानंतर किर्लोस्कर मंडळी खूप स्थिरस्थावर झाली. अण्णासाहेबांनी नव्या संहितेला हात घातला ती संहिता म्हणजे ‘संगीत सौभद्र’. सौभद्र नाटकातील सुभद्रेच्या पात्रासाठी एका गोड गळ्याच्या गायकाची आणि सुंदर पुरुषाची शोधाशोध सुरू झाली. ही शोध मोहिम येऊन थांबली ती बडोद्यातल्या बापूबुवा कोल्हटकरांचे कनिष्ठ पुत्र भाऊराव कोल्हटकरांपाशी. भाऊराव आले आणि किर्लोस्कर मंडळींना नवे अवसान आले. भाऊरावांकडे पाहून अण्णासाहेबांच्या लेखणीतून एकाहून एक सरस पद बाहेर पडत होती. सुवर्ण केतकीपरी जो दिसतो वर्ण नव्हे तो ससुरीचा’, ‘झाली ज्याची उपवर दुहिता चैन नसे त्या तापवि चिंता’ अशी सरस पद बाहेर येत होती आणि जणू पुढे येणार पद मागच्या पदाकडे बघून म्हणत होत, ‘बघ माझ्याकडे शब्दांची किती श्रीमंती दाटून आली आहे.’ अण्णासाहेबांनी मलाच अधिक सुंदर नटवलय बघ. तोच मागच पद म्हणत होत, ‘नाही नाही माझ्यामधील शब्दांचा भावार्थ हाच खरा दागिना आहे.’ अशी लाडिक भांडण कदाचित दोन पदांमध्ये लागली असतील इतकी सरस पद किर्लोस्करांनी लिहिली. पण त्याला न्याय दिला तो भाऊराव कोल्हटकरांनीच त्यांच्या गायनाने सौभद्रला सोन्याच्या कोंदणात बसवले. दिवसागणिक सौभद्र ची लोकप्रियता प्रचंड वाढली. भाऊराव आले आणि सौभद्र झाल. अर्थात त्यांच व्यक्तिमत्त्वच तस होत. एकदा लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी डेक्कन कॉलेज मध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यात किर्लोस्कर मंडळींना निमंत्रण होते. जेवणाची पंगत बसायच्या आधी श्लोक म्हणण्याची पध्दत होती. त्यावेळेला भाऊरावांनी सर्वांच्या आग्रहावरुन ‘देवी म्हणे अनार्या’ ही आर्या अशी सुरेल म्हणली की त्यांच्या गोड गायनाने जेवणारांचे हात थांबले. पुढचे १५-२० मिनिटे टिळक-आगरकरांसमवेत सारी पंगत स्तब्ध झाली. कोणाचे त्या गोड खाण्याकडे लक्षच जाईना कारण प्रत्येक जण भाऊरावांचे गोड सूर कानात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. भाऊरावांमुळे किर्लोस्कर कंपनीला प्रचंड यश मिळाले. पण भाऊरावांनी एक नियम काटेकोर पणे पाळला तो म्हणजे ते गातील तर फक्त किर्लोस्कर कंपनी साठी. इतरत्र कुठेही गाणार नाहीत. कारण त्यामुळे कंपनी फुटण्याची शक्यता होती. आणि अण्णासाहेब तर त्यांच दैवत होत. इतकी ध्येयवेडी, निष्ठावान माणसे किर्लोस्करला लाभली हे रसिकांच भाग्य होत.

यानंतरच्या काळात बालगंधर्व, गडकरी, केशवराव भोसले, केशवराव दाते, नानासाहेब फाटक इ. यांनी रंगमंच गाजवले. संगीत नाटकाची अखंड वाहणारी गंगा यांनी सुरू ठेवली पण या सगळ्यामागे किर्लोस्करांसारख्यांची पुण्याई होती, शेवटच्या काळात हलाखीचे दिवस काढणार्या नटसम्राट गणपतराव जोशींची पुण्याई होती, आयुष्यात आपल्या नवऱ्याच एक नाटक देखील न बघितलेल्या भाऊराव कोल्हटकरांच्या बायकोच्या त्यागाची पुण्याई होती, आयुष्यभर अण्णासाहेब किर्लोस्करांची सेवा करणाऱ्या आणि त्यांच्या निधनानंतर पुन्हा कधीही कोणाला न दिसणाऱ्या विसू न्हाव्याच्या प्रेमाची पुण्याई होती. किती जणांची नाव घ्यावी सांगावी तितकी कमीच. सर्वांनी मिळून नाटकाला मोठ केलं. पण हे मी केलं ते मी केलं हा अभिनिवेश बाळगला नाही. उलट जे चांगल दान या पारड्यात पडत गेल ते ते ही मंडळी उचलत गेली. कदाचित रंगमंच ही या सर्वांसाठी पंढरी होती. येथे जो येईल त्याने आपल्या परीने सेवेचा भार उचलावा त्यातल प्रेरणेच द्योतक पुढच्या पिढ्यांना द्याव आणि पुन्हा एकमुखाने सारे गात होते, ‘हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा’….

लेखक – प्रणव सतीश सदरजोशी

कथांचे संदर्भ: नाट्यपंढरी, लेखक: गो.रा.जोशी.

संपर्क – pranavsadarjoshi123@gmail.com